मौर्योत्तर काल (गुप्तपूर्व) : शेवटचा मौर्य नृपती बृहद्रथ याला त्याचा सेनापती पुष्यमित्र शुंग याने सु. इ. पू. १८७ मध्ये (काहींच्या मते इ. स. पू. १८४), सेनासंचलनाच्या प्रसंगी ठार मारून पाटलिपुत्राची गादी बळकावली. पुढे इ. स. ३१८/३१९ या वर्षी पहिला चंद्रगुप्त याने लिच्छवींच्या साहाय्याने तेथे गुप्त वंशाची राजधानी केली. या दोन घटनांमधील सु. पाच शतकांच्या कालाचे सिंहावलोकन प्रस्तुत लेखात दिले आहे.

मौर्य वंशाच्या उच्छेदापूर्वीच बृहद्रथाचे साम्राज्य खिळखिळे होऊ लागले होते. इ. स. पू. २३६ मध्ये अशोकाचे निधन झाले. त्यानंतरचे त्याचे वंशज दुर्बल निघाल्यामुळे साम्राज्याच्या दूरच्या भागांनी स्वातंत्र्य पुकारले. इ. स. पू. तिसऱ्या शतकाच्या शेवटच्या पादात महाराष्ट्रात सातवाहन राजाने स्वतःचे स्वतंत्र राज्य स्थापिले. पुढे सिमुक राजाच्या कारकीर्दीत त्याला मानाचे स्थान मिळाल्यामुळे त्या वंशाचा पहिला राजा म्हणून पुराणांत त्याचा निर्देश आला आहे. या वंशाच्या तीस राजांनी सु. ४५० वर्षे महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, आंध्र इ. दक्षिणापथाच्या बहुतेक प्रदेशांवर आपले स्वामित्त्व प्रस्थापित केले होते. मध्यंतरी काही काळ कुशाणांच्या शकवंशी क्षत्रपांनी त्यांना पश्चिम महाराष्ट्र व विदर्भ या प्रदेशातून हाकून लावले होते पण त्यांनी लौकरच ते प्रदेश त्यांच्याकडून पुन्हा जिंकून घेतले.

सातवाहनांचा अस्त इ. स. २५० च्या सुमारास झाला. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आभीरांचे आणि विदर्भात वाकाटकांचे राज्य स्थापन झाले. कुंतल किंवा दक्षिण महाराष्ट्राचा सातवाहनांच्या अस्तानंतरचा सु. शंभर वर्षांचा इतिहास अद्यापि अज्ञात आहे. इ. स. ३५० च्या सुमारास तेथे पूर्वकालीन राष्ट्रकूट वंश उदयास आला. या वंशाचा पुढे गुप्त वंशाशी राजनैतिक संबंध कवी कुलगुरू कालिदासाच्या वकिलीमुळे जमून आला, अशी आख्यायिका आहे.

आभीर वंशात दहा राजे होऊन गेले, असे पुराने सांगतात. त्यांचा मूळ पुरुष ईश्वर सेन याचा लेख नासिकजवळच्या पांडुलेण्यात आहे. त्याने सन २४९ मध्ये स्थापलेल्या संवताला कालांतराने कलचुरि-संवत आणि चेदि-संवत अशी नावे मिळाली, पण आरंभी त्यांचा प्रसार पश्चिम महाराष्ट्र, गुजरात, कोकण व मध्य भारत या प्रदेशांतच होता. हे सर्व प्रदेश आभीरांच्या राज्यात अंतर्भूत असावेत. आभीरांनी सु. १६७ वर्षे राज्य केले असे दिसते [→ आभीर].

विदर्भात वाकाटकांनी आपले बलाढ्य साम्राज्य स्थापले. पहिला विंध्यशक्ती हा या वंशाचा मूळ पुरुष होय. त्याचा पुत्र पहिला प्रवरसेन याने आपले साम्राज्य चारी दिशांत पसरवून अनेक श्रौत यज्ञ आणि चार अश्वमेध यज्ञ केले. तसेच आपल्या सत्तेच्या स्थैर्याकरिता उत्तरेतील पद्मवतीच्या भगवान नामक नाग घराण्याची वैवाहिक संबंध जोडून नाग-वाकाटक ळी (ॲक्सिस) उत्पन्न केली. पुढे गुप्त नृपती दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळी या वंशाचा गुप्तवंशाशी वैवाहिक संबंध जोडला गेला.

