डच साहित्य : मध्युगाच्या आरंभी प्रथम लॅटिन आणि नंतर फ्रेंच ही नेदर्लंड्समधील सुशिक्षित वर्गाची शिष्टसंमत भाषा होती. डच ह्या तेथील प्रचलित लोकभाषेला मात्र अलिखित आख्यायिका व लोकगीते यांची मौखिक परंपरा होती. डच भाषेचा सर्वांत प्राचीन नमुना दहाव्या शतकारंभीच्या काही धर्मगीतांमध्ये (Wachtendonk Psalm Frangments) पहावयास मिळतो. डच साहित्याची खरी सुरुवात बाराव्या शतकापासूनच सर्वसामान्यपणे मानली जाते. विवेचनाच्या सोयीसाठी डच साहित्याच्या विकासाची (१) मध्ययुग, (२) सुवर्णयुग, (३) अठरावे-एकोणिसावे शतक व (४) विसावे शतक अशा चार कालखंडांत विभागणी करता येईल.

मध्ययुग : बाराव्या शतकापासूनचे डच साहित्य हे विविध प्रकारच्या पद्यमय शिलेदारकथांचे आहे. ह्या कथा यमकयुक्त पद्यांत असून त्या अमीर-उमरावांसाठी रचलेल्या आहेत. त्यांतून तत्कालीन यूरोपवर सत्ता गाजविणाऱ्या शिलेदारी जीवनाचे चित्रण आढळते. Reinaut van Montalbaen, karel ende Elegast, Malegijs Ferguut, Walewijn  ह्या डच शिलेदारकथा फ्रेंच कथामालांशी संबंधित असून त्यांत ‘सॅरासिन्स’ (अरब व मुस्लीम) विरुद्धच्या लढायांतील वीरांच्या कथा वर्णिल्या आहेत. ह्या कथा कितपत स्वतंत्र आहेत व कितपत अनुकरणात्मक आहेत हे ठरविणे कठीण आहे. रोमां द् ला रोझ (इं. भा. रोमान्स ऑफ द रोझ ) ह्या फ्रेंच रोमान्सच्या काही भागांची भाषांतरेही डचमध्ये झालेली आढळतात. या काळातील बरेचसे डच साहित्य डच लोकांच्या वैचारिक व सांस्कृतिक जीवनाचे सोळाव्या शतकापर्यंत प्रमुख केंद्र असलेल्या फ्लँडर्स भागात निर्माण झाले. एका अज्ञात फ्लेमिश सरदार कवीची ‘Het Kerelslied’ ही एक उल्लेखनीय भावगर्भ कविता. तीत उमरावांना फ्लेमिश समुद्रकिनाऱ्यावरील ग्रामीण लोकांबद्दल वाटणारी द्वेषाची व तिरस्काराची भावना ठळकपणे व्यक्त झाली आहे.

हॉलंड व फ्लँडर्स यांतील ‘कम्यून्स’नी (लहानलहान प्रशासकीय विभाग) सरंजामदारांकडून सत्ता काबीज केली. त्यानंतर डच साहित्य केवळ मूठभर सरंजामदारांसाठी राहिले नाही, तर ते सर्व समाजाचे साहित्य बनले. भाटांनी नाट्यप्रयोगांतून दिलेले नीतिमत्तेचे पाठ मनोरंजक होते. हाइन्रिख फोन फेल्डेके हा याच काळातील पहिला श्रेष्ठ कवी. Eneide (सु. ११८६) हे त्याने व्हर्जिलच्या ईनिड ह्या महाकाव्याचे एका फ्रेंच कृतीवरून केलेले भाषांतर होय. त्याची भाषा डच–जर्मनमिश्रीत असली, तरी ती डचला अधिक जवळची आहे. त्याच्या Eneide चा व प्रेमकवितेचा जर्मनीतील काव्यावर मोठा प्रभाव पडला. ‘मिनस्येंगर’ म्हणजे प्रेमकवी म्हणून तो प्रसिद्ध आहे. ब्रॅबंट येथील पहिला ड्यूक  यान याच्या सुंदर कवितांना विशेष लोकप्रियता लाभली. हेडविक (सु. १२००) ह्या ख्रिस्ती कवयित्रीची गूढवादी रचना तिच्यातील सखोल धार्मिक अनुभूतीमुळे विशेष लोकप्रिय होती पण ती आज उपलब्ध नाही. तन्मयता आणि कमालीचा प्रांजळपणा तिच्या रचनेत आढळतो. तिच्या बोधपर पत्रांमुळे नंतरच्या गूढवादी कवींना स्फूर्ती मिळाली.

