व्यवसायजन्य रोग : (ऑक्युपेशनल डिसीज). माणसाचे वेगळेपण दाखविणारे काही विकास त्याच्या उदरनिर्वाहाच्या साधनांशी निगडित असतात, असे दिसते. अश्मयुगातील शिकारी माणसांपासून हे वेगळेपण सुरू झाले आणि तेव्हापासूनच व्यवसायजन्य रोग सुरू झाले असावेत. नंतर शेतीला सुरुवात केल्यावर त्यांची वाढ झाली, असे काही तज्ञांचे मत आहे. औद्योगिक क्रांतीच्या उदयानंतरच व्यवसायजन्य रोग जास्त जाणवू लागले. व्यावसायातील हानिकारक घटक आणि विकास यांचे साहचर्य जसजसे स्पष्ट होऊ लागले, तसतसा त्यांचा पद्धतशीर अभ्यास होऊ लागला. त्यांतून आता ⇨ व्यावसायिक चिकित्सा ही स्वतंत्र शाखा निर्माण झाली आहे.

व्यवसायाच्या ठिकाणी माणसाला ज्या अपायकारक घटकांना तोंड द्यावे लागते, त्यांचे भौतिकी, रासायनिक व जैव असे स्थूल वर्गीकरण करता येईल. यांशिवाय अपघात, मानसिक ताण, अस्वाभाविक दिनचर्या आणि कामाच्या स्वरूपानुसार पडत असलेले शारिरिक ताण यांचाही अनिष्ट परिणाम स्वास्थ्यावर होऊ शकतो. या सर्वांच्या एकत्रित प्रभावामुळे निरनिराळ्या व्यवसायांची तौलनिक असुरक्षितता ठरत असते. तिचे मापन करण्यासाठी मानकीकृत मृत्युप्रमाण गुणोत्तर हा निर्देशांक वापरला जातो. तो पुढीलप्रमाणे काढतात.

                                                                            एखाद्या विशिष्ट व्यावसायिक गटातील मृत्युप्रमाण

         मानकीकृत मृत्युप्रमाण गुणोत्तर = —————————————————– X १००

                                                                        एकंदर लोकसंख्येतील त्याच वयोगटाचे मृत्युप्रमाण

हा निर्देशांक १०० हून कमी असलेल्या (सुरक्षित) व्यवसायांमध्ये अकुशल कामगार, मजूर, प्राध्यापक, शिक्षक, व्यवस्थापक, कार्यालयीन लेखनिक व टंकलेखक, सरकारी अधिकारी यांसारख्या मुख्यतः उद्योगेतर क्षेत्रांचा समावेश होतो. याउलट १०० पेक्षा जास्त निर्देशांक औद्योगिक क्षेत्राशी संबंधित आढळतात. उदा. खाणकामगार, धातु-उत्पादक कामगार, छपाई कामगार, चर्मोद्योग, यंत्रनिर्मित्री व यंत्रचालन यांतील कुशल कामगार तसेच जहाज-उद्योग, रासायनिक उद्योग, मासेमारी, बांधकाम इ. व्यवसायांतील कर्मचारी. एखाद्या व्यवसायाची तौलनिक सुरक्षितता त्यात आधुनिक तंत्रविद्येचा वापर किती यशस्वीपणे होत आहे यावर अवलंबून असते. गुणोत्तरातील दोन मृत्युप्रमाणांमधील फरक खरोखरच सांख्यिकीय (संख्याशास्त्रीय) निकषांनी सार्थसिद्ध होतो आहे का आणि होत असल्यास त्याला कारणीभूत व्यवसायेतर घटक (उदा., सामाजिक व आर्थिक पातळी) कोणते असू शकतील, याचाही विचार प्रथम करावा लागतो.

रासायनिक प्रदूषण : औद्योगिक वातावरणातील रासायनिक प्रदूषणाचा परिणाम व्यवसायजन्य विकारांच्या उद्‌भवास सर्वांत अधिक हातभार लावतो, असे दिसते. रसायनयुक्त धूर, वाफा, उपद्रवकारक वायू, सूक्ष्म फवारे, सूक्ष्मचूर्णांची धूळ यांसारख्या विविध रूपांत या पदार्थांचा माणसाशी संपर्क होऊ शकतो. त्यामुळे त्वचा, डोळे, श्वसनमार्ग आणि कधीकधी अन्नाच्या व पाण्याच्या संदूषणाने पचनमार्ग यांवर अनिष्ट परिणाम प्रथम आढळतात. काही दिवसांनी शरीरातील इतर ऊतकांवरही (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकासमूहांवरही) असे परिणाम घडून येतात. रासायनिक द्रव्यांचे व्यवसायजन्य रोगांच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.

