मांडर, कारेल व्हान : (१५४८–२ सप्टेंबर १६०६). डच कवी आणि चित्रकार. जन्म आज बेल्जियममध्ये असलेल्या ग्यूलबेक येथे एका उमराव कुटुंबात. शिक्षण गेंट, कूर्‌ट्रे, तूर्ने आणि रोम येथे. शिक्षण झाल्यानंतर काही काळ त्याने धार्मिक विषयांवरील नाटके लिहिली. काही धार्मिक कविताही त्याने लिहिल्या आहेत. ह्या धार्मिक विषयांवरील नाटकांतील देखावे त्यानेच चित्रित केले होते. हार्लेम येथे त्याने एक कला- अकादमीही स्थापना केली होती. तथापि मांडरची कीर्ती आज त्याच्या Het Schilderboeck (१६०४, इं. शी. बुक ऑफ पेंटर्स) ह्या ग्रंथावर अधिष्ठित आहे. विविध कालखंडांत होऊन गेलेल्या चित्रकारांची त्याने लिहिलेली चरित्रे ह्या ग्रंथात अंतर्भूत आहेत. विख्यात इटालियन चित्रकार, वास्तुशिल्पी आणि कलेतिहासकार जोर्जो व्हाझारी (सोळावे शतक) ह्याने लिहिलेल्या ‘लाइह्‌व्ज ऑफ द पेंटर्स’ (इं. शी.) ह्या ग्रंथाइतकीच प्रतिष्ठा मांडरच्या ग्रंथास प्राप्त झाली ॲम्स्टरडॅम येथे तो निधन पावला.

देसाई, म. ग.