लोबाचेव्हस्की, न्यिकली, इव्हानव्ह्यिच : (२ डिसेंबर १७९२-२४ फेब्रुवारी १८५६). रशियन गणितज्ञ.यानोश वोल्यॉई या हंगेरियन गणितज्ञांबरोबर लोबाचेव्हस्की हे अयूक्लिडीय भूमितीचे [⟶भूमिति] जनक समजले जातात.

लोबाचेव्हस्की यांचा जन्म निझ्नि नॉव्हगोरॉड (आता गॉर्की) येथे झाला. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी कझॅन विद्यापीठात विद्यार्थी म्हणून प्रवेश केला व नंतर त्यांचे संपूर्ण आयुष्यच या विद्यापीठात केंद्रीभूत झाले. १८११ मध्ये त्यांनी भौतिकी व गणित विषयांतील एम्.ए. पदवी मिळविली. त्याच विद्यापीठात ते १८१४ मध्ये साहाय्यक प्राध्यापक व १८२२ मध्ये प्राध्यापक झाले. त्याच वर्षी ते विद्यापीठाच्या नवीन इमारतींच्या बांधकामाच्या देखरेखीसाठी स्थापन केलेल्या समितीचे सदस्य झाले व या समितीचे १८२५ मध्ये अध्यक्षही झाले. त्यांनी भौतिकी व गणित विभागाचे दोनदा अधिष्ठाते (१८२० -२१ आणि १८२३-२५), विद्यापीठाचे ग्रंथपाल (१८२५-३५), संग्रहालयाचे अभिरक्षक (१८२५-२७), विद्यापीठाचे कुलमंत्री (१८२७-४६) व कझॅन शिक्षण क्षेत्राचे साहाय्यक विश्वस्त (१८४६-५५) अशा विविध प्रशासकीय पदांवर काम केले. या सर्व पदांवर काम करीत असताना त्यांचे संघटन व शैक्षणिक कौशल्य प्रकर्षाने दिसून आले आणि त्यांनी विद्यापीठात झार पहिले अलेक्झांडर यांच्या धोरणांचा पाठपुरावा करणाऱ्या प्रशासनामुळे निर्माण झालेल्या गोंधळाच्या परिस्थितीतून विद्यापीठाचे सोडवणूक केली. १८२६ मध्ये पहिले निकोलस यांची कारकीर्द सुरू झाल्यावर परिस्थिती सुधारली आणि लोबाचेव्हस्की यांनी विद्यापीठात नवीन मार्ग अनुसरण्यात पुढाकार घेतला. त्यांनी विद्यापीठीय दर्जा व विविध विद्याशाखांतील सुसंवाद पूर्ववत स्थितीत आणला. १८३० मधील पटकीच्या साथीच्या वेळी लोकांचे प्राण वाचविण्यात, १८४२ मध्ये विद्यापीठाच्या इमारतींना लागलेल्या विध्वंसक आगीनंतर त्यांच्या पुनर्बांधणीत, कझॅन प्रदेशात विज्ञान लोकप्रिय करण्यात आणि तेथील प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचे आधुनिकीकरण करण्यात त्यांनी महत्त्वाची कामगिरी केली. प्रशासकीय व अध्यापन कार्याच्या मोठ्या भाराखेरीज या कार्यात व्यग्र असूनही त्यांनी व्यापक गणितीय संशोधनासाठी वेळ काढला, हे उल्लेखनीय आहे.

लोबाचेव्हस्की यांनी आपले पहिले मोठे गणितीय कार्य Geometriaया शीर्षकाखाली १८२३   मध्ये लिहिले पण ते १९० ९ पर्यंत मूळ स्वरूपात प्रसिद्ध झाले नाही. तथापि त्यातील मूलभूत भूमितीय परिशीलनामुळेच त्यांना त्यांच्या प्रमुख म्हणजे अयूक्लिडीय भूमितीच्या शोधाप्रत नेले. त्यांनी १८२६ मध्ये अयूक्लिडीय भूमितीसंबंधीचा आपला सिद्धांत जाहीर केला व १८२९ मध्ये तो प्रसिद्ध केला. ही भूमिती यूक्लिड यांच्या समांतर रेषासंबंधीच्या गृहीतकावर आधारलेली नव्हती. या गृहीतकानुसार प्रतलातील एखाद्या रेषेला त्या प्रतलातील त्या रेषेबाहेरील बिंदूपासून एक व एकच रेषा समांतर काढता येते. अयूक्लिडीय भूमिती तार्किक दृष्ट्या शक्य असल्याचे दाखवितानाच लोबाचेव्हस्की यांनी यूक्लिड यांचे समांतर गृहीतक त्यांच्या इतर गृहीतकांवरून निगमित करता येत नाही, असेही दाखवून दिले. लोबाचेव्हस्की यांच्या शोधाला बोल्यॉई यांच्या १८३२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या कार्यामुळे दुजोरा मिळाला व २,०००  वर्षे गणितज्ञांना गोंधळात पाडणाऱ्या समस्येचे अंतिम उत्तर मिळाले. मात्र बोल्यॉई यांना लोबाचेव्हस्की यांच्या कार्याची माहिती पुढे १८४८ मध्ये समजली. त्यामुळे पूर्व-प्रकाशनाच्या निकषावर लोबाचेव्हस्की यांना अयूक्लिडीय भूमितीच्या शोधाचे श्रेय सामान्यतः  देण्यात येते.