धातू : शरीराला अनेक धातूंची सूक्ष्म प्रमाणात आवश्यकता असते. उदा. जस्त, मँगॅनीज, मॅग्नेशियम. त्यांच्या चयापचयासाठी (शरीरात सतत होणाऱ्या रासायनिक व भौतिक घडामोडींसाठी) विशिष्ट प्रथिनांची निर्मिती शरीरात होत असते. या प्रथिनांशी इतर धातूंचे अणू बद्ध झाल्यामुळे काही विकार घडून येतात. त्याचप्रमाणे आवश्यक धातूंचे शरीरातील प्रमाण जास्त झाल्यानेही विषाक्तता (विषारी परिणाम) निर्माण होऊ शकते. सुरक्षित पातळी व विषाक्त पातळी यांमधील फरक फार थोडा असल्याने आणि शरीरातून धातूंचे उत्सर्जन मंद गतीने होत असल्यामुळे धातुजन्य विषाक्तता सहज निर्माण होऊन दीर्घ काळ टिकू शकते. विकसित देशांमध्ये धातूंपासून सुरक्षित अशी हाताळणीची यंत्रे आता प्रचारात आहेत परंतु अविकसित देशांतील औद्योगिक क्षेत्रात अजूनही धातुजन्य व इतर मूलद्रव्यजन्य विकार मोठ्या प्रमाणावर आढळतात.

रासायनिक (विशेषतः कार्बनी) विद्रावक : यांचा शरीराशी श्वसनातून किंवा त्वचेतून संपर्क झाल्यास त्यांचे शोषण फार जलद गतीने होते. वसा (स्निग्ध) द्रव्यांचे प्रमाण जास्त असणाऱ्या ऊतकांमध्ये (उदा. तंत्रिका तंत्र म्हणजे मज्जासंस्था) त्यांचे संचयन होऊ शकते. रासायनिक परिवर्तनाच्या विविध प्रक्रियांचे कार्य हे विद्रावक (विरघळविणारे पदार्थ) रोखू शकतात. त्यांचे उत्सर्जन श्वसन आणि मूत्रमार्गांनी काही दिवसांतच पूर्ण होऊ शकते. अनेक विद्रावकांशी संपर्क आल्यास त्यांची विषाक्तता जास्त गंभीर स्वरूप धारण करते. विद्रावकांपैकी प्रमुख म्हणजे अल्कोहॉले, बेंझीन, टोल्यूइन, स्टायरीन, झावलीन, ॲसिटोन, हेक्झेन, ग्लायकॉल वर्ग, कार्बन टेट्राक्लोराइड आणि तत्सम क्लोरीनयुक्त हायड्रोकार्बन संयुगे होत.

स्फोटक पदार्थ, कृत्रिम धागे, प्लॅस्टिक द्रव्ये, रंग : यांसारख्या संश्लेषणजन्य (कृत्रिम रीतीने बनविलेल्या) रासायनिक कच्च्या मालाच्या निर्मितीसाठी आवश्यक अशा व्हिनिल क्लोराइड, ॲक्रिल अमाइड, ॲनिलीन व तत्सम बेंझीन संयुगांचा, तसेच नायट्रोग्लिसरीन, एथिलीन ग्लायकॉल, डायनायट्रेट अशा पूर्वद्रव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने कामगारांच्या शरीरात त्यांचा प्रवेशही सतत व मोठ्या प्रमाणात होत असतो. त्यामुळे त्यांची निवड करतानाच ती जैव परिणामांपासून शक्य तेवढी मुक्त आहेत, याची खात्री करून घ्यावी लागते.

कीटकनाशके व तणनाशके : कृषिव्यवसायात वापरली जाणारी कीटकनाशके (उदा., डीडीटी, लिंडेन, डायएल्ड्रीन, फॉस्फरसयुक्त कोलीन एस्टरेजरोधके, पायरेथ्रम इ.) तसेच तणनाशक द्रव्ये (उदा., पॅराक्काट, डायनायट्रो ऑर्थोक्रेसॉल इ.) अशा द्रव्यांच्या फवारणीसाठी वापरली जाणारी यंत्रसामग्री हाताळणारे कामगार, विमानचालक आणि शेती उत्पादन हाताळणारे शेतकरी, साठवणूक कामगार वगैरेंना या पदार्थांपासून उपद्रव होतो.

