संक्षेप : दीर्घ लांबीचे शब्द, शब्दसमूह वा वाक्यांश यांची निदर्शक अल्पाक्षरचिन्हे वापरून केली जाणारी लघुरूपे वा शब्दसंकोचन. संप्रेषणात (विशेषत: लिखित) त्यांचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. कित्येकदा लिखाणात वा उच्चरणामध्ये दीर्घ लांबलचक नावे वारंवार येत असल्यास, ती तशीच दीर्घपणे वापरणे गैरसोयीचे ठरते. अशा वेळी त्यांचे संक्षेप उपयुक्त ठरतात. संक्षेप करण्यामागे व वापरण्यामागे अनेक प्रकारची उद्दिष्टे व तत्त्वे संभवतात. लेखनसुकरता आणि मजकुरातील जागेची काटकसर ही त्यांतील दोन प्रमुख व मूलभूत उद्दिष्टे होत. लिखित तसेच छापील मजकुरातील वाक्ये, तक्ते व कोष्टके, आकृत्या व चित्रवर्णने इत्यादींमध्ये जागेची बचत व सुलभता, या दृष्टींनी संक्षेप विशेषत्वाने वापरले जातात. तव्दतच सूची, तळटीपा, संदर्भगंथसूची इत्यादींबाबतही संक्षेप वापरणे सोयीस्कर ठरते.

संक्षेपांचा वापर प्राचीन काळापासून चालत आला आहे. प्राचीन काळातील थडगी, स्मारके, नाणी, कोरीव लेख यांवरील लिखाणात संक्षेप चिन्हे वापरल्याचे आढळून येते. कारण तिथे जागेच्या अभावी शब्दांची लघुरूपे वापरणे अनिवार्य ठरत असे. कालांतराने पपायरसे, चर्मपत्रे अशी आदय लेखनसाधने उपलब्ध झाल्यावर हस्तलिखितांच्या लिखाणाचे प्रमाण जसे वाढत गेले, तसे लेखनप्रत तयार करणाऱ्या प्रतकारांनी लिहिण्याचे श्रम व वेळ यांत बचत करण्यासाठी संक्षेपांचा वापर मोठया प्रमाणात केला. प्राचीन ग्रीक कोरीव लेख, मध्ययुगीन हस्तलिखिते (उदा., ‘ DN ’ हा ‘ डॉमिनस नॉस्टर ’चा संक्षेप), कुराणाच्या प्रती यांत संक्षेपांची अनेक रूपे आढळतात. सिसरोचा सचिव मार्कस टूलियस टिरो याने अनेक संक्षिप्त रूपे रूढ केली. उदा., ‘ अँड ’ (आणि) या अर्थी &amp ही खूण. काही लॅटिन संक्षेप अद्यापही प्रचलित आहेत. विसाव्या शतकात विज्ञाने, तंत्रविदया, उदयोग-व्यवसाय इ. क्षेत्रे मोठया प्रमाणात विस्तारत गेली तसेच शासकीय अभिकरणांची संख्याही वाढत गेली. अशा सर्वच क्षेत्रांत विपुल प्रमाणात संक्षेपचिन्हे निर्माण करण्यात व अतिवापराने रूढ करण्यात आली. अशा संक्षेपांचा अफाट शब्दसंग्रह बहुधा सर्वच भाषांत आढळून येतो. सर्वसाधारण तसेच विशेषीकृत संप्रेषणात त्यांचा वापर सर्रास व मोठया प्रमाणात केला जातो. गणित, सांख्यिकी, भौतिकी तसेच इतरही तांत्रिक व शास्त्रीय विषयक्षेत्रांत अक्षरसंक्षेपांऐवजी अन्य संक्षेपचिन्हेच अधिक प्रमाणात वापरली जातात.[⟶ गणितीय संकेतने, चिन्हे व संज्ञा] चिन्हे व ⇨ प्रतीके ही संक्षेपाहून भिन्न असली, तरी ती संक्षेपनिर्देशनाचेच कार्य करतात. तारायंत्रविदया, संगणकादी माध्यमे यांच्या संप्रेषणात दीर्घ शब्द, वर्णनात्मक भाषा वा भाषिक विस्तार यांना फारसा वाव नसतो त्यामुळे संक्षेपचिन्हांचा वापर अपरिहार्य ठरतो. लघुलेखनात गतिमानता आवश्यक असल्याने लघुलिपी ही प्राय: संक्षेपचिन्हांचीच बनलेली असते. तव्दतच सांकेतिक लेखनात भाषिक अतिरिक्ततेला अवसर नसल्याने गुप्तलेखनशास्त्रात संक्षेपचिन्हांचा वापर अनिवार्य ठरतो.

