प्फेफर, व्हिल्हेल्म फ्रीड्रिफ फीलिप : (९ मार्च १८४५—३१ जानेवारी १९२०). जर्मन वनस्पती शरीरक्रियावैज्ञानिक. वनस्पतींतील विविध शरीरक्रियावैज्ञानिक प्रक्रिया आणि तर्षण दाब [ तर्षण] यांसंबंधी त्यांनी महत्त्वाचे संशोधन केले. त्यांचा जन्म कासेलजवळील ग्रेबनस्टाइन येथे झाला. त्यांचे शिक्षण गटिंगेन विद्यापीठात झाले आणि १८६५ मध्ये त्यांनी वनस्पतिविज्ञान व रसायनशास्त्र या विषयांतील डॉक्टरेट पदवी मिळविली. त्यानंतर त्यांनी मारबर्ग विद्यापीठात औषधनिर्माणशास्त्राचा अभ्यास केला व १८६८ मध्ये ते औषधविक्रेत्याचा व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असणारी परीक्षा उत्तीर्ण झाले. तथापि वनस्पतिविज्ञानाच्या शैक्षणिक आणि संशोधक क्षेत्रातच कार्य करण्याचा निश्चय करून त्यांनी बर्लिन येथे नाटानाएल प्रिंगशाइम व यूलिऊस फोन झाक्स मार्गदर्शनाखाली वनस्पतिविज्ञानाचा अभ्यास केला (१८६९—७१). १८७१ मध्ये मारबर्ग विद्यापीठात विनावेतन अध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्यानंतर त्यांनी बॉन (१८७३), बाझेल (१८७७), ट्यूबिंगेन (१८७८) व लाइपसिक (१८८७) येथील विद्यापीठांत सवेतन अध्यापन कार्य केले. लाइपसिक येथील बोटॅनिकल इंस्टिट्यूटचे ते संचालकही होते.

वनस्पतींचे श्वसन, ⇨ प्रकाशसंश्लेषण, प्रथिन-चयापचय [→ चयापचय], वनस्पतींतील अनुवर्तनी व अनुकुंचनी चलनवलन [→ वनस्पतींचे चलनवलन] इ. शरीरक्रियावैज्ञानिक प्रक्रियांसंबंधी त्यांनी महत्त्वाचे संशोधन केले. ॲस्परजिन या ⇨ ॲमिनो अम्लाच्या वनस्पतींच्या चयापचयातील महत्त्वासंबंधीचे त्यांचे कार्य वादग्रस्त ठरले, तथापि ते ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरले. वर्णपटाच्या निरनिराळ्या भागांतील प्रकाशाचा वनस्पतींच्या कार्बन डाय-ऑक्साइडाचे अपघटन करण्याच्या (घटक अलग करण्याच्या) क्रियेवर होणाऱ्या परिणामाचा त्यांनी अभ्यास केला. तसेच वनस्पतींच्या वाढीवर बाह्य उद्दीपकांच्या होणाऱ्या काही परिणामांचे त्यांनी विश्लेषण केले. वनस्पतींमधील तर्षण दाबाचे प्रत्यक्ष मापन त्यांनीच प्रथम केले. याकरिता त्यांनी चिनी मातीच्या झिलईरहित सच्छिद्र पात्रांचा उपयोग केला व त्यात कॉपर फेरोसायनाइडाचे अवक्षेपण करून (न विरघळणारा साका साचवून) अर्धपार्य (विशिष्ट द्रव्येच आरपार जाऊ देणारे) पटल मिळविले. असे पात्र वनस्पतीच्या कोशिकेची (पेशीची) प्रतिकृती मानता येईल, असे त्यांनी प्रतिपादन केले. या पात्रांच्या साहाय्याने त्यांनी विविध पदार्थांच्या विद्रावांचा तर्षण दाब निरनिराळ्या संहतींना (विद्रावातील पदार्थाचे प्रमाण निरनिराळे असताना) व तापमानांना मोजला. त्यांच्या या प्रयोगाची माहिती त्यांनी १८७७ मध्ये प्रसिद्ध केली आणि तिच्या आधारावरच पुढे जे. एच्. व्हांट-हॉफ यांनी आपले सैद्धांतिक समीकरण मांडले. [→ तर्षण].

वनस्पतींच्या शरीरक्रियाविज्ञानावरील आपल्या ग्रंथाचा पहिला भाग (Pflanzenphysiologie) त्यांनी १८८१ मध्ये प्रसिद्ध केला. ए. जे. एवर्ट यांनी त्याचे इंग्रजीत तीन खंडांत भाषांतर केले (१९००—१९०६). अनेक वर्षे तो एक उत्कृष्ट संदर्भ ग्रंथ म्हणून वापरात होता. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांची व संशोधनपर निबंधांची संख्या शंभरावर होती. त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ केंब्रिज, हाल, केनिग्झबर्ग व ऑस्लो या विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय पदव्या दिल्या. ते लाइपसिक येथे मृत्यू पावले.

जमदाडे, ज. वि.