मैथिली भाषा : बिहारमध्ये दरभंगा, भागलपूर, पूर्णिया, मोंघीर या भागांत प्रामुख्याने ही भाषा बोलली जाते. नेपाळ, आसाम आणि बंगाल येथेही मैथिली बोलणारे लोक आहेत. ही हिंदीची बोली आहे असा एक अपसमज आहे. १९८१ च्या जनगणनेतही ती हिंदीची बोली म्हणून दाखविण्यात आली होती. ग्रीअर्सन तिला बिहारी या भाषेची बोली मानतो. भोजपुरी आणि मगही या तिच्या आसपास असणाऱ्या भाषा मानायच्या की मैथिलीच्या बोली मानायच्या, याबाबत मतभिन्नता आहे. मात्र मगही आणि मैथिलीमध्ये खूप साम्य आहे. भागलपूर, दरभंगा येथील ब्राह्मणांनी जतन केलेली मैथिली ही शुद्ध आणि प्रमाण बोली मानली जाते. दाक्षिणात्य प्रमाण मैथिली ही गंगेच्या उत्तरेकडे बोलली जाते. गंगेच्या दक्षिणेकडील मैथिलीला छिकाछिकी बोली म्हणतात. कारण छिक्‌ हा शब्दावयव तीमध्ये प्राबल्याने येतो. मैथिलीची सिरिपुरिया ही बोली बंगाली आणि मैथिली यांना जोडणारा दुवा, तर जोलहा ही मुसलमान वापरत असलेली बोली ही फार्सीमधून उसने घेतलेल्या शब्दांच्या आधिक्यामुळे तयार झालेली.

१९७१ च्या जनगणनेवरून सु. दोन कोटी लोक मैथिली भाषा बोलतात असे दिसते. या भाषेला दीर्घ इतिहास आहे. संस्कृत, फार्सी, मुंडा, बंगाली या भाषांचा परिणाम तिच्यावर झालेला आहे. बिहारमधील अन्य भाषा बोलणारे मैथिलीला ति-हुतिया असे म्हणतात. मैथिलीचे लेखन मैथिली, कैथी आणि देवनागरी या तीन लिप्यांतून होते. [→ कैथी लिपि नागरी लिपि].

मराठी ‘आहे’ या क्रियापदाप्रमाणे मैथिलीत ‘अछ’ हे क्रियापद आहे. मराठीतील लकारान्त विशेषणाप्रमाणे मैथिलीतही लकारान्त विशेषणे आहेत. मात्र मराठी ‘ळ’ चा मैथिलीत ‘र’ झालेला दिसतो. संस्कृतातील ‘ष’ मैथिलीत ‘ख’ होतो. मैथिलीतील क्रियापदरूपे गुंतागुंतीची आहेत. क्रियापद कर्ता आणि कर्म या दोहोंशी एकाच वेळी सुसंवाद राखते. कर्ता हा आदरार्थी किंवा सामान्य असतो. त्याचप्रमाणे कर्मही आदरार्थी आणि सामान्य असते. त्यामुळे प्रत्येक पुरुषांत एकाच क्रियापदाची सात-आठ वेगवेगळी रूपे संभवतात. क्रियापदाच्या रूपात वचन आणि लिंग हा भेट नाही. उदा., ‘देखलक’ याचा अर्थ ‘तिने / त्याने पाहिले’ असा होतो. मात्र ‘देखलथीन्ह’ म्हटले तर ज्याला पाहिले ती व्यक्ती आदरणीय आहे असा अर्थ होतो.

फक्त स्त्रियांनी वापरावयाचे असे अनेक खास शब्द मैथिलीत आहेत. उदा., मनसा (माणूस), बार (नवरा), रै (अरे) इत्यादी. उद्‌गारवाची अव्ययेही बोलणाऱ्याच्या सामाजिक प्रतिष्ठेनुसार बदलतात. मराठी प्रमाणे रंगांचे तीव्रतादर्शक शब्द मैथिलीत आहेत. उदा., काडी खटखट (काळाकुट्ट), उज्जड दपदप (पांढरा शुभ्र) इत्यादी. मात्र मैथिलीत नामांची पुल्लींग आणि स्त्रीलिंग ही दोनच लिंगे असतात.

मैथिलीला समृद्ध साहित्यपरंपरा आहे. विसाव्या शतकातील मैथिली भाषकांच्या जागृत झालेल्या अस्मितेने मैथिली साहित्यात नवीन भर पडत आहे.

पहा : मगही भाषा हिंदी भाषा.

संदर्भ : 1. Grierson, G. A. Linguistic Survey of India, Vol. V. Part 2 , Delhi, 1968.

             2. Jha, Subhadra, The Formation of the Maithili Language, London, 1958.

             3. Sebeok, T. A. Ed. Current Trends in Linguistics, Vol. 15, The Hague, 1969.

धोंगडे, रमेश वा.