औद्योगिक वायू : रासायनिक प्रक्रियांमध्ये निर्माण होणाऱ्या आणि औद्योगिक प्रक्रियांसाठी बाहेरून पुरविण्यात येणाऱ्या वायूंच्या सूक्ष्म प्रमाणातील गळतीमुळे श्वसनमार्ग, डोळे, त्वचा यांचा दाह होऊन श्वासनलिकेचा शोथ (दाहयुक्त सूज), फुप्फुसशोथ, नेत्रश्लेष्मशोथ यांसारखे दीर्घकालीन विकार होऊ शकतात उदा. अमोनिया, फॉर्माल्डिहाइड, सल्फर डाय-ऑक्साइड, क्लोरीन, फॉस्जीन, फ्ल्युओरीनयुक्त वायू. हाच संपर्क मोठ्या प्रमाणात होत असल्यास श्वसनातील ऑक्सिजन-कार्बन डाय-ऑक्साइड-विनियमात अडथळा येऊन श्वसनरोधाचे परिणाम दिसू लागतात. कार्बन मोनॉक्साइड, निकेल कार्बोनिल, हायड्रोजन सल्फाइड, सायनाइड वायू यांसारख्या वायूंमुळे रक्तातील व ऊतकातील श्वसन-प्रक्रियाही विस्कळीत होतात. खाणकामगार, कारखान्यांतील भट्टीवरील कामगार, गटारे साफ करणारे, तेल आणि धातुकांचे (कच्च्या रूपातील धातूंचे) शुद्धीकरण करणारे तंत्रज्ञ यांच्यावर श्वसनरोधाचे परिणाम दिसू शकतात. यांशिवाय काही वायू प्रत्यक्ष श्वसनावर परिणाम घडवत नसले, तरी त्यांच्या फार मोठ्या प्रमाणातील उपस्थितीमुळे ऑक्सिजनाचे प्रमाण कमी होऊन ⇨ ऑक्सिजन-न्यूनता उद्‌भवू शकते. उदा. खाणीत साठलेला नायट्रोजन, मिथेन किंवा शीतक मिश्रणे तयार करण्याच्या कारखान्यातील कार्बन डाय-ऑक्साइड यांपासून कामगारांना धोका संभवतो.

औषधी द्रव्ये : औषध उद्योगातील कामगार, तसेच विक्रेते, परिचारिका, डॉक्टर आणि रुग्णालयातील इतर कर्मचारी यांचा संपर्क औषधी द्रव्यांशी सतत येत असतो. त्यातून प्रत्यक्ष औषधी परिणाम होण्याची शक्यता कमी असते. काही हॉर्मोनविषयक परिवर्तने, प्रतिपिंडनिर्मितीमुळे होणारी ॲलर्जी (अधिहर्षता), डोकेदुखीसारखी लक्षणे, वर्तनातील सूक्ष्म बदल हे मात्र आढळू शकतात. भूल देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वायुरूप किंवा बाष्पनशील औषधांनी (उदा. हॅलोथेन, नायट्रस ऑक्साइड) महिला कर्मचाऱ्यांमध्ये गर्भपात, गर्भविकृती, जननकौशिकांत अचानक बदल यांसारखे परिणाम होतात, अशी शंका काही अभ्यासांमधून व्यक्त करण्यात येते.

भौतिक प्रदूषण : कामाच्या जागी संभावणारे भौतिकी धोके रासायनिक प्रदूषणाइतकेच गंभीर परिणाम घडवू शकतात. त्यांचा आढळ काहीसा कमी असला, तरी रसायने टाळण्याच्या प्रयत्नात भौतिकी पद्धतींचा वापर वाढत आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. हानिकारक प्रमुख भौतिकी बाबी पुढीलप्रमाणे आहेत.


