प्यूपिन (पूपीन), मायकेल इडव्होरस्की : (४ ऑक्टोबर १८५८—१२ मार्च १९३५). अमेरिकन भौतिकीविज्ञ. दूरध्वनी व तारायंत्र यांसारख्या वाहक तारांच्या द्वारे होणाऱ्या दूरांतरीय संदेशवहनात उपयुक्त असणाऱ्या मूलभूत प्रयुक्तींच्या शोधाकरिता विशेष प्रसिद्ध. त्यांचा जन्म हंगेरीतील (आता यूगोस्लाव्हियातील) इडव्होर (बानात) येथे झाला. इडव्होर व पान्चेव्हॉ येथे प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर १८७४ मध्ये ते एकटेच अमेरिकेला गेले. तेथे शेतावर व कारखान्यांत काही काळ काम केल्यावर त्यांना १८७९ मध्ये कोलंबिया विद्यापीठात प्रवेश मिळाला व १८८३ मध्ये त्यांनी पदवी संपादन केली. त्यांना १८८६—८८ या काळात जॉन टिंड्ल अधिछात्रवृत्ती मिळाली. नंतर त्यांनी केंब्रिज विद्यापीठात भौतिकी व गणित या विषयांचा अभ्यास केला आणि पुढे बर्लिन विद्यापीठात हेर्मान फोन हेल्महोल्ट्स यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करून १८८९ मध्ये पीएच्.डी. पदवी मिळविली. त्यानंतर १८९० मध्ये ते कोलंबिया विद्यापीठात नवीनच सुरू करण्यात आलेल्या विद्युत् अभियांत्रिकी विभागात गणितीय भौतिकीचे अध्यापक झाले. १९०१ साली विद्युत् यांत्रिकीचे (विद्युत् प्रेरणा व त्यामुळे निर्माण होणारी गती यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राचे) प्राध्यापक व पुढे १९१७ मध्ये फीनिक्स रिसर्च लॅबोरेटरीचे संचालक म्हणून त्यांची नेमणूक झाली. १९३१ मध्ये ते सेवानिवृत्त झाले.

दूरध्वनीच्या वाहक तारांमध्ये अगोदर निश्चित केलेल्या अंतरावर प्रवर्तक वेटोळ्यांची योजना करून प्यूपिन यांनी दूरांतरीय दूरध्वनीचा पल्ला (विशेषतः दूरध्वनी केबलींवर) पुष्कळच वाढविण्यात यश मिळविले [→ दूरध्वनिविद्या]. १९०१ मध्ये बेल टेलिफोन कंपनीने व जर्मनीतील दूरध्वनी व्यावसायिकांनी या शोधाचे एकस्व (पेटंट) घेतले. विद्युत् तरंगांचे प्रसारण, विद्युत् अनुस्पंदन [→ अनुस्पंदन] आणि बहुदली तारायंत्रविद्या [→ तारायंत्रविद्या] यांसंबंधीही त्यांनी महत्त्वाचे शोध लावले. १८९६ मध्ये त्यांनी द्वितीयक क्ष-किरणांचा (प्राथमिक क्ष-किरण व त्यांचे शोषण करणारे माध्यम यांच्यात परस्परक्रिया होऊन निर्माण होणाऱ्या क्ष-किरणांचा) शोध लावला. त्याच वर्षी त्यांनी अनुस्फुरक (ज्यावर क्ष-किरणांसारखे किरण टाकले असताना ज्यापासून दृश्य प्रकाशाचे उत्सर्जन होते अशा) पडद्याचा उपयोग करून अल्प उद्‌भासनाने (प्रकाशनाने) क्ष-किरण छायाचित्रण करण्याची पद्धत शोधून काढली. त्यांनी प्रारंभीच्या रेडिओ प्रेषकांचा अभिकल्प (आराखडा) व विद्युत् जाल सिद्धांत यांसंबंधीही संशोधन केले होते.

सर्बीयाचे (प्यूपिन यांची मातृभूमि व त्या काळातील यूरोपातील एक संस्थान) सन्माननीय दूत म्हणून प्यूपिन यांची न्यूयॉर्क येथे नेमणूक झाली. पहिल्या महायुद्धानंतर १९१९ साली पॅरिस येथे झालेल्या शांतता परिषदेत यूगोस्लाव्हियाच्या प्रतिनिधी मंडळाचे ते सल्लागार होते. त्यांनी लिहिलेल्या इमिग्रंट टू इन्व्हेंटर या आत्मचरित्रात्मक व लोकप्रिय ठरलेल्या ग्रंथाला १९२४ मध्ये पुलिट्झर परितोषिक मिळाले. ते अमेरिकेच्या नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सदस्य होते. कोलंबिया विद्यापीठाच्या भौतिकी प्रयोगशाळेला त्यांचे नाव देण्यात आले आहे. ते न्यूयॉर्क येथे मृत्यू पावले.

भदे, व. ग.