मगही भाषा : भारतीय आर्य (इंडो-आर्यन) भाषा-उप-कुलाची बिहार राज्यात बोलली जाणारी एक बोली. बिहारमध्ये बोलल्या जाणाऱ्या ⇨मैथिली,भोजपुरी आणि मगही या बोली ‘बिहारी’ या एकत्रित संज्ञेने उल्लेखिल्या जातात. प्रचीन भारतातील मगध देशात जाणाऱ्या मागधी या प्राकृत भाषेपासून परिवर्तित होत मगहीचा जन्म झाला. मागधी ही सम्राट अशोकाची राजभाषा होती. संस्कृत नाटकांत राजपुत्रादी महत्त्वाच्या व्यक्तींचे संभाषण मागधीत होत असे. ‘मगह’ हे ‘मगध’ शब्दाचे परिवर्तित रूप होय. ⇨पुष्पदंत (दहावे शतक) याच्या ⇨णायकुमारचरिउ या ग्रंथात ते प्रथम आढळते. मगह जनपदाची भाषा म्हणून ही मगही. सुशिक्षितांमध्ये हिचा उल्लेख ‘मागधी’ असा, तर सामान्य जनांमध्ये ‘मघी’ असाही होतो. [⟶ मागधी भाषा].

बिहार हा पूर्वी विदेह, गांधार व मगध या जनपदांनी व्यापालेला होता. यांतील मागधीचे क्षेत्र इ. स. च्या चौथ्या शतकात शरयू नदीपासून कोसी नदीपर्यंत व कर्मनाशापासून कलिंगपर्यंत पसरलेले होते. आजच्या मगहीचे केंद्रस्थान गया जिल्हा हे होय. याशिवाय पाटणा, हजारीबाग, मुंगेर (मोंघीर), पालामाऊ, संथाळ परगणा, धनबाद, शाहबाद आणि सिंगभूम या जिल्ह्यांतील बऱ्याच विस्तृत प्रदेशात मगही बोलली जाते. १९६१ च्या जनगणनेनुसार मगही मातृभाषा असणारांची  संख्या २८,१८,६०२ एवढी होती. यापूर्वीच्या जनगणनांतील आकडेवारी लक्षात घेतल्यास मगही बोलणारांची संख्या ६६ लक्षांहून अधिक असावी असे दिसते. जनगणनेच्या काळात अधिकांश नागरिकांनी आपली मातृभाषा हिंदी आहे असे निर्देशिल्यामुळे हा घोटाळा झाला आहे. 

मगहीच्या पूर्वी-मगही, कुडमाली, खोंटाली, पांचपरगनियां, सदरीकोल, कोर्ठा इ, प्रादेशिक उपबोली आहेत. त्यांची संरचना व शब्द संग्रह यांवर जवळच्या प्रदेशांतील भोजपुरी, मैथिली, ⇨बंगाली,ओडिया (उडिया) इ. भाषांचा प्रभाव दिसून येतो. गया जिल्ह्यात बोलली जाणारी मगही ही प्रमाण मानली जाते. हिच्या लेखनासाठी प्रामुख्याने ⇨कैथी लिपीचा वापर होतो. कैथी ही नागरीच्या लपेटीदार शैलीपासून विकसित झालेली असून तिच्यात शिरोरेखेचा अभाव असतो. प्रदेशभिन्नतेनुसार मगहीच्या लेखनासाठी बंगाली किंवा ओडिया लिंपींचाही वापर होतो. [⟶ कलिंग (ओडिया) लिपि बंगाली लिपि].

मगहीची ध्वनिव्यवस्था हिंदीसारखीच असून तिच्यात अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ओ हे आठ प्रधान स्वर व ॲ आणि ऑ हे दोन दुय्यम स्वर आहेत. शब्दांच्या अन्त्यस्थानी उच्चारण ऱ्‍हस्व करण्याची प्रवृत्ती दिसते. सर्वच स्वरांचे नासिक्यरंजन होते. या बोलीत प, त, ट, क, ब, द, ड, ग, फ, थ, ठ, ख, भ, ध, ढ, ग हे स्पर्श च, ज, छ, झ हे स्पर्शसंघर्षी म, न, ङ, म्ह, न्ह ही अनुनासिके ड़, ढ़ हे उत्क्षिप्त ल, ल्ह हे पार्श्विक र, ऱ्‍ह ही कंपिते स, ह ही घर्षके आणि य, व हे अर्धस्वर अशी पस्तीस व्यंजने आहेत. व्यंजनांचे शब्दांमधील वितरण हिंदीच्या धर्तीवरच आहे. ‘व’ च्या जागी ‘ब’ व ‘ड़’ च्या जागी ‘र’ हे परिवर्तन सर्वत्र आढळते. पूर्वी-मगहीत बंगालीच्या प्रभावाने ‘श’ या घर्षकाचा प्रवेश झालेला दिसतो.

