पीतज्वर : पीतज्वर हा व्हायरसजन्य तीव्र स्वरूपाचा रोग असून एकदम सुरुवात, थकवा, खूप ताप, तापाच्या मानाने मंद नाडी, कावीळ ही त्याची वैशिष्ट्ये होत. गंभीर अवस्थेत रुग्णास रक्ताच्या उलट्या, मूत्रातून प्रथिनांचे उत्सर्जन व कावीळ यांचा त्रास होतो. रक्ताभिसरण-शैथिल्य ओढवते. मागोमाग रुग्ण त्वरित दगावतो.

आफ्रिका व दक्षिण अमेरिका या खंडांतील उष्ण कटिबंधीय भरपूर पाऊस असलेल्या भूभागात तो मुख्यत्वे आढळतो. नागरी पीतज्वर आणि अरण्यातील पीतज्वर असे याचे रोगपरिस्थितिविज्ञानदृष्ट्या दोन प्रमुख प्रकार आहेत. नागरी प्रकारात ईडिस ईजिप्ताय या डासाद्वारे एका रुग्णापासून दुसऱ्यास संसर्ग होतो, तर अरण्य पीतज्वर मुख्यत: दाट जंगलाच्या मध्यभागी वस्ती करणाऱ्या माकड आणी त्यासारख्या इतर प्राण्यांत होतो आणि तेथे वास्तव्य करणाऱ्या डासांद्वारे त्याचा प्रसार होतो. काही कारणामुळे हे डास माणसास चावल्यास माणसास रोग होऊन त्यासोबत तो नागरी भागात येतो.

संप्राप्ती : (कारणपरंपरा). पीतज्वरास कारण असलेले व्हायरस हे संधिपाद प्राण्यांद्वारा [उदा., कीटकांद्वारा → आर्थ्रोपोडा] प्रसार होणारे व्हायरस असून ‘ब’ गटात मोडतात. त्यांचे सर्वसाधारण आकारमान ३८ मिलिमायक्रॉन (१ मिलिमायक्रॉन = १०-९ मी.) असते. नव्याने शरीरात शिरलेले व्हायरस तंत्रिकाकर्षी (मज्जा कोशिका–पेशी–समूहांचे आकर्षण असणे) व अंतस्त्याकर्षी (छाती व उदर यांतील अंतर्गत इंद्रियांचे आकर्षण असणे) अशा दोन्ही गुणधर्मांनी युक्त असतात. यकृत, मूत्रपिंड, हृदय इ. अवयवांच्या शोथाद्वारे (दाहयुक्त सुजेद्वारे) अंतस्यार्कर्षण प्रगट होते, तर तंत्रिकाकर्षण केंद्रीय तंत्रिका तंत्राच्या [→ तंत्रिका तंत्र] शोथाने दिसून येते. उंदराच्या मेंदूत व्हायरस पुनः पुन्हा एकातून दुसऱ्यात असे वाढवीत गेल्यास त्यांचे अंतस्त्याकर्षण नष्ट होऊन ते फक्त तंत्रिकाकर्षी उरतात. या गुणधर्माचा उपयोग करून कोंबडीच्या गर्भातून बनविलेल्या ऊतकसंवर्धन (समान कार्य व रचना असलेल्या कोशिकांच्या समूहाची कृत्रिम रीत्या वाढ करण्याच्या) माध्यमात १७ डी व्हायरस जाती पुन:पुन्हा वाढवून पीतज्वरविरोधी लस बनविण्यात येते. संपूर्ण जगभर ठिकठिकाणची सर्व माणसे या रोगास पात्र असून रोगलक्षणे अंतस्त्याकर्षणामुळे होतात. माकडाच्या काही जाती (उदा., ऱ्हीसस) या रोगास अत्यंत संवेदनाशील असून ताबडतोब मरतात, तर काही जाती रोगातून बऱ्या होतात. पांढरे उंदीर हेही व्हायरसाच्या तंत्रिकाकर्षी गुणधर्मास अत्यंत संवेदनशील असतात.

