डुलाँग (ड्यूलाँ), प्येअर ल्वी : (१२ किंवा १३ फेब्रुवारी १७८५–१८ किंवा १९ जुलै १८३८). फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ भौतिकीविज्ञ. वायूंचे गुणधर्म व उष्णता यांसंबंधी महत्त्वाचे कार्य. त्यांचा जन्म र्‌वे येथे झाला. पॅरिस येथील एकोल पॉलिटेक्निकमध्ये त्यांनी काही काळ शिक्षण घेतले. सी. एल्. बर्थेलॉट यांच्या खाजगी प्रयोगशाळेत साहाय्यक म्हणून काम केल्यानंतर ते एकोल नॉर्मल (१८११), आल्फॉर येथील पशुवैद्यकीय शाळा (१८१३) व पॅरिस येथील फॅकल्टी ऑफ सायन्सेस (१८२०) येथे रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. एकोल पॉलिटेक्निक येथे त्यांनी परीक्षक (१८१३–२०) व नंतर भौतिकीचे प्राध्यापक (१८२०–३०) म्हणून काम केले आणि १८३० मध्ये ते या संस्थेचे संचालक झाले.

 त्यांनी १८११ मध्ये नायट्रोजन ट्रायक्लोराइड या स्वयंस्फोटक द्रव्याचा आणि १८१६ मध्ये हायपोफॉस्फोरिक अम्लाचा शोध लावला. जे. जे. बर्झीलियस यांच्याबरोबर त्यांनी पाण्याच्या भारात्मक संघटनेचे (घटकांच्या वजनी प्रमाणेच) मोजमाप केले (१८१९). एफ्. ॲरागो यांच्याबरोबर त्यांनी ठराविक वस्तुमानाच्या वायूवरील दाबाच्या परिणामासंबंधीच्या रॉबर्ट बॉइल यांच्या नियमाचा २७ वातावरण दाबापर्यंत (वातावरणाच्या सर्वसाधारण दाबाच्या २७ पट दाबापर्यंत) पडताळा करून पाहिला. बहुतेक घन पदार्थांच्या बाबतीत अणुभार व विशिष्ट उष्णता यांचा गुणाकार स्थिरांक (=  ६·४) असतो, हा ए. टी. पेटिट यांच्याबरोबर १८१९ साली शोधून काढलेला नियम, हे त्यांचे सर्वांत महत्त्वाचे कार्य होय [⟶ उष्णता]. हा नियम ‘डुलाँग-पेटिट नियम ’ या नावाने ओळखण्यात येतो. अणुभार काढण्यासाठी हा नियम उपयुक्त ठरलेला आहे, तथापि तो फक्त आसन्न (अंदाजी) स्वरूपात खरा असल्याचे आढळून आले आहे. पेटिट यांच्याबरोबर १८१७ मध्ये त्यांनी असेही दाखविले की, न्यूटन यांचा शीतलनाचा नियम हा फक्त तापमानाच्या लहान फरकांकरिताच खरा असतो. डुलाँग यांनी वायूंची विशिष्ट उष्णता आणि उच्च तापमानीय वाफेची स्थितिस्थापकता (दाब काढून घेतल्यावर पूर्व स्थितीला येण्याचा गुणधर्म) यांसंबंधीही संशोधन केलेले होते. ते फ्रान्सच्या ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सदस्य (१८२३) तसेच एक वर्ष अध्यक्ष (१८२८) होते. अमेरिकेच्या नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे व लंडनच्या रॉयल सोसायटीचेही ते सदस्य होते. ते पॅरिस येथे मृत्यू पावले. 

भदे, व. ग.