बोबो ड्यूलॅसो : आफ्रिकेतील अपर व्होल्टा देशाच्या हाउट्स-बेसिन्स प्रांताची राजधानी. लोकसंख्या १,१५,०६३ (१९८१ अंदाज). हे आबीजान (आयव्हरी कोस्ट) ते वागाडूगू (अपर व्होल्टा) या लोहमार्गावरील प्रमुख स्थानक असून उत्तम सडकांनी देशातील इतर शहरांशी जोडलेले आहे. येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.फ्रेंच अंमलाखाली (१८९७ ते १९६०) एक प्रमुख औद्योगिक केंद्र म्हणून बोबो ड्यूलॅसोचा विकास झाला. येथे सायकली, तेल, साबण, अन्नप्रक्रिया, कापड, प्लॅस्टिक इ. उद्योगधंदे विकसित झालेले आहेत. तसेच परंपरागत हस्तोद्योगही टिकून असून, त्यांत कलाकृतीचे दागदागिने, ब्राँझ व हस्तिदंताच्या कलात्मक वस्तू इत्यादींचा समावेश होतो. शहरात भूगर्भशास्त्र, खाणकाम, कापडनिर्मिती यांतील संशोधनासाठी सरकारी संशोधनकेंद्र आहे. बोबो ड्यूलॅसो हे इस्लामी संस्कृतीचे एक केंद्र समजले जाते. येथे अनेक मशिदी आढळतात. जुने रोमन कॅथलिक चर्च व मातीच्या इतर काही चर्चवास्तू उल्लेखनीय आहेत.

लिमये, दि. ह.