पार्किनसन लक्षणसमूह व पार्किनसन रोग : गतिन्यूनत्व, ताठरता आणि कंप ही लक्षणे असलेल्या मेंदूतील अधोमस्तिष्क गुच्छिकांच्या विकृतीमुळे उद‌्भवणाऱ्या लक्षणसमूहाला पार्किनस लक्षणसमूह असे नाव जेम्स पार्किनसन नावाच्या इंग्रज वैद्यांच्या नावावरून देण्यात आले आहे. हा लक्षणसमूह पुढील कारणांमुळे किंवा विकृतींतही आढळतो. (१) ⇨ कंपवात (२) मस्तिष्कशोथ-पश्चात [⇨ तंत्रिका तंत्र] (३) रोहिणीविलेपी विकारजन्य (मेंदूतील रोहिण्यांना होणाऱ्या ज्या विकृतीमुळे रक्तपुरवठ्यात व्यत्यय येतो) (४) विषजन्य : (अ) फिनोथायाझोन गटातील औषधांचा विषारी परिणाम, (आ) विल्सन रोग नावाच्या (एस्.ए.के. विल्सन या शास्त्रज्ञांच्या नावावरून ओळखण्यात येणाऱ्या) विकृतीत अधोमस्तिष्क गुच्छिकांमध्ये तांबे साचून होणारा दुष्परिणाम, (इ) मँगॅनीज, पारा आणि कार्बन मोनॉक्साइड यांची विषबाधा (५) इतर गौण कारणे : आघात, उपदंश आणि मस्तिष्क-अर्बुद (नवीन पेशींच्या अत्याधिक वाढीमुळे उत्पन्न होणारी मेंदूतील गाठ). 

वरीलपैकी कंपवाताला पार्किनसन रोग किंवा सकंप पक्षाघात अशी दुसरी नावे असून त्याची सविस्तर माहिती ‘कंपवात’ या नोंदीत दिली आहे.

भालेराव, यं.त्र्यं.