लॅटव्हियन भाषा : हिला लेटिश भाषा असेही म्हणतात. इंडो-यूरोपियन भाषाकुलात बाल्टिक भाषांचे एक उपकुल आहे. त्यात दोनच भाषा आज विद्यमान आहेत-लिथ्युएनियन व लॅटव्हियन. लॅटव्हियन भाषा लॅटव्हिया प्रजासत्ताकाची राजभाषा १९१८ पासून झाली असली, (१९७० साली १३,४२,००० बोलणारे, शिवाय शेजारील देशांत आणि युनायटेड स्टेट्समध्ये एकूण अंदाजे ३,७०,०००) तरी लिखित नमुने सोळाव्या शतकापासून (कॅथलिक व लूथेरन पंथीय धर्मशिक्षणासाठी प्रश्नोत्तरी) मिळतात. व्याकरणपुस्तक अठराव्या शतकापासून व वाङ्मय एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून मिळते.

हिच्या तीन उपभाषा आहेत-पूर्व (पहाडी), मध्य, पश्चिम (लिव्होनियन). यांपैकी मध्य बोली अधिक जुन्या वळणाची असून आजची साहित्यभाषा तिच्यावर आधारलेली आहे. सोळाव्या शतकात गॉथिक लिपी वापरात होती. १९२२ साली सुधारित रोमन लिपी स्वीकारल्यावर लेखन उच्चारानुसारी झाले (उदा. a e o u दीर्घ स्वर.).

बाल्टिक भाषा भोवतालच्या इतर इंडो-यूरोपियन भाषांपेक्षा काही बाबतींत संस्कृतला जवळ आहेत. द्विवचन, शब्दसुर (वैदिक भाषेतील उदात्तादि स्वरविशेषांप्रमाणे), काही जुने प्रत्यय यांचे अवशेष त्यांच्यामध्ये आढळतात.

लॅटव्हियन भाषेत आज शब्दबल शब्दाच्या आद्य अक्षरावर पडते. तिच्यावर फिनिश भाषेचा परिणाम दिसतो. 

संदर्भ : 1. Endzelins, Janis, Balta Kalbu garsai ir formos, 1957, Trans, Comparative phonology and morphology  

                of the Baltic languages, 1971.

           2. Lazdina, Tereza Budina, Teach Yourself Latvian, London, 1966.

           3. Magner, Thomas F Schmalstieg, William R.Ed., Baltic Linguistics,1970.

केळकर, अशोक रा.