आयसॉक्राटीझ : (४३६ – ३४८ इ. स. पू.). एक ग्रीक वक्ता. जन्म अथेन्स येथे. त्याचा पिता सुसंपन्न व्यापारी होता. त्याच्या काळी अथेन्समध्ये मिळणारे उत्तमातले उत्तम शिक्षण त्याला लाभले होते. पेलोपोनेशियन युद्धात त्याच्या कुटुंबाचे फारच नुकसान झाल्यामुळे कुटुंबाचा चरितार्थ चालविण्याची जबाबदारी त्याच्यावर पडली. वक्ता म्हणून त्यास फारसे यश मिळू शकले नाहीत्यामुळे त्याने अध्यापनाचा व्यवसाय स्वीकारला. विद्यार्थ्यांच्या नैसर्गिक गुणांना अनुसरून आणि त्यांच्या बौद्धिक व नैतिक विकासाच्या दृष्टीने त्यांना वक्तृत्वशास्त्र शिकविण्याचे त्याचे धोरण असे त्यामुळे वक्तृत्वशिक्षण देणारी जगातील सर्वोत्तम संस्था असा त्याच्या शाळेचा लौकिक होता. केरोनीयाच्या युद्धानंतर लवकरच तो निवर्तला. अथेन्समधील परिस्थितीला कंटाळून त्याने आत्महत्या केली, असे म्हटले जाते.

हंबर्ट, जॉ. (इं.)  कुलकर्णी, अ. र. (म.)