ब्रॅडफर्ड-१ : ग्रेट ब्रिटनच्या वेस्ट यॉर्कशर महानगरीय परगण्यातील शहर. लोकसंख्या ४,६३,१०० (१९७८ अंदाज). हे लिड्सच्या पश्चिमेस १५ किमी. एअर नदीच्या ब्रॅडफर्ड बेक या लहानशा प्रवाहावर वसलेले असून ते लोकरी कापडाच्या उद्योग-व्यापारासाठी विशेष प्रसिद्ध आहे.

मध्ययुगापासून लोकर उद्योगासाठी अग्रगण्य असलेल्या या शहराचा जुना उल्लेख १०६६ मधील आहे. दे लेसी या घराण्याच्या अंमलाखाली (१०८६-१३११) एक बाजारपेठ म्हणून ते नावारूपास आले. अनुकूल हवामानामुळे येथे कापड उद्योगाचा झपाट्याने विकास घडून आला. कृत्रिम तंतुकापडही येथे तयार होते. येथील लोकर विनिमय केंद्रामार्फत दक्षिण अमेरिका व ऑस्ट्रेलिया यांच्याशी लोकरी कापडाचा व्यापार चालतो. येथे अवजड उद्योगांपैकी विद्युत विलेपन, विद्युत्-साहित्य, यंत्रसामग्री, मोटारी, रसायने, खाणकामसाहित्य, इत्यादींचाही विकास झालेला आहे. यंत्रमागाचा जनक एडमंड कार्टराइट याचे स्मारक भवन, सेंट पीटर चर्च (१४५८), अनन्यसाधारण मानली जाणारी कापडतपासणी संस्था, या येथील वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी होत. येथे ब्रॅडफर्ड विद्यापीठ असून कलावीथी, वस्तुसंग्रहालय, लिस्टर उद्यान या इतर उल्लेखनीय बाबी होत. प्रसिद्ध कादंबरीकार, नाटककार व समीक्षक जे. बी. प्रीस्टली (१८९४-) आणि संगीतिका रचनाकार फ्रेडरिक डेलियस (१८६२-१९३४) यांचे ब्रॅडफर्ड हे जन्मग्राम होय.

गाडे, ना. स.