गोल्डश्मिट, मायर आरॉन : (२६ ऑक्टोबर १८१९–१५ ऑगस्ट १८८७). प्रसिद्ध डॅनिश कादंबरीकार व पत्रकार. वंशाने ज्यू. जन्म व्हॉर्डिंगबॉर (डेन्मार्क) येथे. शालेय शिक्षण कोपनहेगन येथे. आपले पहिले साप्ताहिक त्याने १८३९ मध्ये विकले. त्यानंतर त्याने Corsairen (इं. शी. द कोर्सेअर) नावाचे दुसरे साप्ताहिक सुरू केले (१८४०). डेन्मार्कमधील राजसत्ता आणि नोकरशाही यांविरुद्ध गोल्डश्मिट व त्याच्या सहकाऱ्याने आघाडी उघडली त्यामुळे ‘द कोर्सेअर’ हे डेन्मार्कमधील लोकशाही चळवळीचे मुखपत्रच बनले. पुढे सरेन किर्केगॉरशी आलेल्या वाङ्‌मयीन वैमनस्यामुळे गोल्डश्मिटला तुरूंगवास भोगावा लागला आणि आपले साप्ताहिकही विकावे लागले (१८४६). यानंतर त्याने इंग्लंडादी देशांचा प्रवास करून डेन्मार्कला परतल्यावर Nord og Syd  (इं. शी. नॉर्थ अँड साउथ) हे नियतकालिक चालविले (१८४८- ५९). त्यातूनच त्याने आपले रंगभूमी, साहित्य, कला व प्रचलित राजकारण यांवरील बरेचसे लेखन प्रसिद्ध केले.

En Jode (१८४५, इं. भा. द ज्यू ऑफ डेन्मार्क, १८५२) ही गोल्डश्मिटची पहिली कादंबरी. सनातनी ज्यू-मताला विरोध करणाऱ्या पुरोगामी ज्यू नायकावर ती आधारित असून तीत ज्यू समाजाचे मर्मभेदक चित्रण आढळते. डॅनिश ज्यू आणि डॅनिश समाजातील अन्य लोक ह्यांच्या दुराव्याचे चित्रणही ह्या कादंबरीत आहे. गोल्डश्मिटच्या बहुतेक कथा-कादंबऱ्यांना ज्यू जीवनाची पार्श्वभूमी आढळते. Hjemlos (३ खंड, १८५३–५७, इं. भा. होमलेस ओर अ पोएट्स इनर लाइफ, १८६१) या त्याच्या दुसऱ्या प्रसिद्ध कादंबरीचा नायक मात्र ज्यू नसून डॅनिश आहे तथापि ह्या नायकाला मार्गदर्शक ठरलेल्या एका सुसंस्कृत ज्यूच्या व्यक्तिरेखेद्वारा ह्या कादंबरीत गोल्डश्मिटने नैतिक समतोलाचा (‘नेमेसिस’चा) सिद्धांत मांडला आहे. माणसाने केलेल्या पापाचे क्षालन या जगातच व्हायला हवे, तसेच सुखाचा तोल दुःखाने सांभाळला पाहिजे, अशी ही भूमिका आहे. त्याच्या त्यानंतरच्या लेखनास याच तत्त्वज्ञानाची बैठक आहे. गोल्डश्मिटची लेखनशैली वेधक असून Ravnen (१८६७, इं. शी. द रेव्हन) व Maser (कथासंग्रह, १८६८) इत्यादींमधून त्याने रंगविलेली ‘सायमन लेव्ही’ ही व्यक्तिरेखा डॅनिश कादंबरीविश्वातील एक अमर व्यक्तिरेखा ठरली आहे. यांशिवाय त्याच्या Fortaellinger (१८४६), Arvingen (१८६५, इं. भा. द एअर, (१८६५) या कादंबऱ्या, Avromche Nightingale (१८७१) हा कथासंग्रह आणि Livserindringer og Resultater (२ खंड, १८७७ , इं. शी मेम्वार्स अँड रिझल्ट्‌स) हे आत्मचरित्र इ. साहित्यकृतीही विशेष उल्लेखनीय आहेत. तो कोपनहेगन येथे मृत्यू पावला.

संदर्भ : Kyrre, H. M. Goldschmidt, 2 Vols. 1919.

यानसेन, एफ्. जे. बिलेस्कॉव्ह (इं.) पोरे, प्रतिभा (म.)