वानखडे, मनोहर नामदेव : (२० जानेवारी १९२४ – १ मे १९७८). व्यासंगी साहित्यसमीक्षक आणि दलितांच्या वाङ्‌मयीन-सांस्कृतिक चळवळींचे द्रष्टे नेते. अमरावती जिल्ह्यातील थुगाव येथे त्यांचा जन्म झाला. शालेय व महाविद्यालयीन जीवनात कुशाग्र बुद्धिमत्तेचा विद्यार्थी म्हणून त्यांचा लौकिक होता. इंग्रजी हा विषय घेऊन १९४५ साली ते बी.ए. झाले. इंग्रजीत सर्वाधिक गुण मिळविल्याबद्दल त्यांना ‘माधवराव चांदोडकर सुवर्णपदक’ देण्यात आले. १९४५ – ४७ ह्या काळात भारत सरकारची शिष्यवृत्ती (गव्हर्न्‌मेंट ऑफ इंडिया ओव्हरसीज स्कॉलरशिप) मिळवून ते इंग्लंडला उच्च शिक्षणासाठी गेले. तथापि प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे तेथील अभ्यासक्रम ते पूर्ण करू शकले नाहीत. १९५० साली ते एम्. ए. झाले. १९५१ ते १९६२ ह्या कालखंडात औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयात त्यांनी इंग्रजीचे अध्यापन केले. इंग्रजीचे ते विभागप्रमुखही होते. त्याच-प्रमाणे १९५८– ६२ ह्या काळात मिलिंद कला महाविद्यालयाचे ते प्राचार्य होते. १९६२ साली फुलब्राइट-स्मिथ-मड् शिष्यवृत्ती मिळवून उच्च शिक्षणासाठी ते अमेरिकेत गेले. अमेरिकेतील विद्यापीठांतून त्यांनी इंग्रजीचे अध्यापनही केले. त्यांच्या अमेरिकेतील वास्तव्यात ⇨ वॉल्ट व्हिटमन ह्या अमेरिकन कवीवरील भारतीय तत्त्वज्ञानाचा प्रभाव, या विषयावर त्यांनी संशोधन केले. १९६३ साली ए.एम्. व १९६५ साली त्यांनी पीएच्.डी. मिळविली. १९६६ मध्ये ते पुन्हा मिलिंद महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी आले व इंग्रजी विभागप्रमुख म्हणूनही काम पाहू लागले. मराठवाडा विद्यापीठाच्या (सध्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) कलाशाखेचे अधिष्ठाते, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य व अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळाचे तसेच साहित्य अकादमीचेही ते सदस्य होते. अमेरिकेतील त्यांच्या वास्तव्यात तेथील गोऱ्या लोकांचे सुखीसमृद्ध जीवन एकीकडे, तर ‘घेटो’ त जखडलेल्या निग्रो लोकांचे बकालपण दुसरीकडे, हे दृश्य त्यांना अंतर्मुख करण्यास कारणीभूत झाले. तेथील निग्रोंच्या वाङ्‌मयीन चळवळीचाही त्यांनी सखेल अभ्यास केला.  मिलिंद महाविद्यालयाचे प्राचार्य असताना त्यांनी दलित, उपेक्षित आणि बौद्ध विद्यार्थ्यांच्या व लेखकांच्या अस्मितेला फुंकर घातली. अस्मिता (नंतरचे अस्मितादर्श) हे त्रैमासिक रा. ग. जाधव, गंगाधर पानतावणे,डॉ. म. ना. वानखडे.रायमाने इत्यादींच्या साहाय्याने सुरू केले (१९६७). दलित साहित्यावरील विविध प्रश्नांची चर्चा त्यातून केली गेली. दलित साहित्याच्या घटनासिद्धीच्या प्रक्रिये-तील १९ व २४ नोव्हेंबर १९६७ रोजी झालेली आद्य चर्चा (‘महाराष्ट्रातील आज उद्याचा सांस्कृतिक संघर्ष आणि वाङ्‌मयीन समस्या’) रा. ग. जाधव, वा. ल. कुळकर्णी, मे. पुं. रेगे आणि म. भि. चिटणीस ह्यांच्यासह त्यांनीच घडवून आणली. विद्रोही साहित्य लिहिण्याची हाक त्यांनी दलित साहित्यिकांना दिली.

वानखडे यांचे अभ्यासपरिपूर्ण, मौलिक व मूलगामी अशा स्वरूपाचे लेखन अनेक ठिकाणी विखुरलेले आहे. मिळवता आलेल्या त्यांच्या सर्व लेखनाचा तसेच त्यांच्या भाषणांचा संग्रह दलितांचे विद्रोही वाङ्‌मय (संपा. वामन निंबाळकर, यशवंत मनोहर) ह्या नावाने प्रसिद्ध झाला आहे (१९८१). दलित साहित्याच्या प्रेरणा, विद्रोहाचे सत्त्व आणि सामर्थ्य, बौद्ध जीवननिष्ठा, निग्रो वाङ्‌मयाची प्रेरकता, दलित मिथ्यकथांची निर्मिती ह्यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवरील त्यांचे मौलिक विवेचन ह्या संग्रहातून उपलब्ध होते. तथापि त्यांची वाङ्‌मयदृष्टी केवळ दलित साहित्यापुरतीच मर्यादित नव्हती. टी. एस्. एलियटच्या द वेस्ट लँड ह्या प्रसिद्ध काव्याचे मार्मिक रसग्रहणही त्यांनी केले. दलित साहित्याची चळवळ ही मूलतः सांस्कृतिक परिवर्तनाची चळवळ असून पारंपारिक भारतीय समाजाचे आधुनिकीकरण करण्याच्या प्रक्रियेत ती आघाडीची चळवळ मानली पाहिजे, अशी भूमिका घेऊन दलित साहित्याला त्यांनी एक व्यापक भारतीय संदर्भ प्राप्त करून दिला. त्याचप्रमाणे दलित हे केवळ बौद्ध वा मागासवर्गीय नसून पिळवणूक झालेले सर्व जे जे श्रमजीवी आहेत, ते सर्व दलिताच्या व्याख्येत समाविष्ट होतात, हा विचार मांडला दलित साहित्य हे माणसाला केंद्रबिंदू मानते, माणसाच्या सुखदुःखांशी समरस होते आणि माणसाला सम्यक क्रांतीकडे घेऊन जाते ते माणसामाणसांत वैरभाव न पसरविता प्रेम पसरविते, ही आपली धारणा असल्याचे त्यांनी सांगितले. जुनी मूल्ये आणि परंपरा ह्यांच्या विरोधात पोटतिडिकेने बंडखोरी केली पाहिजे, अशी त्यांची धारणा होती.

भुसावळ येथे १९६७ साली झालेल्या बौद्ध साहित्यसंमेलनाचे आणि १९७६ साली नागपूर येथे भरलेल्या दलित साहित्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते.

अमेरिकेतील ह्यूस्टन शहरी कर्करोगाने त्यांचे निधन झाले.

मेश्राम, केशव