नागरी पीतज्वराचा प्रसार ईडिस ईजिप्ताय या डासाद्वारे होतो. हा डास मुख्यत्वे घरादारात वावरतो. दिवसा उजेडी चावतो. घरातील व आजुबाजूच्या साठलेल्या वा साठवलेल्या पाण्यात वाढतो. रोगाचा प्रसार डासाच्या मादीकडून होतो. डास रोग्याला चावल्यानंतर व्हायरस डासाच्या शरीरात शिरतात. १० ते २० दिवसांच्या कालावधीनंतर हा डास निरोगी व्यक्तिस चावून रोगाचा प्रसार करू लागतो.

अरण्य पीतज्वराची बाधा कारणपरत्वे जंगलात गेलेल्या माणसास (शिकारी, लाकूडतोडे वगैरे) तेथील दूषित डास चावल्यामुळे होते. खूप पाऊस पडत असलेल्या जंगलात हा रोग माकडांमध्ये सततच अस्तित्वात असतो. तेथून रोगाच्या साथी नागरी भागात पसरतात. १९३४ नंतर या रोगाच्या मोठ्या साथी पसरलेल्या नाहीत. बंदरात अथवा विमानतळावर रोगाचा उद्रेक झाल्याचे आढळून आले, तर ताबडतोब विलग्नवासाची (रुग्ण इतरांपासून वेगळा ठेवण्याची, क्वारंटाइनची) कडक दक्षता घेण्यात येते.

भारतात याचा अद्यापपर्यंत कधीही उद्रेक झालेला नाही परंतु याचा प्रसार करणारे ईडिस ईजिप्ताय हे डास येथे भरपूर आहेत व सर्व जनतेत रोगाचा पूर्वसंपर्क नसल्यामुळे प्रतिकारक शक्ती अजिबात नाही. तेव्हा हा रोग येथे उद्‌भवल्यास फार भयंकर साथ उद्‌भवू शकेल.

विकृती : पीतज्वरात मुख्यतः यकृतात वैशिष्ट्यपूर्ण विकृती आढळते. ठिकठिकाणी यकृत कोशिका नाश पावतात. असा कोशिकानाश यकृत घटकाच्या मध्यभागात विशेषेकरून दिसून येतो. केंद्रीय व प्रवेशिका नीलभोवतीच्या (आतड्यातील अशुध्द रक्त यकृताकडे वाहून नेणाऱ्या सूक्ष‌्म वाहिनीभोवतीच्या) यकृत कोशिकांत फारसा बिघाड नसतो. ऊतकमृत्यू ठिकठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात आढळतो. नाश पावलेल्या कोशिकांत मधून मधून एखादी अरुणकर्षी-काचाभ (इओसीन या रंगद्रव्याने सहज अभिरंजित करता येणारी व काचेसारखी जवळजवळ पारदर्शक असणारी) कोशिका आढळते. याशिवाय मेदविघटनही (स्निग्ध पदार्थांचे घटक अलग होण्याची क्रियाही) आढळते. मूत्रपिंडात मुख्यतः मूत्रनलिकांतून विकृती आढळते.

लक्षणे : बहुसंख्य रोग्यांत रोगाचे स्वरूप सौम्य, किंचित डोकेदुखी व थोडा ताप एवढ्यापुरतेच मर्यादित असते. रोगी काही दिवसांत बरा होतो. संसर्गाच्या दृष्टीने हे रोगी महत्त्वाचे असतात. डासावाटे ते रोगप्रसार करू शकतात. म्हणूनच त्यांना झालेल्या सौम्य वा क्षुल्लक रोगाचे निदान होणे महत्त्वाचे असते. पीतज्वर क्षेत्रात अशा रोग्यांचे अचूक निदान होणे अत्यंत महत्त्वाचे असते.