अशोकाच्या निधनानंतर महाराष्ट्रात जसे सातवाहनांचे, त्याप्रमाणे कलिंग देशात चेति (चेदि) वंशाचे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले. पुढे या वंशातील ⇨ खारवेल राजाने दक्षिणेतील तसेच उत्तरेतील दूरदूरच्या प्रदेशांवर स्वाऱ्या करून आपला दरारा स्थापित केला. एकदा तर त्याने मगधावर स्वारी करून राजगृहाला वेढा घातला. तेव्हा तेथपर्यंत चालून आलेल्या यवन (ग्रीक) राजा दिमित (डीमीट्रिअस) याला मथुरेपर्यंत पळ काढावा लागला, असे खारवेलाच्या हाथीगुंफा लेखात म्हटले आहे.

सातवाहनांच्या अस्तानंतर आंध्र प्रदेशात इक्ष्वाकू वंशी राजांचे स्वामित्त्व प्रस्थापित झाले. त्यांचे अनेक लेख नागार्जुनकोंडा येथे मिळाले आहेत. त्यांची राजधानी जवळच विजयपुरी येथे होती. तेथील लेखांत राजांनी अनेक श्रौत यज्ञ केल्याचे व हिंदू देवांची देवालये बांधल्याचे व राज्यवंशातील स्त्रियांनी बौद्ध संघास देणग्या दिल्यास उल्लेख आहेत. तिसऱ्या शतकाच्या अखेरीस पल्लवांकडून पराजय पावल्यावर इक्ष्वाकूंच्या सत्तेला अवनती प्राप्त झाली [→ इक्ष्वाकु].

उत्तर हिंदुस्तानात अशोकानंतर मौर्य साम्राज्य खिळखिळे झाल्यामुळे भारताच्या वायव्य प्रदेशावर परकी आक्रमणे होऊ लागली. बॅक्ट्रियामध्ये इ. स. पू. सु. २१२ मध्ये यूथिडीमस याने स्वतंत्र राज्य स्थापले होते. सील्यूकसचा वंशज तिसरा अँटायओकस याने त्याच्या बंडाकरिता त्याला शासन करावे, म्हणून इ. स. पू. २०६ मध्ये त्याच्यावर स्वारी केली, तेव्हा त्याने नमते घेतल्यामुळे त्या दोघांचे सख्य होऊन अँटायओकसने राजपुत्र डीमीट्रिअस याला आपला जावई केले. पुढे त्याने हिंदुकुश ओलांडून सुभगसेन नामक राजाच्या प्रदेशावर स्वारी केली. पण त्याने काही लढाऊ हत्तींची खंडणी दिल्यावर अँटायओकस परत गेला [→ बॅक्ट्रिया].

या प्रमाणे या खेपेचे परकी स्वारीचे संकट टळले पण पुढे लौकरच डीमीट्रिअसने भारतावर आक्रमण करून साकेत, पांचाल आणि मथुरा ही स्थळे घेऊन पाटलीपुत्रापर्यंत धडक मारली. पण त्या सुमारास खारवेलची मगधावर स्वारी झाली आणि खुद्द बॅक्ट्रियामध्ये राज्यक्रांती होऊन युक्रेटिडीसने गादी बळकावल्याचे वृत्त आल्यामुळे डिमीट्रिअसला परत जावे लागले. पुढे या दोन्ही ग्रीक वंशाच्या राजांनी आक्रमण करून अफगाणिस्तान आणि वायव्य सीमा प्रांत व्यापला. त्यांच्या अधुन मधून उत्तर भारतावर स्वाऱ्या होत असत. काहींचे भारतीय राजांशी राजनैतिक संबंध जुळले होते.

