बेल्जियन साहित्य : बेल्जियनमध्ये झालेली साहित्यनिर्मिती फ्रेंच आणि फ्लेमिश अशी द्वैभाषिक आहे. ह्या दोन भाषांत निर्मिल्या गेलेल्या बेल्जियन साहित्याचा आढावा थोडक्यात असा :

फ्रेंच साहित्य : फ्रेंच भाषेतील अत्यंत प्राचीन साहित्य बेल्जियमच्या भूमीवर रचिले गेले आहे. कांतिलॅन व सॅंतलाली (नववे शतक, इ. शी. सॉंग ऑफ सेंट यूलाली) हे ह्यांचे एक लक्षणीय उदाहरण. कांतिलॅन… हे काव्य बेल्जियममधील एनो प्रांतात रचिले गेले, असे मानले जाते. त्याचप्रमाणे ल गार्सो ए लव्हग्ल  ह्या फ्रेंच भाषेतील सर्वप्राचीन फार्सची रचना एनो प्रांतातील तूर्ने ह्या शहरी झाली. पद्यरोमान्सकार ⇨ झां फ्र्‌षासार (सु. १३३७- सु. १४०४), झॉर्झ शाटलॅं (१४०४-७५), फीलीप द कॉमीन (१४४७? – १५११?) आणि झां लमेअर द बेल्झ (१४७०?-१५२५) ह्यांनी इतिवृत्तकार म्हणून केलेली कामगिरीही प्रसिद्ध आहे. ‘क्रॉनिकल्स ऑफ फ्रान्स, इंग्लंड, स्कॉटलंड अँड स्पेन’ (इं. शी.) ह्या फ्र्‌वासारकृत विख्यात इतिवृत्ताच्या ४ भागांत पश्चिम यूरोपातील १३२५ ते १४०० पर्यंतच्या घटनांचा – मुख्यत: इंग्लंड आणि फ्रान्स ह्यांच्यात घडून आलेल्या ⇨ शतवार्षिक युद्धाच्या (१३३७-१४५३) पहिल्या पन्नास वर्षांचा – इतिहास आलेला आहे. झॉर्झ शाटलॅं ह्याने क्रॉ‌नीक दे शोझ द सतां हे बर्गंडीच्या ड्यूकच्या घराण्याचे इतिवृत्त लिहिले असून त्यात १४१९ ते १४७५ पर्यंतच्या कालखंडाचा परामर्श घेतलेला आहे. हे इतिवृत्त आज त्रुटित स्वरूपात उपलब्ध आहे. लॅटिन ‌इतिहासलेखनाचा आदर्श शाटलॅंपुढे असल्याचे दिसते. विविध घटना व व्यक्ती ह्यांवर भाष्य करताना त्याने आपली स्वतंत्र, निर्लेप वृत्ती प्रकट केलेली आहे. शाटलॅं हा कवीही होता. नैतिक-राजकीय विषयांवर त्याने कविता लिहिल्या असून ‘ले प्रॅंस’ ह्या कवितेत वाईट सत्ताधाऱ्यांचे चोवीस नमुने त्याने रंगविले आहेत. फीलीप द कॉमीन ह्याने लिहिलेल्या आठवणी (मेम्वार्स) म्हणजे मध्ययुगीन इतिहासलेखनाच्या क्षेत्रातील एक अभिजात कृती होय. ह्या आठवणी आठ खंडांत विभागण्यात आल्या आहेत. त्यांपैकी पहिल्या सहा खंडांत (लेखनकाळ बहुधा १४८९-९०) अकराव्या लुईच्या कारकीर्दीचे चित्र पाहावयास मिळत, तर सातव्या व आठव्या खंडात (लेखनकाळ १४९७-९८) आठव्या चार्ल्सने इटलीवर केलेल्या स्वारीचा वृत्तान्त आहे. राजे आणि मुत्सद्दी ह्यांच्या उद्‌बोधनार्थ कॉमीनने ह्या आठवणी लिहिल्या. कॉमीनच्या बुद्धिमत्तेचा आणि राजकारणात त्याला असलेल्या सखोल स्वारस्याचा प्रत्यय त्याच्या ह्या आठवणींतून येतो. ह्या आठवणींचे निवेदन करीत असताना अनेक ठिकाणी त्याने प्रागतिक