हॉइगेन्स, कॉन्स्टंटाइन : (४ सप्टेंबर १५९६–२८ मार्च १६८७). डच कवी, विचारवंत आणि मुत्सद्दी. द हेग येथे जन्म. त्याचे वडील क्रिस्तियान हे एक वैज्ञानिक होते. हॉइगेन्सने सात भाषांवर प्रभुत्व मिळविले होते. लेडन विद्यापीठात कायद्याचा अभ्यास केल्यानंतर त्याने राजनैतिक सेवेत प्रवेश केला. ह्या सेवेच्या निमित्ताने त्याला अनेकदा इंग्लंडचा प्रवास घडला. तेथील वास्तव्यात कवी जॉन डन आणिइंग्रज राजनीतिज्ञ व तत्त्ववेत्ता फ्रान्सिस बेकन ह्यांच्याशी त्याचापरिचय झाला आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने तो प्रभावित झाला. डनच्या१९ कवितांचा त्याने डच भाषेत अनुवाद केला. बेकनच्या प्रभावातून आधुनिक विज्ञानाचे संस्कार त्याच्यावर झाले. विज्ञानाधिष्ठित आधुनिकता-वादाचा त्याने स्वीकार केला असला, तरी धार्मिक बाबतींत तो जॉन कॅल्व्हिनचा अनुयायी होता.

 

हॉइगेन्सने आपले लेखन केवळ विरंगुळा म्हणून केले. आपल्या कवितेला तो आपल्या शेतातील ‘कॉर्न फ्लॉवर्स’ (१६५८ १६७२,इं. शी) म्हणून संबोधीत असे. ‘कॉर्न फ्लॉवर्स’ ह्या काव्यसंग्रहाच्यानावाप्रमाणेच ‘आयडलनेस ऑर एंप्टी अवर्स’ (इं. शी.) ह्या त्याच्या काव्यसंग्रहाचे नावही त्या दृष्टीने पाहण्यासारखे आहे. ‘एक्स्क्विझिटली फूलीश’ (१६२२, इं. शी.) ही त्याची फॅशनेबल शहरी स्त्रियांवरील एकतीव्र उपरोधिका आहे. एक प्रहसनवजा नाटकही त्याने लिहिले (१६५३). त्याने लिहिलेल्या ‘डेली वर्क’ (१६३९, इं. शी.) या आत्मचरित्रातून त्याच्या काळातील बौद्धिक वातावरणाचे सखोल भान येते.

 

द हेग येथे तो निधन पावला.

 

कुलकर्णी, अ. र.