भावविरेचन : (कॅथर्सिस). शोकात्मिकेसारख्या (‘ ट्रॅजेडी ‘- सारख्या) गंभीर नाट्यदर्शनात खून, रक्तपात, मृत्यू, जीवघेणा संघर्ष अशा गोष्टी असतात. त्यांनी भय, अपार कीव, शोक इ. भावना विलक्षण उचंबळून येतात. काही विशिष्ट संगीताने पण असा उत्कट भावनिक परिणाम होतो. हा परिणाम कितपत हितावह आहे, असा प्रश्न ग्रीक नाट्याच्या काळी उत्पन्न झाला असला पाहिजे. त्याला उत्तर म्हणून ‘ ट्रॅजेडी ‘ संबंधीच्या विवेचनात ⇨ ॲरिस्टॉटलने ‘ कॅथर्सिस ‘ ची कल्पना मांडून उत्कट भावदर्शनाचे समथन केले आहे.

‘कॅथर्सिस’ किंवा भावविरेचन हा ग्रीक शब्द वैद्यकशास्त्राशी संबद्ध असून त्याचा मूळ अर्थ ‘ रेचन ‘, ‘ शुद्धीकरण ‘ असा आहे. माणसाच्या अंतःकरणात अनेक स्वार्थी विकार असतात त्यांचा व्यवहारातील आविष्कार त्या व्यक्तीला आणि इतरांनाही धोकादायक होऊ शकतो परंतु त्यांना काही अन्य प्रकारे मोकळी वाट मिळाली, तर चित्तशुद्धी होऊन माणसाचे आरोग्य ठीक राहते. हा वैद्यकशास्त्राचा सिद्धांत गंभीर शोकात्म नाट्यदर्शनाला लावून कलादर्शनाने उचंबळून आलेल्या भावना परिणामतः प्रेक्षकांच्या चित्तशुद्धीलाच साहाय्य करतात, असे ॲरिस्टॉटलचे प्रतिपादन आहे. श्रेष्ठ जर्मन साहित्यिक ⇨ गटे यांच्या मते कॅथर्सिसचा परिणाम नटांवर होतो तर नट व श्रोते-प्रेक्षक या दोहोंच्या भावनांचे ‘उदात्तीकरण’ कॅथर्सिसने होते, असे ⇨ लेसिंग हा प्रसिद्ध लेखक मानतो. वैद्यशास्त्राखेरीज मनोविश्लेषण आणि मनोरूग्णांना करावयाचे उपचार यांच्या संदर्भात फ्रॉइडने हा शब्द वापरलेला आहे.

प्राचीन भारतीय साहित्यशास्त्रातील रस-संकल्पनेशी भावविरेचनाचे तत्त्वतः साम्य नाही. अभिनवगुप्ताच्या रससिद्धांताच्या विवेचनाप्रमाणे माणसाचे मूलबूत स्थायी भाव पुरूषार्थांशी संबद्ध आहेत. प्रत्येकाला धर्म, अर्थ, काम यांना प्रेरणा देणाऱ्या वासना साध्य करून घेता येतीलच असे नाही. काव्य-नाट्यांतील नायक मात्र त्या साध्य करून घेता येतीलच असे नाही. काव्य-नाट्यांतील नायक मात्र त्या साध्य करताना दिसतो. त्याच्याशी प्रेक्षकांच्या भूमिकेवर तन्मय होऊन इच्छापूर्तीचे समाधान आपण मिळवू शकतो त्यामुळे काव्य-नाट्यांतील उत्कट भावदर्शन झालेच तर ते शेवटी आपल्या आनंदालाच कारणीभूत भावदर्शन झालेच तर ते शेवटी आपल्या आनंदालाच कारणीभूत होते. हा अनुभव कलात्मक असल्याने आपण तन्मय होऊनही तटस्थ राहू शकतो म्हणून शोक-भयादी भावही आनंदाच्या जाणिवेत परिणत होतात. म्हणजे, ॲरिस्टॉलची कल्पना भावविरेचनाची, भाव शुद्धीची तर भारतीय साहित्यशास्त्रातील भावदर्शनाने मिळणाऱ्या समाधानाची, कलात्मक आनंदाची आहे.

पहा: शोकात्मिका.

भट, गो. के.