स्टाईन, सर ( मार्क) ऑरेल : (२६ नोव्हेंबर१८६२–२६ ऑक्टोबर १९४३). मध्य आशियात संशोधन करणारा एक ब्रिटिश-हंगेरियन पुरतत्त्वज्ञ व भूगोलज्ञ. जन्म वूडापेस्ट (हंगेरी) येथे. पदवी संपादन केल्यानंतर त्याने मध्य आशियात विशेषतः चिनी तुर्कस्तानमध्ये प्रवास केला आणि त्या स्थळाचे युद्धाच्या डावपेचांच्या दृष्टिकोनातून महत्त्व प्रतिपादन केले. पुढे त्याने लाहोरच्या ओरिएंटल कॉलेजचे प्राचार्य म्हणून १८८८–९९ दरम्यान अध्यापन केले. प्राचार्यपदी असताना राजतरंगिणी ह्या रकल्हणलिखित इतिहासग्रंथाची संस्कृत प्रत प्रकाशित केली (१८९२). याच प्रतीचे त्याने ए क्रॉनिकल ऑफ द किंग्ज ऑफ काश्मीर या शीर्षकार्थाचे इंग्रजी भाषांतर केले (१९००). याच काळात त्याने मध्य आशियातील पश्‍चिम चीन ते खोतानपर्यंतचे सर्वेक्षण केले. या आणि अन्य तीन मोहिमांत (१९०६–०८, १९१३–१६ व १९३०) त्याने चीन व पश्‍चिमी भूप्रदेश यांतील काफील्यांच्या (कॅरव्हॅन) प्राचीन मार्गांचा शोध घेतला, त्यांच्या नोंदी केल्या, काही पुरावे हस्तगत केले आणि अश्मयुगापासून इ.स. आठव्या शतकापर्यंतच्या काळातील काही वस्तू गोळा केल्या. या भौगोलिक सर्वेक्षणात काही थडगी व वस्त्रे मिळाली. शिवाय तान ह्यूआंग (ढरप र्कीरपस) येथील एका बौद्ध गुहेचा शोध लावला. या गुहेत भित्तिचित्रे असून काही हस्तलिखिते व झेंडे होते. ते बहुतेक साहित्य नवी दिल्लीच्या एशियन अँटिक्वीटीज म्यूझियममध्ये ठेवले आहे. त्याने सर्वेक्षण केलेल्या भूभागावर एन्शन्ट खोतान (दोन खंड –१९०७), सेरिन्डिया (पाच खंड –१९२१) आणि इनरमोस्ट एशिया (चार खंड –१९२८) हे तीन अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिले. त्याची ब्रिटिश शासनाने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे अधीक्षक म्हणून नियुक्ती केली (१९१०–२९). या काळात त्याने ग्रेको-बुद्धिस्ट अवशेषांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि अलेक्झांडर द ग्रेटच्या आशियातील स्वाऱ्यांचा भाग काढला व काही अनुमाने निश्‍चित केली. मेसोपोटेमिया आणि सिंधू संस्कृती यांतील संबंध स्पष्ट करताना त्याने इराण व बलुचिस्तानातील काही प्राचीन टेकड्यांचा धांडोळा घेतला. याशिवाय त्याने इराकच्या मेवरील काही रोमन टेहळणी क्षेत्रांचे विहंग छायाचित्रण केले. पुढे त्याने अफगाणिस्तानातील काही प्राचीन स्थानांचे सर्वेक्षण करण्याची इच्छा व्यक्त केली. दरम्यान अल्पशा आजाराने त्याचे काबूलमध्ये निधन झाले. त्याला १९०४ मध्ये ब्रिटिश नागरिकत्व मिळाले. त्यामुळे त्याच्या कार्याचा सन्मान त्याला सरदारकी (सर ही पदवी) देऊन करण्यात आला (१९१२).

देशपांडे, सु. र.