भूमितीखेरीज लोबाचेव्हस्की यांनी अनंत श्रेढीचा [विशेषतःत्रिकोणमितीय श्रेढीचा ⟶ श्रेढी] सिद्धांत, समाकलन [⟶ अवकलन व समाकलन] व संभाव्यता या विषयांत उल्लेखनीय कार्य केले. बीजगणितात त्यांनी १८३४ मध्ये बैजिक समीकरणांच्या मूळांच्या मूल्यांच्या आसन्नीकरणाची (खऱ्या मूल्याच्या जवळात जवळचे मूल्य काढण्याची) एक पद्धत शोधून काढली परंतु हीच पद्धत स्वीस गणितज्ञ सी.एच्.ग्रेअफे यांनी १८३७ मध्ये शोधून काढल्यावर त्यांच्याच नावाने पुष्कळदा ओळखली जाते.

बोल्यॉई यांच्याप्रमाणे लोबाचेव्हस्की यांनाही त्यांच्या कार्याबद्दल मरणोत्तर कीर्ती लाभली. त्यांच्या आयुष्यभरात त्यांच्या भूमितीचा फारच थोड्या गणितज्ञांवर प्रभाव पडला. त्या काळचे अग्रणी रशियन गणितज्ञ आणि पश्चिम यूरोपातही ख्यातनाम असलेले एम्.व्ही. ऑस्ट्रोग्राडस्की यांनाही लोबाचेव्हस्की यांच्या भूमितीचे आकलन होऊ शकले नाही. याखेरीज त्यांचे कार्य प्रथमतः परदेशी फारशा माहीत नसलेल्या स्थानिक सर्वसाधारण नियतकालिकात १८२९ मध्ये व पुढे कझॅन विद्यापीठाच्या Uchenge Zapiski (वैज्ञानिक संस्मरणिका) या विद्याविषयक कामाच्या अहवालात १८३५-३९ मध्ये प्रसिद्ध झाले होते परंतु बोल्यॉई यांच्याप्रमाणे निराश न होता लोबाचेव्हस्की यांनी आपल्या कल्पना रशियन भाषेबरोबरच जर्मन व फ्रेंच भाषांतही आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चिकाटीने प्रसिद्ध करणे चालू ठेवले. १८३७ मध्ये Geometrie Imaginaire (इं.भा. इमॅजिनरी जिऑमेट्री) हा त्यांचा लेख क्रेलेज जर्नलमध्ये फ्रेंच भाषेत प्रसिद्ध झाला. १८४०  साली Geometrische Untersuchungen Zur Theorie der paralle llinien हा त्यांचा ग्रंथ बर्लिन येथे प्रसिद्ध झाला (याच्या जी.बी. हॉलस्टेड यांनी केलेल्या जिऑमेट्रिकल रिसर्चेस ऑन द थिअरी ऑफ पॅरलल्स या इंग्रजी भाषांतराची नवी आवृत्ती १९१४ मध्ये प्रसिद्ध झाली). या ग्रंथाच्या प्रसिद्धीनंतर जर्मन गणितज्ञ सी.एफ.गौस यांनी केलेल्या शिफारशीमुळे लोबाचेव्हस्की यांची १८४२ मध्ये गटिंगेन रॉयल सोसायटीचे परदेशी सदस्य म्हणून निवड झाली. गौस हेही अयूक्लिडीय भूमितीबाबतच्या त्याच निष्कर्षाप्रत पोचले होते. पण त्यांनी ते कधीही प्रसिद्ध केले नाहीत.

आयुष्याच्या अखेरीस लोबाचेव्हस्की यांना अंधत्वाने व घरगुती अडचणींनी ग्रासले. या परिस्थितीतही त्यांनी १८५५ मध्ये आपला सिद्धांत पुन्हा फ्रेंचमध्ये Pangeometrieया ग्रंथाद्वारे मांडला. हा ग्रंथ रशियनमध्येही कझॅन येथे प्रसिद्ध झाला (१८५५-५६) परंतु जी.एफ्. बी. रीमान यांनी १८६६ मध्ये मांडलेल्या भूमितीच्या मूलभूत कल्पनांच्या प्रभावामुळे इटालियन गणितज्ञ एऊजान्यो बेल्ट्रामी यांनी १४६८ मध्ये व जर्मन गणितज्ञ फेलिक्स क्लाइन यांनी १८७१ मध्ये अयूक्लिडीय भूमितीची सुसंगता व व्यापक अनुप्रयोज्यता दाखवून देईपर्यंत या भूमितीचा सर्वसाधारण स्वीकार होण्यास विलंब लागला. पुढे विसाव्या शतकात सापेक्षता सिद्धांत व पुंज भौतिकी या विषयांतही लोबाचेव्हस्की भूमितीचा उपयोग करण्यात आला. लोबाचेव्हस्की कझॅन येथे मृत्यू पावले.

ओक,स. ज. भदे,व.ग.