व्हर्व्ही, आल्बर्ट : (१५ मे १८६५ – ८ मार्च १९३७). डच कवी, लेखक व समीक्षक. ॲम्स्टरडॅम येथे जन्म. प्रारंभी डच काव्यास नवे वळण लावण्यासाठी पुढे सरसावलेल्या कविमंडळामध्ये तो अग्रस्थानी होता. ‘de manner van 80’ ह्या नावाने डच साहित्यात ही वाङ्मयीन चळवळ ओळखली जाते. ह्या चळवळीतून बाहेर पडल्यानंतर De Beweging (१९०५-१९) ह्या नियतकालिकातून त्याने वरील चळवळीविरुद्ध प्रखर प्रतिक्रिया व्यक्त केल्या. Tweemandelijksh (१८९४-१९०२) व De twintigste eeuw (१९०२-०५) या नियतकालिकांचा तो सहसंपादक होता. तसेच De Nieuwe Gids (इं. शी. द न्यू गाइड) ह्या नियतकालिकाचा तो संस्थापक होता. ह्या नियतकालिकांतून त्याने केलेल्या दर्जेदार लेखनामुळे डच साहित्यात नवे चैतन्य प्राप्त झाले. लायडन विद्यापीठामध्ये तो १९२५ ते १९३५ या काळात तो प्राध्यापक होता.

आल्बर्ट व्हर्व्ही

व्हर्व्हीने प्रारंभी संस्कारदर्शी काव्यरचना केली. परंतु नंतर मात्र तो प्रतीकात्मकतेकडे झुकला. Persephone (१८८३) हा त्याचा आरंभीचा उल्लेखनीय काव्यसंग्रह. त्याची काव्यरचना सामाजिक व सौंदर्यान्वेषी वृत्तीची निदर्शक आहे. Van de liefde die vriendschap heet (१८८५-८६, इं. शी. ऑफ द लव्ह मेन कॉल फ्रेंडशिप) ही त्याची उल्लेखनीय सुनीत-मालिका. डच कवी ⇨व्हिलेम योहान क्लूस (१८५९-१९३८) ह्या जिवलग मित्राबरोबरचे जिव्हाळ्याचे स्नेहबंध तुटल्यानंतरची उत्कट भावावस्था ह्या मालिकेच्या मुळाशी आहे. कॉर कॉर्डिअम (१८८६) ही त्याची आणखी एक महत्त्वाची रचना. त्याच्या अंतर्यामी अहर्निश वसत असलेल्या, अलौकिक अशा गूढ भावाचा प्रत्यय तीतून जाणवतो. अशा गूढ जाणिवांचे एक व्यापक प्रतीकात्मक स्वरूप त्याच्या Uit de lage landen bij de zee (१९०४, इं. शी. फ्रॉम द लो-लँड्स बाय द सी) या काव्यातून व्यक्त झालेले आहे. ‘स्व’ च्या नित्य नूतनीकरणाची संकल्पना त्याच्या Een dag in April (१९२६, इं. शी. ए डे इन एप्रिल) ह्या मुक्तछंदात्मक कवितेतून साकार झाली आहे. त्याचे लय-तालावरचे प्रभुत्व व प्रतिमानिर्मितीचे सामर्थ्य ह्या काव्यातून जाणवते. बेनेडिक्ट स्पिनोझा (१६३२-७७) आणि जर्मन कवी ⇨ श्टेफन गेओर्ग (१८६८-१९३३) या दोहोंचा त्याच्यावर प्रभाव आहे.

त्याचे प्रकाशित साहित्य Verzamelde gedichten (३ खंड, १९११-१२) व Proza (१० खंड, १९२१-२३) मध्ये अंतर्भूत आहे. Vondel Volledige dichtwerker (१९३७) ही ⇨योस्ट व्हान डेन व्हाँडेलच्या (१५८७-१६७९) रचनेची सटीक आवृत्ती त्याने संपादित केली. त्याने डच साहित्याचा इतिहासही लिहिला.

नूर्दविक आन झी येथे त्याचे निधन झाले.

पोळ, मनीषा