डचमधील ‘रोमान्स’ विरुद्धची तसेच अमीर-उमराव वर्गांच्या शिलेदारी साहित्याविरुद्धची प्रतिक्रया व्हिलेम नावाच्या कवीच्या रेनर्ट वा रेनर्ड द फॉक्स  (सु. १२५०) ह्या काव्यापासून सुरू झाल्याचे दिसते. डच साहित्येतिहासकारांच्या मते रेनर्ट हे जागतिक साहित्यातील एक उत्कृष्ट ‘पशुकाव्य’ आहे. यातील रेनर्ट म्हणजे कोल्हा. हा संपूर्णतः व्यक्तिवादी, कपटी, उलट्या काळजाचा, प्रसंगी अत्यंत क्रूर असून त्याच्या मते जग हे फसव्या व मूर्ख लोकांनी भरलेले आहे. हा कोल्हा स्वतःचे व स्वतःच्या कुटुंबीयांचे वाटेल त्या मार्गाने समर्थन व संरक्षण करतो. आपल्या पडत्या काळात तो बुद्धिमत्तेचा वापर करून इतरांची व्यंगे हेरतो आणि त्यांची पिळवणूक करतो. कवीने ह्या काव्यातून तत्कालीन समाजाचे प्रतीकात्मक, मार्मिक व विनोदी पद्धतीने दर्शन घडविले आहे. जर्मानिक महाकाव्य आणि दरबारी रीतीरिवाज यांचे सुंदर विडंबन असलेला एक ग्रंथ आर्नाउट व व्हिलेम यांनी संयुक्तपणे लिहिला. बाराव्या शतकाच्या अखेरीस केलेल्या ‘Le Plaid’ ह्या फ्रेंच काव्याच्या डच अनुवादाचाही काही भाग उत्कृष्ट आहे. उत्कृष्ट विडंबनचित्रे आणि मार्मिक, सूक्ष्म विनोद यांनी विनटलेले हे साहित्य जगन्मान्यता पावले आहे.

अमीर-उमरावांच्या उच्च वर्गीय साहित्याच्या खुणा डिर्क पॉटर (१३७०–१४२८) या कवीच्या रचनेत रेंगाळताना दिसतात. पॉटर हा मुळात डच असलेला एक श्रेष्ठ कवी. त्याच्या काव्याची प्रेरणा व त्याची वृत्ती निर्मेळ मध्ययुगीन आहे. या काळातील अनेक पद्यकथांतून शिलेदारी युगाचे गुणविशेष टिकून असल्याचे दिसते. ह्या पद्यकथांचे वाङ्‌मयीन मूल्य मात्र अगदीच सामान्य प्रतीचे आहे.

ब्रूझ, गेंट, ईपर इ.फ्लेमिश नगरांतील नागरिकांना त्यांच्या सामर्थ्याची जाणीव आता होऊ लागली होती. आपण आपल्या कल्पनेनुसार एक संपन्न जीवन निर्माण करू शकतो, ही नवी आकांक्षा त्यांच्यात निर्माण झाली होती. इटलीतील नगरराज्यांचा आदर्श त्यांना प्रेरक वाटला. याकॉप व्हान मार्लांट (१२३५–१३००) या कवीचा जन्म ब्रूझजवळ झाला. त्याने तत्कालीन सर्वांगीण ज्ञानाचे विश्वकोशात्मक संकलन केले. फ्रेंच आदर्शांचा पगडा संपूर्णपणे झुगारून देऊन मूळ लॅटिन साहित्य तसेच बायबल यांचा त्याने ठाव घेतला. मानवी वर्तन आणि लोकव्यवहार यांवरील त्याचे भाष्य स्वतंत्र व मौलिक असून काही बाबतींत क्रांतीकारकही आहे. त्याच्या पुढे सेंट ऑगस्टीनच्या De Civitate Dei  (इं. शी. द सिटी ऑफ गॉड) या ग्रंथाचा आदर्श होता. डच साहित्यातील बोधवादी संप्रदायाचा तो प्रणेता मानला जातो. त्याने Rhyme Bible (१२७१), Secreta Secretorus, De Natura Rerum, Historia Scolastica, Spieghel Historiel  इ. ग्रंथ लिहिले. त्याच्या काही चांगल्या भावकविताही उपलब्ध आहेत. त्यांत तो आपल्या बांधवांना मोठ्या ओजस्वी व वक्तृत्वपूर्ण शैलीत नव्या धर्मयुद्धाकडे चालण्याचे आवाहन करतो. ‘सर्व डच कवींचा जनक’ म्हणून त्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो. यान व्हान बोंडल (१२८०–१३६५) या कवीची रचना पारंपारिक बोधवादी पठडीतील असून त्याने स्थानिक राजघराण्यांची यमकयुक्त इतिवृत्त लिहिली. हॉलंडमध्ये अशी इतिवृत्ते लिहिण्याचे काम मेलीस स्टोक (१२४०–१३१०) याने केले. यान डे व्हेर्ट हा बोधवादी कवी बोंडेलचा समकालीन होता.

