डॉइझी, एडवर्ड ॲडेलबर्ट : ( १३ नोव्हेंबर १८९३–     ). अमेरिकन जीवनसायनशास्त्रज्ञ. केजीवनसत्त्व शुद्ध स्वरूपात कृत्रिम रीत्या तयार करून त्याची औषधी उपयुक्तता सिद्घ केल्याबद्दल त्यांना १९४३ चे वैद्यक किंवा शरीरक्रियाविज्ञान या विषयातील नोबेल पारितोषिक ⇨ हेन्रिक डाम यांच्याबरोबर विभागून मिळाले.

त्यांचा जन्म ह्यूम (इलिनॉय) येथे झाला. त्यांनी इलिनॉय विद्यापाठीच्या ए. बी. (१९१४) आणि एम्. एस्. (१९१६) या पदव्या मिळविल्या. नंतर पहिल्या महायुद्धात सैन्यात नोकरी केली व १९२० मध्ये हार्व्हर्ड विद्यापीठाची पीएच्.डी. पदवी मिळविली. १९१९–२९ या काळात त्यांनी वॉशिंग्टन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ मेडिसिनच्या जीवरसायनशास्त्र विभागात निर्देशक साहाय्यक व सहयोगी प्राध्यापक म्हणून काम केले. पुढे ते सेंट लूइस विद्यापीठाच्या स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये जीवरसायनशास्त्राचे प्राध्यपक व विभाग प्रमुख झाले (१९२४). १९५१ मध्ये त्यांची विशेषित सेवा प्राध्यापक म्हणून निवड झाली.

एडगर ॲलन यांच्याबरोबर त्यांनी उंदराच्या ऋतुचक्राचे नियमन करणाऱ्या अंडाशयातील संबंधित अशा घटकांचा अभ्यास केला. त्यातूनच त्यांनी स्टेरॉइडांमधील इस्टोन हा हॉर्मोन (उत्तेजक स्त्राव) स्फटिकरूपात प्रथमच १९२९ मध्ये अलग केला. नंतर त्यांनी इस्ट्रिऑल व इस्ट्राडिऑल –१७ बीटा ही संबंधित संयुगेही अलग केली. पुढे ही संयुगे किंवा त्यांच्याशी निकटसंबंध असलेले अनुजात (त्यांच्यापासून तयार केलेली इतर संयुगे) स्त्रियांच्या लैंगिक रोगांवरील उपचारात मोठ्या प्रमाणात वापरण्यात आली. डॉइझी व त्यांच्या सहकाऱ्यांनी वनस्पतीपासून केव सूक्ष्मजंतूंपासून केही जीवनसत्त्वे शुद्ध स्वरूपात अलग केली, तसेच केजीवनसत्त्व कृत्रिम रीत्या तयार करण्यात १९३९ साली यश मिळविले. वरील कार्याव्यतिरिक्त डॉइझी यांनी इन्शुलीन, प्रतिजैव (अँटिबायॉटिक) पदार्थ, हॉर्मोने व पित्ताम्ल यांचा चयापचय (शरीरात होणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडी) या विषयांतही संशोधन केलेले आहे.

येल, वॉशिंग्टन, शिकागो, इलिनॉय, सेंट लूइस इ. विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय पदव्या दिलेल्या आहेत. ते लिंग हॉर्मोनांचे प्रमाणीकरण करण्यासाठी राष्ट्रसंघाने नेमलेल्या समितीचे सदस्य (१९३२ व १९३५) तसेच अमेरिकन सोसायटी ऑफ बायॉलॉजिकल केमिस्ट्स (१९४३–४५), एंडोक्राइन सोसायटी (१९४९–५०) व सोसायटी फॉर एक्सपिरिमेंटल बायॉलॉजी अँड मेडिसीन (१९४९–५१) या संस्थांचे प्रमुख होते. १९३८ मध्ये नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. त्यांच्या सन्मानार्थ सेंट लूइस विद्यापीठाच्या जीवरसायनशास्त्र विभागाला १९५५ मध्ये त्यांचे नाव देण्यात आले. त्यांनी शंभराहून अधिक शास्त्रीय लेख लिहिलेले असून एडगर ॲलन आणि सी. एच्. डॅनफोर्थ यांच्याबरोबर लिहिलेला सेक्स अँड इंटर्नल सिक्रिशन्स (१९३९) हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. 

भालेराव, य. त्र्यं.