व्हाइसमान, आउगुस्ट : (१७ जानेवारी १८३४-५ नोव्हेंबर १९१४). जर्मन जीववैज्ञानिक. आनुवंशिकताविज्ञानाच्या संस्थापकांपैकी एक. जननद्रव्य (जर्म-प्लाझम) नव्याने तयार होत नाही व ते एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे दिले जाते, या जननद्रव्याच्या सातत्य सिद्धांतासंबंधी त्यांनी केलेले संशोधन महत्त्वाचे मानले जाते.

व्हाइसमान यांचा जन्म फ्रँकफुर्ट-आम-मेन (जर्मनी) येथे झाला. त्यांचे वडील प्राध्यापक आणि आई संगीतकार व चित्रकार होती. बालवयापासून त्यांना कीटकांचा व वनस्पतींचा संग्रह करण्याचा छंद व निसर्गेतिहासाबद्दल जिज्ञासा होती. त्यांनी १८५२-५६ या काळात गटिंगेन विद्यापीठात वैद्यकाचे व गीसेनला प्राणिविज्ञानाचे शिक्षण घेतले. १८६३ मध्ये ते फ्रायबर्ग विद्यापीठात प्राणिविज्ञानाचे प्राध्यापक व तेथील प्राणिविज्ञानाची संस्था व संग्रहालयाचे पहिले संचालक झाले. १९१२ मध्ये ते तेथूनच सेवानिवृत्त झाले.

त्यांचे सुरुवातीचे संशोधन प्राणिविज्ञानासंबंधीचे होते. त्यांनी कीटकाचे रूपांतरण व हायड्रोझोआच्या लिंग कोशिका (पेशी) यांवर संशोधन केले. दृष्टिदोषाच्या त्रासामुळे त्यांनी सूक्ष्मदर्शकाने करावयाचे संशोधन बंद केले. मात्र पत्नीच्या मदतीने ते सैद्धांतिक समस्येवर काम करीत राहिले. हायड्रोझोआच्या निरीक्षणावरून त्यांनी अशी कल्पना केली की, प्राण्याच्या जननद्रव्यामध्ये जातीसाठी आवश्यक असे काही तरी असते. ते काळजीपूर्वक परिरक्षित केले जाते व एका पिढीतून दुसऱ्या पिढीत नेले जाते. यावरून त्यांनी जननद्रव्याचा सातत्य सिद्धांत मांडला. त्यानुसार सजीव जीवाणूमध्ये आनुवंशिक द्रव्य (जननद्रव्य) असते. त्याचे एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे संक्रमण होत असते. ते जीवाणूच्या प्रत्येक अवयवाच्या विकासाचे नियंत्रण करते. पर्यावरणाच्या क्रियेमुळे त्यांचे रूपांतरण होत नाही, असे त्यांचे मत होते. उपार्जित लक्षणांच्या वंशागती सिद्धांताला त्यांनी जोरदार विरोध केला. यासंबंधीचा त्यांचा उंदरावरील प्रयोग प्रसिद्ध आहे. त्यांनी उंदरांच्या शेपट्या तोडल्या व अशा शेपट्या तोडलेल्या उंदरांच्या सलग पाच पिढ्यांचे निरीक्षण केले. प्रत्येक पिढीत उंदरांना नेहमीसारख्या शेपट्या आल्या. यावरून त्यांनी असे सिद्ध केले की अवयवच्छेदनाचे अनुहरण होत नाही.

निषेचित (फलित) अंड्यामध्ये मातापित्याकडून आलेल्या आनुवंशिक द्रव्याचे मिश्रण होते. तरी आनुवंशिक द्रव्यामध्ये वाढ होत नाही, असे त्यांना आढळून आले. यावरून त्यांनी मूळ केंद्रकातील फक्त निम्मेच पैत्रुक जननद्रव्य प्रत्येक अपत्य (संतती) केंद्रकामध्ये येत असले पाहिजे असे प्रतिपादन केले. ई. श्ट्रासबुर्गर, ओस्कार हेर्टव्हिख व इतरांच्या संशोधनामुळे त्यांचे प्रतिपादन खरे असल्याचे सिद्ध झाले. त्यांच्या मतानुसार आई-वडील व त्यांची मुले यांच्यात सारखेपणा आढळतो, याचे कारण ते एकाच जननद्रव्यापासून निर्माण झालेले असतात. जननद्रव्याद्वारे आनुवंशिक घटक एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे प्रजोत्पादनाच्या क्रियेद्वारा संक्रमित केले जातात. हे संक्रमण होत असताना त्यात बदल होत नाहीत असे त्यांचे मत होते. नंतरच्या काळात ह्या सिद्धांतात काही बदल झाले, पण मूलभूत गोष्टी तशाच राहिल्या. त्यांचे इंग्रजीतील अनुवादित प्रमुख ग्रंथ पुढीलप्रमाणे : चार्ल्स डार्विन यांची प्रस्तावना असलेला स्टडीज इन दी थिअरी ऑफ डिसेंट (२ खंड, १८८२), एसेज अपॉन हेरेडिटी अँड किंड्रेड बायॉलॉजिकल प्रॉब्लेम्स (२ खंड, १८८९-९२), दी जर्म-प्लाझम : ए थिअरी ऑफ हेरेडिटी (१८९३) आणि दी इव्होल्युशन थिअरी (१९०४).

ते फ्रायबर्ग येथे मरण पावले.

पहा : आनुवंशिकता आनुवंशिकी.

पाटील, चंद्रकांत प.