डीमीट्रिअसच्या स्वारीमुळे मौर्य राजाचे सामर्थ्य अगदीच खचले होते. पुढे ⇨ पुष्यमित्र शुंगाने राज्यक्रांती करून मौर्य नृपती बृहद्रथ याला ठार मारले अणि गादी बळकावली. पुष्यमित्राने हिंदू धर्माला राजाश्रय देऊन संस्कृत विद्येला उत्तेजन दिले. त्याने स्वतः दोन अश्वमेध यज्ञ करून पशुहिंसेवरील नियंत्रण दूर केले. त्याने आपली सत्ता वायव्येस पंजाबपर्यंत आणि दक्षिणेस नर्मदेपर्यंत पसरविली. त्याचा मुलगा अग्निमित्र हा विदिशेस राज्य करीत होता. त्याने विदर्भाच्या राजघराण्यातील कलहाचा फायदा घेऊन त्यावर आपले स्वामित्त्व प्रस्तापित केले. या काळीही यवनांच्या स्वाऱ्या मधून मधून होत असत. पुष्यमित्राच्या अश्वमेधाचा घोडा सिंधू नदीच्या तीरी यवनांनी पकडल्यामुळे अग्निमित्राचा पुत्र व सुमित्र याने त्यांच्याशी युद्ध करून तो सोडविल्याचा प्रसंग कालिदासाच्या मालविकाग्निमित्रम् नाटकात घातला आहे.

शुंगांनी इ. स. पू. ७२ पर्यंत राज्य केले. या वंशातील भागभद्र नामक राजाच्या विदिशेतील दरबारी तक्षशिलेच्या अँटिआल्‌किडस राजाने आपला हीलिओडोरस दूत पाठविला होता. तो भागवत किंवा विष्णु-उपासक असल्याने त्याने तेथील देवळासमोर गरूडध्वजाचा शिलास्तंभ उभारला होता, असे त्यावरील लेखावरून कळते [→ शुंगवंश].

शुंगानंतर इ. स. पू. ७२ च्या सुमारास कण्व (काण्व) वंश उदयास आला. हा शुंगाप्रमाणे ब्राह्मणजातीय होता. यातील चार राजांनी ४२ वर्षे राज्य केले (इ. स. पू. ७२–३०). यानंतरच्या आणि गुप्तांच्या पूर्वीच्या मगध राजवटींविषयी आपणास काही माहिती नाही.


यवनानंतर शकाच्या सिंधूप्रदेश आणि पंजाब प्रांत यांवर स्वाऱ्या झाल्या. शकनृपती मौएस याने बोलन घाटातून सिंधुप्रदेश आक्रमून अफगाणिस्थान–पंजाबातील दोन यवन राज्यांमध्ये आपले राज्य तक्षशिला येथे स्थापिले. त्याचे काही क्षत्रप मथुरेसही राज्य करीत होते. त्यानंतर पार्थियन राजांनी शकांचा उच्छेद करून आपली सत्ता प्रस्थापित केली. पण लौकरच कुशाणांनी त्यांच्यावर आक्रमण करून त्याची राज्ये नष्ट केली. कुशाण नृपती कनिष्क याने उत्तर भारताचा बहुतेक भाग आणि दक्षिणेतील विदर्भ, कोकण व महाराष्ट्र हे प्रदेश जिंकून ते आपल्या साम्राज्यात सामील केले होते. कनिष्काने स्थापलेला शकसंवत या सर्व प्रदेशांत चालू झालेला दिसतो. कनिष्कानंतर काही काळ कुशाणांचे साम्राज्य अस्तित्वात होते. त्यांनी नेमलेल्या भूमक, नहपान आणि इपिअम्म या क्षत्रपांनी गुजरात, राजपुताना, माळवा, महाराष्ट्र, कोकण व विदर्भ या प्रदेशांवर काही काळ राज्य केले. ह्यातील दक्षिणेकडचे प्रदेश त्यांनी सातवाहनांकडून जिंकून घेतले होते. तथापि गौतमीपुत्र सातकर्णीने नहपानाचा पराभव करून ते परत मिळविले. माळवा, काठेवाड व गुजरातचा काही भाग यांवर चष्टन नामक क्षत्रपाने पुन्हा आक्रमण करून आपले राज्य स्थापिले. त्याचा वंश या प्रदेशात गुप्तांच्या उदयापर्यंत राज्य करीत होता.

कनिष्काचे साम्राज्य उत्तर भारताच्या बहुतेक भागावर आणि दक्षिण भारताच्या काही भागांवर पसरले होते. अशा विस्तृत आणि बलाढ्य साम्राज्याचा अस्त कनिष्कानंतर पन्नास वर्षांच्या आत कसा घडून आला ही एक समस्या आहे. ती सोडविण्याकरिता आपणास उत्तर भारतातील लहान लहान राज्ये आणि गणराज्ये यांच्या मौर्योत्तरकालीन इतिहासाकडे वळले पाहिजे.

