वॉलिस, अल्फ्रेड रसेल : (८ जानेवारी १८२३- ७ नोव्हेंबर १९१३). ब्रिटिश निसर्गवेत्ते. ⇨नैसर्गिक निवडीच्या तत्त्वाच्या आधारे ⇨चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांच्यापासून स्वतंत्रपणे त्यांनी ‘जातीचा उगम’ हा महत्त्वाचा सिद्धांत मांडला असून ते या कार्याबद्दल विशेष प्रसिद्ध आहेत ‘सर्वोत्तम तोच जगेल’ (सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट किंवा जीवो जीवस्य जीवनम्) ही उक्ती त्यांनी प्रचारात आणली.
वॉलिस यांचा जन्म अस्क, मॉनमथशर येथे झाला. तरुणपणीच त्यांना वनस्पतिविज्ञानाची गोडी लागली व त्यांनी वनस्पतींच्या नमुन्यांचा संग्रह करण्यास सुरुवात केली. १८४४-४५ मध्ये त्यांचा ब्रिटिश निसर्गवेत्ते हेन्ऱी वॉल्टर बेट्स यांच्याशी परिचय झाला. बेट्स यांनी वॉलिस यांना कीटकांच्या अध्ययनाची गोडी लावली. १८४८ मध्ये ते दोघे ॲमेझॉन नदीच्या शोध मोहिमेवर गेले व १८५३ मध्ये वॉलिस यांनी त्या मोहिमेवर आधारलेले अ नॅरेटिव्ह ऑफ ट्रॅव्हल्स ऑन दी ॲमेझॉन अँड रिओ नीग्रो हे प्रवासवर्णन प्रसिद्ध केले. परतीच्या प्रवासात त्यांचे जहाज बुडाले व त्यात त्यांचा संपूर्ण संग्रह नष्ट झाला मात्र आधीच इंग्लंडला पाठविलेले साहित्य तेवढे बचावले.
इ. स. १८५४-६२ मध्ये त्यांनी मलाया द्वीपसमूहाची मोहीम केली. तीमध्ये त्यांनी क्रमविकासाच्या (उत्क्रांतीच्या) सिद्धांताला ॲमेझॉनच्या मोहिमेत जमविलेल्या पुराव्याला आणखी पुष्टी देणारा पुरावा एकत्रित केला. फेब्रुवारी १८५५ मध्ये साराबाक येथे मुक्कामाला असताना ‘ऑन द लॉ विइच हॅज रेग्युलेटेड व इंट्रोडक्शन ऑफ न्यू स्पीशिज’ हा सडेतोड निबंध त्यांनी लिहिला. त्या निबंधात त्यांनी असे प्रतिपादन केले की, पूर्वी अस्तित्वात असलेल्या व निकटच्या संबंध असलेल्या जातींपासून आता अस्तित्वात असलेल्या जाती काल व अवकाश या दोहोंच्या संदर्भात योगायोगाने अस्तित्वात आल्या आहेत. जातींमध्ये होणारे बदल कसे घडून येतात या प्रश्नाने गेली दहा वर्षे माझा पिच्छा सोडलेला नाही, असेही त्यांनी लिहिले होते. शेवटी फेब्रुवारी १८५८ मध्ये मोलकाझमधील टर्नाटे येथे मानवी क्रमविकासासंबंधी विचार करीत असताना टॉमस रॉबर्ट मॅल्थस यांच्या एसे ऑन पॉप्युलेशनचे त्यांना स्मरण झाले. वॉलिस लिहितात की, माझ्या मनात ‘जीवो जीवस्य जीवनम्’ हा विचार चमकून गेला, त्या सिद्धांतावर सविस्तर विचार केला. एका संध्याकाळी त्याचा आराखडा तयार केला. पुढील दोन दिवस संध्याकाळी तो सविस्तर लिहून पुरा केला व दुसऱ्या दिवशीच्या डाकेने चार्ल्स डार्विन यांना तो पाठविला. भूवैज्ञानिक सर चार्ल्स लायेल यांना पाठविलेल्या पत्रात डार्विन लिहितात की, एवढा जबरदस्त योगायोग मी पाहिला नव्हता व पुढे असेही म्हणतात की, “वॉलिस यांच्या संज्ञा माझ्या प्रकरणांचे मथळे आहेत.” पुढील नोव्हेंबर १८५९ मध्ये डार्विन यांचा ओरिजीन ऑफ स्पीशिज हा ग्रंथ प्रसिद्ध झाला.
लायेल व वनस्पतिशास्त्रज्ञ ⇨सर जोसेफ हूकर यांच्या सल्ल्यानुसार १ जुलै १८५८ रोजी लिनीअन सोसायटीपुढे वरील निबंधाचे डार्विन यांच्या संक्षिप्त दृष्टिकोनासह वाचन करण्यात आले. “ऑन द टेंडन्सी ऑफ व्हरायटीज टू डिपार्ट इंडेफिनेट्ली फ्रॉम द ओरिजिनल टाइप” हे वॉलिस यांच्या विभागाचे शीर्षक होते. जीवनकलह, प्राण्यांच्या संख्या वाढीचा वेग व अन्नपुरवठ्यावर त्यांची संख्या अवलंबून असणे हे मुद्दे सप्रमाण चर्चिले गेले आणि आरोग्य व ताकद या बाबतींत जे जीव सर्वश्रेष्ठ असतात तेच जास्त काळ आपले अस्तित्व टिकवू शकतात… जे अतिदुर्बल व अतिनिकृष्ट असतात ते नेहमीच नष्ट होतात.
