अतिवास्तववाद : विसाव्या शतकातील दोन महायुद्धांमधल्या काळात उदयास आलेली आणि विकास पावलेली कलाविषयक व साहित्यविषयक चळवळ. प्रत्यक्षानुभव व बुद्धी यांद्वारा सृष्टीमध्ये ज्याप्रमाणे वास्तवाची प्रतीती येते, त्याचप्रमाणे स्वप्नांतून किंवा अनिर्बंध कल्पनातरंगांतून अबोध मनाचे जे आविष्कार प्रकट होतात, त्यांतूनही वास्तव प्रतीत होते आणि हे आविष्कार दृश्य सृष्टीपेक्षा उच्च श्रेणीच्या वास्तवाच्या कितीतरी अधिक जवळचे असतात. अशा उच्च श्रेणीच्या वास्तवाचा म्हणजेच अतिवास्तवाचा शोध घेणेहे कलेचे व साहित्याचे उद्दिष्ट असले पाहिजे, हा ह्या चळवळीमागील मध्यवर्ती विचार होय.

अतिवास्तववादाचा उगम प्रामुख्याने ⇨दादावादात आहे. पहिल्या महायुद्धाने संवेदनशील मनाला जो जबर धक्का दिला होता, त्यातून दादावाद उदयाला आला. मानवी मूल्ये, सुसंस्कृत, सुजाण वर्तनाचे नियम, अर्थपूर्णतेचे, सौंदर्याचे, नीतीचे दंडक ह्या सर्वांतील पोकळपणा, त्यांचे वैयर्थ्य महायुद्धाने उघडे पाडले होते. म्हणून दादावाद मानवी जीवनाकडे आणि संस्कृतीकडे ‘कशातच काही अर्थ नाही, सर्वच निरर्थक आहे’, अशा तुच्छतावादी दृष्टिकोनातून पाहतो. दादावाद म्हणजे मानवी जीवनाकडे पाहण्याची जाणूनबुजून धारण केलेली थिल्लर वृत्ती असल्यामुळे दादावादाने कलेकडे, साहित्याकडे थिल्लरपणे पाहिले. सर्वच गोष्टींचा अव्हेर करणारी, सर्वच संस्थांविरूद्ध व सुव्यवस्थित जीवनाविरूद्ध बंड करणारी ही विघातक चळवळ टिकू शकली नाही पण या विघातक चळवळीचे विधायक असे एक अंग होते. सुजाण व समंजस वर्तनाचे, सुंदर रचनेचे, अर्थपूर्णतेचे जे बुद्धीने प्रमाणभूत मानलेले नियम किंवा दंडक होते, त्यांच्याविरुद्ध दादावादाने बंड केले होते. ही बंडखोर प्रवृत्ती मानवी प्रकृतीचे एक शाश्वत असे अंग आहे. दादावाद ह्या प्रवृत्तीचा एका विशिष्ट परिस्थितीतील आविष्कार होता. वास्तवतेचे तसेच मानवी जीवनाचे खरेखुरे प्राकृत स्वरूप अस्ताव्यस्त असते. त्याच्यात कोणतीही रचना, व्यवस्था किंवा सुसंगती नसते. वास्तवता म्हणजे अनेक असंबंधित गोष्टी केवळ यदृच्छया एकत्र येऊन बनलेला समूह किंवा गोंधळ आहे, हे दादावादाला दाखवून द्यावयाचे होते. कलेचे जीवनापासून स्वतंत्र व स्वायत्त असे विश्व असते, ही भूमिका नाकारून त्याने सुव्यवस्थित रचनेच्या व मांडणीच्या परंपराप्राप्त नियमांची जाणूनबुजून मोडतोड केली. कला ही जीवनाचा एक भाग असली पाहिजे, हे तत्त्व स्वीकारून कलेला साक्षात जीवनाच्या प्रवाहात स्थान देण्याचा प्रयत्न केला. दादावादी कलावंतांनी कलाकृतींचे माध्यम, रचना, मांडणी, तंत्र इ. बाबतींत अनेक धाडसी व तऱ्हेवाईक प्रयोग केले. हे सारे प्रयोग अतिवास्तववादाचा वारसा ठरले. अतिवास्तववादाची अधिकृत मांडणी फ्रेंच कवी व लेखक⇨आंद्रे ब्रताँ ह्याने १९२४ साली प्रसिद्ध केलेल्या पुस्तिकेत प्रथम केली. अबोध मनातील ‘अनियंत्रित कल्पनासाहचर्यावर, स्वप्नाच्या सार्वभौमत्वावर व मुक्त विचारावर’ अतिवास्तववाद आधारलेला आहे, असे त्याने जाहीर केले. हा अर्थात फ्रॉइडच्या मनोविश्लेषणाचा प्रभाव होता व ब्रताँ स्वत: मनोविश्लेषणशास्त्रज्ञ होता. शिवाय सामाजिक संस्था, प्रघात, संकेत यांनी नियंत्रित केलेल्या जीवनाविरुद्ध दादावादाने केलेल्या बंडाचा वारसा अतिवास्तववादाने स्वीकारला होता व म्हणून ह्या पंथाच्या अनुयायांनी काही काळ मार्क्सवादी कार्यक्रम अर्धवट स्वीकारला होता. अतिवास्तववाद ही दृश्य कलांप्रमाणे साहित्यातीलही चळवळ होती आणि आपॉलिनेर, बोदलेअर, मालार्मे इ. प्रतीकवादी कवींचा तिच्यावर प्रभाव होता. अतिवास्तववादाचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मूलत: हेगेलच्या तत्त्वज्ञानावर आधारलेला आहे, हेही ब्रताँने दाखवून दिले. अबोध मनातील अनिर्बंध कल्पनासाहचर्याला, मुक्त विचारांना आणि  त्यांतून निर्माण होणाऱ्या प्रतिमांच्या संघटनांना पुरेपूर वाव द्यावयाचा, तर त्यांच्यावर पडणारी तार्किक विचारांची व कलासौंदर्यविषयक पूर्वग्रहांची बंधने नष्ट केली पाहिजेत. यासाठी अतिवास्तववादी लेखकांनी व कलावंतांनी अबोध मनातून आपोआप स्फुरणाऱ्या स्वयंप्रेरित लिखाणाचा व रचनेचा पुरस्कार केला. जीवनात जे काही अद्‌भुत असे आढळते, त्याचा बुद्धिवाद द्वेष करतो, असे ब्रताँने म्हटले आहे. स्वप्नात, ध्यासात, मुक्तपणे भटकण्यात, काव्यात, अतींद्रिय सृष्टीत, यदृच्छेने घडलेल्या एखाद्या घटनेत हे अद्‌भुत आढळते. हे अद्‌भुत म्हणजेच सौंदर्य आणि सौंदर्य म्हणजे हे अद्‌भुत. ह्या अद्‌भुताचा प्रत्यय येण्यासाठी आपल्या अबोध मनाभोवती तार्किक विचारांची आणि सौंदर्यविषयक पारंपरिक संकेतांची जी कुंपणे असतात, ती नाहीशी करून या मनाला मो कळे केले पाहिजे. परंतु लेखकाच्या किंवा चित्रकाराच्या अबोध मनातून ज्या प्रतिमा किंवा प्रतीके स्फुरतील, त्यांचे सर्वांना ग्रहण होऊ शकेल का? मानवी अस्तित्वाचा गाभा असलेल्या अबोध मनातील प्रतीकांची भाषा ही एक सार्वत्रिक, सर्वांना अवगत असलेली भाषा आहे, असे अतिवास्तववादाचे म्हणणे होते. कला व साहित्य यांविषयी या वादाची भूमिका अशा प्रकारे अत्यंत क्रांतिकारक होती.

