त्यूरे, ग्यूस्ताव्ह आदॉल्फ : (२३ मे १८१७–२० मे १८७५). फ्रेंच वनस्पतिशास्रज्ञ. शैवलांतील [⟶ शैवले]  प्रजोत्पादनावरील कार्याबद्दल विशेष प्रसिद्ध. त्यांचा जन्म व शिक्षण पॅरिस येथेच झाले. १८३८ मध्ये त्यांनी कायद्याची पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी शैवलशास्रज्ञ झोझेफ दकेन यांच्या मार्गदर्शनाखाली अध्ययन केले. १८४० मध्ये त्यूरे फ्रेंच राजदूत म्हणून कान्स्टँटिनोपलला गेले. तेथून फ्रान्सला परत आल्यावर त्यांनी सरकारी नोकरी सोडून दिली व वनस्पतिविज्ञानाच्या संशोधनास वाहून घेतले. त्यांनी आपल्या पहिल्या निबंधात (१८४०) कारा या हिरव्या शैवलातील रेतुकाच्या (पुं–जनन पेशीच्या) कशाभिकांचे (पेशीला असणाऱ्या चाबकाच्या दोरीसारख्या वा दोऱ्यासारख्या संरचनांचे, फ्लॅजेलांचे) सविस्तर वर्णन केले. १८४४ मध्ये नॉर्मंडीच्या किनाऱ्याच्या सफरीवरून परत आल्यावर त्यूरे व दकेन यांनी फ्यूकस या तपकिरी शैवलातील रेतुकाचा शोध ॲकॅडेमी डेस सायन्सेसला सादर केला. एक लाल कण आणि एक पुढे व दुसरी मागे वळलेल्या अशा दोन असमान कशाभिकांचे त्यांनी वर्णन केले. शैवलातील प्रजोत्पादनावरील निबंध स्पर्धेत त्यांना ॲकॅडेमी डेस सायन्सेसचे पहिले बक्षीस मिळाले. फ्यूकसमधील फलन व संकरण यांविषयीची माहिती त्यूरे यांनी १८५४ मध्ये प्रसिद्ध केली.

त्यूरे यांनी एद्‌वार बॉर्ने यांच्या सहकार्याने फ्लोरिडी या लाल शैवलांच्या गटाचे जटिल (गुंतागुंतीचे) जीवनवृत्त १८६७ मध्ये निश्चित केले. १८५७ मध्ये ॲकॅडेमी डेस सायन्सेसचे ते सभासद झाले. Notes algologiques (१८७६–८०) आणि Etudes Phycologiques (१८७८) हे त्यांचे दोन ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर बॉर्ने यांनी प्रसिद्ध केले. १८५७ पर्यंतचा सर्व काळ त्यांनी फ्रान्सच्या अटलांटिक किनाऱ्यावरील शैवलांचा अभ्यास करण्यात घालविला परंतु चेरबर्ग येथील हवापाणी न मानवल्यामुळे १८५७ मध्ये ते अँटिबीस येथे येऊन राहिले. तेथे त्यांनी आपल्या घराभोवती उत्तम वनस्पतिशास्त्रीय उद्यान तयार केले. ते नीस येथे मृत्यू पावले.

जमदाडे, ज. वि.