ओर्तिगांऊ, रामाल्यू : (२४ नोव्हेंबर १८३६—२७ सप्टेंबर १९१५ ). प्रसिद्ध पोर्तुगीज प्रवासवर्णनकार आणि समीक्षक. जन्म ओपोर्तो येथे. तेथेच शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही काळ शिक्षक. लिस्बन येथील विज्ञान अकादमीच्या कार्यालयातही त्याने काम केले. सुरुवातीच्या काळातील ऊ मिश्तेरिऊ द इश्षादा द सींत्रा (१८७१, इं.शी. द मिस्टरी ऑफ द रोड ऑफ सींत्रा) ही कादंबरी व अश फार्पांश (१८७१, इं. शी. द स्पीअर्स) हे उपरोधप्रचुर नियतकालिक यांत त्याला ⇨यॅसा द कैरॉजचे सहकार्य लाभले. 

त्याच्या प्रमुख ग्रंथांपैकी अ ऑलांदा (१८८३, इं. शी. हॉलंड) हे प्रवासवर्णन पोर्तुगीज साहित्यातील एक नमुनेदार प्रवासवर्णन होय. हिऱ्यांना पैलू पाडण्याचा हॉलंडमधील उद्योग, तेथील धरणांचा डच जीवनावर झालेला परिणाम इत्यादींच्या वास्तववादी वर्णनांतून त्या देशाचे समग्र व स्वच्छ चित्र त्याने उभे केले आहे. अश फार्पाशचे अंक (१८७२—१८८७) एकूण पंधरा खंडांत प्रसिद्ध झाले आहेत. त्यांत उत्तम विनोद आणि धारदार उपरोध यांद्वारा पोर्तुगीज जीवनाच्या वाङ्‍मयीन, सामाजिक, नैतिक, आरोग्यविषयक इ. विविध अंगांचा वास्तव निकषांच्या कक्षेत उपहास साधलेला आहे. 

स्वतःस वास्तववादी मानणाऱ्या ओर्तिगांऊने त्या संप्रदायाच्या तत्त्वनियमांशी इमान राखले. उत्तम निरीक्षण व जे पाहिले त्याचे उत्तम वर्णन करण्याची हातोटी यांमुळे ओर्तिगांऊने प्रवासवर्णनाला कलात्मकता व सौंदर्य एवढेच नव्हे, तर अत्यंत व्यावहारक व उपयुक्त प्रयोजन प्राप्त करून दिले. लिस्बन येथे तो निधन पावला. 

रॉड्रिग्ज, एल्. ए., (इं.) कुलकर्णी, अ. र. (म.)