उष्णता : ओतकामाच्या भट्ट्या, धातुनिर्मितीचे कारखाने, खाणी यांच्या परिसरातील उष्णतेमुळे सारखा घाम येऊन शरीरातील लावणे बाहेर टाकली जातात. त्यातून अशक्तपणा, गरगरणे, पेटके येणे, डोकेदुखी यांसारखी लक्षणे निर्माण होतात. शारीरिक स्वास्थ्य खालावते. यासाठी नुसते पाणीच न पिता मिठाच्या गोळ्या घेऊन ही लक्षणे टाळता येतात. उन्हाळ्याची तीव्रता जास्त असलेल्या प्रदेशांमध्ये बाहेर काम करणाऱ्या किंवा हिंडणाऱ्या कर्मचाऱ्यांना ऊष्माघाताचा त्रास होऊ शकतो. यामध्ये लवणे व पाणी या दोन्हींची कमतरता निर्माण होते. तसेच तीव्र आघातात शरीराचे तापमान-नियंत्रण विस्कळीत होऊन खूप ताप येतो. द्रवसंतुलन बिघडून अवसाद स्थिती (रक्तदाब कमी होणे व रक्ताभिसरणाचे कार्य खुंटणे) निर्माण होते. याशिवाय कान, डोळे, श्वसनमार्ग आणि उघडी पडलेली त्वचा यांवरही अनिष्ट परिणाम होऊ शकतात. मूत्राचे प्रमाण कमी झाल्याने अशा व्यक्तींमध्ये मूत्रमार्गाचे विकार, मुतखडे इत्यादींचे प्रमाणाही जास्त आढळू शकते.

ध्वनी : माणसाच्या श्रवणक्षेत्रात १०० ते ४,००० हर्ट्‌झच्या ध्वनितरंगांप्रत संवेदनेचा सर्वसाधारणपणे समावेश होतो. या क्षेत्रातील वेगवेगळ्या भागांची संवेदना ध्वनिप्रदूषणामुळे कमीजास्त प्रमाणात तात्पुरती किंवा कायमची नष्ट होऊ शकते. हा बदल श्रवणमापक उपकरणाने विशेष चाचणी केल्याशिवाय सहजासहजी लक्षात येत नाही. म्हणून ध्वनिजन्य विकार दीर्घ काळ सुप्त राहतात.

औद्योगिक यंत्रे, छापखाने, कापडाच्या गिरण्या, हवेच्या दाबावर चालणारी खडक फोडण्याची यंत्रे, विमाने यांसारख्या गोंगाट करणाऱ्या अनेक यंत्रांशी कर्मचाऱ्यांचा दीर्घ काळ संबंध येत असतो. त्यातून निर्माण होणारे श्रवणदोष पुढील होत : (अ) तात्पुरती संवेदनहीनता व कानात शिटी वाजल्यासारखा आवाज येणे. काही तास विश्रांती घेतल्यावर हा थकवा दूर होतो. (आ) एका प्रकारच्या आवाजामुळे दुसऱ्या प्रकारचा आवाज दडपला जाणे. उदा. यंत्राच्या आवाजामुळे बोलण्याचा आवाज किंवा धोक्याची सूचना देणारी घंटा ऐकू न येणे. औद्यागिक सुरक्षिततेच्या दृष्टीने हा परिणाम धोक्याचा ठरतो. (इ) व्यक्तीच्या नकळत हळूहळू विशिष्ट ध्वनितरंगांची प्रभावसीमा (प्राणी ओळखू शकेल अशी किमान उत्तेजक ऊर्जा) वाढत जाणे. याची सुरुवात ४,००० हर्ट्‌झ कंप्रतेपासून होऊन ती ३,००० ते ६,००० हर्ट्‌झ या क्षेत्रात पसरत जाते. श्रवणमापनाने हा दोष लवकर हुडकून काढला नाही, तर व्यक्तीला त्याची जाणीव फार उशिरा होते. तोपर्यंत मानवी संभाषणातील व्यंजने (१,०००-२,००० हर्ट्‌झ) आणि स्वर (५०० ते १,००० हर्ट्‌झ) यांवर काहीसा परिणाम झालेला असतो. श्रवणदोषांमुळे काही मानसिक बदलही घडू शकतात. त्यामुळे कर्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. वाढत्या रक्तदाबासारखे काही शारीरिक परिणामसुद्धा ध्वनिप्रदूषणामुळे संभवतात.