ही दोन्ही प्रकारची राज्ये पुष्यमित्राच्या निधनानंतर लौकरच अस्तित्वात आली असावी. त्यांपैकी काहींना शक-कुशाणादी परकी आक्रमकांपुढे काही काळ नमते घ्यावे लागते असले, तरी त्यांनी कनिष्काच्या निधनानंतर लौकरच आपले स्वातंत्र्य पुन्हा पुकारले आणि कुशाण साम्राज्य नष्ट केले.

यौधेयगण : पंजाबच्या गणराज्यात यौधेयांचे गणराज्य विख्यात होते. त्यांचा अंमल सतलज आणि यमुना यांच्यामधील प्रदेशांवर सध्याच्या लुधियाना, अंबाला, कर्णाल, रोहटक आणि हिस्सार होता. या प्रदेशांवर यौधेय फारप्राचीन काळापासून राज्य करीत होते. पाणिनीच्या अष्टाध्यायीत त्यांच्या आयुधजीविसंघाचा उल्लेख आहे. त्यांचा प्रदेश सुपीक असल्यामुळे त्याला बहुधान्यक असे सार्थ नाव पडले होते. त्यांची सर्वांत प्राचीन नाणी इ. स. पू. दुसऱ्या-पहिल्या शतकांतील आहेत. त्यांवरून त्यांना शंकापासून आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण केले असल्याचे स्पष्ट दिसते. पुढे त्यांनी कुशाणांविरुद्धही लढून जय मिळविला व त्याची द्योतक अशी ‘यौधयगणस्य जय’ असा लेख असलेली नाणी पाडली. महाक्षत्रप रूद्रदामक याने आपल्या लेखांत त्यांची सर्व ‘क्षत्रियांवर विजय मिळवून आपली वीर पदवी सार्थ करणारे’ अशी प्रशंसा केली आहे. हे गणराज्य समुद्रगुप्ताच्या काळापर्यंत भरभराटीत होते. त्यांचे उपास्य दैवत षडानन कार्त्तिकेय याची आकृती त्यांच्या नाण्यांवर आढळले.

मालव: यौधेयांप्रमाणे हे गणराज्यही अत्यंत प्राचीन असून त्याचा उल्लेख पाणिनीच्या अष्टाध्यायीत आहे. ते राज्य झेलम आणि चिनाब यांच्या संगमापासून रावी नदीपर्यंत पसरलेल्या प्रदेशावर होते. यांनी अलेक्झांडरला जोराचा प्रतिकार केला होता. पतंजलीच्या महाभाष्यातही मालवांचा उल्लेख आहे. पुढे शकांच्या आक्रमणांमुळे पंजाबात आपले स्वातंत्र्य टिकविणे अशक्य झाल्यावर त्यांनी तो प्रदेश सोडून राजस्थानात जयपूरजवळच्या प्रदेशात आपली वसाहत केली. तेथे कर्कोटनगर वगैरे ठिकाणी त्यांच्या ख्रिस्तोत्तर पहिल्या-दूसऱ्या शतकांतील नाणी सापडली आहेत. त्यांवरील ‘मालवानां’ जय: या सारख्या लेखांवरून यौधेयांप्रमाणे त्यांनीही कुशाणांवर संस्मरणीय जय मिळविला असावा. त्यांच्यामध्ये प्रचलित असलेल्या संवताला कालांतराने ‘विक्रमसंवत’ असे नाव पडले. पुढे त्यांनी विंध्य प्रदेशातील प्राचीन आकरावन्ती प्रदेशात वस्ती केली, तेव्हापासून त्याला मालव हे नाव पडले.

या शिवाय कुणिद, कुलूत, मद्रक इ. गणराज्ये पंजाबात आणि त्या जवळच्या प्रदेशात गुप्तकालापर्यंत टिकून होती, असे त्यांच्या नाण्यांवरून दिसते.

