स्नायु तंत्र : स्नायू हे अल्पावधीत आकुंचन पावणारे आणि शिथिल होऊ न पूर्ववत होणारे ऊतक (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकांचा समूह) आहे. हा गुणधर्म असणाऱ्या अनेक तंतूंची सुव्यवस्थित रचना होऊन प्रत्येक स्नायू तयार झालेला असतो. सूक्ष्मदर्शकातून पाहिले असता स्नायूंच्या आकुंचनशील घटकांची आणि स्नायुतंतूची मांडणी तीन भिन्न प्रकारांची आहे, असे लक्षात येते. ही मांडणी, स्नायूंचे कार्य आणिा त्यावरील मतंत्रिका तंत्राचे (मज्जासंस्थेचे) नियंत्रण यांच्या आधारे स्नायूंचे पुढील तीन प्रकारांत विभाजन होऊ शकते : (१) रेखित आणि ऐच्छिक नियंत्रणानुसार कार्य करणारे, मुख्यतः सांध्यांची हालचाल घडवून आणणारे कंकालीय (हाडांच्या सांगाड्यांशी संबंधित) स्नायू (२) रेखित परंतु ऐच्छिक नियंत्रण नसणारे, स्वायत्त तंत्रिका तंत्राच्या आदेशानुसार कार्य करणारे आणि असे नियंत्रण (आदेश) नसल्यास स्वतंत्रपणे कार्य करत राहणारे हृदयाचे स्नायू आणि (३) अरेखित, सांगाड्याशी संबंध नसलेले, परंतु अंत:स्थित इंद्रिये व रक्तवाहिन्या यांसारख्या पोकळ अवयवांमधील अनैच्छिक स्नायू. यांपैकी पहिल्या प्रकारातील सर्व स्नायू ‘स्नायू तंत्रा’त येतात. दुसऱ्या व तिसऱ्या प्रकारांचा विचार ⇨ ऱ्हदय आणि अन्य इंद्रियांच्या वर्णनात केला जातो.

मानवी स्नायू तंत्रात सु. ६०० पेक्षा अधिक स्नायूंचा समावेश होतो. प्रौढ, निरोगी आणि सुपोषित व्यक्तीच्या शरीराच्या वजनाचा ४० प्रतिशत भाग या स्नायूंचे वजन दाखवितो वर दिलेल्या २ व ३ क्रमांकांच्या स्नायूंचे एकत्र वजन सु. १० प्रतिशत भरते. कुपोषण, व्यायाम, व्यवसायाचे स्वरूप यांमुळे एकूण वजन कमी-अधिक होऊ शकते परंतु स्नायूंची आणि त्यांच्यातील स्नायुतंतूंची संख्या बदलत नाही. फक्त आकारमानात घट किंवा वाढ होते.

रचना : प्रत्येक कंकालीय स्नायूची दोन टोके एखााद्या सांध्याच्या दोन हाडांना जोडलेली असतात) सांध्यांची जी बाजू नेहमीच्या हालचालीत अधिक स्थिर असते, तेथील टोकाला स्नायूचा प्रारंभ होतो असे मानले जाते. या प्रारंभाच्या ठिकाणी स्नायूचे बाह्य आवरण आणि हाडावरील आवरण यांचे संयोेजी (जोडणारे) ऊतक एकत्र येऊन दृढ असे बंधन तयार होते. मांडीचे आणि बाहूंचे काही स्नायू प्रारंभाच्या ठिकाणी दोन किंवा अधिक भागांत विभागलेले आढळतात. या भागांना स्नायूची शिरे (शीर्षे) म्हणतात. अशा द्वि-, त्रि- किंवा चतु:-शिरस्क स्नायूंचे प्रारंभ एकाहून अधिक हाडांपासून झालेले असू शकतात. स्नायूचे दुसरे टोक सांध्याच्या दुसऱ्या बाजूकडील हाडास जोडलेले असते. दुसरे टोक जोडलेल्या ठिकाणास निवेशन किंवा बंधस्थान म्हणतात. अनेक स्नायूंमध्ये या दुसऱ्या टोकाचे रूपांतर चिवट संयोेजी ऊतकापासून निर्माण झालेल्या दोरीसारख्या कंडरेत [ ⟶ कंडरा ] झालेले असते. चेहऱ्यासारख्या ठिकाणी स्नायूचे दुसरे टोक संयोेी ऊतकासच जोडलेले असते. उदा., चेहऱ्यावरील हावभाव निर्माण करणारे स्नायू किंवा डोळ्याची (नेत्रगोलाची) हालचाल घडविणारे स्नायू.