संक्षेपांची निर्मिती अनेक प्रकारे होते. त्यातून संक्षेपांची अनेक रूपे प्रचलित झाली आहेत. काही संक्षेप शब्दांची आदयाक्षरे वापरून तयार केले जातात. उदा., N हा नाऊनचा संक्षेप, Co हा कंपनीचा संक्षेप, Gen (Genesis), Nov. (नोव्हेंबर) इत्यादी. काही संक्षेप शब्दातील महत्त्वाची, कळीची अक्षरे निवडून तयार केले जातात. उदा., Ltd (लिमिटेड), VTOL (व्हर्टिकल टेक्ऑफ अँड लँडिंग) इत्यादी. काही संक्षेप शब्दाचे पहिले व शेवटचे अक्षर घेऊन बनविले जातात. उदा., Rd (रोड), Ca (circa) इत्यादी. बोलताना सहसा शब्दांचे संक्षेप न उच्चरता पूर्ण शब्द उच्चरण्याची प्रवृत्ती असते. मात्र क्वचित संक्षेपही उच्चरले जातात. उदा., Ltd हा कित्येकदा एल्-टी-डी असा उच्चरला जातो. प्रचलित बोलीभाषेत काहीवेळा शब्दाचे खंडन (ट्रंकेशन) करून त्याचा संक्षेप वापरला जातो. उदा., ‘ मेट्स ’ हे ‘ मेट्रोपॉलिटन्स ’ Mo संक्षिप्त रूप होय. आद्याक्षर संज्ञा (ॲकॉनिम्स) हा संक्षेपाचाच एक प्रकार होय. दीर्घ शब्दसमूहातील वा वाक्यांशातील सुट्या शब्दांची आद्याक्षरे घेऊन जे संक्षेप बनवले जातात, त्यांस आदयाक्षर संज्ञा म्हणतात. उदा., ‘ यूनेस्को ’ (युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन). अशा आदयाक्षर जुळणीतून काही वेळा उच्चरक्षम स्वतंत्र शब्द तयार होतात. उदा., ‘ रडार ’ (रेडिओ डिटेक्टिंग अँड रेजिंग), ‘ स्नाफू ’ (सिच्युएशन नॉर्मल, ऑल फाउल्ड अप), ‘ नासा ’ (नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲड्-मिनिस्ट्रेशन) इत्यादी. किंवा अलग रीत्या उच्चरली जाणारी सुटी अक्षरेही तयार होतात. उदा., ‘ वाय्एम्‌सीए ’ अशी सुटी अक्षरे सामान्यत: मध्ये पूर्णविराम न देता लिहिली जातात. काही संक्षेप स्थलवाचक असतात (उदा., यू. एस्. ए.), तर काही संस्थावाचक असतात. अधिकृत संस्थात्मक दीर्घनामांचे निर्देश संक्षेपाने करण्याची प्रवृत्ती सर्वत्रच आढळते. उदा., NSPCC (नॅशनल सोसायटी फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ कूएल्टी टू चिल्ड्रेन). नित्याच्या व्यवहारात अनेक संक्षेप सततच्या वापराने रूळलेले असतात. उदा., एस्टी (स्टेट ट्रान्सपोर्ट), म. रा. वि. मं. (महाराष्ट्र राज्य विद्युत् मंडळ), आय्आय्‌टी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी), टेल्को (टाटा एंजिनियरिंग अँड लोकोमोटिव्ह कंपनी लिमिटेड) इत्यादी. विदयापीठाच्या पदव्या, मेट्रिक पद्धती, वजन-मापे वगैरे क्षेत्रांत प्राचुर्याने संक्षेप वापरले जातात.मराठी विश्वकोशा त नोंदींच्या विवेचनात तसेच चित्रे, आकृत्या, तक्ते, कोष्टके यांत जे मराठी व इंग्रजी संक्षेप वापरले आहेत, त्यांची यादी प्रत्येक खंडाच्या प्रारंभी दिली आहे. परिभाषासंग्रहा त (खंड २१) निरनिराळे विषय व उपविषय यांसाठी जे संक्षेप वापरले आहेत, त्यांची यादी दिली आहे.

काही मोजके रूढ व प्रचलित संक्षेप पुढे उदाहरणादाखल दिले आहेत. इंग्रजी : A. A. (अल्कोहॉलिक्स ॲनॉनिमस), A. D. (Anno Domini – इन द यिअर ऑफ अदर लॉर्ड), एड्स (ॲक्वायर्ड इम्यून डेफिशियन्सी सिंड्रोम), बी. सी. (बिफोर क्राइस्ट), सीडी (कॉम्पॅक्ट डिस्क), C/o (इन केअर ऑफ), डीएनए (deoxyribonucleic acid), e. g. (exempli gratia-फॉर एक्झँपल), इसीजी (इलेक्ट्रो- कार्डिओग्रॅम), ओके (करेक्ट, ऑल राइट), ओपेक (ऑर्ग्नायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्स्पोर्टिंग कंट्रीज), PAYE (पे ॲज यू अर्न), पीसी (प्रिव्ही काउन्सिलर / पोलिस कॉन्स्टेबल / पर्सनल कंप्यूटर), Q. E. D. (quod erat demonstrandum -विच वॉज टू बी शोन ऑर प्रूव्ह्‌ड), आर्ए (रॉयल अकॅडमी), R. S. V. P. (Repondez, sil vous plait -आन्सर, इफ यू प्लीज).

मराठी : अक्र. (अणुक्रमांक), आं. ए. (आंतरराष्ट्रीय एकक), इ. (इत्यादी), इं. भा. (इंग्रजी भाषांतर), इ. स. पू. (इसवी सन पूर्व), उ. अश. (उपयुक्त अश्वशक्ती). उदा., (उदाहरणार्थ), कॅमू. (कॅलरीमूल्य), किमी. (चौरस किलोमीटर), वि. गु. (विशिष्ट गुरूत्व), संपा. (संपादक/संपादित), सु. (सुमारे), º से. (सेल्सिअस-तापमान), सेंमी. (घन सेंटिमीटर) इत्यादी.

इनामदार, श्री. दे.