विचार मांडलेले आहेत. झां लमेअर द बेल्झ ह्याच्या साहित्यातून संगीत, शिल्पकला आणि चित्रकला ह्यांसारख्या कलांत त्याला असलेला रस दिसून येतो. वाड्‌मयीन सौंदर्याची आणि कलात्मकतेची एक वेगळी जाणीव त्याच्या ठायी होती. त्याने भरपूर प्रवास केला होता. इटालीला त्याने तीन वेळा भेट दिली होती आणि दान्ते, बोका‌चीओ, पीत्रार्क ह्या श्रेष्ठ इटालियन साहित्यीकांचाही त्याच्यावर प्रभाव पडला होता. विविध राजघराण्यांसाठी त्याने इतिवृत्तलेखन केले रूपकात्मक कविता लिहिल्या इल्ल्युस्त्रासियॉं द गोल… (१५१३, इं. शी. इलस्ट्रेशन्स ऑफ गॉल अँड पिक्यूलिॲरिटीज ऑफ ट्रॉय) सारखा गद्य रोमान्स लिहिला. ह्या रोमान्समध्ये विविध ग्रीक-लॅटिन कवींच्या काव्यपंक्ती त्याने ह्या रोमान्समध्ये उद्‌धृत केल्या आहेत. इटालियन प्रबोधनाच्या प्रेरणांचा फ्रेंच परंपरांशी समन्वय साधण्याचा त्याने प्रयत्न केला. ला कॉंकोर्द दे द लांगाज (लेखनकाळ-१५१० नंतर, इं. शी. द कन्‌कॉर्ड ऑफ टू लॅंग्वेजिस) ह्या गद्य-पद्यमिश्रित ग्रंथात त्याने फ्रान्स आणि इटली ह्या दोन देशांतील सुसंवादित्वाचा आग्रह धरलेला असून फ्रेंच आणि इटालियन ह्या दोन भाषांतील जवळीकीवर भर दिलेला आहे. फ्रान्स आणि फ्लॅंडर्समधील प्रबोधनकालीन मानवतावाद्यांचा झां लमेअर द बेल्झ हा पूर्वसूरी मानला जातो. १५३० ते १८०० हा जवळजवळपावणेतीनशे वर्षांचा दीर्घ कालखंड मात्र वाड्‌मयीन दृष्ट्या निराशाजनक ठरला. नाव घेण्यासारखे साहित्यिक ह्या काळात फारसे झाले नाहीत. ह्याला अपवाद, फिलिप व्हान मार्निक्कस (बॅरन सिंत आल्देगॉंदे – १५३८-९८) आणि प्रिन्स शार्ल झोझेप फोन लीन्य (१७३५-१८१४) ह्यासारख्या लेखकांचा. फिलिप व्हान मार्निक्स हा पुस्तपत्रकार. आपल्या लेखनातून त्याने धर्मसुधारणेचा पुरस्कार केला आणि पोपवर हल्ले केले. प्रिन्स शार्ल झोझेप फोन लीन्य ह्याने लिहिलेला मेलांज मिलितॅर लितेरॅर (१७९५- १८११), ३४ खंड, इं. शी. मिसलेनिअस मिलिटरी, लिटररी अँड सेंटिमेंटल मेग्वार्स) हा त्याचा महाग्रंथ प्रसिद्ध आहे. त्याने लिहिलेल्या पत्रांचा व आठवणींचा इंग्रजी अनुवाद लेटर्स अँड मेम्वार्स ऑफ द प्रिन्स द लीन्स ह्या नावाने प्रसिद्ध झालेला आहे (१९२७). त्याच्या पत्रांतून आणि आठवणींतून अनेक व्यक्तींची उत्कृष्ट शब्दचित्रे काढलेली आढळतात तसेच विविध घटना प्रत्ययकारीपणे वर्णिलेल्या दिसतात. तत्कालीन यूरोपमधील अनेक थोर व्यक्तींशी-उदा., रूसो व व्हॉल्तेअर – त्याचा परिचय व पत्रव्यवहार होता. यूरोपातील अनेक राजदरबारांतून त्याचा वावर झालेला होता. तत्संबंधीचे त्याचे अनुभवही वाचनीय आहेत.