दोन टोकांच्या दरम्यानचा स्नायूचा भाग अनेक स्नायुतंतूंनी बनलेला असतो. त्यांची संख्या स्नायूकडून अपेक्षित कार्यासाठी लागणाऱ्या शक्तीवर अवलंबून असते. हे सर्व तंतू जवळजवळ स्नायूची पूर्ण लांबी व्यापणारे, एकमेकांना समांतर आणि संयोेी ऊतकाच्या साह्याने एकत्र बांधलेले आढळतात. प्रत्येक तंतू १० ते ८० म्यूमी. (मायक्रोमीटर=१०-४सेंमी.) जाडीचा असतो. तंतूला उत्तेजित करणारी तंत्रिकेची शाखा स्नायूच्या मध्यावर स्नायूत प्रवेश करते. तंत्रिकेतील प्रत्येक तंत्रिका कोशिकेच्या तंतूपासून (अक्षदंडापासून) हजारो उपशाखा निघत असल्यामुळे प्रत्येक स्नायुतंतूस एक स्वतंत्र उपशाखीय तंतू नियंत्रित करू शकतो. या संरचनेमुळे तंत्रिका उत्तेजित झाल्यावर सर्व स्नायुतंतू एकाच वेळी आकुंचन पावू शकतात.

स्नायुतंतूंचे अधिक बारकाईने निरीक्षण केल्यास प्रत्येक स्नायुतंतूमध्ये शेकडो तंतुके असतात, असे आढळते. प्रत्येक स्नायुतंतुकाची रचना उसाच्या किंवा बांबूच्या एखाद्या कांड्यासारखी अनेक पेरे असलेली दिसते. सुमारे २ मायक्रोमीटर लांबीच्या या पेऱ्यांच्या दोन्ही बाजूंस ‘झेड डिस्क’ किंवा हेन्सेन चकती या नावाने ओळखली जाणारे रेणुरचना असते. दोन चकत्यांच्या दरम्यानच्या सूक्ष्म स्नायुखंडात स्नायूचे आकुंचनशील घटक, ॲक्टिन व मायोसिनाचे रेणू एकाआड एक अशा पध्दतीने एकमेकांना समांतर आणि काही अंतरापर्यंत परस्परव्यापी असे असतात. प्रत्येक स्नायुतंतुकात सुमारे १५०० मायोसिन तंतू आणि सुमारे ३,००० ॲक्टिन तंतू असतात. ॲक्टिनाचे एक टोक झेड् डिस्कला बध्द असते. मायोसिनाचा तंतू अधिक जाड असतो व तो स्नायुखंडाच्या मधाल्या भागात असतो. त्याच्यापासून निघणाऱ्या अनेक तिरक्या शाखा ॲक्टिनाच्या रेणूच्या दिशेने झुकलेल्या असतात. या रचनेमुळे तंत्रिकेकडून आदेश येताच ॲक्टिनाचे तंतू आणि त्रयाबरोबर झेड् डिस्कचा भाग मध्याकडे खोचला जाऊन स्नायुखंडाची लांबी कमी होते (पहा आकृती). या दोन प्रकारच्या रेणूंच्या भिन्न गुणधर्मांमुळे व विशिष्ट रचनेमुळे ध्रुवीकृत प्रकाशात निरीक्षण केल्यास स्नायुखंडावर आडवे पट्टे (फिकट व गडद प्रकाशाचे) असल्यासारखे दिसते.


स्नायुतंतुकाच्या एका पेऱ्याची रचना : (अ) शिथिल स्थितीत (आ) आकुंचित स्थितीत : (१) झेड् डिस्क, (२) ॲक्टिनाचे तंतू, (३) मायोसिनाचा तंतू (आकृती स्पष्ट होण्यासाठी समांतर तंतूंमधील मोकळी जागा जास्त ठेवली आहे).

