यिद्दिश भाषा-साहित्य : ज्यू लोकांमध्ये प्रामुख्याने बोलली जाणारी, अगोदर थाईच्‌ या नावाने ओळखली जाणारी आश्केनिझिक ज्यू जमातीची भाषा. हिला ज्यूडियो जर्मन असेही म्हणतात. धार्मिक व सांस्कृतिक वैशिष्ट्यांतून निर्माण झालेल्या वेगवेगळ्या ज्यू भाषांपैकी (लादिनो, ज्युदेओ–रोमॅनिक इ.) सर्वांत महत्त्वाची भाषा. १९०० च्या सुमारास सु. ७० लाख ज्यू ही भाषा यूरोपमध्ये बोलत असत. त्यानंतर सुरू झालेल्या नाझी हत्याकांडातून वाचून उरलेल्या ज्यू लोकांनी ही भाषा इझ्राएलमध्ये पुन्हा वापरात आणली आहे. आज सर्वांत जास्त बोलली जाणारी ही ज्यू भाषा आहे.

यिद्दिश भाषेची घडण सेमिटिक, जर्मानिक व स्लाव्हिक भाषांच्या घटकांपासून बनली आहे. अर्थात जर्मानिक भाषा तिच्या निर्मितीला जास्त आधारभूत आहे. जर्मानिक भाषेच्या वेगवेगळ्या बोली व त्यांच्या मध्ययुगीन विकासस्तरावरील बोलीभाषा (मध्य जर्मन व बव्हेरियन) या मिश्रणातून यिद्दिश वर्णव्यवस्था, पदव्यवस्था व वाक्यरचना यांचा मुख्य गाभा झाला आहे. सेमिटिक भाग बायबलकाळातील हिब्रू व ॲरेमाइक भाषांतून मुख्यतः सेमिटिक संस्कृतीमधील शब्द आणि वाक्‌प्रचार यांच्या रूपाने यिद्दिशमध्येच आला आहे. स्लाव्हिक घटकांतून पोलिश, श्वेतरशियन व युक्रेनियन भाषांतील शब्द व व्याकरणाचे काही भाग या भाषेत घेतले गेले आहेत.

यिद्दिश भाषा हिब्रू लिपीत उजवीकडून डावीकडे लिहिली जाते. एकोणिसाव्या शतकापर्यंत यिद्दिश पुस्तके आश्केनिझिक लिपीत छापली जात असत. यिद्दिश भाषेचे व्याकरण व शब्दसंग्रह स्थळकाळानुसार बदलत गेले आहेत. पश्चिम यिद्दिश भाषेतील व्याकरणविशेष जर्मन व्याकरणाशी मिळतेजुळते आहेत. दुसऱ्या यूरोपीय भाषांमधून अनेक शब्द, शास्त्रीय परिभाषाही त्यांत समाविष्ट आहेत. यिद्दिश भाषा भौगोलिक दृष्टीने दोन गटांमध्ये विभागली जाते : पश्चिम यिद्दिश व पूर्व यिद्दिश. ऐतिहासिक दृष्टीने तिचे प्राचीन, अर्वाचीन आणि आधुनिक असे कालखंड पडतात.

पश्चिम यिद्दिश : मध्य यूरोपमधील जर्मनभाषीय देशांमध्ये व त्यांच्या सीमावर्ती प्रदेशांत (हंगेरी, चेकोस्लोव्हाकिया, उत्तर इटली, हॉलंड) विसाव्या शतकापर्यंत वेगवेगळ्या बोलींच्या स्वरूपांत पश्चिम यिद्दिश बोलली जात असे पण हळूहळू तिचा ऱ्हास होऊन जर्मन भाषेने तिची जागा घेतली.

पूर्व यिद्दिश : हिचा विकास आश्केनिझिक ज्यूंच्या स्थलांतरानंतर मध्य यूरोपातून पूर्व यूरोपात जास्त होऊ लागला व ती भाषा रशिया व रूमानियामधील ज्यू लोक प्रामुख्याने बोलू लागले (लिटाऊ, पोलंड व पश्चिम रशिया). आज बोलली जाणारी यिद्दिश भाषा म्हणजे पूर्व यिद्दिश होय.