रोगाचा परिपाककाल (व्हायरस शरीरात शिरल्यापासून प्रत्यक्ष लक्षणे दिसेपर्यंतचा काळ) तीन ते सहा दिवसांचा असून सुरुवात एकदम होते. पूर्व लक्षणे काहीही नसतात. रोगाचा पहिला टप्पा तीन दिवसांचा असतो, त्यास शोथावस्था म्हणतात. तीव्र डोकेदुखी, पाठदुखी, कसकस, पाय दुखणे, थकवा इ. त्रास होतो. चेहरा व डोळे लाल होतात. प्रकाशाकडे बघवत नाही. जिभेचा शेंडा लाल होतो. सुरुवातीस कावीळ नसते. ताप एकदम ४० से.पर्यंत किंवा त्यापेक्षा वर चढतो. त्या प्रमाणात नाडीचा वेग वाढत नाही. सुरुवातीस नाडी वाढली, तरी नंतर कमी होते. पोटात मळमळते, उलट्या होतात, अस्वस्थ वाटते, बध्दकोष्ठ होते. रक्तातील पांढऱ्या कोशिकांची संख्या कमी होते. तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी मूत्रातून एकदम मोठ्या प्रमाणात प्रथिने जाऊ लागतात.

यानंतर किंचित सुधारणा होऊन चौथ्या दिवसापासून ‘विषावस्थेस’ सुरुवात होते. ताप उतरतो, डोकेदुखी थांबते. रोगी अस्वस्थ व चिडचिडा होतो. हळूहळू शरीर पिवळे पडते व कावीळ वाढत जाते. सर्व तीव्र आजारी रोग्यांत कावीळ असतेच. निरनिरळ्या अवयवांत रक्तस्राव होतात. हिरड्या सुजतात आणि दाबल्यावर त्यांतून रक्त येते. घोळणा फुटतो, त्वचेखाली सूक्ष‌्म किंवा मोठे रक्तस्राव आढळतात. जठर, आतडी, गर्भाशय यांतून गंभीर स्वरूपाचा रक्तस्राव  होऊ शकतो. नाडी दर मिनिटाला ५० पर्यंत कमी होते. हृदय स्नायुशोथामुळे रक्तदाबन्यूनत्व व हृद‌्विस्तार हे विकार उद्‌भवू शकतात. उलट्या होतच असतात. जठरात रक्तस्राव झाल्यास रक्ताची उलटी होते. मूत्रातून प्रथिनोत्सर्जन वाढलेले असते. अखेरीस उचकी, खूप उलट्या, रुधिरज कृष्णमल (शौचास काळे होणे) या गोष्टी होतात रोगी बेशुध्द होतो व दगावतो.

तीव्र आजारी रोगी बरा होऊ लागतो तेव्हा सातव्या-आठव्या दिवसापासून प्रकृतीस उतार पडतो. प्रथिनोत्सर्जन थांबते. बरा झाला म्हणजे तो कायमचा बरा होतो. शरीरात कायमची रोगप्रतिकारक्षमता निर्माण होते व रोगाचा पुनरुद्‌भवच होत नाही.

निदान : रक्ताची उलटी, मूत्रातून मोठ्या प्रमाणात प्रथिनोत्सर्जन, कावीळ, ताप व कृष्णमल या लक्षण समुदायात पीतज्वराचा विचार करावयास हवा. यकृतशोथ, मलेरिया, विषमज्वर, काविळीची इतर कारणे [ → कावीळ] यांचा निदान करताना विचार करणे आवश्यक असते. लक्षणे सौम्य असताना ⇨ डेंग्यू ज्वर, ⇨ इन्फल्यूएंझा यांपासून पीतज्वर वेगळा ओळखणे अवघड असते. माकडातून व्हायरस वाढविणे आणि रोग्याच्या शवतपासणीत मिळालेल्या यकृत, मूत्रपिंड या अवयावांतून व्हायरस वाढविणे यांवरुन खरे निदान सिध्द होते. रोग्याचे आजारी असताना व बरे झाल्यानंतर असे दोनदा रक्त घेऊन त्यामध्ये आजाराच्या अवधीत व्हायरसविरोधी ⇨ प्रतिपिंडांची वाढ झालेली दाखविता आल्यानेही निदान सिध्द होते. यासाठी पूरक बंधन (विशिष्ट प्रतिपिंडाचे वा प्रतिजनांचे अस्तित्व, त्या दोहोंपैकी एकाची उपस्थिती ज्ञात असताना, ओळखण्याची परीक्षा), रक्तसमूहन (रक्तातील तांबड्या कोशिकांच्या एकत्रित समूह तयार होण्याची क्रिया), प्रतिबंधक यांसारख्या परीक्षा केल्य़ा जातात.