तेराव्या-चौदाव्या शतकांतील भक्तीसाहित्यात अनेक अज्ञात कवींच्या भावकवितांचा समावेश होतो. शुद्धता, भावनात्मक खोली, आल्हाददायक व साधी, सरळ शैली इ. वैशिष्ट्ये त्या भावकाव्यांत आढळतात. भक्तिपर भावकवितेपेक्षा अधिक संपन्न रचना यान व्हान रॉइसब्रूक (१२९४–१३८१) या गूढवादी कवीची असून त्याचा हॉलंडमधील तसेच इतर देशांतील गूढवादी कवींशी घनिष्ट संबंध होता. द्रष्टेपण, अलौकिक प्रतिमा, उत्स्फूर्त आविष्कार इ. गुणांमुळे त्याची रचना त्याच्या सामकालीनांत वेगळी व उच्च प्रतीची ठरली. त्याचे गद्यलेखनही मध्ययुगीन डच साहित्यात सर्वोत्कृष्ट मानले जाते. डच मधील सर्वोत्कृष्ट बोधवादी साहित्याचा आविष्कारही त्याच्याच लेखनात आढळतो. त्याच्या साहित्यामुळे डच भाषेला लवचिकता आणि ओज प्राप्त झाले. त्याचा आध्यात्मिक प्रभावही सर्व यूरोपभर दीर्घकाळ टिकून राहिला. रॉइसब्रूक आणि त्याचा विश्वासू सेवक यान व्हान लेव्हेन यांनी तत्कालीन चर्चमध्ये चालत असलेल्या गैरप्रकारांविरुद्ध कडाडून हल्ला चढविला आणि चिंतनशील विवेकपूर्ण जीवनाचा हिरिरीने पुरस्कार केला. सुंदर साहित्यकृती निर्माण करण्याचा रॉइसब्रूकचा हेतू नव्हता तथापि निसर्गाच्या व माणसाच्या सूक्ष्मावलोकातून त्याच्या लेखनाला आध्यात्मिक महत्त्वासोबतच उत्कृष्ट साहित्यिक घाट व अर्थवत्ताही प्राप्त झाली. De chierheit der gheestliker Brulocht  (१३५०, इं. शी. द. ग्लोरी ऑफ द स्पिरिच्युअल मॅरेज) या त्याच्या प्रख्यात कृतीत त्याने जीवात्म्याचे ईश्वराशी मिलन साधताना जो प्रवास घडतो त्याचे उत्कृष्ट वर्णन केले आहे. त्याच्या कृतींची लॅटिनमध्येही भाषांतरे झालेली आहेत. 


Beatrijs (इं. शी. लेजंड ऑफ बीआट्रिस) ह्या काव्याचा कर्ता अज्ञात आहे तथापि रॉइसब्रूकच्या रचनेइतकीच ही रचना सरस आहे. ह्या काव्यात सर्वांत पापी माणसाबाबतही कुमारी मेरी ही ईश्वराजवळ मध्यस्थी करते, असे दाखविलेले आहे. १२२२ पासून यूरोपीय भाषांत प्रस्तुत विषय अनेकांनी हाताळला असला, तरी या विषयावरील सर्वोत्कृष्ट असे हेच डच भाषेतील काव्य आहे. ह्या काव्यातील चमत्कारयुक्त भाग धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचा असला, तरी त्यातील मानसशास्त्रीय खोली व काव्यगुण विशेष लक्षणीय आहेत. मध्ययुगीन नेदर्लंड्सच्या साहित्यातील ते एक मौल्यवान रत्न आहे. या काव्याच्या भावनिक प्रभावाची तुलना फक्त मध्ययुगीन डच साहित्यातील Elckerlyc (इं. शी. एव्ह्‌रीमन) याच्याशीच करता येईल. Elckerlyc  हे एक नाटक असून त्यात मुक्तीच्या वा अखेरच्या क्षणी जेव्हा माणसास सर्व जग आणि आप्तमित्र सोडून जातात, त्या वेळचे चित्रण आहे. इतर यूरोपीय भाषांतही हे नाटक अवतरले असून त्या सर्व नाटकांचे उगमस्थान मुळात एकच असले पाहिजे. त्याचे हे डच रूप मात्र सर्वोत्कृष्ट मानले जाते.

