पुनःस्थितिस्थापन : मृत अथवा दुखावलेल्या ऊतकांच्या (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या – पेशींच्या–समूहांच्या) जागी नव्या निरोगी ऊतकाची (मूलोतक किंवा आधार ऊतकाची) पुनर्स्थापना होण्याच्या प्रक्रियेला पुनःस्थितिस्थापन म्हणतात. दुखावलेल्या ऊतकांची पुनर्स्थापना ही शरीरातील शोथापेक्षाही (दाहयुक्त सुजेपेक्षाही)  मूलभूत प्रक्रिया आहे. ती वनस्पती आणि प्राणिजगतात सर्वत्र आढळते. क्रमविकासाप्रमाणे (उत्क्रांतीप्रमाणे) प्राणी जितका खालच्या पायरीवर तितकी त्याची पुनर्जननाची क्षमता [→ पुनर्जनन] परिपूर्ण असते. गांडूळ हे याचे उत्तम उदाहरण होय. त्याचे डोके किंवा शरीराचा अर्धा भाग छाटला असता उर्वरित भागास डोके किंवा उरलेला अर्धा भाग नव्याने प्राप्त होतो आणि हे कित्येक वेळा घडू शकते. पूर्ण स्थितिस्थापनेची क्षमता असलेल्या गांडूळ व इतर प्राण्यांचे प्रजोत्पादन अलैंगिक पध्दतीनेच होते. अधिक क्रमविकसित प्राण्यातील पुःस्थितिस्थापन हे मर्यादित अलैंगिक पुनरुत्पादनाचे विशिष्ट उदाहरण होय. जखम भरून येणे या वरपांगी साध्या वाटणाऱ्या गोष्टीत असंख्य क्रिया अनुक्रमाने घडतात. त्या एकदम सुरू होतात व विशिष्ट स्थिती प्राप्त होताच थांबतात. प्रस्तुत नोंदीत मानवात आढणाऱ्या पुनःस्थितिस्थापनाबद्दल माहिती दिली आहे.

जखम किंवा व्रण भरून येणे, पूर्ण अवयवाची निर्मिती किंवा विशिष्ट शोधानंतर झालेल्या यकृतासारख्या आतील अवयवाची दुरुस्ती या सर्वांचा ह्यात अंतर्भाव होतो. पुनःस्थितिस्थापनाचा प्रमुख हेतू ऊतक पूर्वीप्रमाणेच शक्य तेवढे कार्यरत कर्यरत करणे हाच असतो.

प्रकार : पुनःस्थितिस्थापन दोन प्रकारचे असू शकते : (१) मूलोतक कोशिकांचे प्रगुणन होऊन पुनःस्थापना होणे, यालाच पुनर्जनन असेही म्हणता येईल.  (२) प्रामुख्याने संयोजी ऊतकाचे प्रगुणन होऊन पुनःस्थितिस्थापना होणे. याचे प्राथमिक संधान व द्वितीयक संधान असे दोन उप्रकार आहेत.

मूलोतक कोशिका प्रगुणनाद्वारे होणारे पुनःस्थितिस्थापन­ : मूलोतक कोशिकांचे तीन प्रकार आहेत : (अ) सुपरिवर्त्य कोशिका उदा., अधिस्तर (शरीराच्या बाह्य व अंतर्गत पृष्ठभागावरील) कोशिका, (आ) स्थिर कोशिका उदा स्राव ग्रंथीतील मूलोतक कोशिका, वसा कोशिका (संचित स्निग्ध पदार्थाने फुगलेल्या संयोजी ऊतकातील कोशिका) वगैरे व (इ) स्थायी कोशिका उदा., तंत्रिका (मज्जतंतू) कोशिका ह्रदस्नायू कोशिका. या तिन्ही प्रकारच्या कोशिकांच्या पुनःसंस्करणाचा यात अंतर्भाव होतो. सुपरिवर्त्य व स्थिर कोशिका आयुष्यभर केव्हाही पुनर्जननक्षमता टिकवून असतात परंतु स्थायी कोशिका पुनर्जनन करू शकत नाहीत. त्या नाश पावल्यास त्यांची जागा भरून काढण्यासाठी संयोजी ऊतक कोशिकांचे प्रगुणन होते. सुपरिवर्त्य आणि स्थिर कोशिकांचे पुनरुत्पादन होत असले, तरी अगदी मूळची रचना नेहमीचीच प्राप्त होते असे नाही.

