चापेक, कारेल : (९ जानेवारी १८९०–२५ डिसेंबर १९३८). चेक नाटककार व कादंबरीकार. बोहीमियातील मॅलेस्व्हाटोनोव्हाइस येथे जन्म. चापेकचे शिक्षण प्राग, पॅरिस व बर्लिन विद्यापीठांतून झाले. १९१५ मध्ये प्राग येथील चार्लस विद्यापीठातून त्याने तत्त्वज्ञान या विषयात पीएच्.डी. मिळविली. काही वर्षे शिक्षकाचा व्यवसाय केल्यानंतर त्याने लेखनव्यवसाय पतकरला व लेखक आणि पत्रकार म्हणून तो प्रागमध्येच स्थायिक झाला.
आरंभीचे काही लिखाण त्याने आपला भाऊ यॉसेफ चापेक (१८८७–१९४५) ह्याच्या समवेत केले आहे पण लवकरच तो स्वतंत्ररित्या लेखन करू लागला. अगदी सुरुवातीसच लिहिलेल्या त्याच्या R.U.R. (Rossum’s Universal Robots, १९२०, इं.भा. १९२३) आणि Ze zivota hmyzu (यॉसेफ चापेकच्या सहकार्याने, १९२०, इं. भा. द इन्सेक्ट प्ले, १९२३) या नाटकांमुळे त्याला युरोपभर प्रसिद्धी मिळाली. या नाटकांतून त्याने यंत्रप्रधान आणि भौतिकवादी आधुनिक समाजातील विविध प्रश्नांचे व समस्यांचे अत्यंत भेदक चित्रण केले आहे. चापेकच्या R.U.R. या नाटकामुळे ‘रोबॉट’ हा नवीन शब्द इंग्रजीत रूढ व लोकप्रिय झाला. यानंतर चापेक कादंबरी लेखनाकडे वळला Tovarna na absolutno (१९२२, इ.भा. द ॲब्सल्यूट ॲट लार्ज, १९२७) व Krakatit (१९२४, इं.भा. १९२५) या कादंबऱ्यांतही उपयुक्त नाट्यकृतीतील विषयाचा प्रभाव आहेच. Krakatit मध्ये अणुकेंद्रीय भौतिकीचे विध्वंसक परिणाम आणि त्यांतून निर्माण होणारे नैतिक प्रश्न ह्यांचे पूर्वसूचन त्याने केले आहे. तथापि कलात्मक दृष्ट्या उच्च दर्जाच्या कादंबऱ्या म्हणून त्याच्या Hordubal (१९३३, इं.भा. १९३४), Povetron (१९३४, इं.भा. द मीटिअर १९३५) आणि Obycejny zivot (१९३४, इं.भा. ॲन ऑर्डिनरी लाइफ, १९३६) या कादंबरी त्रयीचा (ट्रिलॉजी) उल्लेख केला जातो. मानवी जीवनाचा अंतिम अन्वयार्थ शोधण्याचा त्यांत प्रयत्न आहे. व्यापक मानवतावादी दृष्टीकोण व उत्कृष्ट व्यक्तिचित्रण ही त्यांची वैशिष्ट्ये होत.
कादंबरी व नाटके ह्यांशिवाय चापेकने प्रवासवर्णनेही लिहिली आहेत. सूक्ष्म निरीक्षण, नर्म विनोद आणि तल्लख वर्णने यांमुळे चेक वाङ्मयात त्यांना वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. त्याची प्रवासवर्णनात्मक पुस्तके अशी : Anglicke listy (१९२४, इं.भा. लेटर्स फ्रॉम इंग्लंड, १९२५), Vylet do Spanel (१९३०, इं.भा. लेटर्स फ्रॉम स्पेन, १९३१), Obrazky z Holandska (१९३२ इं.भा. लेटर्स फ्रॉम हॉलंड, १९३३), Cesta na Sever (१९३६ इं.भा. ट्रॅव्हल्स इन द नॉर्थ, १९३९) त्याने इतरही काही लेखन केले आहे. त्यात Povidky z druhe kapsy (१९२९, इं.भा. टेल्स फ्रॉम टू पॉकेट्स, १९३२) या रहस्यकथा, Hovory s T. G. Masarykem (१९२८–३५) हे चेकोस्लोव्हाकियाचा पहिला अध्यक्ष टॉमाश मासारिक ह्याचे चरित्र व द गार्ड्नर्स यीयर (१९३१) हा त्याचा निबंधसंग्रह उल्लेखनीय आहे. मासारिकचे चरित्र त्याने शक्य तो मासारिकच्याच शब्दात लिहिले असून त्याचा इंग्रजी अनुवाद प्रेसिडेंट मासारिक टेल्स हिज स्टोरी (१९३४) आणि मासारिक्स थॉट अँड लाइफ (१९३८) अशा दोन खंडांत प्रसिद्ध झाला आहे. चापेकने काही सुंदर परीकथाही लिहिल्या आहेत. त्या १९३१ मध्ये प्रसिद्ध झाल्या. तीक्ष्ण विनोदबुद्धी, बालमनाचे सखोल आकलन व निवेदनातील हलकेफुलकेपणा ही त्यांची काही वैशिष्ट्ये. त्याच्या काही वेचक परीकथा कॅरेल चॅपेकच्या सहा परिकथा ह्या नावाने देवीदास बागुल ह्यांनी मराठीत रूपांतरित केल्या आहेत (१९६३).
चेक प्रायोगिक रंगभूमीसाठी त्याने केलेले कार्यही महत्त्वाचे आहे. प्रागमधील ‘नॅशनल आर्ट थिएटर’साठी काही वर्षे काम केल्यानंतर पुढे त्याने स्वतःची नाट्यसंस्था स्थापन केली. अनेक नवोदित नाटककारांना त्याने प्रेरणा दिली. आयुष्याच्या अखेरीस चापेक पुन्हा नाट्यलेखनाकडे वळला. Bila Nemoc (१९३७ इं.भा. पॉवर अँड ग्लोरी, १९३८) आणि Matka (१९३८, इं.भा. द मदर, १९३९) या त्याच्या नाटकांतून फॅसिझमचा यूरोपमधील वाढता प्रसार, त्यांतील धोके ह्यांची जाणीव व्यक्त झालेली आहे. जर्मनीने चेकोस्लोव्हाकियाचा पाडाव केल्याच्या वार्तेने तो खचून गेला. प्राग येथेच तो मृत्यू पावला.
संदर्भ : Harkins, W. E. Karel Capek, New York, 1962.
पोरे, प्रतिमा
“