आकुंचनाची क्रिया : तंत्रिका तंतूमधून आवेग (संदेश) येण्याची क्रिया तंतूच्या पृष्ठभागावरील विद्युत् वर्चसातील बदल होण्यामुळे होत असते. स्नायूपर्यंत हा आवेग पोचल्यावर तेथील तंत्रिका तंतूमधून ॲसिटिल कोलीन हा प्रेषक बाहेर पडतो. त्याच्या क्रियेमुळे स्नायूच्या तंतूंच्या पृष्ठभागावरही तशाच प्रकारच्या विद्युत् वर्चसातील बदल घडून येतो. या बदलामुळे स्नायुतंतुकामध्ये कॅल्शियमाचे आयन (विद्युत् भारयुक्त अणू) मुक्त होतात) ॲडिनोसीन ट्रायफॉस्फेट (एटीपी) या ऊर्जादायक जैवरसायनाच्या मदतीने व कॅल्शियमाच्या उपस्थितीमुळे ॲक्टिन व मायोसिनाच्या रेणूंमध्ये जे तात्पुरते रचनात्मक फेरफार नंतर घडतात, त्यामुळे या दोन प्रकारच्या रेणूंमध्ये आकर्षण निर्माण होते. परिणामत: ते एकमेकांकडे सरकू लागतात व स्नायुखंडाची लांबी कमी होते. ही सर्व प्रक्रिया अत्यंत जलद होते आणि सुमारे १० ते १०० मिलिसेकंद टिकते. तंत्रिकेतून वारंवार संदेश येत राहिल्यामुळे आकुंचन अधिक काळ चालू राहते. शरीरातील काही स्नायू (उदा.,पोटरीमधील गॅस्ट्रोनेमियस) आणि बहुतेक सर्व स्नायूंमधील काही तंतू मायोग्लोबिन या द्रव्याच्या कमतरतेमुळे अधिक फिकट रंगाचे किंवा पांढरे दिसतात. या पांढऱ्या तंतूमध्ये एकदम जोरदार, परंतु अल्पकालिक आकुंचन निर्माण करण्याची क्षमता असते. इतर स्नायूंमध्ये दीर्घकाळ ऑक्सिजन धरून ठेवणारे मायोग्लोबिन असल्यामुळे ते गडद लाल (तांबडे) दिसतात व दीर्घकाळ टिकणारे, कमी ताकदीचे आकुंचन निर्माण करू शकतात. कोणत्याही स्नायू पूर्णपणे शिथिल कधीच नसतो. या अंशत: आकुंचित अवस्थेस स्नायुतानता म्हणतात. कोणत्याही आसनावस्थेत शरीराचा तोल सांभाळून ते स्थिर ठेवण्यासाठी या तानतेचा उपयोग होतो. आकुंचनाच्या प्रक्रियेसाठी स्नायूमधील ॲक्टिन व मायोसिन यांच्या भोवती असलेल्या स्नायुजलात योग्य प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फेट हे आयन आणि एटीपीच्या चयापचयाच्या प्रक्रियांमध्ये आवश्यक असलेली ⇨ एंझाइमे योग्य प्रमाणात असणे आवश्यक ठरते. त्यांच्या कमतरतेमुळे स्नायूंची कार्यक्षमता कमी होऊ शकते. तसेच दीर्घकाळ अविश्रांत आकुंचनाची क्रिया घडत राहिल्यास लॅक्टिक अम्लासारखे पदार्थ साचत राहून स्नायूंना शीण येऊन आकुंचनाचे प्रमाण हळूहळू कमी होत जाते. एटीपीपासून प्राप्त झालेल्या ऊर्जेचा वापर आकुंचनाच्या कामी करून घेण्याच्या बाबतीत स्नायूंची कार्यक्षमता मुळातच फार कमी आढळते. सुमारे २५% ऊर्जेचा वापर यासाठी होत असतो आणि ७५% ऊर्जेचे रूपांतर उष्णतेत होते. त्यामुळे स्नायूंच्या आकुंचनाचा उपयोग शरीरातील उष्णता वाढवण्यासाठीही होतो. या उष्णतेमुळे तापमानात वाढ होऊ लागल्यास ते स्थिर ठेवण्यासाठी घाम येण्यास प्रारंभ होतो.

