विशिष्ट करनिर्धारण : (स्पेशल ॲसेस्मेंट). सर्वसामान्यपणे कोणत्याही करविषयक कायद्यामध्ये तो कर ज्याला देय असतो, त्या करदात्यावरच त्या कराची आकारणी तरतूद केलेली असते. परंतु अपवादात्मक विशिष्ट परिस्थितीमध्ये अशी कर आकारणी करदाता सोडून अन्य व्यक्तीवर करण्याची तरतूद केलेली असते. अशा पद्धतीने झालेल्या करनिर्धारणाला ‘विशिष्टकरनिर्धारण’ असे म्हणतात. उदा., भारतीय आयकर अधिनियमाच्या काही प्रावधानांनुसार पुढीलप्रमाणे विशिष्ट करनिर्धारण करता येते :

(अ) करदाता मरण पावल्यास त्याच्या वारसांवर करनिर्धारण केले जाते त्यांना ज्या प्रमाणात मृताकडून वारसाहक्काने मालमत्ता मिळाली असेल, त्या प्रमाणात देय कराला ते जबाबदार असतात. मिळालेल्या मालमत्तेहून जास्त कर त्यांच्याकडून वसूल करता येत नाही. करदाता जिवंत असताना ज्या ज्या गोष्टींना आणि निर्धारणेला तो जबाबदार असू शकला असता, त्या सर्व गोष्टींची व निर्धारणाची जबाबदारी वारसांवर येऊ शकते. तसेच एखादी आकारणीविषयक कारवाई मरण पावलेल्या करदात्यावर तो जिवंत असताना चालू झाली असेल, तर त्याच्य वारसांवर ती कारवाई तशीच चालू ठेवता येते. त्याचप्रमाणे मृत व्यक्तीच्या करनिर्धारणेसंबंधीची कारवाई त्याच्या वारसांवरसुद्धा सुरू करता येते. मात्र वारसांची करदेयता त्यांना वारसा म्हणून मिळालेल्या मालमत्तेहून जास्त असू शकत नाही.

(आ) काही विशिष्ट परिस्थितीत करदात्याच्या वतीने प्रातिनिधिक करदाता म्हणून कोणाला समजावयाचे, याबाबतच्या तरतुदी आयकर कायद्यामध्ये केलेल्या आहेत. त्यानुसार अनिवासी भारतीयाचा नोकर वा व्यावसायिक भागीदार, वा त्याच्याकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीनीने उत्पन्न मिळविणारी व्यक्ती, किंवा त्याचा विश्वस्त ह्यांपैकी कोणालाही त्याचा प्रतिनिधी समजले जाते. करदाता अज्ञान, मतिमंद किंवा वेडसर असल्यास, त्याच्या वतीने उत्पन्न गोळा करणारा त्याचा पालक किंवा व्यवस्थापक ह्यास त्याचा प्रतिनिधी समजले जाते. अज्ञान व्यक्ती किंवा न्यास यांच्या बाबतीत एखाद्या न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे नेमलेले पाल्याधिकरण (कोर्ट ऑफ वॉर्‌कस) यांना त्यांचे प्रतिनिधी मानले जाते. ज्यांना न्यासाचे उत्पन्न मिळते असे विश्वस्त पत्रान्वये नेमलेले, किंवा मौखिक पद्धतीने नेमलेले विश्वस्त ह्यांना न्यासाचे प्रतिनिधी मानले जाते.

अशा सर्व प्रातिनिधिक करदात्यांना जणू ते स्वतःच करदाते आहेत, अशा पद्धतीने आयकर कायद्यातील सर्व जबाबदाऱ्या पाळाव्या लागतात. तसेच त्यांनी प्रतिनिधी म्हणून भरलेल्या सर्व रकमांची वसुली त्यांना मूळ करदात्याच्या उत्पन्नातून करून घेता येते.

(इ) संकीर्ण : मृत्यूपत्रानुसार नेमलेल्या मृत्यूपत्र-व्यवस्थापकाला (एक्झिक्यूटर) प्रातिनिधिक करदाता समजले जाते. एखादा चालू व्यवसाय दुसऱ्या व्यक्तीने तसाच चालवण्यास घेतला आणि मूळ व्यावसायिकाकडून करविषयक जबाबदाऱ्या पार पाडल्या गेल्या नसतील, तर तो व्यवसाय चालवण्यास घेणारा, हस्तांतरण झालेल्या वर्षाच्या जबाबदाऱ्यांना पात्र समजला जातो. हिंदू अविभक्त कुटुंबाच्या बाबतीत त्या कुटुंबाचे संपूर्ण विघटन झाले असल्यास, त्याच्या विघटनपूर्व करदेयकतेबाबत त्याचे सर्व सदस्य प्रतिनिधी म्हणून धरले जातात. एखादी भागीदारी किंवा संस्था, विघटित झाली असेल, तर तिचे भागीदार किंवा सदस्य या सर्वांना तिचे प्रतिनिधी समजले जाते. एखादी सार्वजनिक भागभांडवली मंडळी (पब्लिक लिमिटेड कंपनी) दिवाळखोरीमध्ये निघाली असल्यास अशा कंपनीचा परिसमापक(लिक्विडेटर) किंवा न्यायालयाने नियुक्त केलेला प्रापक (रिसीव्हर) हा त्या कंपनीच्या बाबत प्रतिनिधी समजला जातो. खाजगी (मर्यादित) कंपनीच्या बाबात जर तिचे देय कर वसूल होऊ शकले नाहीत, तर ते तिच्या तत्कालीन संचालकांकडून वसूल करता येतात. मात्र त्यांनी कंपनीच्या व्यवहारात आपण निष्काळजीपणा, अफरातफर किंवा कर्तव्यात कसूर केलेली नाही, असे सिद्ध केल्यास ही जबाबदारी त्याच्यावर येत नाही. अनिवासी भारतीयाच्या मालकीचे किंवा त्याने भाड्याने घेतलेले जहाज जर प्रवासी, माल, टपाल किंवा पशुधन घेऊन भारतीय बंदरामध्ये आले असेल, तर त्या जहाजाला मिळणाऱ्या वाहतूक भाड्यावर विशिष्ट टक्केवारीने उत्पन्न धरून आयकर-आकारणी केली जाते आणि बंदर सोडण्यापूर्वी असा कर वसूल केला जातो. जर बंदर सोडण्यापूर्वी असे उत्पन्न निश्चित करून त्याचा कर भरणे व उत्पन्नपत्रक भरणे सबळ कारणामुळे शक्य होणार नाही अशी आयकर अधिकाऱ्यांची खात्री पटली, तर ते त्या जहाजाला बंदर सोडण्याची परवानगी देऊ शकतात मात्र अशावेळी जहाजाच्या कप्तानाने देय कर भरला जाण्याची पुरेशी तरतूद केली आहे आणि करपत्रक भरण्यासाठी व अन्य पूर्तता करण्यासाठी भारतीय प्रतिनिधी नेमला आहे, याची ते खात्री करून घेतात. अशावेळी आयकर कायद्याच्या पालनाच्या जबाबदाऱ्या तीस दिवसांत पूर्ण करण्याचे दायित्व त्या प्रतिनिधीवर असते.

अशाच तऱ्हेच्या विशिष्ट करनिर्धारणासंबंधीच्या खास तरतुदी विक्री-कर कायदा, व्यवसायकर कायदा व अन्य सर्व करविषयक कायदे यांमध्ये केलेल्या आढळतात.

पहा : कर कर भाडवली कर, वस्तुविनिमयावरील कर, संकीर्ण.

गोडबोले, अरुण