नागराज्ये : या गणराज्यांप्रमाणे काही सामान्य पद्धतीची राज्येही या काळात उदयास येऊन भरभराटीस आली. त्यांमध्ये नागराज्ये प्रमुख होती. पुराणांत नागराज्ये पद्मावती, मथुरा, कान्तिपुरी, विदिशा इ. ठिकाणी असल्यास उल्लेख आहे. त्यांमधे पद्मावतीचे (पूर्वीच्या ग्वाल्हेर संस्थानातील पदम पवायाचे) राज्य प्रसिद्ध आहे. तेथे अनेक नागराजांची नाणी सापडली आहेत. तेथील नागवंशाला भारशिव अशी संज्ञा होती. कारण हल्लीच्या लिंगायतांप्रमाणे हे राजे शिवलींग धारण करीत असत. त्यांनी उत्तरेस भागीरथीपर्यंतचा प्रदेश जिंकून त्या नदीच्या पवित्र जलाने आपणास राज्याभिषेक करवून घेतला होता. तसेच सम्राटपदनिदर्शक दहा अश्वमेध यज्ञही केले होते. कुशानांविरुद्धच्या लढायांत त्यांनी प्रामुख्याने भाग घेतला होता, यात संशय नाही. गुप्तांच्या उदयापूर्वी यांचे मध्ये हिंदूस्तानात बलाढ्य राज्य होते. आणि त्याच्या संरक्षणार्थ त्यांनी विदर्भात वाकाटक घराण्याशी वैवाहिक संबंध जोडला होता. त्याचा निर्देश वाकाटकांच्या ताम्रपटांत येतो.


मघ: याशिवाय कौशाम्बी (प्रयागजवळच्या कोसाम) चे मघ घराणेही त्या काळी प्रबळ होते. कौशांम्बी ते रेवा जिल्ह्यातील बांधोगढ हा प्रदेश त्यांच्या अंमलाखाली होता. या प्रदेशांत पूर्वीपासून कुशाणांचा शकसंवत चालू असल्याने त्याचा उपयोग मध राजांनी आपल्या कोरीव लेखांत केला आहे. या वंशात नऊ राजे होऊन गेले असे पुराणे सांगतात. त्या सर्वांचे लेख या प्रदेशांत सापडले आहेत. गुप्त नृपती पहिला चंद्रगुप्त याने प्रयागपर्यंत देश आक्रमिला, तेव्हा त्याने यांचे राज्य जिंकले असावे. पुढे समुद्रगुप्ताने उत्तर आणि दक्षिण भारतातले आपले विजय संपादन केल्यावर तेथील अशोकस्तंभावर आपली प्रशस्ती कोरविली. तो स्तंभ आता प्रयागच्या किल्यात आहे.

या कालातील धार्मिक, वाङ्‍मयीन आणि आर्थिक परिस्थितीवर तत्कालीन राजकीय घडामोडींचा परिणाम स्पष्ट दिसतो. या काळात बौद्ध धर्माची सर्वत्र भरभराट होती. शुंग राजा पुष्यमित्र याने बौद्धांचा छळ केला असे नंतरच्या दिव्यावदान ग्रंथात म्हटले आहे. पण त्यात तथ्य दिसत नाही. शृंगाच्या राज्यात बौद्ध धर्म भरभराटीत होता. भारहूतसारख्या ठिकाणी स्तूप, त्यांच्या वेदिका, तोरणे वगैरे बांधली जात असत, असे तेथील कोरीव लेखांवरून दिसते. शुंगाप्रमाणे सातवाहन राजेही वैदिक धर्मानुयायी होते. त्यांनी स्वतः अनेक श्रौत याग करून ब्राह्मणांवर देणग्यांचा वर्षाव केला होता. पण त्या वंशातील अनेकांनी बौद्धांसाठी नासिक वगैरे ठिकाणी लेणी कोरविली होती. आंध्रातील इक्ष्वाकुवंशी राजांनी स्वतः अनेक श्रौत याग केले असेल, तरी त्यांच्या राजस्त्रियांनी नागार्जुनकोंडा येथील बौद्ध संघाला उदार साहाय्य केले होते. ग्रीक, शक, पार्थियन व कुशाण राजे सामान्यतः बौद्ध धर्माकडेच आकृष्ट होत. कुशाणवंशी कनिष्काने तर चौथी बौद्ध संगीती (परिषद) भरवून नव्या महायान पंथाला उत्तेजन दिले होते. तथापि काही परकी राजे व त्यांचे अधिकारी हिंदू धर्मातील देवदेवतांकडे आकृष्ट होत. तक्षशिलेच्या भागवत यवनदूत हीलिओडोरसचे उदाहरण सुप्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील शहरात आणि माळव्यातील कर्दमक या शकवंशांनी हिंदू धर्माचा पुरस्कार केलेला दिसतो. त्या मानाने जैन धर्माला राजाश्रय मिळाल्याची या काळातील उदाहरणे अत्यंत विरळ आहेत. कलिंग नृपती खारवेल हा त्या धर्माचा कट्टर अनुयायी होता. मथुरेतील काही लेखांवरून त्या धर्माचा जनतेतील प्रसार अजमावता येतो.