स्नायू तंत्रामुळे घडून येणाऱ्या हालचाली : शरीरातील सर्व चल सांध्यांच्या हालचाली स्नायूंच्या मदतीने होत असतात. निरनिराळ्या प्रकारच्या हालचालींसाठी विकसित झालेले व त्यांच्या कार्यानुसार निरनिराळ्या अक्षांभोवती फिरणारे हे सांधे हाडांच्या हालचाली ज्या प्रकारे घडवतात त्या प्रकारानुसार अनेकदा स्नायूंना नावे दिलेली आढळतात. कोणताही स्नायू आकुंचनामुळे त्याला जोडलेल्या हाडास ओढण्याचे कार्य करू शकतो परंतु हे आकुंचन थांबल्यावर प्रसरण पावणारा (शिथिल होणारा) स्नायू हाडास ढकलण्याचे काम करू शकत नाही. त्यामुळे बहुतेक सर्व सांध्यांभोवती परस्परविरोधी हालचाली घडवून आणणाऱ्या स्नायूंच्या जोड्या आढळतात. उदा., दंडाच्या पुढील बाजूस असलेला द्विशिरस्क स्नायू कोपर मिटून हात खांद्यापाशी आणतो मागील बाजूस असलेला त्रिशिरस्क स्नायू त्याविरुध्द क्रिया करून कोपर सरळ करून हात दूर नेतो. स्थूलमानाने स्नायूंकडून होत असलेल्या हालचाली पुढील प्रमाणे असू शकतात : (१) सांधा मिटणे : यामुळे सांध्याच्या दोन (अलीकडील व पलीकडील) भागांचे पृष्ठभाग एकमेकांच्या दिशेने जवळ येतात किंवा टेकतात. उदा., कोपर, गुडघा, बोटे, मान इ. मिटणे किंवा वाकविणे. ही क्रिया आनमनी (वाकणाऱ्या) स्नायूंमुळे होते) (२) सांधा उघडणे : वरील क्रियेच्या विरुध्द अशा या क्रियेमुळे हात, पाय, मान इ. ताठ होतात. ही क्रिया करणारे स्नायू प्रसारणी (वर्धनशील) गणले जातात. (३) शरीराच्या मध्यरेषेकडे किंवा हाताच्या/पायाच्या मध्यरेषेकडे अवयव आणणे. उदा., हात छातीच्या बाजूस आणून टेकवणे, पाय वा गुडघे एकमेकांसमीप आणणे, हाताची वा पायाची बोटे मधल्या बोटाच्या दिशेने जवळ आणणे. या स्नायूंना अभिवर्तनी म्हणतात. (४) याविरुध्द क्रिया करणारे स्नायू अपवर्तनी म्हणून ओळखले जातात. (५) सांध्याच्या उभ्या अक्षाभोवती फिरल्यामुळे पलीकडला (दूरस्थ) भाग जागच्या जागीच फिरणे. ही क्रिया घडविणारे स्नायू घूर्णक म्हणून ओळखले जातात. अंतर्घूर्णक व बहिर्घूर्णक असे त्यांचे दोन वर्ग करता येतात. तळहात आणि अग्रबाहू पालथे ठेवणे, मानेची नकारदर्शक हालचाल, पावलांची टोके एकमेकांकडे किंवा बाहेरच्या दिशेने वळविणे यांसारख्या हालचालींचा यात समावेश होतो. (६) यांखेरीज दोन पृष्ठभाग एकमेकांवर सरकविणे (जबड्याची मागे-पुढे हालचाल), एखादा भाग वर उचलणे (बरगड्यांची अंत:श्‍वसनाच्या वेळी होणारी हालचाल, गुदद्वाराची मलविसर्जन करताना होणारी हालचाल), खाली ओढणे (श्वसनाच्या वेळी छाती व पोट यांच्यामधील पडद्याची हालचाल), तोंड किंवा डोळे घट्ट मिटताना होणाऱ्या ओठांच्या किंवा पापण्यांच्या हालचाली, जिभेच्या हालचाली (बोलताना आणि खाताना होणाऱ्या) इ. विविध प्रकारच्या हालचाली स्नायूंकडून होत असतात.

वजन उचलणे, ओढणे, ढकलणे, भार वाहून नेणे, चालणे किंवा पळणे यांसारख्या हालचालींत अनेक सांधे व स्नायू यांचा सहभाग असतो आणि यात अनेक तरफ-प्रणाली कार्यान्वित होत असतात. त्यांच्या एकत्रित परिणामामुळे स्नायूंमधील ऊर्जेचा जास्तीत जास्त उपयोग करून घेण्याचा प्रयत्न शरीराकडून होतो. ऊर्जेपासून स्नायूंचे दोन प्रकारचे आकुंचन होऊ शकते. समताणी प्रकारात स्नायूची लांबी कमी होते आणि तानतेत फारसा फरक पडत नाही. अवयवांच्या हालचालींसाठी हे आकुंचन उपयोगी पडते. याउलट सममात्रीय किंवा सममितीय आकुंचनात स्नायूची लांबी विशेष न बदलता ऊर्जेचा उपयोग एखादी बाहेरील वस्तू ओढणे, ढकलणे किंवा दाबणे यांसारख्या कमीत कमी हालचालींत जास्तीत जास्त शक्ती लावण्याच्या कामांसाठी होतो. उदा., भारतोलन (जड वस्तू दीर्घकाळ उचलून धरणे), स्थिर असलेली वस्तू वा वाहन ढकलण्यासाठी सुरुवातीस जोर लावणे, उचलून घेतलेली जड वस्तू – भरलेली बादली किंवा प्रवासी सामान-एका ठिकाणाहून दुसरीकडे नेताना उचलून धरणे.