पंधराव्या-सोळाव्या शतकांतील डच साहित्यात सर्वांगांनी क्रांतिकारक परिवर्तन घडून आल्याचे दिसते. जवळजवळ सर्वच शहरांतून व खेड्यांतून साहित्यमंडळे उघडल्याचे दिसते. ह्या मंडळांतर्फे दर वर्षी अनेक नाट्यप्रयोग सदर केले जात तसेच अनेक सभासद आपली काव्यरचनाही सादर करीत. प्रत्येक साहित्यमंडळासाठी एका अधिकृत कवीची नेमणूक करण्यात येई. हा कवी आपली नाटके लिहून ती तेथे सादर करीत असे. प्रत्येक सभासदासही आपली साहित्यनिर्मिती करण्याचा आणि ती सादर करण्याचा अधिकार असे. हे नेमलेले अधिकृत कवी बहुप्रसव कवी असत. त्यांनी निर्माण केलेल्या काव्याचे धार्मिक, शृंगारिक व मनोरंजक असे तीन विभाग पडतात. ह्या अधिकृत कवींनी लिहिलेली ‘रिफ्रेन’ प्रकारातील, म्हणजे कडव्यात लिहिलेली, ध्रुवपदयुक्त कविता बरीच उपलब्ध आहे. त्यांतील धार्मिक विभागातील कविता सामान्य प्रतीची असली, तरी शृंगारिक विभागातील कविता मात्र चांगली आहे. ह्या शृंगारिक कवितेत लौकिक वीरगीतांचाही समावेश होतो. मनोरंजक विभागातील कविता निखळ करमणूक करणारी आहे. काव्यशास्त्राचे नियम काटेकोरपणे पाळूनही उत्कृष्ट रचना करणारा आंटोनिस डे रूव्हेरी (मृ. १४८२) हा या काळातील श्रेष्ठ कवी होय. आना बायान्स (१४९४–१५७५) ही कवयित्रीही उल्लेखनीय आहे. तिने आपल्या रचनेतून पारंपरिक रोमन कॅथलिक चर्चचा मोठ्या हिरिरीने प्रभावी पुरस्कार केला. ⇨ फिलिप व्हान मार्निक्स ऊर्फ बँरन सिंट आल्डेगाँडे (१५३८–१५९८) हा प्राँटेस्टंट पंथाचा कडवा अभिमानी होता व त्याने आपल्या औपरोधिक गद्यातून रोमन चर्चवर प्रहार केले. त्याने डेव्हिडच्या साम्सचे डचमध्ये भाषांतर केले काही उत्कृष्ट पुस्तपत्रे आणि अनेक संचलनगीतेही लिहिली. त्याच्या ‘wilhel-muslied’ ह्या प्रसिद्ध संचलनगीतास राष्ट्रगीताचा बहुमान लाभला.

सुवर्णयुग : धर्मयुद्धांच्या (क्रूसेड्स) परिणाम एकसंध नेदर्लंड्सची शकले होण्यात झाला आणि त्यामुळे डच साहित्याचे महत्त्वाचे केंद्र दक्षिणेकडून उत्तरेकडे गेले. सतरावे शतक हे डच साहित्याचे सुवर्णयुग मानले जाते. या कालखंडात सनातनी आणि परंपराभिमानी लेखकांनीही प्रबोधनाचा स्वीकार करण्यास सुरुवात केली. सुवर्णयुगातील सर्वोत्कृष्ट साहित्य काव्य, नाटक आणि सुखात्मिक ह्या साहित्यप्रकारांत आढळते. ⇨ योस्ट व्हान डेन व्हाँडेल (१५८७–१६७९) या श्रेष्ठ साहित्यिकाने डच साहित्यावर सु. दीड शतक आपला जबरदस्त प्रभाव टिकविला. त्याने डच साहित्यात आणलेल्या नवतेची व संवेदनशीलतेची तुलना रूबेन्स (१५७७–१६४०) व रेम्ब्रँट (१६०६–१६६९) यांनी फ्लेमिश चित्रकलेत आणलेल्या नवतेशीच करावी लागेल. व्हाँडेलने आपल्या लेखनात रूबेन्सच्या बरोक चित्रशैलीतील नाट्यमयात व भव्योदात्तता आणि रेम्ब्रँट याच्या व्यक्तिचित्रातील आत्मीयता, खोली व गूढता या गुणांचा सुरेख समन्वय साधला. तो श्रेष्ठ कवी व नाटककार होता. त्याने विपुल नाट्य व काव्यलेखन केले. y3wuoeph in Dothan (१६४०), Lucifer (१६५४), Jephta (१६५९), Adam in Ballingschap (१६६४), Noah (१६६७) ही त्याची महत्त्वाची नाटके होत. त्याची भावकविता Poezy (१६४७) आणि Poezy of Verscheide gedichten (१६८२) यांत संगृहीत आहे. ⇨पिटर कॉरनेलिसन होफ्ट (१५८१–१६४७) हा श्रेष्ठ नाटककार व कवी. त्याने अभिजात साहित्यातून स्फूर्ती घेऊन आपली साहित्यनिर्मिती केली. तो एक श्रेष्ठ इतिहासकारही होता. त्याच्या इतिहास लेखनात टॅसिटसच्या इतिहासलेखनातील काटेकोरपणा, मनोवेधकता इ. गुणांचा प्रत्यय येतो. Theseus en Ariadne (१६१४) ही त्याची उत्कृष्ट शोकामित्का असून Granida (१६१५) ही त्याची उत्कृष्ट गोपगीत मानले जाते. De Nederlandsche Historien (१६४२) हा त्याचा प्रसिद्ध इतिहासग्रंथ आहे. ⇨गेर्बांट ब्रेडेरो  (१५८५ – १६१८) हा कवी नाटककार असून त्याच्यावर एलिझाबेथकालीन इंग्लिंश नाटककारांचा प्रभाव होता. त्याच्या Het Moortje  (१६१५) व De Spaanschen Brabander (१६१७) ह्या सुखात्मिका आणि Klucht van de koe (१६१२), Klucht van den Molenaar (१६१३) व klucht van symen sonder soetigheyd (१६१३ ?) हि तीन प्रहसने विशेष उलेखनीय होती. ह्या काळातील अतिशय महत्त्वाचे डच लेखन म्हणजे बायबलचा Statenbijbel (१६३७) हा अधिकृत अनुवाद. ह्या अनुवादाच्या डच साहित्यावरील परिणामाची तुलना इंग्लंडच्या पहिल्या जेम्सने पुरस्कृत केलेल्या बायबलच्या (१६११) इंग्रजी अनुवादाशी व त्याच्या इंग्रजी साहित्यावरील परीणामाशीच करता येईल. बायबलचा डच अनुवाद प्रोटेस्टंट पंथाच्या भूमिकेतून केलेला असल्यामुळे तो रोमन कॅथलिक चर्चच्या प्रभावाखाली असलेल्या फ्लँडर्समध्ये लोकप्रिय झाला नाही.