मगहीतील नामे पुल्लिंगी व स्त्रीलिंगी अशा दोन गटांत विभागता येतात. उदा., पुल्लिंगी-साला ‘मेहूणा’, लेदा ‘पोट’, लेरू ‘खोड’, लूगा ‘साडी’ स्त्रीलिंगी-साली ‘मेहुणी’, मौनी‘टोपली’, मड़इ ‘ओसरी’, बनियाइन ‘वाणीण’. वस्तू अगर जीव यांबद्दल आदर वा परिचय व्यक्त करायचा असल्यास नामांच्या मूलरूपास-वा, -बा, किंवा -या हे प्रत्यय लावून विशेष रूपे तयार केली जातात. उदा., घोडवा,बैलवा, घरबा, रनियां, नामांच्या मूलरूपास–अन प्रत्यय लावून अनेकवचन साधले जाते. जसे, -घोडन, घोडवन. नामांना-सब आणि लोग हे पससर्ग लावून त्यांची समूहवाचक रूपे बनविण्याची पद्धती बरीच रूढ आहे. उदा., घरसब ‘सर्व घरे’ मालीलोग ‘माळी लोक’. नामाला लागणारे विभक्तिप्रत्यय वा परसर्ग हिंदीप्रमाणेच आहेत. मात्र चतुर्थी व षष्ठीचे प्रत्यय किंचित भिन्न आहेत. उदा., मोहन के ‘मोहनला’, घरले ‘घरासाठी’, घोड़ाके ‘घोड्याचा’. 

या बोलीतील सर्वनामे पुढीलप्रमाणे आहेत : प्र. पु.-मोरा, हम द्वि, पु. तूं, तोह, अपने तृ. पु. ऊ, उन्ह, ई, इन्ह, जउन, जिन्ह, तउन, तिन्ह प्रश्नार्थक–के ‘कोण’, का किंवा की ‘काय’. सर्वनामांचे विभक्तिप्रत्ययांपूर्वी सामान्यरूप होते. मगहीतील काही संख्यावाचक शब्द हिंदीहून भिन्न आहेत. उदा., ॲक (१), दू (२), पान (५), छो (६), इगारह (११), ॲकंतर (७१), बहंतर (७२), नोआसी (८९) इत्यादी.

मगहीतील क्रियापदे सकर्मक व अकर्मक अशा दोन गटांत विभागता येतात. धातूला–आय किंवा–आव हे प्रत्यय लावून प्रथम प्रयोजकाची आणि–वाय प्रत्यय लावून द्वितीय प्रयोजकाची रूपे सिद्ध होतात. उदा., उठाय, उठाव, उठवाय. क्रियापदांच्या रूपांत लिंग वा वचनाचा भेद दर्शविला जात नाही परंतु पुरूषभेद व आदरअनादरसूचक भेद मात्र दर्शविला जातो. विविध काळ व अर्थ यांची रूपे पुष्कळशा प्रमाणात हिंदीच्या धर्तीवर असली, तरी प्रत्यययोजनेत फरक संभवतो. उदा., वर्तमान-हम तस्वीर देखही भूत-देखली भविष्य-देखब अपूर्ण वर्तमान-देखइत ही अपूर्ण भूत-देखइत इली पूर्ण वर्तमान-देखली हे पूर्ण भूत-देखली इल आज्ञार्थ-देख विध्यर्थ-देखइत होअब संकेतार्थ-देखइत होती. पूर्वी-मगहीत क्रियापदांच्या प्रत्ययांचा त्याग करण्याची प्रवृत्ती दिसून येते. 

मगहीच्या वाक्यरचनेवर पश्चिमी हिंदीचा बराच प्रभाव आहे. उदा., हिंदी-मुझे घर जाना है, भोजन करना है और फिर लौटना है. मगही-हमराघर जायला हे, भोजन करेला हे आउर फिनू लौटेला हे.

संदर्भ :

1. Grierson, G.A. Linguistic Survey of India, Vol. V. Part 2, Delhi, 1968.

२. अर्याणि, सं. मगही–भाषा और साहित्य, पाटणा, १९७६.

३. अर्याणि, सं. मगही व्याकरण कोश, दिल्ली, १९६५.

कुलकर्णी, सु. बा.