ब्लुमबर्ग, बारूक सॅम्युएल : (२८ जुलै १९२५ – ). अमेरिकन वैद्य आणि जीवरसायनशास्त्र.⇨ यकृतशोथाला (यकृताच्या दाहयुक्त सुजेला) कारणीभूत होणाऱ्या व्हायरसासंबंधी ब्लुमबर्ग यांनी केलेल्या कार्याचे महत्व लक्षात घेऊन त्यांना आणि अमेरिकन बालरोगतज्ञ व व्हायरसशास्त्र डॅनिएल कार्लटन गजडुसेक यांना सांसर्गिक रोगांचे उद्गम व प्रसार यांच्या नवीन यंत्रणेसंबंधीच्या शोधाकरिता १९७६ व शरीरक्रियाविज्ञान वा वैद्यक विषयाचे नोबेल पारितोषिक विभागून मिळाले.

ब्लुमबर्ग यांचा जन्म न्यूयॉर्क येथे झाला. १९४३ – ४६ मध्ये त्यांनी अमेरिकन नौदलात काम केले. स्कनेक्टाडी येथील युनियन कॉलेजातून १९४६ मध्ये त्यांनी बी. एस्. पदवी मिळविली. कोलंबिया विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ फिजिशिअन्स अँड सर्जन्स या संस्थेत शिक्षण घेऊन १९५१ मध्ये त्यांनी एम्. डी. पदवी मिळविली. नंतर १९५५ – ५७ मध्ये ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या जीवविज्ञान विभागात काम करून त्यांनी जीवरसायनशास्त्राची पीएच्. डी. १९५७ मध्ये संपादन केली. १९५१ – ५७ मध्ये त्यांनी न्यूयॉर्क येथील बेल्व्ह्यू रुग्णालयात निवासी वैद्य म्हणून काम केले. १९५३ – ५५ मध्ये ते न्यूयॉर्कच्या प्रेसबिटीरीअन रुग्णालयात वैद्यकाचे अधिछात्र होते. त्यानंतर १९५७ – ६४ मध्ये ते बेथेस्डा (मेरिलँड) येथील नॅशनल ऑफ हेल्थ या संस्थेच्या भौगोलिक वैद्यक व आनुवंशिकी विभागाचे प्रमुख होते. १९६४ पासून ते फिलाडेल्फियातील इन्स्टिट्यूट फॉर कॅन्सर रिसर्च या संस्थेच्या उपरुग्ण संशोधनाचे सहयोगी संचालक म्हणून काम करू लागले. १९७७ मध्ये त्यांची पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात वैद्यक व मानवशास्त्र या विषयांच्या प्राध्यापकपदावर नेमणूक झाली.

ब्लुमबर्ग यांनी अमेरिका, आफ्रिका, भारत, उत्तर ध्रुव प्रदेश आणि पॅसिफिकमधील बेटांवर राहून काही वांशिक गटांतील लोकांनाच विशिष्ट रोग का उद्भवतात आणि इतरांना ते रोग का होत नाहीत याचा अभ्यास केला. हजारो व्यक्तींच्या रक्तरसाचा अभ्यास करीत असताना त्यांना ऑस्ट्रेलियन आदिवासींच्या रक्तरसात एक विशिष्ट प्रथिन आढळले. या प्रथिनाला त्यांनी ‘ऑस्ट्रेलियन प्रतिजन’ हे नाव दिले. प्राणी शरीरात प्रवेश केल्यानंतर जो पदार्थ विशिष्ट प्रतिरक्षात्मक  प्रतिकार करून शरीराचे रक्षण करण्याची प्रतिक्रिया उत्पन्न करतो त्याला प्रतिजन म्हणतात. याच प्रतिजनाला पुढे ‘यकृतशोथ बी पृष्ठीय प्रतिजन’ (हेपॅटायटीस बी सरफेस अँटिजेन) असे व इंग्रजीत संक्षिप्त रूपाने HB5Ag असे म्हणू लागले. ज्या विशिष्ट व्हायरसामुळे यकृतशोथ उत्पन्न होतो त्या ‘बी’ व्हायरसाचा हे प्रथिन भाग असल्याचे ब्लुमबर्ग यांना समजले. या व्हायरसामुळे उद्भवणारी विकृती गंभीर स्वरूपाची असून तिच्या चिरकारी (दीर्घकालीन) प्रकारातून पुढे यकृत कर्क उत्पन्न होण्याची शक्यता असते.

ब्लुमबर्ग यांच्या शोधामुळे यकृतशोथ बी या विकृतीच्या निदानाकरिता विशेष परीक्षा उपयोगात आणली गेली. या परीक्षेमुळे रक्ताधानापासून (रुग्णाला रक्त देण्याच्या क्रियेतून) उद्भवणारा व्हायरससंसर्गाचा संभाव्य धोका टाळणे शक्य झाले आहे आणि ती बहुतेक सर्व रक्तपेढ्यांतून नित्यक्रमाने वापरात आहे. लक्षणविरहित रोगवाहक ओळखण्यात ही परीक्षा बहुमोल असते. स्कॉटलंडमध्ये ८०० रक्तदात्यांमध्ये १ रक्तदाता रोगवाहक आढळला आहे. अमेरिकेत १०० रक्ताधानांमागे १ या प्रमाणात यकृतशोथ बी होण्याची शक्यता आढळली असून जपानात वाहून अधिक प्रमाण आढळले आहे. या शोथामुळे प्रायोगिक यकृतशोथ लस बनविता आली.

नोबेल पारितोषिकाखेरीज त्यांना मेडिकल सोसायटी ऑफ न्यूयॉर्क या संस्थेचा बर्नस्टाइन पुरस्कार (१९६९), फ्रायबर्ग विद्यापीठाचे इपिंजर पारितोषिक (१९७३), पॅसानो पुरस्कार (१९७४), कार्ल लँडस्टायनर मेमोरियल पुरस्कार (१९७५) वगरे सन्मान, तसेच पॅरिस विद्यापीठाची व अनेक अमेरिकन संस्थांच्या सन्माननीय पदव्या मिळालेल्या आहेत. त्यांनी २६० पेक्षा जास्त शास्त्रीय लेख लिहिलेले आहेत. ऑस्ट्रेलिया अँटिजेन अँड बायॉलॉजी ऑफ हेपॅटायटीस बी हा त्यांचा ग्रंथ १९७७ मध्ये प्रसिद्ध झाला.   

भालेराव, य. त्र्यं.