स्नायू तंत्राचे नियंत्रण : कंकालीय स्नायूंच्या हालचाली ऐच्छिक असल्यामुळे त्यांचे तंत्रिका तंत्रीय नियंत्रण सर्वांत उच्च पातळीवरून म्हणजे प्रमस्तिष्काच्या बाह्यांगाकडून होत असते. अनुमस्तिष्काकडून (लहान मेंदूकडून) प्रत्येक हालचालीत सहभागी होणाऱ्या अनेक स्नायूंच्या कार्यात समन्वय साधला जातो. या सर्व नियंत्रणासाठी आवश्यक ते संदेश मेंदूतून मेरुरज्जूच्या निरनिराळ्या पातळ्यांवर पोचविणाऱ्या तंत्रिका कोशिका व त्यांच्यापासून निघणारे तंतू (अक्षदंड) यांना ऊर्ध्व किंवा वरच्या प्रेरक तंत्रिका म्हणतात. मेरुरज्जूच्या पातळीवर स्नायूकडे जाणाऱ्या तंत्रिका तंतूंचा दुसरा टप्पा सुरू होतो. त्याला निम्न किंवा खालची प्रेरक तंत्रिका म्हणतात. ही तंत्रिका वरून आलेले संदेश स्नायूकडे पोचविण्याचे कार्य करते तसेच स्नायूचे प्रतिक्षेपी आकुंचन घडविण्यातही तिचा महत्त्वाचा सहभाग असतो. स्नायूची तानता टिकवून धरणे आणि त्याच्या पोषणासाठी आवश्यक असे आदेश निर्माण करण्याचे कामही या तंत्रिकेकडे असते. पक्षाघातासारख्या घटनेत वरच्या तंत्रिकेस इजा झाल्यामुळे स्नायू काही काळ शिथिल होतात किंवा नियंत्रण हरवतात. परंतु नंतर तानता वाढून ते ताठर होतात आणि ऐच्छिक हालचाली करू शकत नाहीत. याउलट तंत्रिका शोथ, पोलिओ, अपघात यांसारख्या कारणांनी जर खालच्या तंत्रिकेस इजा झाली तर स्नायू शिथिल, दुर्बल, अपोषित होऊन त्यांचे आकारमान खूप घटते आणि ऐच्छिक हालचालींबरोबरच प्रतिक्षेपी हालचालीही बंद होतात.


स्नायूंचे विकार : मुख्यतः अपघातजन्य कार्यदोष आणि उपजत, आनुवंशिक पुष्टिदोष (कष्टपोषण) यांचाच आढख स्नायू तंत्रात दिसतो. जंतुसंक्रामणे आणि अर्बुदे क्वचितच निर्माण होतात. रक्तातील चयापचयजन्य बदलांमुळेही स्नायूंच्या कार्यरत तात्पुरते दोष संभवतात.

अपघातामुळे डोक्याला किंवा पाठीच्या कण्याला मार लागल्यास वर उल्लेख केलेल्या वरच्या किंवा खालच्या तंत्रिकांवर जोराचा दाब येऊन त्या नष्ट होतात. त्यामुळे अशा तंत्रिकांच्या नियंत्रणाखाली असणारे स्नायू पक्षाघात होऊन निरुपयोगी होतात. तंत्रिकांचे पुनरुज्जीवन किंवा नवनिर्मिती होत नसल्यामुळे तांत्रिकांचा आजार कायमस्वरूपी असतो. अशाच प्रकारचा पक्षाघात मेंदूमधील रक्तस्राव किंवा वाहिनीक्लथन, अर्बुद, दोन मणक्यांच्या दरम्यान असणाऱ्या आंतर-कशेरुक चकतीचे विस्थापन किंवा वार्धक्यामुळे पाठीच्या कण्यातील मेरुनाल अरुंद होणे यांसारख्या कारणांनी होऊ शकतो. तो एकाएकी न होता हळूहळू दाब वाढत गेल्यामुळे होतो. त्यामुळे लवकर निदान झाल्यास त्याची वाढ थांबविणे शक्य असते व रुग्णामध्ये सुधारणा होते. जड वजन एकदम उचलणे, खेळताना दुखापत होणे, घसरल्यामुळे हातपाय मुरगळणे किंवा मोडणे यांसारख्या कारणांनी होणाऱ्या खालच्या तंत्रिकेच्या इजाही सौम्य किंवा तात्पूरता स्वरूपाचा पक्षाघात निर्माण करू शकतात. [⟶ पक्षाघात].