रेगे, मे. पुं.

ललितकलांपैकी चित्रकलेत अतिवास्तववादाचा प्रभाव सर्वांत अधिक दिसतो. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी शेवटी यूरोपात⇨दृकप्रत्ययवादानंतर कलेतील आधुनिक विचारप्रवाह⇨अभिव्यक्तिवाद, ⇨अप्रतिरूप कला यांसारख्या प्रकारांनी वाढीस लागला. प्रारंभी बाह्यविश्वाच्या दृश्य प्रतिक्रियाच चित्रित करण्यात आल्या व त्यानुरूप वस्तुविचार व माध्यमविचार प्रतिपादन करण्यात आला. नंतर विरूपणातील व रंगयोजनेतील अभिव्यक्तिसामर्थ्य लक्षात येऊ लागले. वैज्ञानिक शोधांनी शक्य झालेल्या गतिमानतेमुळे वस्तूच्या स्थायी रूपाच्या कल्पना अप्रस्तुत ठरल्या. वस्तूच्या दृश्य रूपापेक्षा अंतर्मनात स्फुरणाऱ्या तिच्या प्रतिमारूपाचा आविष्कार करणे हे चित्रकलेचे उद्दिष्ट ठरले. अतिवास्तववादी चित्रातील आकारांचे संयोजन वेगळ्या पद्धतीने केलेले असते. कार्यकारणभावाच्या दृष्टीने विसंगत वाटणाऱ्या आकारांची मांडणी तेथे स्वयंप्रेरणेने केलेली असते. अनेक आकृत्या अनपेक्षितपणे एकमेकींवर मांडलेल्या, फोडलेल्या किंवा जोडलेल्या असतात. अनेक तंत्रे त्यासाठी वापरलेली असतात. रंगांचा उपयोग स्वप्नमय अवकाश निर्माण करण्यासाठी मुख्यत: केला जातो. त्यात नाटकी अद्‌भुतता किंवा सहेतुक कल्पनाचमत्कृती येऊ नये, असा कटाक्ष असतो. कल्पनाचमत्कृती व नितळ सफाई यांचा हेतुपूर्वक उपयोग साल्वादोर दाली याने मात्र केला आहे. अतिवास्तववादी चित्रकलेच्या या प्रमुख प्रणेत्याची चित्रकला म्हणूनच काहीशी वेगळी वाटते. पॉल क्ले, जोन मीरो, कीरीको, माग्रित, ताँगी, पीकाब्या, झां आर्प, द्यूशाँ, मॅन रे, शगाल, मॅक्स अर्न्स्ट हे महत्त्वाचे अतिवास्तववादी कलावंत होत. जाकोमात्ती व झां आर्प यांनी शिल्पकलेत, साल्वादोर दालीने चित्रकलेव्यतिरिक्त चित्रपटसृष्टीत व मॅन रे याने छायाचित्रणात अतिवास्तववादी तंत्राचा उपयोग केला. पिकासोच्या काही कलाकृती अतिवास्तववादी मानल्या जातात. १९३० साली अतिवास्तववादी कलावंतांच्या कलाकृतींचे सामुदायिक प्रदर्शन भरविण्यात आले व त्यानंतर १९६० साली या कलाप्रकाराची दोन जागतिक प्रदर्शनेही भरविण्यात आली.

