ऑडी, एन्ड्रे: (२२ नोव्हेंबर १८७७–२७ जानेवारी १९१९). श्रेष्ठ हंगेरियन भावकवी. जन्म एर्मिंडस्‌झेंट येथे. शिक्षण कारे (नॉडी कारोली) आणि झिलॉ येथे. काही काळ कायद्याचा अभ्यास केल्यानंतर त्याने पत्रकाराचा व्यवसाय पतकरला. वयाच्या बाविसाव्या वर्षी प्रसिद्ध झालेला Versek (१८९९, इं. शी. पोएम्स) हा त्याचा पहिला काव्यसंग्रह फारसा लक्षवेधी ठरला नाही. तथापि त्यानंतरच्या Meg egyszer (१९०३) ह्या काव्यसंग्रहात मात्र त्याच्या समर्थ प्रतिभेच्या खुणा प्रगटल्या. १९०३ नंतर तो पॅरिसला गेला. फ्रेंच साहित्याच्या प्रभावामुळे त्याच्या वाङ्‌मयीन दृष्टिकोनात फार मोठे परिवर्तन घडून आले व त्याचे प्रतिबिंब Ujversek (१९०६, इं. शी. न्यू पोएम्स) मध्ये दिसून येते. आशय आणि अभिव्यक्ती ह्या सर्वच बाबतींत ह्या कविता क्रांतिकारक होत्या. हंगेरियन साहित्यविश्वात ह्या काव्यसंग्रहाने प्रचंड खळबळ उडवून दिली. त्यावेळी जवळजवळ नि:सत्त्व झालेल्या हंगेरियन कवितेला त्याने एक नवचैतन्य प्राप्त करून दिले परंतु ‘एक संतप्त तरुण’ अशी त्याची प्रतिमा हंगेरीत रूढ झाली आणि देशातील एकंदर वातावरणावर त्याने वेळोवेळी निर्भीड लेख लिहून हल्ले केल्यामुळे उजव्या विचारसरणीच्या राष्ट्रवाद्यांचा त्याच्यावर रोष झाला. डाव्यांनी मात्र त्याला प्रेषित मानले.

ऑडीच्या कवितेत नव्याचा ध्यास घेणारी बंडखोरी दिसते. त्याच्या धार्मिक कविता अनेकांना पावित्र्यविडंबक वाटल्या. त्याच्या प्रेमकवितांची स्फूर्तिदात्री कोणी लेडानामक स्त्री असून शारीर प्रेमाकडे पाहण्याचा एक गूढवादी दृष्टिकोन त्यांत दिसतो. त्याच्या समग्र कवितेचे बारा खंड प्रसिद्ध झालेले असून त्याच्या गद्यलेखनाचे सात खंड प्रसिद्ध झाले आहेत. त्याने लघुकथालेखनही केले.

प्रथम धिक्कारला गेलेला हा कवी पुढे मात्र हंगेरियन कवितेला नवीन दिशा दाखविणारा कवी म्हणून मान्यता पावला. बूडापेस्ट येथे तो निधन पावला.

जगताप, दिलीप