डोग्री भाषा : पंजाबीच्या उत्तरेला व काश्मीरीच्या दक्षिणेला जम्मूच्या डोंगराळ प्रदेशात डोग्री भाषा बोलली जाते. डोग्रा हे नाव संस्कृत दुर्गर, प्राकृत दुग्गर यापासून आले असावे.

डोग्रीचे प्रमाण पंजाबीशी बरेच साम्य आहे. मुख्य फरक नामाची सामान्यरूपे आणि काही शब्दयोगी अव्यये यांत आहे. यामुळे डोग्रीला ग्रीअर्सनने पंजाबीची पोटभाषा मानले आहे पण सिद्धेश्वर वर्मा यांच्या मते ती एक स्वतंत्र भाषा आहे. डोग्री भाषा टाकरी लिपीचा उपयोग करते.

 डोग्री भाषा बोलणारे १९६१ च्या जनगणनेप्रमाणे ८,७९,७४८ होते, त्यांपैकी ८,६९,१९९ जम्मू-काश्मीरमध्ये व बाकीचे भारताच्या इतर राज्यांत होते. 

व्याकरण : सामान्यतः जम्मू भागातील भाषा प्रमाण समजली जाते आणि तिचे व्याकरण पंजाबीशी अतिशय मिळतेजुळते आहे. 

ध्वनिव्यवस्था : स्वर–अ, आ, उ, ए, ओ व्यंजने–क, ख, ग, घ, ङ, च, छ, ज, झ, ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, स, ह, ड. ‘ज’ आणि ‘य’ तसेच ‘ब’ आणि ‘व’ यांच्यासाठी प्रत्येकी एकच चिन्ह आहे, तर फार्सीमधून आलेला ‘श’ दाखविण्यासाढी ‘छ’ हेच अक्षर वापरले जाते.

नाम : नामे पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी असतात. एकवचन व अनेकवचन तसेच मूळरूप व सामान्यरूप ही स्पष्टपणे वेगळी असतात. 

सर्वनाम : आऊं, मैं, में, ‘मी’ –अस ‘आम्ही’ तूं  ‘तू ’-तुस ‘तुम्ही’ ओ, ओह ‘तो-ती-ते’ –ओ, ओह ‘ते-त्या-ती’. 

क्रियापद : सर्वसाधारण इंडो-आर्यन भाषांप्रमाणे असते. आहेंची रूपे लागून विविध कालदर्शक रूपे तयार होतात. 

उतारा : अते उसदा बडा पोतर खेतरवच था. जां घरकछ आएआ गाने ते नचतेदी बलेल सोनी. ता एक नौकराकी सदेआ ते पोछाने, ‘एहे कहे?’ उसने उसी आखेआजे, ‘तेरा भरह आएआ, ते तेरे बांबने बडी धाहम कोती, इस करी जे आहे राजीबाजी आईगेआ.’

भाषांतर : आणि त्याचा मोठा मुलगा शेतात होता. जेव्हा तो घराजवळ आला तेव्हा त्याने गाणे व नाचण्याचा आवाज ऐकला. त्याने एका नोकराला बोलावले आणि विचारले, ‘हे काय आहे?’ त्याने त्याला सांगितले की, ‘तुझा भाऊ आला आहे आणि तुझ्या बापाने मोठी जेवणावळ केली, अशासाठी की तो सुखरूप परत आला आहे’. 

महाराजा रनबीर सिंघ यांनी डोग्रीला स्वतंत्र लिपी देऊन तिचा राज्यकारभारात वापर करणे सुरू केले पण याचा उपयोग फारसा झाला नाही. टाकरी लिपीही मागे पडून देवनागरीचा उपयोग करण्याची प्रवृत्ती वाढत आहे. साहित्य अकादेमीने ऑगस्ट १९६९ मध्ये डोग्रीला स्वतंत्र भाषा म्हणून मान्यता दिली. 

डोग्रीचे लोकसाहित्य अतिशय समृद्ध असून त्यात वीरकथा अद्‌भुत कथा व नीतिकथा आहेत. लोककथांपेक्षा लोकगीते अधिक विपुल आहेत. 

संदर्भ : 1. Grierson, G. A. Linguistic Survey of India, Vol. IX, Part I, Delhi, 1968.

    2. Indian Linguistics, Vols, I–15, Poona, 1966.

कालेलकर, ना. गो.