हॉर्सली, सर व्हिक्टर अलेक्झांडर हेडन :(१४ एप्रिल १८५७–१६ जुलै १९१६). ब्रिटिश शरीरक्रियावैज्ञानिक आणि मेंदू शल्यविशारद. त्यांनी सर्वप्रथम १८८७ मध्ये मेरुरज्जूतील अर्बुद (गाठ) शस्त्रक्रिया करून काढले. तसेच त्यांनी अवटू ग्रंथींच्या कार्याविषयी मौलिक संशोधन केले. त्यांनी ⇨अलर्क रोगाला (रेबीझ पिसाळलेले कुत्रे चावल्यावर होणाऱ्या आजाराला) प्रतिबंधक इलाज शोधले आणि मेंदूच्या विशिष्ट भागांच्या कार्याबाबतचे विशेष संशोधन केले. 

 

माकडांतील अवटू ग्रंथी काढून टाकून (१८८३) त्यांचा शरीराची वाढ, विकास व चयापचय (शरीरात सतत घडणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडी) यांतील सहभाग आणि अवटू ग्रंथींतील बिघाडामुळे होणारा ‘मिक्सीडीमा’ (कोरडी व चकाकीयुक्त सूज हे लक्षण असलेला आजार) तसेच ⇨क्रेटिनिझम (जन्मतःच असलेली गतिमंदता वा खुजेपणाची विकृती) यांविषयी हॉर्सली यांनी संशोधन केले. ⇨ (लूई) ल्वी पाश्चर यांनी तयार केलेल्या रेबीझ लशीचा प्रभावीपणा व उपयुक्तता तपासण्याकामी शासकीय आयोगाचे सचिव म्हणून हॉर्सली यांची नियुक्ती झालेली होती (१८८६). हॉर्सली यांनी पाश्चर यांच्या लशीच्या परिणामकारकतेची पुष्टी केली. त्यामुळे इंग्लंडमध्ये या रोगाच्या निर्मूलनार्थ मोहिम राबविली गेली. हॉर्सली यांनी शल्यक्रियेबाबतचे तंत्र विकसित केले. त्यामुळे मेंदूची शस्त्रक्रिया हे एक व्यवहारी वास्तव बनले. त्यांनी १८९० पर्यंत अशा ४४ यशस्वी शस्त्रक्रिया केल्या. १९०२ मध्ये त्यांना ‘सर’ या पदवीने सन्मानित करण्यात आले. 

 

पहिल्या महायुद्धात अमराह मेसोपोटेमिया (आताचे इराक) येथे ब्रिटिश सैन्यासाठी क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करीत असताना ऊष्माघाताने हॉर्सली यांचे निधन झाले. 

 कानिटकर, बा. मो.