प्रॉव्हांसाल भाषा : प्रॉव्हांसाल या नावाने ओळखल्या जाणाऱ्या बोली दक्षिण फ्रान्सच्या जवळजवळ एकतृतीयांश भागात पसरलेल्या असून त्यांचा एकमेकींशी घनिष्ठ भाषिक संबंध आहे. त्या बोलणाऱ्यांची संख्या एक कोटीवर आहे.

फ्रान्सच्या प्रदेशात प्राचीन काळापासून लॅटिनपासून निघालेल्या दोन भाषा प्रचलित होत्या. त्यांपैकी उत्तरेकडच्या भाषेवर आजची प्रमाण फ्रेंच आधारलेली आहे.

दक्षिणेकडच्या भाषेपासून मध्ययुगात एक महत्त्वाची साहित्यभाषा अस्तित्वात आली; पण नंतर राजकीय महत्त्व प्राप्त झालेल्या उत्तर फ्रेंच भाषेपुढे तिला माघार घ्यावी लागली. त्यामुळे प्रारंभीच्या काळात प्रॉव्हांसालची सांस्कृतिक संपर्कभाषा लॅटिन होती, ती जाऊन तिची जागा प्रमाण फ्रेंचने घेतली.

प्रॉव्हांसालमधील साहित्य इ. स. १००० च्या आसपास सुरू झाले. आरंभीच्या प्रॉव्हांसाल साहित्यात बोईथिअस ह्या रोमन तत्त्वज्ञाच्या ‘द कॉन्सलेशन ऑफ फिलॉसफी’ (इं. अर्थ) ह्या ग्रंथाच्या प्रॉव्हांसाल रूपांतराचा समावेश होतो. हे रूपांतर त्रुटित स्वरूपात उपलब्ध झालेले असून त्याच्या हस्तलिखिताचा काळ १००० ते १०५० ह्या दरम्यानचा असावा असे दिसते.

काही उदाहरणे : La cabro de moussu Seguin, que se battégue tonto la neni emé lou loup, e piei lou matin Jou loup la mangé.

(मुस्यू सगँची बकरी, जिने ‘रात्रभर लांडग्याशी झुंज दिली, आणि नंतर सकाळी लांडग्याने तिला खाऊन टाकले).

Car Diéu a tant ama lou moande, que i’a douna soun Fiéu Sonlet, per que tout ome que créi en éu noun perigue, mai ague la vido eternalo.

[कारण देवाने जगावर इतके प्रेम केले, की ज्याची त्याच्यावर श्रद्धा आहे तो नष्ट होऊ नये; पण त्याला चिरंतन जीवन लाभावे म्हणून त्याने आपला एकुलता एक मुलगा (त्याला) दिला].

संदर्भ : 1. Cohen, Marcel; Meillet, Antoine, Les langues ciu monde, Paris, 1952.

2. Meillet, Antoine, Les lungues dans Plurope nouvelle, Paris, 1928.

कालेलकर, ना. गो.