अपघातामुळे झालेल्या खोल किंवा विस्तृत जखमेमध्ये अनेक प्रकारचे जंतू प्रवेश करू शकतात. त्यांपैकी क्लॉस्ट्रिडियमाच्या जाती स्नायूंच्या दृष्टीने सर्वांत हानिकारक ठरतात. ऑक्सिजनाची कमतरता असणाऱ्या वातावरणात वाढणारे तीन प्रकारचे क्लॉस्ट्रिडियम जंतू तंत्रिका व स्नायूंना कमजोर करू शकतात. क्लॉस्ट्रिडियम टिटॅनाय तंत्रिकांवर परिणाम करणारे विष निर्माण करून धनुर्वात निर्माण करतात. त्यात सर्व स्नायूंचे जोरदार आकुंचन होऊन शरीरात ताठरपणा पसरत जातो. क्लॉ परफ्रिंजेन्स याची वाढ जखमेतील मृत ऊतकात चांगली होते. त्यांच्या विषाचा प्रवेश आसपासच्या निरोगी स्नायूंमध्ये होऊन तेथे वायुनिर्मिती होऊ लागते व ऊतकमृत्यू घडू लागतो. त्याला वायुकोथ म्हणतात. [⟶कोथ]. कधीकधी यावर उपचारासाठी मोठ्या प्रमाणात आसपासचे ऊतक कापून काढावे लागतात. क्लॉ. बोट्युलिनम याचे जंतू अत्यंत प्रभावशाली विष तयार करतात. त्यामुळे अन्नविषबाधा होऊन स्नायूंची आकुंचन शक्ती कमी होते. तंत्रिका तंतूंची टोके रासायनिक प्रेषक निर्माण करू शकत नसल्यामुळे ही पक्षाघाताची स्थिती निर्माण होते. सुदैवाने या तीनही प्रकारच्या क्लॉस्ट्रिडियम संक्रामणावर उपचारासाठी पेनिसिलिनासारखी प्रतिजैव (अँटिबायॉटिक) आणि विषाचा परिणाम रोखणारी प्रतिपिंडाच्या स्वरूपातील प्रतिविषे उपलब्ध आहेत. तसेच हे नवीन तंत्र आहे. विषाणुजन्य विकारांपैकी बालपक्षाघाताचे विषाणू खालच्या पातळीवर तंत्रिकांची कार्यक्षमता नष्ट करून कायमचा पक्षाघात घडवून आणतात. याउलट इन्फ्ल्यूएंझा-बी हा विषाणू स्नायूंवर परिणाम करून काही दिवस टिकणारी स्नायुवेदना निर्माण करू शकतात.

अनेक रासायनिक पदार्थ व औषधे स्नायू तंत्रावर अनिष्ट परिणाम करू शकतात. कीटकनाशके, तणनाशके, युध्दात वापरले जाणारे वायू, क्युरारे नावाचे बाणविष यांच्या विषाक्ततेमध्ये स्नायूंचा पक्षाघात होऊन श्‍वसनाची क्रिया थांबू शकते. अल्कोहॉलाचे अतिरिक्त सेवन, थायामिनाची (जीवनसत्त्व-ब१) कमतरता, खाणीत किंवा भट्टीत काम केल्यामुळे घामातून सोडियमाचे मोठ्या प्रमाणात उत्सर्जन यांचाही स्नायूंच्या कार्यक्षमतेवर हानिकारक परिणाम संचित स्वरूपात होतो. आहारानंतर अतिरेकी कष्ट, व्यायाम किंवा पोहणे यांमुळे रक्तपुरवठा कमी होऊन स्नायूंचे जोरदार व वेदनामय आकुंचन (पेटके, वांब) होऊ शकते. कॅल्शियमाच्या अल्पतेमुळे (रक्तातील) अशीच परिस्थिती उद्भवते. हिवतापावरील क्लोरोक्वीन आणि कर्करोगावरील व्हिनक्रिस्टीन यांसारखी औषधे, स्नायूंची वाढ करणारी आणि खेळातील यश संपादनासाठी घेतली जाणारी स्टेरॉइडे, फॉलिक अम्लाची कमतरता निर्माण करणारी सल्फा किंवा अन्य औषधे यांच्या उपयोगातही स्नायू तंत्रावरील दुष्परिणामांचा धोका लक्षात ठेवावा लागतो.

