ब्रेमर, फ्रेडरीका : (१७ ऑगस्ट १८०१ – ३१ डिसेंबर १८६५). स्वीडिश कादंबरीकर्त्री. ओबू (तुर्कू), फिनलंड येथे जन्मली. १८०४ मध्ये तिचे आईवडील स्वीडनमधील स्टॉकहोम शहरी आले. तेथेच तिचे बरेचसे आयुष्य गेले. द नेबर्स (१८३७, इं. भा. १८४२), द होम (१८३९, इं. भा. १८४३) ह्या ब्रेमरच्या विशेष उल्लेखनीय कादंबऱ्या. द एच्- फॅमिली (१८२९, इं. भा. १८४४) ह्या तिच्या कादंबरीने स्वीडिश साहित्यात वास्तववादी कादंबरीलेखनाचा पाया घातला. सुधारणावादी दृष्टिकोण आणि स्त्रीहक्कांचा पुरस्कार तिने आपल्या कादंबऱ्यांतून केला. हर्था (१८५६) ही तिची कादंबरी ह्या संदर्भात विशेष निर्देशनीय. स्वीडनमधील स्त्रियांच्या सामाजिक सुधारणा घडवून आणणारे प्रागतिक कायदे अस्तित्वात येण्यास तिच्या ह्या कादंबरीनेही चालना मिळाली होती. आर्स्टा, स्वीडन येथे ती निधन पावली.

सूर्यवंशी, द. वा.