यिद्दिश भाषेचा उगम व इतिहास हा ज्यू लोकांचा धर्म, इतिहास व संस्कृती ह्यांच्याशी निगडित आहे. यिद्दिश भाषेचा जन्म बव्हंशी अकराव्या किंवा बाराव्या शतकात जर्मनीतील ऱ्हाईनलँड प्रदेशात झाला असावा. सेमिटिक संस्कृतीतील शब्द व हिब्रू लिपी या दोन घटकांच्या आधारावर या भाषेचा प्रामुख्याने विकास झाला आहे.

प्राचीन यिद्दिश (१५०० पर्यंत) : १२७२-७३ मध्ये पहिली नोंदली गेलेली भाषाकृती म्हणून एक काव्यपंक्ती व्होर्म्सच्या माखसोरमध्ये मिळाली आहे. चौदाव्या शतकाच्या शेवटापासूनची अनेक हस्तलिखिते उपलब्ध आहेत (उदा., केंब्रिज हस्तलिखित १३८२). पंधराव्या शतकापासून पत्रे, नोंदी, गुप्तसंदेश, उतारे, तसेच साहित्यिक आणि शास्त्रीय लिखिते मिळाली आहेत. ज्यूंवर होणाऱ्या अत्याचारामुळे बाराव्या ते चौदाव्या शतकांत सुरू झालेल्या ज्यूंच्या स्थलांतराने पश्चिम यिद्दिश भाषेत बरेच बदल घडत गेले व पूर्व यिद्दिश भाषेची हळूहळू सुरुवात होत गेली.

अर्वाचीन यिद्दिश (१५००१७५०) : हा काळ पश्चिम यिद्दिश भाषेचा सुवर्णकाळ व पूर्व यिद्दिशचा आरंभकाळ. पूर्व यिद्दिशमध्ये स्लाव्हिक शब्द व वाक्प्रचार यांचा अंतर्भाव होऊ लागला व मध्य यूरोपात ज्यूंच्या देशांतरामुळे यिद्दिश भाषेला या काळात बरेच महत्त्व प्राप्त झाले. पण अठराव्या शतकापासून यिद्दिश भाषेचा मध्य यूरोपवरील प्रभाव हळूहळू कमी होत गेला.

आधुनिक यिद्दिश (१७५० पासून) : दळणवळणाची भाषा म्हणून प्रामुख्याने बोलली जाणारी पूर्व यिद्दिश अठराव्या शतकापासून ज्यूंची मुख्य सांस्कृतिक भाषा म्हणून ओळखली जाते. आश्केनिझिक ज्यूंची ही मातृभाषा विसाव्या शतकात ज्यूंच्या देशांतरानंतर (यूरोपातून विशेषतः अमेरिकेत) आणि खास करून ज्यूंच्या नाझींकडून झालेल्या शिरकाणानंतर हळूहळू लय पावत आहे. तिचा पुररुद्धार करण्याचे बरेच प्रयत्न अनेक ज्यू भाषासंस्था करीत आहेत परंतु राजकीय, आर्थिक घडामोडी व सांस्कृतिक बदल यांमुळे यिद्दिश भाषेचा विकास विरळ होत चालला आहे.

तलगेरी, प्रमोद

यिद्दिश साहित्य : यिद्दिश साहित्याचा उदय मध्य युगात झाला. परंतु त्याचे जुन्यातले जुने उपलब्ध पुरावे प्रायः चौदाव्या शतकापासूनचे मिळतात. मौखिक परंपरेने निर्मिती झालेले, तसेच लेखनबद्ध झालेले, बरेचसे यिद्दिश साहित्य मुद्रणकलेच्या व योग्य जपणुकीच्या अभावी कालौघात नष्ट झाले असण्याची शक्यता आहे. मध्ययुगाच्या उत्तरार्धात यूरोपीय भाषांतील रोमान्स साहित्य यिद्दिशमध्ये अनुवादिले गेले आणि देशोदेशी भ्रमंती करणाऱ्या ज्यूंकडून त्यांचा ज्यू समाजात प्रसार झाला. बायबलमधील कथांवर आधारलेले धार्मिक स्वरूपाचे रोमान्सही या भाषेत लिहिले गेले. १५४४ मध्ये म्हणजे मार्टिन ल्यूथरने बायबल जर्मन भाषेत अनुवादिल्यानंतर १० वर्षांनी, पेंटाट्यूकची दोन यिद्दिश भाषांतरे करण्यात आली. TzehnoUrehno हा पेंटाट्यूकाचा (जुन्या कराराचे पहिले पाच भाग) स्त्रियांसाठी केलेला यिद्दिश सारांश सोळाव्या शतकाच्या अखेरचा. तो अत्यंत लोकप्रिय झाला होता. सोळाव्या शतकात एलियास लेव्हिटा (१४६९-१५४९) ह्या थोर लेखकाचे कर्तृत्व ठळकपणे नजरेत भरते. त्याचे व्यक्तिमत्त्व चतुरस्र होते. तो हिब्रूचा उत्तम अध्यापक आणि कवीही होता. भाषाशास्त्र आणि व्याकरण हेही त्याचे अभ्यासाचे क्षेत्र होते. लेव्हिटाने यिद्दिश भाषेत काही रोमान्सही लिहिले. यिद्दिश ही जर्मनपेक्षा स्वतंत्र भाषा असून स्वतंत्रपणेच वाङ्मयीन आविष्काराचे ती एक प्रभावी माध्यम होऊ शकते, अशी लेव्हिटाची धारणा होती. सर बेव्हिस ऑफ हँपटन या रोमान्सच्या इटालियन रूपांतरावरून Bovo d’ Antona हा त्याने लिहिलेला रोमान्स अतिशय लोकप्रिय ठरला.