एकोणिसाव्या शतकात बेल्जियममधील वाड्‌मयीन प्रबोधन आकार घेऊ लागले. शार्ल द कॉस्तर (१८२७-७९) हा ह्या कालखंडातील एक श्रेष्ठ साहित्यिक. La legenge de Thyl Ulenspiagel et de Lamme Goedzak (१८६७) ही कादंबरी म्हणजे त्याची सर्वश्रेष्ठ साहित्यकृती. उत्कट देशभक्तीच्या प्रेरणेतून, बेल्जियनांना त्यांच्या उज्जवल भूतकाळाची जाणीव देण्यासाठी, शार्ल द कॉस्तरने ही कादंबरी लिहिली. उलेनश्पायगल हा ह्या कादंबरीचा नायक जुलूमशाहीविरूद्धच्या लढ्याचे प्रतिक होय. कादंबरीचे कथानक सोळाव्या शतकात घडते. शार्ल द कॉस्तरने वातावर‌णनिर्मितीसाठी फ्रेंच भाषेतील आर्ष आणि जोमदार अशा शब्दकळेचा प्रभावी उपयोग करून घेतला. कामीय लमॉन्ये (१८४४-१९१३) ह्या कादंबरीकारावर श्रेष्ठ निसर्गवादी फ्रेंच साहित्यिक एमिल झोला ह्याचा प्रभाव होता. अँमाल (१८८१) आणि आप्प – शॅर (१८८६) ह्या त्याच्या दोन उल्लेखनीय कादंबऱ्या. झॉर्झ एक्‌हाउत (१८५४-१९२७) ह्याने आपल्या सामाजिक कादंबऱ्यांतून गरीबांबद्दल कळवळा आणि सामाजिक अन्यायाबद्दलची चीड व्यक्तविली. ला नुव्हॅल कार्‌ताज (१८८८) ह्या आपल्या कादंबरीत त्याने औद्योगिकरणाचे सामाजिक जीवनावरील परिणाम चित्रित केले आहेत. ऑक्टेव्ह पिर्‌मेझ (१८३२-८३) हाही ह्या काळातील एक थोर ‌साहित्यिक. निबंध, पत्रे, वाड्‌मयचर्चा अशा प्रकारचे लेखन त्याने केले आहे. ‘थॉटस अँड मॅक्झिम्स’ (१८६२, इं. शी.) आणि ‘अवर्स ऑफ थॉट’ (१८७३, इं. शी.) हे त्याचे उल्लेखनीय ग्रंथ आहेत. चिंतनशील व्यक्तिमत्त्वाच्या ह्या लेखकावर रूसो, शातोब्रीआं, मॉंतेन आणि पास्काल ह्यांसारख्या फ्रेंच साहित्यिकांचा आणि विचारवंतांचा प्रभाव होता. पिर्‌मेझची विचारपद्धती तात्त्विक स्वरूपाची असली, तरी काटेकोर अर्थाने तो तत्त्वज्ञ नव्हता. मानवाकडे पाहण्याचा त्याच दृष्टिकोण नैराश्यवादी होता, असे त्याच्या लेखनातून जाणवते. भावना आणि वासना ह्यांना काबूत राखण्याचे सामर्थ्य मानवी बुद्धीत नसल्यामुळे मानवाच्या भवितव्याबद्दल त्याला आशा वाटत नव्हती. पिर्‌मेझची लेखनशैली डौलदार आहे. मॅक्स वॉलर याने सुरू केलेल्या ला जन बॅल्जीक ह्या नियतकालिकानेही मोलाचे वाड्‌मयीन कार्य केले. ह्या नियतकालिकाने