साडरबॅर्य, याल्मार: (२ जुलै १८६९–१४ ऑक्टोबर १९४१). स्वीडिश कादंबरीकार, लघु कथाकार आणि नाटककार. जन्म स्टॉकहोम शहरी. अप्साला विद्यापीठात शिक्षण घेतल्यानंतर काही काळ त्याने सरकारी नोकरी केली आणि नंतर तो लेखनाकडे वळला. Forvillelser (१८९५) ही त्याची पहिली कादंबरी. जीवनाविषयीची वैशिष्ट्यपूर्ण उपरोधिता, भ्रमनिरास आणि करूणेची अधोगती यांचे दर्शन तिच्यातून घडते. Martin Bricks ungdom (१९०१, इं. भा. मार्टिन बर्क्‌स यूथ, १९३०) आणि Doktor Glas (१९०५, इं. भा. डॉक्टर ग्लास, १९६३) ह्या त्याच्या दोन कादंबऱ्यांनी कादंबरीकार म्हणून त्याला ख्यातकीर्त केले. ह्यांपैकी पहिल्या कादंबरीत प्रौढत्वाकडे झुकणाऱ्या तरुणांच्या जीवनातील नैराश्य, मौजमजा आणि समस्या यांचा रंजक वृत्तांत आहे. त्यातील बालपणाविषयीचे वर्णन हा स्वीडिश साहित्यातील एक उत्कृष्ट नमुना होय. काही नैतिक भूमिका घेऊन जाणीवपूर्वक केलेल्या हत्येचे समर्थन Doktor Glas ह्या कादंबरीत असल्यामुळे तिच्या प्रकाशनानंतर मोठी खळबळ माजली होती. स्टॉकहोमधील दैनंदिन जीवनाचे मार्मिक व सापेक्ष चित्रण हे त्याच्या लेखनाचे एक लक्षणीय वैशिष्ट्य मानले जाते. त्याच्या कथांचे चार संग्रह निघाले. Historietter (१८९८) हा त्याचा सर्वोत्कृष्ट कथासंग्रह. सुंदर, भावगेय शैलीत त्यातील कथा लिहिलेल्या असून त्यांतून अधूनमधून प्रकट होणारा सौम्य उपरोध त्या कथांच्या प्रभावीपणात भर घालतो. ‘द फर कोट’, ‘द कप ऑफ टी’ आणि ‘द ॲकंप्लिश्ड ड्रॅगन’ (सर्व इं. शी.) ह्या परीकथांचा त्याच्या उत्कृष्ट कथांत समावेश होतो. यांत तो मानवी आत्मसंतुष्टता आणि स्वफसवणूक यांचा उपहास आपल्या परखड, मार्मिक व विनोदी शैलीत करतो. गर्ट्रूड (१९०६) ही त्याची नाट्यकृती आणि Den allvarsamma leken (१९१२, इं. शी. ‘द सिरिअस गेम’) ही कादंबरी त्याच्या रम्याद्‌भुत (रोमँटिक) प्रणयाच्या मोहजालाची शोक-सुखात्मिक अभिक्रिया होत.

त्याच्या लेखनातून जीवनातील एक प्रकारच्या भ्रमनिरासाची आणि विश्वाच्या नियतिबद्घतेची जाणीव प्रत्ययास येते. त्याचप्रमाणे ह्या जाणिवेतून येणारा निराशावादही दिसून येतो. आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धातला साधारणपणे १९१० नंतरचा काळ त्याने कोपनहेगन (डेन्मार्क) येथे घालवला. नाझींचा आणि फॅसिझमचा धोका दिसू लागताच त्याने त्याबाबत इशारे देणारे काही लेखही लिहिले.

कोपनहेगन येथेच तो निधन पावला.

कुलकर्णी, अ. र.