नॉर्वेजियन भाषा : नॉर्वेजियन ही इंडो-यूरोपीय भाषाकुटुंबाच्या जर्मानिक शाखेच्या स्कँडिनेव्हियन गटाची एक भाषा आहे. या गटाच्या इतर भाषा आइसलँडिक, डॅनिश व स्वीडिश या आहेत. यांपैकी आइसलँडिक ही इतरांपासून खूप दूर, इंग्लंडच्या उत्तरेला जवळजवळ १,००० किमी. अंतरावर असलेल्या बेटात बोलली जाते. उरलेल्या तीन भाषा मात्र एकमेकींना लागलेल्या असून त्याच्यांतील साम्य इतके ठळक आहे, की त्यांना वेगवेगळ्या भाषा का म्हणावे, हे कळत नाही पण नॉर्वे, स्वीडन व डेन्मार्क ही स्वतंत्र राज्ये आहेत आणि स्वतंत्र राजसत्तेचे किंवा राष्ट्रीयत्वाचे प्रतीक म्हणून मिरवायच्या बिरुदांपैकी भाषा हे एक असल्यामुळे त्यांना वेगळे मानले जाते.

नॉर्वेजियन भाषिकांची संख्या तीस लाखांवर आहे.

प्रारंभी नॉर्वेजियन लोक डॅनिश व शहरी नॉर्वेजियन बोली यांच्या मिश्रणातून बनलेली एक साहित्यिक भाषा वापरत असत पण आता पूर्वीच्या डॅनो-नॉर्वेजियनबरोबर ग्रामीण बोलींनी बनलेली दुसरी एक सर्वमान्य भाषा अस्तित्वात आलेली आहे. तिचा प्रभाव शहरी साहित्यिक भाषेवरही पडला आहे. अशा प्रकारे नार्वेत आता नागरी नॉर्वेजियन (रिक्समाल) व ग्रामीण नॉर्वेजियन अशा दोन लिखित भाषा अस्तित्वात आहेत.

ध्वनिविचार : नॉर्वेजियनची लिपी रोमन आहे. तीत इंग्रजी सव्वीस अक्षरांव्यतिरिक्त तीन नवनिर्मित स्वरचिन्हेही आहेत. सर्वसाधारण ध्वनिपद्धती पुढीलप्रमाणे :

स्वर – आ, इ, ए, ॲ, इ‍ॅ, ए‍ॅ, उ, ओ, ऑ.

व्यंजनेस्फोटक : क, ट, प, ग, ड, ब.

                    अनुनासिक – म, न.

                    घर्षक – फ, ख, व्ह, ह, स, ज्ञ.

                    द्रव – र, ल.

                    अर्धस्वर – य, व.

व्याकरण : नाम : सामान्य व नपुंसक ही दोन लिंगे आहेत. एक व अनेक ही दोन वचने आणि प्रथमा, द्वितीया व षष्ठी या तीन विभक्ती आहेत. निर्गुण विशेषणे दोन आहेत. त्यांतले अनिश्चित विशेषण नामापूर्वी येते, तर निश्चित विशेषण नामाला प्रत्ययाप्रमाणे जोडलेले असते. अनेकवचन मूळ रूपाला r,er किंवा et लावून होते. षष्ठीचा प्रत्यय s आहे. द्वितीयेला स्पष्ट प्रत्यय नाही.

 

क्रियापद  क्रियापदांचे इंग्रजीशी अतिशय साधर्म्य आहे.

वाक्यरचना : वाक्यरचना ही इंग्रजीच्या धर्तीवरच आहे : फार गाव्ह योहान बोकान – ‘वडिलांनी योहानला पुस्तक दिले’.

काही शब्द (नागरी) : एन्, एट् (एक) टो (दोन) ट्रे (तीन) फीरे (चार) फेम् (पाच) झेक्स् (सहा) झीव्ह (सात) ओट्टे (आठ) नी (नऊ) टी (दहा) टिमे (तास) डाग् (दिवस) उके (आठवडा) हुंड (कुत्रा) पिके (मुलगी) नाट् (रात्र) मोर् (आई) फोट् (पाऊल).

संदर्भ : 1. Cohen, M. Meillet, A. Les langues du monde, Paris. 1952.

            2. Meillet, A. Les langues dans L, Europe nouvelle, Paris, 1928.

            3. Ostermann, Geo F. Van, Manual of Foreign Languages, New York, 1959.

कालेलकर, ना. गो.