सर्बियन साहित्य : सर्बो-क्रोएशियन भाषा बोलणाऱ्या सर्व लोकांचे हे साहित्य आहे. बाराव्या शतकापासून ह्या साहित्याचा विकास होऊ लागला. बायबल मधील कथा, क्रिस्ती संतांची चरित्रे हे सर्बियन भाषेतील आरंभीचे साहित्य होते. पंधराव्या शतकात तुर्कांनी सर्बीया व्यापल्यानंतर लिखित सर्बियन साहित्याची निर्मिती मंदावली तथापि सर्बीयाच्या गामीण भागात मौखिक साहित्य समृद्ध होतच राहिले. अठराव्या-एकोणिसाव्या शतकांत होऊन गेलेला डोसिथीअस ऑबाडोव्हीट्य (१७४२-१८११) हा त्या काळातल्या सर्बियन साहित्याचा महत्त्वाचा प्रतिनिधी होय. सर्बियन साहित्याच्या विकासावर त्याच्या लेखनाचा मोठा प्रभाव पडला. ऑब्राडोव्हीटय हा केवळ साहित्यिक नव्हता तर शिक्षण तज्ज्ञही होता. यूरोपीय साहित्यातील श्रेष्ठ साहित्यकृतींचा अभ्यास करून सर्ब लोकांनी आपले साहित्य आणि पर्यायाने आपला सांस्कृतिक वारसा   संपन्न करावा, अशी त्याची दृष्टी होती. ह्या प्रकियेत यूरोपीय भाषांतील साहित्यकृतींचे उत्तम सर्बियन अनुवाद मोठी भूमिका बजावू शकतात, याचे भान त्याला होते. त्यामुळे असे अनुवाद स्वत: करण्यावर त्याचा भर राहिला. त्याने अनुवादिलेल्या इसापच्या बोधकथा (१७८८) अतिशय लोकप्रिय झाल्या. ‘ लाइफ अँड ॲड्व्हेंचर्स ’ (१७९३, इं. शी.) हे त्याचे आत्मचरित्र, त्यातील जिवंत निवेदन आणि मार्मिक निरीक्षणे यांमुळे लक्षणीय ठरले आहे. ह्या आत्मचरित्राची लेखनशैली थेट, वेधक आणि लोकांच्या नित्याच्या भाषेला निकटची आहे. १८२० ते १८७० ह्या अर्धशतकात सर्बियन भाषेत जे साहित्य निर्माण झाले, त्यात यूरोपीय स्वच्छंदतावादाची काही वैशिष्टये – उदा., लोकविदयेचे आकर्षण आणि राष्ट्रीय स्वत्वाची उत्कट जाणीव-स्पष्टपणे जाणवतात. या कालखंडातील साहित्यिकांमधील केंद्रवर्ती व्यक्ती व्हूक स्टेफानॉव्हीटय काराजिटय (१७८७-१८६४) ही होय. काराजिटय हा सर्बियन भाषाशास्त्रज्ञ होय. सर्बियन भाषेला वाङ्‌मयीन भाषेचे महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त करून देणे,  हे काम त्याने अंगावर घेतले. त्या दृष्टीने काही सुधारणा सुचविल्या. त्याचप्रमाणे सर्बियन कविता, म्हणी, लोककथा त्याने प्रकाशित केल्या आणि दक्षिण स्लाव्ह लोकांच्या संपन्न सांस्कृतिक वारशाची जाणीव निर्माण केली. सर्बियन भाषेचे व्याकरण त्याने लिहिले आणि शब्दकोशही तयार केला. बँको रॅडिसेव्हिक (१८२४-५३) ह्याच्या सुंदर भावकवितांनी सर्बियन साहित्यात मानाचे स्थान मिळविले आहे. पूर्वीच्या बोधवादी आणि वस्तुनिष्ठ कवितेपासून त्याच्या कवितेने फारकत घेतली. यॉव्हान याव्हानॉव्हिटय्व्हिक, डयूरा जॅक्‌सिक आणि लाझा कोस्टिक हे अन्य उल्लेखनीय स्वच्छंदतावादी कवी होत. १८७० ते १९०० हा सर्बियन साहित्यातील वास्तववादाचा काळ होय. लाझा लाझारिक, सीमो माटाव्हुल्ज ह्यांच्या कथात्मक साहित्यातून हा वास्तववाद विशेषत्वाने प्रत्ययास येतो. त्याचप्रमाणे स्टीव्हन स्रेमॅक ह्याच्या विनोदी आणि उपरोधप्रचुर साहित्यातूनही तो दिसतो.