प्रकाशात आणलेल्या दोन साहित्यिकांना जागतिक ‌कीर्ती लाभली. ⇨ मॉरिस माटरलिंक (१८६२-१९४९) व ⇨ एमील व्हरहारेन (१८५५- १९१६) हे ते साहित्यिक होत. मॉरिस माटरलिंक हा प्रतीकवादी कवी. नाटककार म्हणूनही तो ख्यातकीर्त. तथापि त्याच्या काव्यापेक्षा त्याच्या प्रतीकवादी नाटकांवर त्याची वाड्‌मयीन कीर्ती मुख्यत: 


अधिष्ठित आहे. १९११ साली ‌साहित्याचे नोबेल पारितोषिक त्याला देण्यात आले. ले कापान्त्र आल्युसिने (१८९३) आणि ले व्हील तॉंताक्युलॅर (१८९५, इं. शी. द टेंटॅक्यूलर सिटीज) हे व्हरहारेनचे दोन उल्लेखनीय काव्यसंग्रह. बदलत्या जगातील आधुनिक मानवाच्या जाणीवा त्यांतील कवितांतून व्यक्त झाल्या आहेत. माटरलिंक आणि व्हरहारेन ह्यांच्या पाठोपाठ उदयास आलेल्या कवींत मॅक्स एल्स्‌कांप (१८६२-१९३१) विशेष निर्देशनीय. आर्षता आणि आधुनिकता व्यासंग आणि सरलता ह्यांचा एकत्रित प्रत्यय त्यांच्या कवितेतून येतो. लोकसाहित्य व लोकांचे दैनंदिन जीवन ह्यांतून त्याने आपले विषय निवडले. गुस्ताव्ह व्हानझाइपच्या नाट्यकृतींत उदात्त आदर्शवादाचा पुरस्कार केलेला आहे. पहिल्या महायुद्धानंतरच्या कालखंडातील कवींत मार्सेल थाय्‌री (१८९७- ) ह्याची कविता ठळकपणे नजरेत भरते. युद्धातील अनुभवांचे प्रत्ययकारी दर्शन ही कविता घडविते. आंद्रे मीशो (१८९९-) ह्याची कविता पराकाष्ठेची आत्मनिष्ठ असून भाषा हवी तशी वाकविण्याची प्रवृत्ती त्याच्यात आढळते. युद्धोत्तर कालखंडातील अन्य उल्लेखनीय कवींत रॉबर्ट गॉफिन, आर्मां बेर्न्ये, झेरार प्रेव्होत, झां तॉर्द्यूर आदींचा समावेश होतो. १९२० मध्ये फ्रेंच साहित्याच्या विकासासाठी ब्रूसेल्स येथे खास अकादमीची स्थापना झाली (आकादेमी रॉय्याल द लांग ए द लितेरात्यूर फ्रांसॅझ) आणि ही घटना बेल्जियममधील फ्रेंच साहित्याच्या संवर्धनाच्या दृष्टीने उपकारक ठरली. तसेच १९३० मध्ये कवितेत वाहिलेले एक नियतकालिक जुर्नाल द पोयॅस उदयास आले आणि त्याने फ्रेंच भावकवितेला मोठा वाव देऊन तिच्या विकासास हातभार लावला. फेर्‌मॅं व्हान डेन बॉश (१८६५-१९४९) हा एक मान्यवर समीक्षक. अँग्रेसियॉं द लितेरात्पूर कॉंतांपोरंन (१९०५) हा त्याचा समीक्षापर ग्रंथ उल्लेखनीय आहे.