सुवर्णयुगात इतरही अनेक लहानमोठे डच साहित्यिक होऊन गेले. त्यांत ⇨याकोप काट्स (१५७७ – १६६०) हा बहुप्रसव कवी असून त्याने मध्यम वर्गाच्या संकुचित व अहंमन्य वृत्तीवर आपल्या काव्यातून भाष्य केले. त्याची रचना बोधवादी व विनोदी असल्यामुळे त्याला बरीच लोकप्रियता मिळाली. निसर्गचित्रणात कधी कधी उत्कृष्ट भावनिक आविष्कार तो करतो. Maegdenplicht (१६१८), Houwelyck (१६२५), Spieghel van aen ouden ende nieuwen Tijdt (१६३२) Trouringh (१६३७) इ. त्याचे काव्यग्रंथ होत. ⇨ कॉन्स्टान्‌टाइन हॉइगेन्स (१५९६ – १६६७) हा एक सुसंस्कृत व सहिष्णु साहित्यिक असून त्याने Trijntje Cornelis (१६५३) ही उत्कृष्ट सुखात्मिका लिहिली. जॉन डनच्या काव्याचा अनुवाद करून त्याने डनचा हॉलंडला परिचय करून दिला. त्याने अनेक उपदेशपर कविता आणि चातुरोक्तीही (एपिग्रॅम्स) लिहिल्या. Korenbloemen (१६५८) मध्ये त्याची कविता संगृहीत आहे. यान लुइकेन ( १६४९–१७१७) याने आपल्या शृंगारिक कवितांचा एक खंड प्रसिद्ध केल्यावर स्वतःस धार्मिक लेखनास वाहून घेतले. त्याचे हे धार्मिक लेखन अधिक आकर्षक व माधुर्याने नटलेले आहे.

फ्लँडर्समध्ये अनेक प्रतिभासंपन्न कवींनी व लेखकांनी प्रॉटेस्टंट पंथास विरोध केला व रोमन कॅथलिक पंथाची बाजू घेऊन आपल्या पंथाचे हिरिरीने समर्थन केले. ह्या समर्थकांत कॅथेरीना बाँडेविन्स (१५२०–१६०५), रिचर्ड व्हेर्स्टेजीन (१५५०–१६४०), जे. स्टालपर्ट व्हान डर वायली (१५७९–१६३०) प्रभृतींचा समावेश होता. 


अठरावे-एकोणिसावे शतक : अठराव्या शतकातील डच साहित्यावर इंग्रजी साहित्याचा विशेष ठसा उमटलेला आहे. जस्टूस व्हान एफेन (१६८४–१७३५) याने हॉलंडला Spectatoriale geschriften चा परिचय करून दिला. हे एक नियतकालिक प्रकाशन असून त्यात लेखक सौम्य टीकेच्या स्वरात तत्कालीन नितिमत्तेवर व चालीरीतींवर भाष्य करतो. या प्रकारचे लेखन संपूर्णपणे लौकिक व धर्मनिरपेक्ष स्वरूपाचे असल्यामुळे ते विशेष लोकप्रिय झाले. या लेखनात त्या काळावरील मार्मिक टीपाटीप्पणी आढळतात. या काळातील डच साहित्यावर इंग्रजीशिवाय फ्रेंचचाही प्रभाव जाणवतो. रूसोच्या राजकीय विचारांच्या मानाने फ्रेंच लेखकांच्या सामाजिक व तात्त्विक विचारांचा प्रभाव डच साहित्यावर अल्प प्रमाणात जाणवतो. (१७५० ते १८५०) पर्यंतचे डच साहित्य हे प्रवृत्तीने स्वच्छंदतावादी पण भावविवश आहे. राइन्‌व्हिस फाइट (१७५३ – १८२४) हा या काळातील एक प्रतिभासंपन्न कवी, नाटककार व कादंबरीकार असून त्याच्यावर गटेच्या… वेर्थर चा विलक्षण प्रभाव पडला. त्याची भावकविता विशेष आकर्षक आहे. आख्ये डेकेन (१७४१–१८०४) आणि बेट्ये व्होल्फ (१७३८–१८०४) ह्या दोन लेखीकांनी सॅम्यएल रिचर्ड्‌सन ह्या इंग्रज कादंबरीकाराच्या प्रभावातून आपल्या कादंबऱ्या लिहिल्या. उत्कृष्ट मानसशास्त्रीय आकलन आणि उठावदार व्यक्तिचित्रण यांमुळे त्यांच्या कादंबऱ्या नेहमीच आवडीने वाचल्या जातात. Sara Burgerhart (१७८२) ही त्यांची पत्रात्मक कादंबरी विशेष प्रसिद्ध आहे. ⇨ व्हिलेम बिल्डरडाइक  (१७५६–१८३१) हा एक बहुप्रसव कवी व नाटककार. त्याने आपल्या काव्यांतून सर्वच विषय हाताळले. तो एक प्रतिभासंपन्न कवी होता. त्याची धार्मिक कविता, De ondergang der e rste wareld  हे अपूर्ण राहिलेले महाकाव्य तसेच काही बोधपर कविता विशेष प्रसिद्ध आहेत. डच साहित्यातील एकसूरी व साचेबंद वातावरणाला त्याच्या लेखनाने नवचैतन्य प्राप्त झाले.