श्राव्य ध्वनीच्या कक्षेबाहेरील तरंगांचा उपयोगही हल्ली उद्योगांत केला जातो. १६,००० हर्ट्‌झ ते १० मेगॅहर्ट्‌झपर्यंतच्या (ध्वनीच्या वेगाहून जास्त वेगाच्या) तरंगांमुळे श्रवणदोष आणि रक्तवाहिन्यांचे संकोचन होऊ शकतात. १ ते १०० हर्ट्‌झचे अवश्राव्य (माणसाला ऐकू येणाऱ्या ध्वनितरंगांपेक्षा कमी कंप्रता असणारे) तरंग अनेक प्रकारच्या यंत्रांमुळे निर्माण होतात उदा. डीझेल यंत्रे, विद्युत्-जनित्रे (यांत्रिक ऊर्जेचे विद्युत् ऊर्जेत परिवर्तन करणारी साधने). या तरंगांमुळे शरीरातील इंद्रियांमध्ये सूक्ष्म अनुस्पंदन होऊन अस्वस्थता जाणवते. कानांवर संरक्षक आवरणे न वापरल्यास गरगरणे, उलटी होणे, डोकेदुखी यांसारखी लक्षणेही निर्माण होतात.

यांत्रिक कंपने : कंपनशील यंत्राचा प्रत्यक्ष संपर्क शरीराशी झाल्यास संपूर्ण शरीरात कंपने पसरतात आणि त्यांचे दुष्परिणाम कमीअधिक प्रमाणात सर्व इंद्रियांवर होतात. वैमानिक, अवजड मालमोटारींचे चालक यांना संपूर्ण शरीर हादरल्यामुळे हा धोका कधीकधी संभवतो. त्यातून पाठदुखी, मणक्यांचे विकार, पूरस्थ ग्रंथीचा शोध यांसारख्या तक्रारी उद्‌भवतात.

या कंपनांपेक्षा जास्त गंभीर परिणाम करणारी कंपने यांत्रिक करवती, वायवीय हत्यारे यांच्या हाताळण्यामुळे सहन करावी लागतात. घट्ट पकडलेल्या या हत्यारांच्या कंपनांचा मुख्य भार हात, मनगट, कोपर आणि खांदा यांच्या सांध्यांवर आणि हाडांवर पडतो. त्यात वेदना होणे, हाडांची विरलता व ठिसूळपणा आणि अभिसरणन्यूनता असे बदल हळूहळू घडून येतात. ‘कंपनजन्य पांढरे बोट’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या विकारात हातांना मुंग्या येणे, मधूनमधून एखादे बोट पांढरे पडणे अशी लक्षणे सुरुवातीला आढळतात. नंतर हे बदल सर्व बोटांमध्ये होऊ लागतात व दीर्घ काळ टिकून राहतात. हे टाळण्यासाठी कामाचे तास, कंपनाचा वेग आणि यंत्रावर द्यावयाचा जोर यांमध्ये योग्य असे बदल करावे लागतात.

वातावरणाचा दाब : पाण्यात खोलवर जाऊन काम करणारे पाणबुडे, पाण्याखालील अभियांत्रिकीय कामगार आणि अतिशय उंच भरारी घेऊन तेथून खाली येणारे छत्रीधारी सैनिक किंवा खेळाडू यांना अल्प काळात दाबातील बरेच मोठे बदल सहन करावे लागतात. जास्त दाबाकडून कमी दाबाच्या वातावरणात येण्याची क्रिया विशेष धोकादायक असते. रक्तातील नायट्रोजन वायू सूक्ष्म बुडबुड्यांच्या स्वरूपात ऊतकांमध्ये आणि विविध द्रवांमध्ये बाहेर पडू लागतो, फुप्फुसे फाटून वातवक्ष [परिफुप्फुसाचे दोन स्तर अलग पसरले जाऊन बनलेल्या परिफुप्फुस गुहेत वायू (हवा) असण्याची अस्वाभाविक अवस्था] निर्माण होण्याची भीती असते. हे बदल वरचेवर होत असल्याने हाडांचा  ⇨ ऊतकमृत्यू, खांदे किंवा कोपर, गुडघे इत्यादींमध्ये सांधेदुखी, मानसिक बदल इ. परिणामांची शक्यता असते. ताबडतोब जाणवणाऱ्या लक्षणांमध्ये वेदना, त्वचादाह, श्वसनास अडथळा, गरगरणे, डोकेदुखी, अशक्तपणा यांचा समावेश होतो. खास बनविलेले दाबनियंत्रित पोशाख किंवा हलकेहलके दाब कमी करण्याची सोय असलेल्या पाण्यात सोडता येणाऱ्या कोठ्या यांच्या वापराने हे दुष्परिणाम टाळले जातात.

