वराहमिहिर : (सु. ४९० ते ५८७). ज्योतिषशास्त्राच्या अनेक शाखांवर ग्रंथलेखन करणारे प्रसिद्ध भारतीय गणिती व ज्योतिषी. यांचे व्यक्तिज्योतिष, स्थान ज्योतिष व गणित असे स्वतंत्र ग्रंथ आहेत.

वराहमिहिर दीर्घकाल उज्जैनमध्ये रहात होते. त्यांचे वडील आदित्यदास यांच्याकडून ज्योतिषशास्त्राचे प्राथमिक ज्ञान वराहमिहिरांस मिळाले. इसवी सनाच्या सुरुवातीस इराणी वंशाचे जे लोक भारतात आले यांमध्ये त्यांचे पूर्वज असावेत व आपली सूर्योपासना त्यांनी चालू ठेवली. त्यांच्या नावातील मिहिर (सूर्य) व वडिलांच्या नावातील आदित्य हे शब्द त्या दृष्टीने सूचक वाटतात. पाश्चिमात्य ज्योतिषशास्त्राचा त्यांनी अभ्यास केला. त्यांचा फलज्योतिषावर व शकुनावर फार विश्वास होता. 

त्या वेळी फलज्योतिष व खगोलशास्त्र यांसंबंधी जेवढे ज्ञान होते ते सर्व त्यांच्या ग्रंथांतून आले आहे. त्यांनी रचिलेले ग्रंथ व त्यांचे स्वरूप असे आहे. 

पंचसिद्धांतिका : ग्रंथात पौलिश, रोमक, वसिष्ठ, सौर व पैतामह अशा पाच प्राचीन सिद्धांतांचा सांरांश दिला आहे. यांतील कोणताही सिद्धांत त्यांचा स्वतःचा नाही. यामध्ये सूर्यसिद्धान्तोक्त मध्यम ग्रहास स्वतःचा बीज संस्कार सांगितला आहे. पाच सिद्धांतांपैकी ज्या गोष्टी अनुभवास येतात व ज्या सामान्य रीती उपपत्तीस अनुसरून शुद्ध आहेत असे दिसून आले त्या या ग्रंथांत दिल्या आहेत. देशांतर, छायासाधन, ग्रहण, छेद्यक यांसंबंधीच्या स्वतःच्या रीतींचा सर्व ग्रहांच्या स्थानविषयक गणिताचा समावेश या ग्रंथात केला आहे. हा गणित सुगम करण्याचा करण ग्रंथच आहे. यामध्ये शके ४२७ हे वर्ष आरंभवर्ष मानले असून ते वराहमिहिरांचे जन्मवर्ष आहे की ग्रथारंभ वर्ष आहे, यावर एकमत नाही.

यांतील त्रैलोक्य संस्थान नामक तेराव्या अध्यायात विश्वाची रचना आणि अन्य गोष्टी आहेत. पृथ्वीचा गोल अंतरिक्षात अधांतरी फिरत आहे, हे वराहमिहिरांना माहीत होते. १४ व्या अध्यायात काही यंत्रांचे वर्णन व काही रीतींची माहिती दिलेली आहे. वराहमिहिरांनी प्रथम करण ग्रंथ केला पण पुढे त्यांचे लक्ष फलज्योतिष व नाना प्रकारचे सृष्टिचमत्कार, पदार्थांचे गुणधर्म व त्यांचा व्यवहारात उपयोग यांकडे गेले. भास्काराचार्यांनी त्यांची स्तुती केली आहे व आपल्या अनेक ग्रंथांत वराहमिहिरांची वचने आधारास घेतली आहेत.

बृहत्संहिता : हा त्यांचा दुसरा ग्रंथ छंदोबद्ध असून त्यांची भाषा काव्यमय आहे. यात सूर्य, चंद्र आणि ग्रह यांच्या गती व त्यांची फले त्याचप्रमाणे अगस्ती, सप्तर्षी यांच्या उदयकालाची फले व ग्रहणे इ. ज्योतिषशास्त्रीय माहिती विस्ताराने दिली आहे. यांशिवाय भरतखंडाच्या निरनिराळ्या विभागांवरील भिन्न भिन्न नक्षत्रांचे आधिपत्य, नक्षत्रव्यूह, ग्रहांची युद्धे व समागम फले, वर्षफल, रवीजवळील नक्षत्राची फले, पर्जन्यगर्भ लक्षण, गर्भधारणा वर्षण, पर्जन्यवृष्टिमान व पर्जन्य मापण्याची रीत, नक्षत्रांच्या चंद्राशी होणाऱ्या योगाची फले, संध्यासमयीचा रक्तिमा, भूकंप, उल्का, खळे, इंद्रधनुष्य इ. सृष्टिचमत्कारांची चर्चा, पक्ष्यांच्या दर्शनांचे फल, दिव्य अंतरिक्ष व भौम या उत्पादनांचे वर्णन, गृहरचना, भूमिजलाचा शोध, चुना तयार करण्याची रीत, देवप्रतिमानिर्मिती, रत्नपरीक्षा, दीप लक्षण, दंतधावन, शकुन, तिथिनक्षत्रकरण यांची फले व गोचर ग्रहांची फले अशा विविध प्रकारच्या विषयांची चर्चा निरनिराळ्या अध्यायांत आली आहे. यांव्यतिरिक्त समास संहिता, वट कणिका, बृहज्जातक, लघुजातक, बृहद् यात्रा, योग यात्रा, टिकणिका यात्राविवाह पटल हे त्यांचे इतर ग्रंथ आहेत. लघुजातक हे बृहज्जातकाचे संक्षिप्त रूप असून दोन्ही जातकग्रंथ आजही ज्योतिषांमध्ये प्रचारात आहेत व कित्येक भारतीय भाषांत त्यांची भाषांतरे झालेली आहेत. जे. एच्. केर्न यांनी बृहत्संहितेचे इंग्रजीत व अल् बीरूनी यांनी लघुजातकाचे अरबी भाषेत भाषांतर केले आहे.

वराहमिहिरांच्या ग्रंथांवरील अनेक टीकांपैकी यात्रा, बृहज्जातक, लघुजातक आणि बृहत्संहिता या ग्रंथांवरील भटोत्पल यांच्या टीका प्रसिद्ध आहेत. 

वराहमिहिरांचा मुलगा पृथुयश यांनी षट्पंचाशिका हा ग्रंथ लिहिला आहे. 

नेने, य. रा. पंत, मा. भ.