कदम, संभाजी

अतिवास्तववादी वाङ्‌मयीन चळवळीचे केंद्र फ्रान्समध्येच होते. या चळवळीचा प्रवर्तक आंद्रे ब्रताँ याने अतिवास्तववादासंबंधी एकूण तीन जाहीरनामे (१९२४, १९३० व १९३४) प्रसिद्ध केले. कविता, अंशत: आत्मचरित्रात्मक असलेली एक कादंबरी (Nadja, १९२८) व इतर स्फुट लेखन अशी ब्रताँची साहित्यनिर्मिती आहे. याशिवाय झां कॉक्तो, पॉल एल्यूआर, गीयोम आपॉलिनेर व ल्वी आरागाँ इ. फ्रेंच कविलेखक अतिवास्तववादी म्हणून प्रसिद्ध आहेत.


अतिवास्तववाद केवळ एक तांत्रिक प्रयोग नसून एक प्रकारची मनोवृत्ती आहे. विसाव्या शतकातील मूल्यविहीन मानवी समाजाची आत्मशोधनाची प्रामाणिक गरज आपल्या परीने भागविण्याचे सामर्थ्य या वादात आहे. म्हणूनच १९२० नंतरच्या जागतिक साहित्यावर या वादाचा ठसा कमीअधिक प्रमाणात उमटलेला दिसतो. स्वप्नसृष्टी व अंतर्मनातील प्रतिमाविश्व हे नवे विषय व स्वयंचलित उत्स्फूर्त लेखनाचे तसेच संज्ञाप्रवाही चित्रणाचे नवे तंत्र अतिवास्तववादानेच उपलब्ध करून दिले.

या वादाचा प्रभाव १९४० च्या सुमारास कमी झाला. नव्या कलात्मक गरजांतून व जाणिवांतून त्यात परिवर्तन घडून आले. काहीशी पुनर्घटना करण्यात आली. कलात्मक आविष्कारावर जाणीवपूर्वक नियंत्रण ठेवण्याच्या दिशेने असे परिवर्तन अपरिहार्य होते. या नव्या व आजही प्रचलित असलेल्या अतिवास्तववादी कलासाहित्यात अभिनव वास्तवदर्शनासाठी केलेले मनोविकृतींचे चित्रण, अंतर्बाह्य सृष्टीत आपोआप घडणाऱ्या व अकारण भासणाऱ्या गोष्टींचे अर्थपूर्ण संयोजन व विपरीताचीही विपरीतता हे विशेष आढळतात.

मराठीत अतिवास्तववादाला अनुकूल अशी ऐतिहासिक व सामाजिक पार्श्वभूमी नाही, असे एक मत आहे. तसेच संज्ञाप्रवाहाचे तंत्र या वादाचे सर्वस्व नाही, असाही विचार काहीजण मांडतात. अतिवास्तववादास अभिप्रेत असणारे काही विशेष दिलीप चित्र्यांच्या कथांत व काव्यात आढळतात. संज्ञाप्रवाहाचे तंत्र गंगाधर गाडगीळांसारख्या नवकथाकारांच्या काही कथांत व बा. सी. मर्ढेकरांच्यारात्रीचा दिवससारख्या कादंबरीत दिसून येते. मर्ढेकरांच्या व अन्य नवकवींच्या काही कवितांत ‘दुर्बोधते’चा विशेष आढळतो. ज्याला सर्वार्थाने अतिवास्तववादी म्हणता येईल, असे लेखन मराठीत नाही.

जाधव, रा. ग.

संदर्भ : 1. Breton, Andre,Le Surrealisme et. la Peinture, Paris, 1945.

           2. Canaday, John, Main streams of Modern Art, Londan, 1959.

          3. Nadeau, Maurice Trans. Howard, Richard, The History of Surrealism, London, 1969.

          4. Read, Herbert, A Concise History of Modern Painting, London, 1959.

          5. Waldberg, Patrik,Surrealism, Londan, 1965.