 

किरणोत्सर्ग : क्ष-किरण, जंबुपार (दृश्य वर्णपटातील जांभळ्या रंगापलीकडील अदृश्य) किरण, गॅमा किरण, ⇨ लेसर यांसारखे विशेष प्रकाराचे किरणोत्सर्ग वापरणाऱ्या प्रयोग शाळा, निदान व उपचार केंद्रे, अणुऊर्जा केंद्रे यांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना अशा प्रारणांपासून (तरंगरूपी ऊर्जांपासून) नेहमीच धोका असतो व त्यासाठी सतत मापनाची व्यवस्था केलेली असते.

जैव प्रदूषण : संक्रामणाचा धोका असलेले व्यवसाय औद्योगिक क्रांतीच्या आधीपासूनच माणसे करीत आलेली आहेत. त्यांचे जैव स्वरूप आणि प्रतिबंधक उपायांची जाणीव मात्र एकोणिसाव्या शतकापासून निर्माण झाली. व्यवसायजन्य संक्रामणांचा आढळ मुख्यतः पुढील क्षेत्रांमध्ये दिसतो.

(अ) सूक्ष्मजीवशास्त्रीय प्रयोगशाळा, रुग्णालये, पशुवैद्यकशाळा, रक्तपेढ्या, जैव उत्पादने (लशी, रक्तजन्य पदार्थ इ.) करणारे कारखाने इ. या सर्व ठिकाणी कामाच्या स्वरूपानुसार विविध सूक्ष्मजंतूंची संक्रामणे शक्य असतात परंतु त्यातल्या त्यात गंभीर आणि उपचारद्रव्ये मर्यादित असल्यामुळे प्रतिबंधाची विशेष आवश्यकता असणारी म्हणजे एड्स [AIDS ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम → रोगप्रतिकारकक्षमता-न्यूनताजन्य रोग] आणि यकृतशोध-ब  [हिपॅटायटीस-बी → यकृतशोध] यांच्या विषाणूंची संक्रामणे होत.


(आ) पारंपरिक शेती व पशुपालन क्षेत्रांत ⇨ धनुर्वात, संसर्गजन्य काळपुळी [→ काळपुळी, संसर्गजन्य], ब्रूसेला प्रजातीमधील सूक्ष्मजंतूंमुळे होणारा रोग. ⇨ शेंबा (ग्लँडर्स). अंकुशकृमी यांची संक्रामणे उद्‌भवू शकतात.

(इ) आधुनिक व्यवसायांमध्ये खाणी व भुयारी गटारे यांसारख्या ठिकाणी काम करणाऱ्यांना उंदीर व घुशी यांच्यामार्फत संक्रामण होणारा ⇨ व्हाइल रोग होऊ शकतो. सर्व प्रकारच्या औद्योगिक क्षेत्रांत धुनर्वाताची शक्यता असते. पक्षिविक्रेते, कुक्कुटपालन करणारे यांना विषाणुजन्य शुकरोग [उच्चतापसह असलेला अप्रारूपी फुप्फुसशोथ म्हणजे न्यूमोनिया → शुकरोग] होऊ शकतो. खाटिकखान्यात ब्रूसेलाच्या प्रजातीच्या सूक्ष्मजंतूंच्या संक्रामणाचा धोका असतो. घोड्यांची देखभाल, पैदास करणाऱ्यांना धनुर्वात व शेंबा यांपासून सुरक्षित राहावे लागते. कापडाच्या गिरण्या, हातमाग, कापूस-पिंजारी यांमध्ये आढळणाऱ्या श्वसनांच्या रोगांमध्ये बराचसा उपद्रव कापसाच्या धाग्यांमुळे होत असला, तरी कच्च्या मालाबरोबर येणाऱ्या जंतुसंक्रामणाचाही त्यात वाटा असतो, असे आता सिद्ध झाले आहे. तशीच परिस्थिती मोठ्या प्रमाणात धान्य, खाद्यपदार्थ वगैरे हाताळणाऱ्या व्यावसायिकांमधील त्वचारोगांच्या बाबतीत असते.