ह्या काळात डचमध्ये विनोदी व वास्तववादी साहित्यही विपुल प्रमाणात निर्माण झाले. ⇨ निकोलास बेट्स (१८१४–१९०३) हा एक श्रेष्ठ लेखक असून त्याचा Camera Obscura (१८३९) हा दीर्घकथांचा व निबंधाचा संग्रह विशेष प्रसिद्ध आहे. या ग्रंथाचे डचमध्ये ४२ वेळा पुनर्मुद्रण झाले. बेट्सचे लेखन वैविध्यपूर्ण, रंजक व माणसाविषयीच्या अपार आस्थेने ओतप्रोत भरलेले आहे. ई. जे. पॉटगीटर, (१८०८–७५) हा एक विद्वान आणि आकर्षक शैलीचा स्वच्छंदतावादी लेखक. कवीपासून तो ज्ञानाची व स्फूर्तीची अपेक्षा करतो. वैचारिक संभ्रमाच्या काळात त्याने आपल्या लेखनाद्वारे लोकांना आपल्या देशाच्या गतवैभवाचे व थोरवीचे दर्शन घडविले. त्याच्या लेखनात कोठेही भपका व डामडौल नसून ते अत्यंत आकर्षक, साध्या, सुबोध शैलीने युक्त आहे. ईस्ट इंडिजच्या सरंजामदारी पिळवणुकीचा तीव्र निषेध करणारा Max Havelaar  हा खळबळजनक औपरोधिक ग्रंथ लिहून एड्यूआर्ट डाउवेस डेकर (१८२०–७७) एकदम प्रसिद्धीस आला. केवळ साहित्यिक दृष्ट्याच नव्हे, तर राजकीय दृष्ट्याही हा एक मोठा स्फोटक ग्रंथ आहे. डेकरने ‘मी खूप सोसले’ ह्या अर्थाचे ‘Multatuli’ हे टोपणनाव धारण करून अन्याय आणि मध्यम वर्गीय मनोवृत्ती यांविरुद्ध शेवटपर्यंत लढा दिला. त्याने विपुल लेखन केले आहे. झुंजार वृत्तीचा व उदार मनाचा एक श्रेष्ठ लेखक डच साहित्यात त्याला मनाचे स्थान आहे. त्याची शैली चमकदार असून त्याच्या जीवनवादी भूमिकेचे त्याच्या De Nieuwe Gids (इं. शी. द न्यू गाइड) ह्या नावाचे ‘रिव्ह्यू’तील लेखांतून येते.