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या आरंभी सर्बियन साहित्यावर यूरोपीय साहित्यातील प्रवाहांचा लक्षणीय प्रभाव दिसतो. उदा., फ्रेंच प्रतीकवाद तसेच मानसशास्त्रीय कादंबरी. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धांच्या दरम्यानच्या काळात हा यूरोपीय साहित्याचा आणि साहित्यविषयक चळवळींचा प्रभाव चालूच राहिला. काहीजण अतिवास्तववादाकडे ओढले गेले काही डाव्या विचारसरणीने प्रभावित झाले आणि समाजवादी वास्तववादाचा पुरस्कार करू लागले. १९३० च्या दशकातल्या साहित्यात राजकीय-सामाजिक विषयांना प्राधान्य प्राप्त झाले. ह्या काळातील साहित्यिकांत ⇨ आन्द्रिच ईव्हो (१८९२-१९७५) हा कथा-कादंबरीकार विशेष उल्लेखनीय आहे. बॉझ्नियन स्टोरी (१९४५, इं. भा. १९५९), द बिज ऑन ड्रीना (१९४५, इं. भा. १९५९) आणि वूमन फॉम सारायेव्हो (१९४५, इं. भा. १९६६) ह्या त्याच्या कादंबऱ्या बॉझ्नियाच्या इतिहासावर आधारलेल्या आहेत. १९६१ चे साहित्याचे नोबेल पारितोषिक त्याला देण्यात आले आहे. १९५० च्या सुमारास सर्बियन अभिव्यक्तीच्या अंगाने काही मौलिक रूपे प्रकट झाली. मायोड्रॅग बुलाटोव्हिच ( कादंबरीकार १९३०- ), ऑस्कर डेव्हिको ( कवी आणि कादंबरीकार १९०९-  ), देसांका मॅक्सिमोव्हिच (कवी ), वास्को पोपा ( कवी १९२२-  ), स्टिव्हन रायकोव्हिच ( कवी १९२८-  ), मायोड्रॅग पाव्हलोव्हिच आणि इव्हान लॅलिच हे कवी,  ह्यांचा निर्देश या संदर्भात करता येईल.

युद्धामुळे प्रकट होणारा निर्दयपणा, कौर्य ह्यांमुळे मनुष्याच्या मनुष्यपणालाच निर्माण होणारा धोका बुलाटोव्हिचने प्रतीकात्मक पद्धतीने आपल्या कादंबऱ्यांतून दाखविला. हिंसाचारापुढे माणूस अगतिक असतो हे खरे असले, तरी ह्या स्थितीबद्दल एक व्यक्ती म्हणून त्याला आपली जबाबदारी टाळता येत नाही, हा विचारही त्याने मांडला. द रेड कॉकरेल (१९६१, इं. भा.१९६२) आणि ए हीरो ऑन ए डाँकी (१९६५, इं. भा. १९६६) ह्या त्याच्या कादंबऱ्या उल्लेखनीय आहेत. डेव्हिको हा आधुनिक सर्बियन कवी. त्याच्या कवितांत अतिवास्तववादी प्रवृत्तीही दिसतात. समाजवादी राष्ट्र घडविताना भोवताली होणारे बदल, येणाऱ्या आपत्ती, निराशा यांनी वेढलेले कम्युनिस्ट व्यक्तिमत्त्व हा त्याच्या कादंबऱ्यांचा मुख्य विषय. वास्को पोपाची कविता सखोल आणि विश्लेषक आशय व्यक्त करते. मनुष्य-जीवनाची शोकात्मिका त्याच्या कवितेच्या केंद्रस्थानी आहे. रायकोव्हिचच्या निसर्गकवितेत मनुष्य आणि विविध निसर्गाविष्कार यांच्यातील नातेसंबंधांची आधुनिक संवेदनशीलतेने केलेली अभिव्यक्ती आहे. सामाजिक-राजकीय भाष्यांवर विशेष भर देणाऱ्या ज्या कादंबऱ्या लिहिल्या गेल्या, त्यांत डॅनिलो किस ह्याची ए टूम फॉर बोरिस डेव्हिडोव्हिच (१९७६, इं. भा.) ही निर्देशनीय आहे. १९७० नंतर काही स्त्रियांचे लेखनही सर्बियन साहित्यात येऊ लागले. मिलोरॅड पॅव्हिक आणि बोरिस्लाव्ह पॅव्हिक ह्या काही उल्लेखनीय लेखिका होत.

कुलकर्णी, अ. र.