या कालात भारतीय संस्कृतीचा परकी आक्रमकांच्या संस्कृतीशी संबंध येऊन बरीच देवाणघेवाण झाली. ग्रीक संस्कृती अगोदरच प्रगत असल्यामळे तिच्यावर भारतीय संस्कृतीचा विशेष परिणाम झाला नसावा. तथापि अनेक यवन बौद्ध व हिंदू धर्म स्वीकारून भारतीय संस्कृतीत एकरूप होऊन गेले होते, यात संशय नाही. याचे आणखी एक उदाहरण ग्रीक नृपती ⇨ मीनांदर (मिलिंद) याचे देता येईल. याच्या उलट ग्रीकांच्या नाणककलेचा आणि शिल्पकलेचा भारतीय कलांवर झालेला परिणाम सुस्पष्ट आहे. प्राचीन भारतीय नाण्यांवर राजनाम नसे. ते या कालात घालण्यात येऊ लागले. नाण्यांच्या आकारादिकांवरही ग्रीक कलेचा परिणाम झालेला दिसतो. ग्रीक शिल्पकलेने बुद्धाची मूर्ती करण्याचा प्रघात पडला. गांधार शिल्पकलेतील वस्त्रादिकांची ठेवण ग्रीक कलेतल्या प्रमाणेच आहे. याच्या उलट भारतातील काही ग्रीक राजांनी भारतीय पद्धतीची नाणी पाडली होती. शक, पार्थियन व कुशाण यांना स्वतःची अशी संस्कृती नव्हती. त्यांनी भारतीय संस्कृतीच पूर्णपणे आत्मसात केली आणि दुसऱ्या-तिसऱ्या पिढीतील राजांनी तर भारतीय नावे धारण करण्यास प्रारंभ केला. उदा. शक अधिकाऱ्यांची विजयमित्र आणि इंद्रवर्मा व कुशाण नृपतीचे वासुदेव हे नाव त्या दृष्टीने लक्षणीय आहे.

या कालात प्राकृत भाषा आणि वाङ्‍मय यांची बरीच प्रगती झाली. या कालातील बहुतेक लेख प्राकृत भाषेत आहेत. याला अपवाद फक्त शुंगांच्या अयोध्या येथील आणि रूद्रदामन याच्या गिरनार येथील लेखांचा. शुंग नृपती पुष्यमित्र याने वैदिक धर्माचा पुरस्कार करून संस्कृत भाषेस उत्तेजन दिले. त्याचाच काळी पतंजलीचा महाभाष्य हा संस्कृत व्याकरणाचा सर्वमान्य ग्रंथ रचला गेला. रूद्रदामन याने स्वतः सुंदर गद्य व पद्य काव्ये रचल्याचा गिरनार येथील लेखात निर्देश आहे. पण ती सध्या उपलब्ध नाहीत. याशिवाय या काळात मनुस्मृती, याज्ञवल्क्यस्मृती यांसारख्या स्मृती, सांख्य, योग, न्याय, मीमांसा, वेदान्त इ. दर्शनांची सूत्रे, वात्स्यायनाचे कामसूत्र, भास, सौमिल्ल, कविपुत्र यांची नाटके इ. संस्कृत वाङ्‍मय निर्माण झाले. सस्कृत भाषेची आकर्षकता ध्यानात घेऊन अक्ष्वघोषासारख्या काही बौद्ध कवींनी व तत्त्वज्ञांनी आपले ग्रंथ त्या भाषेत लिहिण्यास आरंभ केला. तथापि पाचशे वर्षांच्या दीर्घ कालाच्या मानाने हे वाङ्‍मय तुटपुंजे आहे.