ह्या ‘रिव्ह्यू’च्या प्रकाशकांनी डच साहित्यातील क्रांतिकारक व महत्त्वपूर्ण अशी प्रबोधनाची चळवळ १८८५ च्या सुमारास उत्तर नेदरर्लंड्समध्ये सुरू केली. म्हणूनच त्यांना सर्वसामान्यपणे ‘ De mannenr van 80’ म्हणजे ‘ऐशीतील माणसे’ म्हटले जाऊ लागले. त्यांनी शेली, कीट्स तसेच फ्रेंच निसर्गवादी, गाँकूर बंधू आणि एमिल झोला यांच्या साहित्याचा शोध घेतला. ‘कला ही अत्यंत वैयक्तिक स्वरूपाच्या भावनांची अत्यंत वैयक्तिक स्वरूपाची अभिव्यक्ती असते’, अशी भूमिका स्वीकारली. या प्रकारच्या भूमिकेमुळे ह्या परंपरेतील साहित्यनिर्मितीत कमालीचे वैविध्य निर्माण झाले. ⇨ हेर्मान गॉर्ट्‌र  (१८६४–१९२७) हा त्यांतील सर्वांत अधिक विशुद्ध रचना करणारा भावकवी होय. त्याने Mei (१८९९, इं. शी. मे) हे एक महाकाव्यही लिहिले असून ते फार लोकप्रिय आहे. पुढे गॉर्ट्‌र एक झुंजार साम्यवादी बनला. ⇨ व्हीलेम क्लूस (१८५९– १९३८) हा ह्या गटातील सर्वांत अधिक व्यक्तिवादी कवी होय. फ्रेडेरिख व्हान एडेन (१८६० – १९३२) याने आपल्या सकस लेखनाने डच साहित्य समृद्ध केले. एल्. व्हान डीसेल याने निसर्गवादाचा हॉलंडला परिचय करून दिला. तो एक वैशिष्ट्यपूर्ण कवी व चोखंदळ समीक्षकही होता. ⇨ आल्बर्ट व्हर्व्ही (१८६५–१९३७) हा एक बुद्धिमान व विद्वान कवी, समीक्षक व नाटककार. त्याने प्रथम संस्कारवादी कविता लिहिली पण नंतर तो प्रतीकात्मक कवितेकडे वळला. त्याने एक साहित्येतिहासही लिहिला. Persephone (१८८३) हा त्याच्या आरंभीच्या कवितांचा उल्लेखनीय संग्रह असून त्याचे गद्य Proza (१९२१–२३) मध्ये दहा खंडात संगृहीत आहे. Vondel Volledige dichwerken (१९३७) हि त्याने व्हाँडेलच्या रचनेची संपादून प्रसिद्ध केलेली उत्कृष्ट सटीक आवृत्ती होय. ⇨ लुई कुपेरस (१८६३–१९२३) हा ह्या गटातील सर्वदेशीय (कॉस्मॉपॉलिटन) लेखक असून त्याने मुख्यत्वे कादंबऱ्या व कथा लिहिल्या. त्याच्या कादंबऱ्यांत डच इतिहासाचे तसेच तत्कालीन समाजाचे उत्कृष्ट चित्रण आढळते. Eline Vere  (१८८९), Nordlot (१८९१), De Stille Kracht (१९००), De Boeken der kleine Zielen (४ खंड, १९०१–०४), De Komedianten (१९१७) इ. त्याच्या उल्लेखनीय कादंबऱ्या होत. त्याच्या कादंबऱ्यांची इतर यूरोपीय भाषांतही भाषांतरे झाली आहेत. आपल्या कादंबऱ्यांतून दंतकथांचा अर्थपूर्ण उपयोग कौशल्याने करून घेणारा कादंबरीकार तसेच आधुनिक जीवनाचा चाणाक्ष भाष्यकार म्हणून त्याला डच साहित्यात मनाचे स्थान आहे. 


विसावे शतक : विसाव्या शतकारंभी अठराशे ऐशीतील ‘रिव्ह्यू’ चळवळीचा जोर क्षीण होत गेला आणि त्याची जागा सामाजिक व नैतिक जाणीवेने घेतली. हेर्मान गॉर्ट्‌र व व्हान एडेन यांच्या लेखनात ही सामाजिक जाणीव आधीच व्यक्त झाली होती. विसाव्या शतकातील सामाजिक-नैतिक प्रेरणेतून रचना करणारे पुढील कवी व लेखक विशेष उल्लेखनीय होत : हेन्रिट्टे रोलंड होल्स्ट (१८६९–१९५२) हा एक प्रभावी भावकवी होता. प्राचीन अभिजात साहित्यातून स्फूर्ती घेऊन पी. सी. बाउटेन्स (१८७०–१९४३) याने उदातत्तेचे दर्शन घडविणारी विशुद्ध कविता लिहिली. अतिशय कोमल आणि बालसदृश भाववृत्तीतून रचना करणारा जे. एच्. लेओपॉल्ट (१८६५–१९२५) हा कवी उल्लेखनीय आहे. गद्यलेखकांत ए. व्हान शेंडेल (१८७४ –      ) या लेखकाचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे त्याने सर्वप्रथम निसर्गवाद नाकारून नव-स्वच्छंदतावादी प्रकारचे सुंदर गद्य लिहिले. रेम्ब्रँटच्या चित्रकलेत आविष्कृत झालेल्या नितिविश्वासारखे विश्व त्याच्या गद्यलेखनात साकार झालेले दिसते. १९०५ पासून नव्या दमाच्या लेखकांची पिढी डच साहित्याच्या क्षितीजावर चमकताना दिसते. ह्या १९०५ च्या पिढीतील लेखकांत अनेक गुणी कवींचा व गद्यलेखकांचा समावेश होतो. ए. रोलंड होल्स्ट (१८८८–  ) जे. सी. ब्लम (१८८७ –   ) पी. एन्. व्हान आयिक (१८८७–१९५४), जे. डब्ल्यू. एफ्. वेरूमेन्स बुनिंग (१८९१–    ), व्ही. व्हान ऱ्व्हिएस्लांड ( १८९२–    ), एम्. नायहोफ (१८९४–    ) ह्या कवींनी डच काव्यात नवे प्रवाह आणून ते समृद्ध केले. जे. स्लाउरहॉफ (१८९८–१९३६) व एच्. मार्स्‌मन (१८९९–१९४०) ह्या दोन प्रतिभासंपन्न व मान्यवर कवींचे अकाली निधन झाल्यामुळे डच काव्याची अपरिमित हानी झाली. तसेच मेन्नो टर ब्राक (१९०२–४०) व ई. ड्यू. पेराँ (१८९९–१९४०) ह्या दोन चोखंदळ समीक्षकांच्या ऐन उमेदीतील निधनानेही डच समीक्षाक्षेत्राची मोठी हानी झाली. यान ग्रेशॉफ (१८८८–   ) हा अष्टपैलू डच कवी, निबंधकार व समीक्षक उल्लेखनीय आहे. बी. आफ्‌जेस (१९१४ –   ) हा अत्यंत लोकप्रिय डच कवी होय. ए. हेल्मान (१९०३–   ) आणि ए डाँकर (१९०२–    ) हे वैशिष्ट्यपूर्ण लेखन करणारे साहित्यिक होत.

पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यानचा काळ हा चिंता, अस्थिरता, भ्रमनिरास यांच्या प्रभावाचा काळ होय या कालखंडातील गेरिट आच्‌टरबर्ग (१९०५–५२) व एडुआर्ट होर्निक (१९१०–  ) ह्या बुद्धिवाद-विरोधी (इर्‌‌रॅशनल) कवींच्या काव्यात फ्रॉइडचा प्रभाव थोडाफार जाणवतो तथापि सिमॉन व्हेस्टडिक (१८९८–  ) ह्याच्या १९५० च्या सुमाराच्या निबंध, गद्य व पद्यलेखनावर हा प्रभाव स्पष्टपणे पडलेला दिसतो. व्हेस्टडिक हा अलौकिक प्रतिभेचा बहुप्रसव लेखक आहे. उल्लेखनीय कादंबरीकारांत ए. एम्‌. डे जोंग (१८८८–१९४३), आंटून कूलन (१८९७–१९६१), ए. डेन. डूलार्ड (१९०१–  ), योहान फाब्रीत्स्युडस (१८९९–  ), आल्बर्ट हेल्मान (१९०३–  ), क्लेअर लेनार्ट (१९०४–  ), आर् व्हान डे वेर्फहोर्स्ट (१९०७ –  ) टन डे व्ह्रीस (१९०७–  ) यांचा अंतर्भाव होतो.

दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर डच काव्यात नवे चैतन्य निर्माण झाले. लीओ व्होर्मन (१९१५–  ), जे. बी. चार्ल्स (१९१०–  ), हान्स लॉडिझेन (१९२४–५०), गीयोम व्हान डर ग्राफ्ट (१९२०–  ), ल्यूसेबर्ट (१९२४–  ), पाडल रॉडेन्को (१९२०–  ), रेम्को कॅम्पर्ट (१९२९–  ), हान्स ॲड्र्यूस (१९२६–  ) या कवींनी फ्रान्स आणि अमेरिकेत विकसित झालेले नवप्रवाह डच काव्यात आणले. पारंपरिक स्वरूपाची रचना करणारे बर्ट्‌स आफ्‌जेस (१९१४–  ) आणि एम् व्हासेलिस (१९०९–  ) हे दोन प्रमुख कवी होत. नव्या पिढीतील कादंबरीकारांवर अस्तित्ववादाचा प्रभाव आढळतो. जेरार्ड कॉर्नेलिस व्हान हेट रेव्हे (१९२३–  ) आणि व्हिलेम फ्रेडेरिक हर्मान्स (१९२१–  ) हे अस्तित्ववादी परंपरेतील उल्लेखनीय कादंबरीकार होत. ॲना ब्लामन (१९०६–६०), ॲड्रिआन व्हान डर व्हीन (१९१६–  ), प्येरी एच्. ड्यूबोइस (१९१७–  ), हेल्ला एस्. हॅस (१९१८–  ), बर्ट शायरबीक (१९१८–  ), आल्फ्रेड कोसमान ( १९२२–  ), हॅरी मुलिश (१९२७–  ) हेही महायुद्धोत्तर पिढीतील उल्लेखनीय प्रातिनिधिक लेखक होत. ॲनी एम्. जी. श्मिट (१९११–  ), एस्. कार्मिगेल्ट (१९१३–  ) आणि ए. कुलहास (१९१२–  )यांच्या लेखनात डच विनोदाचे चांगले दर्शन घडते.

पहा : फ्लेमिश–बेल्जियन साहित्य.

संदर्भ :

1. Russell, J. A. Dutch Romantic Poetry, 1961.2. Weevers, T. Poetry of the Netherlands in Its European Context 1170–1930, 1960.

सुर्वे, भा. ग.