“एखाद्या व्यक्तीच्या किंवा प्राण्याच्या आयुष्यात परिस्थितीतील बदलांमुळे गरजेपोटी शरीरात संरचनात्मक बदल होतात. ते पुढच्या पिढीत आनुवंशिकतेने येतात” या झां बासीस्त प्येर आंत्वान द मॉने लामार्क यांच्या सिद्धांताची व ⇨नैसर्गिक निवड यांची चर्चा वॉलिस यांनी केली व असे निदर्शनास आणून दिले की, ससाणा व मांजर यांना असलेल्या प्रतिकर्षी (आत ओढून घेता येणाऱ्या) नख्या या त्यांच्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे नाहीत, तर जीवनकलहातून आलेल्या आहेत. याचा अर्थ ज्यांना भक्ष्य पकडण्यासाठी उत्कृष्ट अवयव आहेत, असेच प्राणी अधिक दीर्घकाळ जगू शकले आहेत. तसेच चारा खाण्यासाठी लांबवावी लागल्यामुळे जिराफाची मान लांब झाली नाही, तथापि नेहमीच्या जिराफापेक्षा जास्त लांब मान असलेल्या जिराफांना अधिक उंचीवरचा नवीन चारा मिळाला आणि प्रथम चाऱ्याची टंचाई निर्माण झाली त्या वेळी लांब मानेमुळे ते जिवंत राहू शकले.
लामार्क यांचा सिद्धांत वॉलिस यांना पूर्णपणे समजला नव्हता. शारीरिक बदलांचे अनुहरण होते व त्यामुळे जातींमध्ये बदल घडून येतात, हा लामार्क यांना अभिप्रेत असलेला बदलाचा अर्थ आहे, तर वॉलिस यांचा भर बळी तो कान पिळी व जीवो जीवस्य जीवनम् यांवर होता. प्राण्यांचे रंग त्यांच्या सभोवतालच्या परिस्थितीशी जुळणारे असतात यावरही वॉलिस यांचा भर होता. विशेषतः कीटक परिस्थितीशी समरूप होतात व जुळवून घेतात कारण ज्या कीटकांच्या रंगाचे शत्रूपासून लपून राहण्याच्या दृष्टीने उत्तम रीत्या अनुकूलन झालेले असते, ते स्वाभाविकपणे सर्वाधिक काळ जगतात.
आपल्या द मले आर्चिपिलॅगो (१८६९) या ग्रंथात त्यांनी या द्वीपसमूहाची पौर्वात्य व पाश्चिमात्य अशा गटांत विभागणी केली आहे. पाश्चिमात्य गटात बोर्निओ व बाली या बेटांचा समावेश असून तेथील प्राण्यांचा आप्तभाव पौर्वात्य प्रकारचा आहे व पूर्वेकडील गटात सेलेबीझ व लाँबॉक या बेटांचे प्राणिवैज्ञानिक दुवे ऑस्ट्रेलियन स्वरूपाचे आहेत. पौर्वात्य बोर्निओ व बाली ही बेटे आणि सेलेबीझ व लाँबॉक या पाश्चिमात्य बेटांमध्ये एक अरुंद पट्टा असून तो ‘वॉलिस रेषा’ म्हणून ओळखला जातो. या रेषेच्या विरुद्ध बाजूंना असलेल्या मूळच्या सस्तन प्राण्यांमध्ये कमालीची म्हणजे जगाच्या दोन भागांत असते एवढी भिन्नता आढळते, हा त्यांचा मूलभूत महत्त्वाचा शोध आहे. या बेटांचा प्रवास करीत असताना वॉलिस यांचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत विकसित झाला.
सारावाक व टर्नाटे येथे असताना वॉलिस यांनी लिहिलेले दोन निबंध इतर निबंधांबरोबर कॉट्रिब्यूशन्स टू द थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन या १८७० मध्ये झालेल्या खंडात आले होते. या खंडात व इतर अनेक पुस्तकांवरून वॉलिस व डार्विन यांचे अनेक मुद्यांवर मतभेद असल्याचे उघड झाले होते. नैसर्गिक निवडीद्वारे क्रमविकास होऊन मानवाला आजमितीचे शारीरिक रूप प्राप्त झालेले आहे, हे दोघांनाही मान्य होते. तथापि डार्विन यांच्याप्रमाणे मानवाची उच्च बौद्धिकक्षमता नैसर्गिक निवडीद्वारे आली आहे, हे वॉलिस यांना मान्य नव्हते. त्याला अन्य कोणती तरी जीववैज्ञानिकेतर शक्ती कारणीभूत असावी, असे ते मानीत. पारमार्थिक शक्तीवर वॉलिस यांचा विश्वास होता, हे या बाबतीत दिसून येते. चमकदार रंगाच्या नराविषयीचे मादीचे ⇨लैंगिक निवडीचे गृहीतकही वॉलिस यांना मान्य नव्हते. संरक्षण व लपून राहणे या मुद्यांवर भर देऊन ते असे प्रतिपादन करीत की, मादी पक्ष्याचे मंद रंग हे नैसर्गिक निवडीने प्रस्थापित झालेले आहेत.
ब्रिटिश शासनाने १९१० मध्ये वॉलिस यांना ऑर्डर ऑफ मेरिट हा किताब देऊन सन्मानित केले. जमिनीचे राष्ट्रीयीकरण व स्त्रियांना मताधिकार देणे या दोन्ही गोष्टींना त्यांचा पाठींबा होता.
ब्रॉडस्टोन, डॉर्सेट येथे वॉलिस मृत्यू पावले.
जमदाडे, ज. वि.