याच्या उलट या काळात पाली व प्राकृत भाषांत बरेच वाङ्‍मय निर्माण झाले. पाली धर्मग्रंथावरील टीका, मिलींदपञ्ह वगैरे ग्रंथ याचा काळातील होत. सातवाहन राजे स्वतः वैदिक धर्मानुयायी असले, तरी त्यांचा आश्रय संस्कृत भाषेत नसून प्राकृत भाषेत होता. त्यांच्या काळी गुणाढ्य कवीने पैशाची भाषेत बृहत्कथा हा मोठा व उत्कृष्ट ग्रंथ रचला. तो सध्या उपलब्ध नाही. पण त्याची कथासरित्सागर आणि बृहत्कथामंजरी ही ख्रिस्तोत्तर अकराव्या शतकात केलेली संस्कृत रूपांतरे प्रचलित आहेत. सामान्य जनतेतही प्राकृत भाषेचा व वाङ्‍मयाचा प्रचार होता, हे हालाच्या गाथासप्तशतीवरून स्पष्ट दिसते. त्या ग्रंथात त्याने एक कोटी गाथातून सातशे गाथांची निवड केली होती, असे म्हटले आहे. या गाथा समाजाच्या विविध थरांतील कवींनी रचल्या होत्या.

या काळातील आर्थिक परिस्थितीविषयी आपणास फारशी माहीती नाही तथापी या काळात दक्षिण भारतात सातवाहनांचे साम्राज्य दीर्घकाळ टिकल्यामुळे तेथे सुबत्ता नांदत असावी. महाराष्ट्रात या काळात कोरलेली अनेक सुंदर व विशाल लेणी व त्याकरिता समाजातील विविध श्रेणींच्या लोकांनी दिलेल्या देणग्या यांवरूनही हीच गोष्ट सिद्ध होते. उत्तर भारतातील, विशेषतः पंजाब, सिंध व वायव्य सीमाप्रांतात, परकी राजांच्या वरचेवर होणाऱ्या स्वाऱ्या व धुमाकूळ यांनी आर्थिक घडी बिघडली असल्यास नवल नाही. ही परिस्थिती तत्कालीन नाण्यांत प्रतिबिंबित झाली आहे. ग्रीक राजांनी काही नाणी चांदीची पाडली, पण त्यानंतर शक व पार्थियन राजांनीं बहुतेक नाणी तांबे व बिलन या मिश्रधातूंची आहेत. त्यांपैकी कोणीही सोन्याची नाणी पाडली नव्हती, पण कुशाणांच्या साम्राज्याचा विस्तार मध्य आशियापर्यंत होऊन पश्चिमी देशांशी व्यापाराचे मार्ग खुले झाल्यावर देशातील सुबत्ता वाढली. तिचे प्रतिबिंब वीम कडफिसस व कनिष्क यांच्या सोन्याच्या नाण्यांत दिसते. ख्रिस्तोत्तर पहिल्या शतकात भारताचा रोमन साम्राज्याशी व्यापार खूप वाढला होता. रोमन नागरिकांना भारतीय मसाल्याच्या जिनसांची व चैनीच्या वस्तूंची चटक लागल्यामुळे रोमन सोन्याचा ओघ भारतात वाहू लागला, याबद्दल प्लिनी या इतिहासकाराने टीका केली आहे. रोमन सम्राटांची शेकडो सोन्याची नाणी व्यापारामुळे भारतात येते. ती वितळवून कुशाण सम्राटांनी आपली सोन्याची नाणी स्वदेशातील व्यवहाराकरिता आणि व्यापाराच्या सोयीकरिता पाडली होती. दक्षिण भारतातही त्या कालातील रोमन नाणी सापडली आहेत. त्याशिवाय रोमन अँफोरा (मद्यकुंभ) दक्षिणेतील उत्खननात अनेक ठिकाणी सापडले आहेत. त्यांवरूनही भारतात रोमशी असलेल्या तत्कालीन व्यापाराची कल्पना करता येते. या काळात राजकीय एकसंधतेचा अभाव जाणवत असला, तरी भारतीय संस्कृती व समाज यांचा सर्वांगीण विकास झालेला दिसतो.

पहा: आभीर, कण्व वंश, कुशाण वंश, वाकाटक घराणे, शुंग वंश, सातवाहन वंश.

संदर्भ : 1. Aiyanjar, S. Krishnaswami, Ancient India, 2 Vols., Poona, 1941.

             2. Chattopadhyaya, Sudhkar. Early History of North India, Calcutta, 1958.

             3. Majumdar, R. C. Ed. The Age of Imperial Unity, Bombay, 1970.

मिराशी, वा. वि.