हिंमतनगर (अहमद नगर) वालुकाश्म : हा भारतातील एक शैलसमूह आहे. हा शैलसमूह राजस्थानातील पूर्वीच्या ईडर संस्थानातील हिंमतनगर (अहमदनगर) लगत आढळत असल्याने, त्याला सी. एस्. मिड्लमिस यांनी हे नाव दिले आहे. या शैलसमूहाचे थर जवळ-जवळ आडवे असून यांमध्ये गुलाबी, लाल व तपकिरी रंगांचे वालुकाश्म, तसेच काही पिंडाश्म व शेल हे खडक आहेत. या खडकांमध्ये वाइक्सेलिया व मॅटोनिडियम या निर्वंश झालेल्या नेचांच्या कुलांचे वनस्पतिजीवाश्म ( शिळारूप झालेले अवशेष) आढळतात. या शैलसमूहाचा काळ पूर्व क्रिटेशस (सु. १४ ते १२ कोटी वर्षांपूर्वीचा) आहे. बडोद्यालगतचा सोनगीर वालुकाश्म आणि पश्चिम राजस्थानातील बारमेर वालुकाश्म हे शैलसमूहही याच काळातील आहेत. या तिन्ही शैलसमूहांतील वालुकाश्म बऱ्याच प्रमाणात बांधकामासाठी वापरले जातात. 

केळकर, क. वा.