कादंबरीलेखनाच्या क्षेत्रात शार्ल फ्लीस्न्ये (१८९७-१९५२) ह्याने मारियाज (१९३६) सारख्या कादंबऱ्या लिहून नावलौकिक मिळवला. आपल्या व्यक्तिरेखांच्या मनांत खोलवर जाण्याची प्रवृत्ती त्याच्या कादंबऱ्यांनूत आढळते. फ्लीन्स्येला १९३७ साली गॉंकूर पारितोषिक देण्यात आले. ह्या पारितोषिकाचा मान मिळविणारा हा पहिला परदेशी कांदबरीकार होय. झॉर्झ सीम्‌नॉं (१९०३- ) हा आणखी एक विशेष उल्लेखनीय कादंबरीकार. रहस्यकथाकार म्हणून त्याने बरीच लोकप्रियता मिळविलेली असली, तरी युद्धामुळे निर्वासित बनलेल्या माणसांचे चित्रण करणारी ल त्रें (१९६१) सारखी त्याची कादंबरी, त्याने आपले विषयक्षेत्र मर्यादित ठेवले नसल्याचे दर्शविते. त्याच्या रहस्यकथांतून त्याने निर्मिलेली माय्‌ग्रे ही एका इन्स्पेक्टरची व्यक्तिरेखा गाजली होती. काही स्त्री-कादंबरीकारांचा उल्लेख आवश्यक आहे. मारी गेव्हर्स (१८८३- ) हिने अँटवर्प येथील लोक आणि जीवन ह्यांचे चित्रण आपल्या वास्तववादी कादंबऱ्यांतून केले. फ्रांस्वाझ माले-जोरिस हिच्या कादंबऱ्यांतून मानसशास्त्रीय वास्तववादाचा प्रत्यय येतो.

फेर्ना क्रोमिलिंक (१८८५- ) ह्याने बेल्जियन रंगभूमी गाजविली. कॉक्यू माज्निफिकसारखी  त्याची नाटके पॅरिसच्या रंगभूमीवरही यशस्वी ठरली. मीशेल द घेल्देरोद (१८९८-१९६२) ह्याच्या नाट्यकृतींतून अभिव्यक्तिवादी प्रवृत्ती दिसून येतात.

फ्लेमिश ‌साहित्य : फ्लेमिश ही डचचीच एक भगिनी भाषा. डचप्रमाणेच तीही एक लो जर्मन बोली आहे. डच आणि फ्लेमिश ह्या दोन भाषा दैनंदिन व्यवहारात कितीही स्वायत्त असल्या, तरी त्यांची साहित्यभाषा प्रमाणभूत डच ही आहे. (⇨ फ्लेमिश भाषा). फ्लेमिश भाषिक बेल्जियन प्रदेश दीर्घ काळ नेदरलॅंडस ह्या देशाशी राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या एकात्म होते. सोळाव्याशतकाच्या अखेरीस धार्मिक कारणांस्तव धमुसुधारणावादी उत्तर नेदरलॅंडस आणि कॅथलिक पंथीय दक्षिण नेदरलॅडस्‌ (हाच फ्लेमिश भाषिक बेल्जियन प्रदेश) ह्यांची फारकत झाली. म्हणून सोळाव्या शतकाच्या अखेरीपर्यंतचे फ्लेमिश साहित्य हे एकूण डच साहित्याचाच एक अविभाज्य भाग आहे, असे म्हटले तरी चालेल. सोळाव्या शतकाची अखेर होईपर्यंतच्या फ्लेमिश साहित्याच्या संदर्भात हाइन्रिख फोन फेल्डेके (कवी, बारावे शतक), हेडविक (कवियित्री, सु. १२००), यान व्हान रॉइसब्रूक (कवी, १२९४ – १३८१), याकॉप व्हान मार्लांट (कवी, १२३५-१३००) ह्या साहित्यिकांची नावे विशेष उल्लेखनीय आहेत. हाइन्रिख फोन