कंकालीय स्नायू जरी ऐच्छिक हालचाली करत असले, तरी कधीकधी त्यांच्या अनैच्छिक हालचालीही घडून येतात आणि व्यक्तीचे त्यावर नियंत्रण राहू शकत नाही. पार्किनसन विकार, दीर्घकाळ मद्यपान केल्यामुळे होणारा कंपवात, लहान मेंदूचे विकार यांसारख्या तंत्रिका विकारांमध्ये हातापायांच्या स्नायूंचे आकुंचन व शिथिलनाची क्रिया सतत होत राहिल्याने ते थरथर कापतात. काही वेळा हे कंपन स्वस्थ राहिले असताही चालू राहते. काही रुग्णांमध्ये एखादी क्रिया करण्याचा विचार केल्यावरच कंपन निर्माण होते (उद्देशजन्य कंपन). अतिशय वयोवृध्द व्यक्तींमध्येही काही प्रमाणात असे कंपन आढळते. कंपनापेक्षा अधिक जोरदार, विशिष्ट स्नायूंपुरती मर्यादित आकुंचने स्थानिक दोषांमुळे निर्माण होऊ शकतात. उदा., पोटाच्या विकारांमुळे किंवा फ्रेनिक तंत्रिकेवर दाब आल्यामुळे मध्यपटलाचे आकुंचन आणि त्याबरोबर स्वरयंत्रातील आकुंचन एकाच वेळी झाल्याने उचकी लागते. दातांच्या हिरड्यांच्या किंवा घशाच्या विकारामुळे जबड्याचे स्नायू आकुंचन पावून तोंड घट्ट मिटले जाते (दातखीळ बसते). काही रुग्णांमध्ये मानेच्या स्नायूंचे (एकाच बाजूचे) आकुंचन होऊन मान वाकडी राहते (ग्रीवाविरूपण वक्रग्रीवा).

औषधांची अनिष्ट प्रतिक्रिया किंवा रक्तदानात रक्तगटांची विसंगती यामुळे (असंयोज्यता) कधीकधी थंडी वाजून आल्याप्रमाणे सर्व स्नायू आकुंचन-शिथिलन पावतात व त्यांतील उष्णतेमुळे तापमान वाढते.

मायस्थेनिया ग्रॅव्हिस किंवा गंभीर स्नायुदुर्बलता या विकारात स्नायूंमध्ये तंत्रिकांचे संदेशवाहक प्रेषक आपला परिणाम घडविण्यास असमर्थ ठरतात. कारण या प्रेषकाची क्रिया (ॲसिटिल कोलिनाची क्रिया) स्नायूंमधील ज्या ग्राहींवर होणे अपेक्षित असते त्या ग्राहींचे प्रतिपिंड निर्माण झालेले असतात. रुग्णाच्या स्वतःच्या प्रतिरक्षांयत्रणेतच या प्रतिपिंडांची निर्मिती होत असते (आत्मप्रतिरक्षाजन्य प्रतिपिंड). ग्राहीच्या पृष्ठभागावर हे प्रतिपिंड स्थित असल्यामुळे ॲसिटिल कोलीन त्या ग्राहींना कार्यान्वित करू शकत नाही. परिणामत: डोळ्यांच्या पापण्या अर्धवट मिटलेल्या राहणे, कोणत्याही कामाच्या वेळी थकवा येणे, डोळ्यांपुढे दोन प्रतिमा दिसणे यांसारखी लक्षणे उद्भवतात. ॲसिटील कोलिनाचे प्रमाण व परिणाम वाढविणारी औषधे (उदा., निओस्टिग्मीन) वापरून या विकारावर नियंत्रण ठेवून गंभीर समस्या टाळता येतात.


स्नायूंचे पोषणदोष निर्माण झाल्यामुळे ते अशक्त होऊन हालचालींवर मर्यादा पडण्याची अवस्था काही आनुवंशिक विकारांत निर्माण होते. या सर्व विकारांमध्ये लिंगभेदाशी संबंधित अशा एक्स गुणसूत्रातील एका जनुकात दोष असतो. त्यामुळे स्त्रियांकडून या आनुवंशिक दोषाचा वारसा पुढे जातो परंतु स्त्रीमध्ये एक्स गुणसूत्रांची जोडी असल्यामुळे त्यांतील एक निर्दोष असते व स्नायू तंत्राची वाढ त्याच्या मदतीने अबाधित राहते. सदोष गुणसूत्र प्राप्त होणाऱ्या पुरुषात मात्र (एक्स+वाय) जनुकांतील दोष प्रकट होतो. बहुरक्तस्राव (हीमोफिलिया) या विकाराप्रमाणेच हा वारसा स्त्रीकडून तिच्या मुलाला मिळतो पोषणदोष असलेल्या मुलात तो जेव्हा प्रकट होऊ लागतो, तेव्हा मूल सहजासहजी उठून उभे राहू शकत नाही किंवा नीट चालू शकत नाही. हालचाल कमी असल्याने ते लठ्ठ होते, निरनिराळी संक्रामणे उदा., श्‍वसनाचे विकार सहजासहजी होऊ शकतात व वाढ खुंटते. अल्पवयातच मृत्यू ओढवतो. दोष दाखविणारे निरनिराळे स्नायुसमूह आणि दोष प्रकट होण्याचे वय यांनुसार या पोषणदोषांचे अनेक प्रकार माहीत आहेत. त्यांतील ड्युशेन स्नायू पोषणदोष हा प्रकार अधिक विस्ताराने अभ्यासला गेला आहे. जनुकातील दोषामुुळे स्नायूंच्या वाढीस मदत करणारे डिस्ट्रोफिन नावाचे प्रथिन निर्माण होण्यास अडथळा येतो, असे या विकारात आढळते आहे. त्यामुळे स्नायूंच्या ऊतकाचा नाश होऊन त्यांची जागा तंतुमय ऊतक व वसा कोशिका घेतात आणि आकुंचनशीलता कमी होते.