कामगार कार्यक्षमताशास्त्रीय घटक : वर दिलेल्या सर्व प्रदूषणांच्या जोडीला व्यवसायातील कार्यपद्धतीमधील त्रुटींचाही हातभार रोगनिर्मितीला लागत असतो. या त्रुटींचा विचार कामगारांची कार्यक्षमता सुधारण्याच्या दृष्टीनेही केला जातो. उदा., खाणीतील अपुऱ्या प्रकाशामुळे खाणकामगारांमध्ये नेत्रदोल [नेत्रगोल एका स्थिर स्थितीत न राहता मधूनमधून आंदोलत राहणे → नेत्रवैद्यक] निर्माण होतो व त्याबरोबरच गरगरणे, निद्रानाश, डोकेदुखी अशा तक्रारी सुरू होतात. आधुनिक औद्योगिक आणि कार्यालयीन व्यवस्थापनात असे अनेक घटक शोधून काढून त्यांचे योग्य नियंत्रण केले जाते. प्रकाशाची योजना, कामगाराचे कामाचे मेज, बसण्याची पद्धत, आवश्यक ती सामग्री सुलभतेने मिळणे, उपकरणांची सुलभ हाताळणी, कामाच्या वेळेतील आवश्यक अशी विश्रांती, उत्साहजनक वातावरण इत्यादींचा त्यात समावेश होतो. शारीरिक घटकांबरोबरच सहकाऱ्यांशी संबंध, कामाचे समाधान, निवासस्थानाची व्यवस्था, येण्याजाण्यातील वेळेची बचत, आरोग्यविषयक सल्ला, आर्थिक मदत यांसारखे मानसिक ताण कमी करणारे मार्गही व्यवस्थापन अनुसरण्याचा प्रयत्न करते. या सर्वांचा परिणाम व्यवसायजन्य ताण कमी करून रोगनिर्मिती रोखण्यास मदत करतो.

प्रतिबंधक उपाययोजना : व्यवसायजन्य रोगांची कारणे विविध असल्यामुळे प्रतिबंधाचे मार्गही तांत्रिकदृष्ट्या निरनिराळे असतात परंतु त्यांचे सामान्य स्वरूप पुढीलप्रमाणे असते.

(अ) हानिकारक घटकांचा उपयोग किंवा निर्मिती टाळता येईल असे पर्यायी मार्ग शोधत राहणे. रसायने, यंत्रसामग्री, प्रक्रिया यांचा जमा-खर्च मांडताना कामगाराचे आरोग्य आणि कार्यक्षमता ही जमेची बाजू आर्थिक संज्ञा वापरून हिशोबात घेणे कठीण असते परंतु तसा प्रयत्न व्हावा म्हणून कायदेशीर तरतुदी कराव्या लागतात.

(आ) हानिकारक घटकांशी कमीत कमी प्रत्यक्ष संपर्क व्हावा म्हणून त्यांना बंदिस्त करून संबंधित प्रक्रिया दूरस्थ नियंत्रणाने किंवा यांत्रिक हाताळणीने घडवून आणणे. उदा., किरणोत्सर्गी पदार्थांची हाताळणी, भट्टीजवळील अति उष्ण धातुरसांची ओतणी वगैरे.

(इ) उपद्रवकारक सूक्ष्मकण, वाफा, उष्णता इत्यादींचे कामाच्या जागेतून ताबडतोब निष्कासन होईल अशी यंत्रणा वापरतात. उदा. घर्षणाच्या जागी द्रव पदार्थांचा उपयोग, निष्कासक पंखे, पुरेशी आर्द्रता, रासायनिक निष्क्रियीकरण, जंतुनाशक द्रव्ये वगैरे.

(ई) विशेष हानिकारक घटकांचा संबंध येत असणाऱ्या कामासाठी स्वतंत्र कक्ष किंवा इमारत राखून ठेवणे. अशा ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा स्वतंत्र गट असतो व त्याची आरोग्यविषयक तपासणी वारंवार करण्यात येते. सर्वसाधारण कामगारांना होणारा उपद्रव त्यामुळे टाळता येतो. उदा. जास्त आवाज करणारी यंत्रे, रोगजनक जंतूंची वाढ करणारी प्रयोगशाळा इत्यादी.

(उ) संरक्षक पोशाख, हातमोजे, शिरस्त्राणे, चष्मे, कानाची आवरणे, बूट इत्यादींचा वापर करण्याची शिस्त लावतात. अनेकदा अशा वस्तू तितक्याशा सुखद नसतात. अवजड आणि घाम साठू देणाऱ्या असतात. अशा वेळी त्यांच्या उपयोगापासून होणारा फायदा समजून देण्यासाठी विशेष प्रयत्न करावा लागतो. कामानंतर आणि भोजनापूर्वी प्रत्येक वेळी कामाचे कपडे दूर ठेवणे व हातपाय धुणे, नियमित स्नान इ. वैयक्तिक आरोग्यविषयक सवयी अंगी बाणवाव्या लागतात.