सतराव्या शतकात इतिवृत्ते, विलापिका, भाषाविषयक मार्गदर्शक पुस्तके, नैतिक उपदेशपर लेखन असे विविध स्वरूपाचे साहित्य निर्माण झाले. या शतकात यिद्दिश भाषेत जी पुस्तके लिहिली गेली, त्यांतील एक भारतातील कोचीन शहरी राहणाऱ्या ज्यू समाजाच्या अभ्यासाला वाहिलेले असून यिद्दिश भाषेतील ख्यातनाम ग्रंथांत त्याचा अंतर्भाव होतो (सु. १६७५). ग्लीकेल नावाच्या स्त्रीने लिहिलेल्या संस्मरणि काही उल्लेखनीय आहेत. Kurantin हे यिद्दिश भाषेतील पहिले वर्तमानपत्र १६८६ मध्ये ॲम्स्टरडॅम येथे सुरू झाले. ते दर मंगळवारी आणि शुक्रवारी निघे.


अठराव्या शतकात जर्मनीत ज्यूंचे जर्मनीकरण करण्याचा प्रयत्न झाला, तर रशियामध्ये ज्यूंचे रूसीकरण करण्याची धडपड सुरू झाली. पोलंडमध्येही ज्यूंवर पोलिश संस्कृतीचे संस्कार करण्याचा प्रयत्न झालाच. अशा परिस्थितीत यिद्दिश भाषेची गळचेपी झाली. तथापि यिद्दिशमधील लेखन ह्या अडचणींना तोंड देऊनही चालूच राहिले. वाङ्मयीन गुणवत्ता असलेल्या साहित्यकृतींचा मात्र ह्या शतकात अभावच दिसून येतो. ह्या वेळेपर्यंत यिद्दिश ही विविध प्रदेशांतील ज्यूंची भाषा बनली होती. एकट्या जर्मनीतच नव्हे, तर इटली, स्वित्झर्लंड, बोहीमिया, हॉलंड या देशांतही यिद्दिश साहित्यनिर्मिती होत होती.

