आरिआनॉस: (सु. ९५ – सु. १७५). ग्रीक इतिहासकार आणि तत्त्वज्ञ. ॲरिअन या नावानेही तो ओळखला जातो. जन्म आशिया मायनरमधील बिथिनियातील निकोमीडिआ येथे. ग्रीक असूनही त्याने कॅपाडोशिया येथे ‘कॉन्सल’ व ‘लेगेट’ ही अधिकारपदे मिळविली. येथे असताना आलानी या भटक्या जमातीच्या विरोधी मोहिमेत यशस्वी झाल्यामुळे त्याला फार मोठी प्रतिष्ठा मिळाली. अधिकारनिवृत्तीनंतर आपला गुरू एपिक्टीटस ह्याची शिकवण त्याने दोन ग्रंथांतून सांगितली. आनाबासिस ह्या आपल्या ग्रंथाच्या सात खंडांतून त्याने अलेक्झांडरच्या मोहिमांचा इतिहास लिहिला आहे. ह्या ग्रंथाला परिशिष्टवजा जोडलेल्या आठव्या खंडात अलेक्झांडरच्या भारतावरील स्वारीचे वर्णन आहे.
हंबर्ट, जॉ. (इं.) पेठे, मो. व्यं. (म.)