स्टॅग्नेलिअस, एरिक यूहान : (१४ ऑक्टोबर १७९३-३ एप्रिल १८२३). स्वीडिश कवी. जन्म स्वीडनमधील आर्लँड येथे. त्याचे बरेचसे बालपण ह्या बेटावरच गेले. खाजगी रीत्या त्याने शिक्षण घेतले. त्याचप्रमाणे धर्मोपदेशक असलेल्या त्याच्या वडिलांच्या ग्रंथालयातील पुस्तके वाचून स्वप्रयत्नानेही त्याने ज्ञानार्जन केले. पुढे अप्साला विद्यापीठातून शिक्षण घेऊन तो स्टॉकहोममध्ये नोकरी करू लागला.
स्टॅग्नेलिअसचे व्यक्तिमत्त्व वेगळेच होते. आपल्या हयातीत त्याने आपली का व्य र च ना फारशी प्रकाशित केली नाही आणि तेव्हा त्याचा फारसा प्रभावही नव्हता. त्याला जी कीर्ती मिळाली, ती त्याच्या मृत्यूनंतर. अप्साला विद्यापीठात शिकत असतानाच तो स्वच्छंदतावादाकडे वळला तथापि त्याच्या काळात अप्साला येथे असलेल्या स्वच्छंदतावाद्यांशी त्याने कसलाही व्यक्तिगत संपर्क साधला नाही. १८१७ च्या सुमारास एका आध्यात्मिक संघर्षातून गेल्यानंतर त्याने प्लेटो, प्लोटायनस, स्वीड्नबॉर्ग, रोलिंग इत्यादींच्या साहित्याभ्यासातून संस्कारलेल्या एका ख्रिस्ती धर्माचा अवलंब आपल्या व्यक्तिगत जीवनात केला आणि स्वत:चे असे एक स्वतंत्र काव्यविश्व त्याने निर्माण केले. अत्यंत तीव्र अशी रतिभावना आणि विरक्तिप्रधान धार्मिक भूमिका ह्यांसंबंधी त्याच्या मनात चाललेल्या संघर्षाचा प्रत्यय त्याच्या कवितेतून येतो. त्याची काव्यशैली रंगोत्फुल्ल, इंद्रियोद्दीपक आहे पण विरक्त जीवनाची आवश्यकता तो प्रतिपादित राहतो. कामभावना आणि धार्मिकता हे दोन विषय एकमेकांत विलक्षण रीत्या गुंतून त्याच्या काव्यकृतींतून प्रकटतात. स्त्रीच्या उत्कट प्रेमाची आस आणि ह्या माध्यमातून धार्मिकतेचा शोध तो घेताना दिसतो. आमांदा नावाच्या स्त्रीचे निर्देश त्याच्या कवितांतून येतात. ही स्त्री कोण असावी, हे शोधण्याचा प्रयत्न साहित्याभ्यासकांनी केलेला आहे तथापि काहींच्या मते ती कोणी हाडामासाची स्त्री असण्यापेक्षा एका असफल स्वप्नाचे प्रतीक असण्याची शक्यता आहे.
कुलकर्णी, अ. र.
“