एकोणिसाव्या शतकात इझ्राएल आक्सेनफेल्ट (१७८७–१८६६) याने सु. तीस ग्रंथ रचिले. आधुनिक यिद्दिशमधील पहिली नाट्यकृती (लिट्ल सारा, इं. शी.) सॉलोमन एटिंजर (१८००–६५) या पोलिश डॉक्टरने लिहिली. व्हिल्नामध्ये आयझॅक मेयर डीकने (१८१४–९३) विपुल कथात्मक साहित्य निर्माण केले. यिद्दिश भाषेला कलात्मक अभिव्यक्तीचे प्रभावी माध्यम ज्याने बनविले तो ⇨मोखर सेफारिम मेंडेल (१८३५–१९१७) याने दीर्घकथा, सामाजिक कादंबरी अशा साहित्यातून समकालीन ज्यूंच्या जीवनाचे उपरोधप्रचुर चित्रण केले. झारच्या सत्तेखालील रशियात राहणाऱ्या ज्यूंच्या दुःखाचे रूपकात्मक चित्रण त्याने ‘द डॉबिन’ (इं. शी.) ह्या आपल्या ग्रंथात केले आहे. मेंडेलचा समकालीन आय्‌झॅक जोएल लिनिएट्झकी याने लिहिलेल्या ‘पोलिश बॉय’ (इं. शी.) ह्या पुस्तकाचा बराच बोलबाला झाला. ज्यूंच्या जीवनातील मागासलेपणाच्या काही बाबींवर त्याने ह्या पुस्तकात मार्मिकपणे बोट ठेवले. शोलेम अलेईकेम हा श्रेष्ठ विनोदकार. ज्यू जगतातील मार्क ट्‌वेन म्हणून तो ओळखला जातो. आय्‌झॅक लेब्युश पेरेट्सची (१८५१?–१९१५) ‘नाइट ऑफ द ओल्ड मार्केट प्लेस’ (इं. शी.) ही नाट्यकृती म्हणजे फाउस्ट या व्यक्तिरेखेचे ज्यू दृष्टिकोणातून घडविलेले दर्शन होय. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीअखेरीस यिद्दिश रंगभूमीत सुधारणा घडवून आणण्याचे प्रयत्त अमेरिकेत सुरू झाले. या संदर्भात जेकब गॉर्डीन ह्याने केलेली अनेक रूपांतरित नाटके उपकारक ठरली. १९१५ च्या सुमारास अमेरिकेत यिद्दिशमध्ये काव्यलेखन करणाऱ्या तरुण कवींचा एक गट उदयास आला. या कवींचा आत्मपरतेवर विशेष भर होता. डेव्हिड इग्नाटॉव्ह, जोसेफ ओपाटोशू आणि झीशा लँडो हे ह्या गटातील प्रमुख होत. पुढे जेकब ग्लॅट्‌स्टाइन यांच्यासारख्या कवींनी विषयाच्या आणि तंत्राच्या अशा दोन्ही अंगांनी यिद्दिश कवितेत लक्षणीय परिवर्तन घडवून आणले.

विसाव्या शतकातील यिद्दिश साहित्यिक विविध वाङ्‌मयप्रकार समर्थपणे हाताळीत आहेत. इझ्राएल सिंगर यांची ‘द ब्रदर्स आश्केनाझी’ (इं. शी.) ही ज्यूंच्या जीवनावरील, आधुनिक कालखंडातील एक श्रेष्ठ कादंबरी होय. शोलेम ॲश याच्या ‘गॉड ऑफ रिव्हेंज’ (इं. शी.) ह्या वादग्रस्त नाट्यकृतीचा उल्लेखही आवश्यक आहे. विसाव्या शतकातील विशेष उल्लेखनीय अशा यिद्दिश कादंबरीकारांत शोलेम ॲश, आयझॅक सिंगर, जोसेफ ओपाटोशू, इझ्राएल सिंगर, लिऑन कॉब्रीन (अमेरिका), झेड्. सेगालोव्हिट्स (पोलंड), डेव्हिड बेर्गलसन (सोव्हिएत रशिया) यांचा समावेश होतो.

जेकब गॉर्डीन (गॉड, मॅन अँड डेव्हिल, इं. शी.), हिर्शबेन (हाँटेड इन, इं. शी.), डेव्हिड पिन्स्की (ट्रेझर, इं. शी.), लिऑन कॉब्रीन (कंट्री स्वेन, इं. शी.) हे विसाव्या शतकातील काही नामवंत यिद्दिश नाटककार होत.

इतिहास, सामाजिक तत्त्वज्ञान, भाषाशास्त्र यांसारख्या विषयांवरही लेखन झालेले आहे आणि ज्यूंच्या सांस्कृतिक चळवळींना या लेखनाने मोठी प्रेरणा दिलेली आहे. यिद्दिश साहित्यिक हे अमेरिका, रशिया, पोलंड इ. विविध देशांतले असून त्या त्या देशातील एकंदर वातावरणाचे पडसाद त्यांच्या साहित्यकृतींतून अपरिहार्यपणे उमटलेले आहेत. यिद्दिश भाषेतील अनेक ग्रंथ जगातील अन्य भाषांत अनुवादिले गेले आहेत. यिद्दिश साहित्यावरील अभ्यासक्रम ज्यू नसलेल्या शिक्षणसंस्थांतूनही सुरू झालेले दिसत आहेत. ज्यू समाजावर आलेल्या अनेक आपत्ती यिद्दिश साहित्यिकांनाही अपरिहार्यपणे सोसाव्या लागल्या. नाझींनी अनेक यिद्दिश साहित्यिकांना ठार मारले परंतु जे उरले त्यांनी या साहित्याची परंपरा टिकवून धरली.

कुलकर्णी, अ. र.