पोषणदोषाचे काही तुरळक प्रकार लिंगभेदाशी संबंधित नसतात. ते स्त्री-पुरुष दोघांनाही होऊ शकतात. यांतील एका प्रकारात स्नायूंची शिथिलनक्षमता सदोष असल्याने आकुंचित स्नायूंमुळे हालचालींस अडथळा येतो. पोषणदोषाच्या कोणत्याही प्रकारावर उपाय नसल्यामुळे आनु-वंशिकतेचा अभ्यास करून गर्भपात किंवा संतती प्रतिबंधाच्या इतर उपायांचा अवलंब करून ते टाळणे एवढाच मार्ग असतो.

स्नायू तंत्राच्या विकारांमध्ये उपयुक्त निदानाच्या पध्दती : उपरुग्ण तपासणीत स्नायूचे आकारमान, वेदना, स्पर्शासह्यता चाचपून पाहिल्यास जाणवणारा कठिणपणा किंवा शिथिलता आसपासच्या भागातील संवेदनात झालेले बदल (उदा., असंवेदन, मुंग्या येणे) आणि बाहेरून सहज लक्षात येणााऱ्या कंपनासारख्या हालचाली यांवरून स्नायूमधील दोषाचे कारण काही प्रमाणात समजू शकते. अधिक सखोल तपासण्यांसाठी बाधित स्नायूंच्या किंवा अवयवाच्या प्रतिक्षेपी हालचाली, स्नायूच्या शक्तीचा अंदाज (नेहमीच्या क्रिया करणे-चालणे, उचलणे इ. आणि तशाच क्रिया बाह्य रोध लावला असता प्रतिरोध करून घडविणे) आणि विविध कामे करण्याची क्षमता, विविध आसनस्थिती साधण्याची क्षमता इ. चाचण्या केल्या जातात. तंत्रिका आणि स्नायू यांचे स्वतंत्र विद्युत् आलेख घेऊन तंत्रिकेतील किंवा तंत्रिका-स्नायू यांच्या दरम्यानच्या प्रेषणातील दोष वेगवेगळे ओळखता येतात. स्नायूंच्या रचनादोषांसाठी ऊतकपरीक्षेचा अवलंब करता येतो. स्नायुदोषामुळे तेथील क्रीएटीन कायनेजासारखी एंझाइमे ऊतकाबाहेर सांडून रक्तात येतात. त्यांचे मापन जैवरासायनिक चाचण्यांनी करता येते. विद्युत् अग्र लावून उत्तेजित केलेल्या स्नायूची आकुंचनक्षमता किंवा प्रेषकासारखे पदार्थ बाहेरून रक्तवाहिनीत टोचून निर्माण केलेले आकुंचन यांचाही निदानासाठी उपयोग होऊ शकतो.

पहा : अंगग्रहरोधके उसण कंपवात कंडरा गात्रोपघात जीभ तंत्रिका तंत्र पक्षाघात पेटके प्रतिक्षेपी क्रिया प्रेरक तंत्र भ्रूणविज्ञान मायरहोफ ओटो फ्रिट्झ सांधे र्‍हदय.

संदर्भ : 1.Berkow, R., Ed., Merck of Medical Information, 1997.

2. Evans, P., Ed., The Family Medical Reference Book, 2003.

3. Guyton, A.C. Hall, J.E. Textbook of Medical physiology, 1996.

4. Peters, M. The British Medical Association A-Z Family Medical Encyclopedia, 2004.

5. Warwick, R. Williams, P., Eds., Gray’s Anatomy, 1989.

श्रोत्री, दि. शं.