(ऊ) आलक्षन : हानिकारक घटक आणि त्यांचे परिणाम या दोन्हींकडे सतत लक्ष ठेवण्याची ही क्रिया दोन भागांची असते. पहिल्या भागात म्हणजे भौतिक आलक्षनात (बोधनात) हानिकारक पदार्थांची किंवा कारकांची पातळी सतत मापली जाते. प्रत्येक घटकाची व्यावसायिक उद्‌भासन मर्यादा (ओईएल : ऑक्युपेशनल एक्स्पोजर लिमिट) अनुभवाने किंवा प्राण्यांवरील प्रयोगाने ठरविलेली असते. कामाच्या जागी निर्माण होत असलेली पातळी या मर्यादेपेक्षा जास्त होत नाही, हे पाहणे एवढा उद्देश भौतिक आलक्षनाचा असतो. राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय नियंत्रक संस्थांकडून व्यावसायिक मर्यादांबद्दल मार्गदर्शन मिळू शकते. आलक्षनासाठी नमुने गोळा करताना विशेष उपद्रवकारक घटकांसाठी (उदा. श्वसनाचा दाह करणारे वायू) केवळ दहा मिनिटांच्या काळातील उद्‌भवणारी पातळी मोजली जाते. इतर घटकांसाठी वरचेवर मापन करून आठ तासांच्या अवधीत उद्‌भवू शकणारी कालभारित सरासरी पातळी महत्त्वाची असते. त्यात काहीसे चढउतार असले, तरी चालू शकतात. या सर्व मापनांचे परिमाण क्ष मिग्रॅ./घ.मी. किंवा हवेच्या दर दशलक्ष भागांस अमूक भाग या एककात व्यक्त केले जाते. उदा. क्लोरिनाचे प्रमाण दहा मिनिटांसाठी ९ मिग्रॅ. प्रती घ.मी.पेक्षा जास्त नसावे. सिलिकेच्या धूलिकणांसाठी ही मर्यादा ०·३ मिग्रॅ. प्रती घ.मी. (आठ तासांत सरासरी पातळी) अशी आहे.

आलक्षनाचा दुसरा भाग जैव पद्धतीचा असतो. कर्मचाऱ्यांच्या रक्तातील किंवा मूत्रातील हानिकारक घटकांची पातळी, उच्छ्‌वासी हवेतील पातळी, रक्त किंवा मूत्रातील प्राकृत (सर्वसाधारण) घटकांच्या प्रमाणातील बदल, क्ष-किरण चित्रण किंवा अन्य विशेष चाचण्यांनी जैव आलक्षन करता येते. त्यात प्रत्यक्ष हानिकारक घटक अथवा त्यापासून होणारे परिणाम (उदा., तंत्रिका तंत्रीय वा मानसिक बदल, न्यूनरक्तता इ.) यांपैकी जे सहज शक्य असेल ते मोजले जाते. वैद्यकीय तपासणीत एखाद्या व्यवसायासाठी एखादी व्यक्ती अपात्र आढळली, तर त्या व्यक्तीला त्या कामापासून दूर ठेवणे शक्य होते.

व्यवसायजन्य रोगांच्या प्रतिबंधासाठी भारतात कायदेशीर उपायांची सुरुवात १८८१ च्या कारखाना अधिनियमाने झाली. १९४८ च्या सर्वंकष कायद्याने त्यातील वैद्यकाचे स्थान निश्चित झाले. त्यासंबंधी सविस्तर माहिती मराठी विश्वकोशातील ‘औद्योगिक वैद्यक’ या नोंदीत आली आहे. तसेच व्यवसायजन्य विकारांच्या घटकांवरील अधिक माहितीसाठी खाणकाम, त्वचा, पोषण, फुप्फुस, ध्वनी व किरणोत्सर्ग या विषयांवरील नोंदी पहाव्यात.

पहा : औद्योगिक धोके औद्योगिक वैद्यक प्रदूषण व्यावसायिक चिकित्सा

संदर्भ : 1. Cotes, J. E. Stiel, J. Work Related Lung Diseases, London, 1987.

           2. Jones, A. L. Hutecheson, D. M. W. Dymott, S. M. Occupational Hygiene, London, 1981.

           3. Waldron, H. A. Occupational Health Practice, London, 1989.

श्रोती, दि. शं.