फलानुमान : (रोगाची लक्षणे व स्वरूप यांवरून रोगी बरा होण्यासंबंधीचे अनुमान). रोगाच्या सुरुवातीस फलानुमान निश्चित सांगता येत नाही. कारण सौम्य वाटणारा रोग केव्हाही गंभीर स्वरूपात जाऊ शकतो.सुरूवातीपासून सौम्य लक्षणे असल्यास रोगी जलद बरा होतो . तीव्र आजारातील काही रोगीच बरे होतात. रक्ताच्या उलट्या, उचक्या आणि कृष्णमल ही लक्षणे गंभीर भवितव्य दर्शवितात.

उपचार : व्हायरसविरोधी विशिष्ट उपचार उपलब्ध नाहीत. डोकेदुखी, अंगदुखी यांसाठी औषधे, भरपूर पाणी, पेये आणि जरूर तर नीलेतून लवणविद्राव (सलाइन ), रक्त इ. द्यावे लागतात.उलट्या व ताप थांबल्यावर हळूहळू पूर्ण आहार द्यावा. जरूरीप्रमाणे इतर उपचार करावयाचे असतात.

प्रतीबंध : आजूबाजूस डास असतील, तर पीतज्वराच्या रोग्यास पहिले चार दिवस मच्छरदाणीत ठेवावे. पीतज्वर प्रदेशात जाणाऱ्या सर्व प्रवाशांना व त्या प्रदेशातील रहिवाशांना पीतज्वर लस टोचणे आवश्यक असते.

माणसात प्रतिकारक्षमता निर्मितीसाठी व्हायरसांच्या दोन प्रकारच्या जातींपासून बनविलेल्या लसी वापरात आहेत. १७ डी लस कोंबडीच्या गर्भापासून केलेल्या कोशिकावृध्दी माध्यमावर व्हायरस (१७ डी जातीचे) वाढवून तयार केली जाते, ती त्वचेखाली टोचतात. फ्रेंच तंत्रिकाकर्षी लस (पाश्चर संस्था प्रणीत) अरेबिक (किंवा ॲकेशिया) डिंकात टांगलेल्या उंदराच्या मेंदूत वाढविलेल्या व्हायरसांपासून बनविलेली असते. ही लस त्वचेवर एक थेंब ठेवून त्यात ओरखडे काढून दिली जाते. १७ डी लस त्यातल्या त्यात लहान मुलांसाठी अधिक सुरक्षित आहे. लस दिल्यानंतर एक आठवड्याने शरीरात रोगप्रतिकारक्षमता निर्माण होते व ती दहा वर्षे तरी टिकते. नागरी भागातील साथ लस मोठ्या प्रमाणात टोचल्याने ताबडतोब आटोक्यात येते. याबरोबरच डास प्रतिबंधक उपाय [→ डास] करावयास हवेत.

संदर्भ : 1. Beeson, P. B. McDermot, W., Ed. Textbook of Medicine, Philadelphia, 1975.

     2. Davidson, S. MacLeod, J., Ed. The Principles and Practice of Medicine, Edinburgh, 1968.

     3. World Health Organization, Yellow Fever Vaccination, Geneva, 1956.

     4. World Health Organization, International Sanitary Regulations, Geneva, 1961.

रानडे, म. आ. कुलकर्णी, श्यामकांत