फेल्डेके ह्याने सेंट सर्‌व्हॅशस ह्याचे पद्ममय चरित्र लिहिले. हेडविक ही गूढवादी कवयित्री. पश्चिम यूरोपीय गूढवादाची ती एक प्राचीन प्रतिनिधी होय. आध्यात्मिक आशयाच्या प्रेमकविता तिने लिहिल्या. यान व्हान रॉइसब्रूक ह्याच्या काव्यरचनेतून त्याच्या अलौकिक प्रतिभेचा प्रत्यय येतो. याकॉप व्हान मार्लांट ह्याने लिहिलेला ‘द मिरर ऑफ हिस्टरी’ (इं. शी.) हा पद्यमय बोधग्रंथ प्रसिद्ध आहे. जोगीण बिॲट्रिस हिच्यावर आधारलेली Beatrlis ही रचना (तिचा कर्ता अज्ञात) तसेच व्हिलेम मैत्रे नावाच्या कवीचे Van des van Reinaerde (इं.शी. रेनॉर्ड द फॉबस) हे पशुकाव्य, ह्या दोन साहित्यकृतीही निर्देशनीय आहेत. धार्मिक-लौकिक स्वरूपाची नाट्यरचनाही झाली. Elckerlyc (सु. १४७०, इं. शी. एव्ह्‌रीमन) हे नाटक विशेष प्रसिद्ध असून ते बोधवादी स्वरूपाचे आहे. ⇨ फिलिप व्हान मार्निक्स ऊर्फ बॅरन ‌सिंत आल्देगॉंदे (१५३८ – ९८) हा धर्मसुधारणावादी. आपल्या उपरोधप्रचुर लेखणीने त्याने रोमन कॅथलिक चर्चवर हल्ले केले (उदा., बीहाइव्ह ऑफ द होली रोमिश चर्च, १५६९, इं. शी.)

धार्मिक-राजकीय वादंगांमुळे सोळाव्या शतकाच्या अखेरीस दक्षिण नेदर्लंड्‌सपासून उत्तर नेदरलॅंड्‌स वेगळा झाल्यानंतर फ्लेमिश साहित्याचा अवनतकाळ सुरू झाला आणि तो एकोणिसाव्या शतकाच्या आरंभापर्यंत राहिला. १८३० मध्ये बेल्जियमला स्वातंत्र्य मिळाले आणि राष्ट्रवादाच्या प्रेरणेतून वाड्‌मयनिर्मिती सुरू झाली.

साहित्यकृतींतून ऐतिहासिक विषय प्रामुख्याने हाताळले गेले. ⇨ हेंड्रिक कॉन्स्पान्से (१८१२-८३) ह्याने ‘द लायन ऑफ फ्लॅंडर्स’ (१८३८-७४) आणि व्हर्झीनी लव्हलिंग (१८३६-१९२३) हे उल्लेखनीय असे अन्य काही कादंबरीकार होत. Ernest Scaes (१८७४) ही बेर्गमानची सर्वोत्कृष्ट कादंबरी. ह्या कादंबरीचे जर्मन व फ्रेंच अनुवाद झालेले आहेत. व्हर्झीनी लव्हलिंग हिची Een dure eed (१८९०) ही कादंबरी फेमिशमधील एक उत्कृष्ट कादंबरी गणली जाते. ⇨ गीडो गेझेले (१८३०-९९)  हा श्रेष्ठ फ्लेमिश भावकवी ह्याच शतकात उदयास आला. ‘चर्चयार्ड फ्लॉवर्स’ (१८५८, इं. शी.), ‘गार्लंड ऑफ टाइम’ (१८९३, इं. शी.) आणि ‘स्ट्रिंग ऑफ ऱ्हाइम’ (१८९७, इं. शी.) हे त्याचे काव्यसंग्रह उल्लेखनीय आहेत. साध्यासोप्या छंदांतून लयतालांचा आणि भावगेयतेचा उत्कृष्ट प्रत्यय त्याच्या कविता देतात. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस ‘टूडे अँड टूमॉरो’ (इं. शी.) ह्या नियतकालिकाभोवती नव्या दमाचे काही लेखक गोळा झाले.


