पाकट : समुद्रकिनाऱ्याजवळ राहणाऱ्या पण खोल पाण्यातही आढळणाऱ्या या माशाची लांबी ३०–१२० सेंमी. पर्यंत असते आणि त्याचे वजन ४५ किग्रॅ. असते. त्याच्या शरीराच्या दोन्ही बाजूंना मोठे पर असतात त्यामुळे तो लांबीपेक्षा जास्त रूंद दिसतो. शेपटी बारीक असून तिचा उपयोग सुकाणूसारखा होतो. तो कोळंबी, खेकडे, शेवंडे, मृदुकाय प्राणी व इतर मासे खातो. तो उपसागरांच्या किंवा खोल समुद्राच्या किनाऱ्यांवर रेताड व चिखलयुक्त तळावर अंडी घालतो चोकोनी चामड्यासारख्या पिशवीत अंडी घातलेली असतात. पिशवीच्या चारी कोपऱ्यांना वाकडे तनावे असतात. अशा पिशव्या वादळाने किनाऱ्यावर येतात, त्यांना ‘मरमेड पर्स’ म्हणतात.

सामान्य पाकटाचे शास्त्रीय नाव राजा एरिनॅसिया  असून त्याचा समावेश राजिडी मत्सकुलात करतात. तो उत्तर अमेरिकेच्या अटलांटिक किनाऱ्यावर आढळतो. तो ६० सेंमी. लांब असतो. 

वाहत्या पाकटाचे शास्त्रीय नाव डॅसिॲटिस (हिमँच्युरा) युअर्नक  असून त्याचा समावेश डॅसिॲटिस मत्स्यकुलात होतो. तो प. बंगाल व ओरिसाच्या किनाऱ्यालगत आणि दक्षिणेस मद्रासपर्यंत आढळतो. तो चिल्का सरोवरातही आढळतो. याची पिले समुद्रात जातात. त्याची रुंदी १·५ सेंमी. असते. त्याच्या यकृतापासून ३३–३८% तेल मिळते. गोवाल पाकटाचे शास्त्रीय नाव डॅसिॲटिस (पॅस्टिनॅकस) सेफेन असून तोही डॅसिॲटिडी मत्स्यकुलातील आहे. ही जाती भारतात अगदी सर्रास आढळतो. पावसाळी हंगामात सर्व पश्चिम किनाऱ्यावर तो आढळतो. त्याची रुंदी १·८ मी. पर्यंत असते. कारवार पावसाळी किनाऱ्यावर सामान्यतः १·२ मी. व्यासाचे मासे सापडतात. याचे मांस खातात. कातडी चिवट व कठीण असून तिचा उपयोग लाकडाला पॉलिश (झिलई) करण्यासाठी करतात. छातीच्या भागावरील पर वाळवून चीनला निर्यात करतात. 

पहा : रे मासे.  

जमदाडे, ज. वि.