हेइडेनस्टाम, व्हेर्नर फोन : (६ जुलै १८५९–२० मे १९४०). स्वीडिश लेखक, चित्रकार व साहित्याच्या नोबेल पारितोषिकाचा मानकरी. त्याचा जन्म ओल्शामर (स्वीडन) येथे सरदार घराण्यात झाला. त्याचे पूर्ण नाव कार्ल गुस्टाव्ह व्हेर्नर फोन हेइडेन. 

 

बालपणी अशक्त असल्यामुळे तो काव्य आणि शौर्याच्या कथा वाचण्यात मग्न असे. त्याला प्रकृती सुधारण्यासाठी समशीतोष्ण हवामानात जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. म्हणून तो जर्मनी, फ्रान्स, इटली, स्वित्झर्लंड व काही पौर्वात्य देशांत भ्रमंती करीत पॅरिसमध्ये स्थायिक झाला (१८८०). तेथे त्याने प्रारंभिक शिक्षण घेतले. जीनलेआँ झेरोम या चित्रकाराच्या हाताखाली त्याने चित्रकलेचे प्रशिक्षण घेतले. दरम्यान त्याने इमिलिआ उग्ला या स्विस युवतीशी विवाह केला. हा विवाह त्याच्या आईवडिलांना मान्य नव्हता. त्यामुळे घरच्या लोकांशी त्याचे वितुष्ट आले आणि वडिलांच्या मृत्यूनंतरच (१८८७) तो स्वीडनला परतला. या काळात त्याने लेखनात लक्ष केंद्रित केले. इमिलियाच्या निधनानंतर (१८९३) त्याने ओल्गा विबर्ग हिच्याशी विवाह केला. विवाहानंतर त्याने लगेचच घटस्फोट घेतला. त्यानंतर त्याने ग्रेटा शबॅरी या युवतीबरोबर विवाह केला (१९००). त्याच्या साहित्यिक योगदानाबद्दल स्टॉकहोम विद्यापीठाने त्याला डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही पदवी प्रदान केली (१९०९). त्यानंतर त्याची स्वीडिश ॲकॅडमीवर एक सदस्य म्हणून नियुक्ती झाली (१९१२). 

 

हेइडेनस्टाम याचा पहिला काव्यसंग्रह Vallfart Och Vandringsar (१८८८ इं. भा. पिलग्रिमेज अँड वाँडर इयर्स) त्यातील स्मरणरंजनात आपल्यावरील घरच्यानी केलेल्या अन्यायाचा त्याने निषेध नोंदविलाआहे. शिवाय यात त्याने स्वीडिश साहित्यातील निसर्गवादाविरुद्ध प्रतिक्रिया व्यक्त करून आदर्शवादाचा पुरस्कार केला आहे. कल्पनाजाल, सौंदर्य व राष्ट्रीय अस्मिता प्रकट करणारे साहित्य स्वीडिश भाषेत निर्माण झाले पाहिजे, अशी भूमिका मांडली. Hans Alienus(१८९२ इं. भा. ॲन इमॅजिनेटिव्ह एपिक) मध्ये त्याची कल्पक वास्तवतावाद्याची भूमिका स्पष्ट दिसते. त्याचा Nya Dikter (१९१५ इं. भा. न्यू पोएम्स) हा काव्यसंग्रह म्हणजे त्याच्या साहित्यिक कीर्तीचा परमोच्च बिंदू होय. काही दुर्मिळ सौंदर्यस्थळे आणि परिपक्व सूज्ञपणा यांची प्रचिती यात येते. त्याचे द स्वीड्स अँड देअर चिफटेन्स (इं. भा. १९२५) हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी लिहिलेले असावे. 

 

हेइडेनस्टाम याने Endymion (१८८९) या कादंबरीमध्ये पौर्वात्य प्रेमिक पाश्चात्त्य चालीरीतींमुळे कसा हतबल झाला आहे, याचे मनोरंजक वर्णन केले आहे. त्यातून त्याची कल्पक वास्तववादी भूमिका प्रकट होते. याशिवाय त्याने पेपिटाज वेडिंग (इं. भा. १८९०) हे ऑस्कर लेव्हेर्टन या ज्यू कवीच्या सहभागाने लिहिले. यात त्याने वाचक व लेखक यांना निसर्गवाद सोडून देऊन आदर्शवाद स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. Karolinerna (दोन खंड १८९७-९८ इं. भा. द चार्ल्समेन) ही त्याची सर्वोत्तम साहित्यकृती समजली जाते. यात गद्यकाव्य असून स्वीडनचा राजा बारावा चार्ल्स (१६८२–१७१८) व त्याचे शिपाईगडी यांचे वर्णन असून हे राष्ट्रीय महाकाव्य मानले जाते. हे लेखन प्रकाशित झाले आहे. 

 

स्वीडनचा एक अग्रगण्य व श्रेष्ठ कवी म्हणून त्याचे कर्तृत्व मोठे आहे. त्याला साहित्याचे नोबेल पारितोषिक देण्यात आले (१९१६). 

 

वृद्धापकाळाने त्याचे ओव्ह्रलिड येथे निधन झाले. 

 

पहा : स्वीडिश साहित्य. 

गुडेकर, विजया म.