 ऑगस्ट व्हेर्मेलिन (१८७२-१९४५) हा ह्या साहित्यिकांचा नेता होता. आरंभी व्हेर्मेलिनचे विचार अराजकवादी होते. तथापि पुढे तो समाजवादाकडे वळला. ‘द वॉंडरिंग ज्यू’ (१९०६, इं. शी.) ही त्याची कादंबरी प्रसिद्ध आहे. सत्याच्या शोधार्थ धडपडणाऱ्या मानवाचे प्रतीकात्मक चित्रण ह्या कादंबरीत केलेले आहे. विख्यात फ्रेंच कादंबरीकार ग्यूस्ताव्ह फ्लोबेअर ह्याच्या शैलीचा प्रभाव व्हेर्मेलिनवर दिसून येतो.

र्मन टायरलिंक (१८७९ – ) ह्याची ‘आय्‌व्हरी मंकी’ (१९०९, इं. शी.) ही कादंबरी त्याच्या सखोल मानसशास्त्रीय दृष्टीचा प्रत्यय देते. ⇨ स्टाइन स्ट्रव्हल्स (१८७१ – ) ह्याने पश्चिम फ्लॅंडर्समधील ग्रामीण जीवनावर कथा लिहिल्या. ⇨ सिरील बॉइस (१८५९ – १९३२) ह्या कादंबरीकारावर विख्यात फ्रेंच साहित्यिक एमिल झोला ह्याच्या निसर्गवादी लेखनतंत्राचा प्रभाव दिसून येतो. त्याने काही नाटकेही लिहिली. ⇨ कारेल व्हान द व्हुस्टाइन (१८७९-१९२९) ह्याच्या कविता आत्मविश्लेषणात्मक आहेत.

पहिल्या महायुद्धाच्या काळात आणि त्यानंतरही काही काळ प्रादेशिक कथा-कादंबऱ्यांना बहर आला. ⇨ फेलिक्‌स टिमरमान्स (१८८६-१९४७) ह्याने लिहिलेली पॅलिएटर (१९१६, इं. भा. १९२४) ही कादंबरी ह्या संदर्भात उल्लेखनीय आहे. ह्या कादंबरीचा नायक पॅलिएटर ह्याची ‌व्यक्तिरेखा जागतिक साहित्यात चिरस्थायी झालेली आहे. पहिल्या महायुद्धाच्या कालखंडात एक नवी वाड्‌मयीन प्रवृत्तीही दिसू लागली. क्रांतिकारी अभिव्यक्तिवाद (रेव्हलूशनरी एक्स्प्रेशनिझम) किंवा मानवतावादी अभिव्यक्तिवाद (ह्यूमनिटेरिअन एक्स्प्रे‌शनिझम) अशा नावांनी ही प्रवृत्ती ओळखली जाते. ‘स्पेस’ (इं. शी.) हे नियतकालिक ह्या चळवळीचे मुखपत्र होते. अग्रक्रम नीतिशास्त्राला सौंदर्यशास्त्राला नव्हे आत्मनिष्ठ कलेपेक्षा समाजनिष्ठ कला अधिक महत्त्वाची आहे, अशा आशयाचे विचार ह्या प्रवृत्तीने जोपासले. भावकविता आणि नाटक ह्या साहित्यप्रकारांतून ही प्रवृत्ती विशेषत: दिसून येते. पॉल व्हान ऑस्टोइजेन (१८९६-१९२८) हा ह्या प्रवृत्तीचा एक प्रमुख प्रतिनिधी. तथापि त्याच्या वाड्‌मयीन कारकीर्दीचे तीन टप्पे दाखविता येतात. आरंभी उत्कट भावकवितेतून त्याने मानवतावादावरील आपली अपार श्रद्धा व्यक्त केली. तथापि पुढे तो दादावादाकडे वळला आणि त्यानंतर विशुद्ध कवितेचा (प्यूअर पोएट्री) पुरस्कर्ता बनला. कला व साहित्य ह्या विषयांवर ऑस्टाइजेनने निबंध लिहिले. विख्यात जर्मन कथाकादंबरीकार फ्राटूस काफ्का ह्याचे काही ‌साहित्यही त्याने फ्लेमिश भाषेत अनुवादिले. काफ्काचा तो पहिला अनुवादकार होय. व्ही. जे. ब्रूनक्लेअर (१८९९-१९४४) आणि जी. बर्‌सेन्स ह्या दोघांनी ऑस्टाइजेनचे अनुकरण केले.

उपर्युक्त अभिव्यक्तिवादाची चळवळ सुरू झाल्यानंतर भाव‌कवितेबरोबर नाट्यलेखनाच्या प्रेरणाही सचेत झालेल्या दिसतात. परिणामत: फ्लेमिश भाषेत काही चांगली नाटके लिहिली गेली. हर्मन टायरलिंक (De Man zonder lijf, १९२५), अंतोन व्हान दे व्हेल्दे (Tijl, १९२५) हे काही उल्लेखनीय नाटककार होत.

फ्लेमिश साहित्यात १९३० नंतरचे कादंबरीलेखन ठळकपणे नजरेत भरते. ‌मॉरिस रोलंटूस (१८९५-१९६६) ह्याची ‘कम अँड गो’ (१९२७, इं. शी.), जेरार्ड वॉल्सचॅप (१८९८- ) ह्याची Houtekiet (१९४०), व्हिलेम एल्सचॉट (१८८२-१९६०) ह्याची Het dwaallicht (१९४६) ह्या काही निर्देश‌नीय कादंबऱ्या. मॉरिस रोलंट्‌सच्या कादंबरीलेखनातून मनोविश्लेषणाची प्रवृत्ती प्रत्ययास येते. जेरार्ड वॉल्सचॅप ह्याच्या कादंबऱ्या एक प्रकारच्या गतिमानतेची आणि जोमदारपणाची प्रचीती देतात. फ्लॅंडर्समधील रोमन कॅथलिक संस्कृतीवर त्याने आपल्या कादंबऱ्यांतून कठोर टीका केली. Houtekiet  मध्ये पेगन जीवनाचा आदर्श त्याने उभा केला आहे. मानवी स्वभावातील दुबळेपणाचे प्रत्ययकारी दर्शन व्हिलेम एल्सचॉटच्या कादंबऱ्यांतून घडते. रेमंड ब्रूलेझ (१८९५ – ) आणि मार्निक्‌स गिजसेन (१८९९- ) ह्यांचाही उल्लेख आवश्यक आहे. रेमंडची संशयवादी आणि गिजसेनची बुद्धिवादी प्रवृत्ती त्यांच्या कादंबऱ्यांत प्रकट झालेली आहे.विसाव्या शतकाच्या मध्यास योहान डेस्ने (१९१२ -), हयूबर्ट लॅंपो आणि पीएट व्हान आकेन हे कादंबरीकार प्रसिद्धीस आले. डेस्नेच्या कादंबऱ्यांत स्वप्नांचे विश्र्व आणि वास्तवता हयांच्यात निर्माण झालेले ताणतणाव दाखविण्यात आले आहेत. लॅंपोने अतिमानुषाचा प्रांत आपल्या कादंबऱ्यांच्या विषयांसाठी धुंडाळला. पीएट व्हान आकेनवर अमेरिकन कादंबरीकारांचा प्रभाव दिसून येतो. लूई पॉल बूनच्या कादंबऱ्यांत क्रांतीसाठी केलेले आवाहन आहे, मानवाच्या अधोगतीद्दल तीव्र निषेध आहे. हयूगो क्लाउस (१९२९-  ) ह्याच्या कादंबऱ्या प्रयोगात्मक स्वरूपाच्या असून प्रस्थापित व्यवस्थेविरूद्धची प्रतिक्रिया त्यांत त्याने व्यक्तविली आहे. ` द सरप्राइज ‘(१९४८, इं. शी. ) ही त्याची सर्वोत्कृष्ट कादंबरी होय.

 कुलकर्णी.अ.र.