यकृतातील ऊतकमृत्यूमुळे होणारी  हानी भरून काढण्याकरिता यकृत कोशिकांचे तसेच तंतुमय आधार ऊतकातील कोशिकांचेही प्रगुणन होते. जेव्हा यकृत कोशिकांच्या (अधिस्तरीय मूलोतकाच्या) प्रगुणनाचे प्रमाण अधिक असते तेव्हा हानी भरून येऊन जवळजवळ पूर्वस्थिती प्राप्त होते परंतु जेव्हा अशी पूर्वस्थिती प्राप्त होण्याची शक्यता नसते तेव्हा तंतुमय कोशिका ऊतकाची प्रामुख्याने वाढ होते व विशिष्ट कार्य करणाऱ्या मूलोतक कोशिकांचा कायम अभाव उत्पन्न होतो. याशिवाय त्या जागी वण तयार होतो.  इजा झालेले ऊतक पूर्ववत होणार किंवा नाही हे इजेची व्याप्ती व कोशिकांची पुनर्जननक्षमता यांवरून ठरते. पुनःस्थितिस्थापनात जेव्हा मूलोतक कोशिका मोठ्या प्रमाणात भाग घेतात तेव्हा पूर्वस्थिती बऱ्याच प्रमाणात प्राप्त होते.

संयोजी ऊतकाद्वारे पुनःस्थितिस्थापन : यामध्ये (अ) तंतुजनक कोशिकांचे प्रगुणन आणि (आ) सूक्ष्म रक्तवाहिन्यांच्या अंतःस्तरीय कोशिकांचे प्रगुणन या दोन गोष्टी प्रामुख्याने भाग घेतात.

(अ)तंतुजनक कोशिका प्रगुणन: संयोजी ऊतकतंतू निर्माण करणाऱ्या तंतुजनक कोशिका गोलाकार किंवा अंडाकृती असून त्यांचा केंद्रक (कोशिकेतील क्रियांवर नियंत्रण ठेवणारा जटिल गोलसर पुंज) मध्यभागी असतो. जखमेच्या कडेला असणाऱ्या या कोशिका फुगतात व स्थलांतर करतात. जखमेतील क्लथित (साखळलेले) रक्त व फायब्रीन जाल (एक प्रकारच्या न विरघळणाऱ्या प्रथिनापासून-फायब्रिनपासून –बनलेले जाल) यांमधून हे स्थलांतर दिवसाकाठी २२० मायक्रॉन.

(१ मायक्रॉन=१०-६मी.) या गतीने सुरू होते. कोशिकांमधून पुर्वगामी कोलॅजेन स्रवते आणि त्यापासून कोलॅजन तयार होते. या रूपांतराकरिता म्युकोपॉलिसॅकॅराइड [→ कार्बोहायड्रेटे] आणि क जीवनसत्त्व  यांची गरज असते. यामुळे कोलॅजेन तयार होण्याकरिता ४ ते ५ दिवसांचा अवधी लागतो.

(आ)रक्तवाहिन्यांच्या अंतःस्तरीय कोशिकांचे प्रगुणन : इजा झालेल्या मूळ सूक्ष्म रक्तवाहिन्यांच्या  अंतःस्तरिय कोशिकांची आकारवृद्धी होते, त्या फुगतात व सूत्री विभाजनास [→ कोशिका] उद्युक्त होतात. वाढत असणाऱ्या आणि स्थलांतर करणाऱ्या तंतुजनक कोशिकांच्या तंतुजालास धरून विभाजनातून तयार होणाऱ्या नव्या कोशिका सरकत जाऊन त्यापासून  अंतःस्तरीय कोशिकांच्या कलिका बनतात. या कलिकांपासून धनशृंखला तयार होतात व नंतर या शृंखलांतून पोकळी निर्माण होते. अशा प्रकारे नव्या सूक्ष्म रक्तवाहिन्या तयार होतात आणि त्यांतून रक्तप्रवाह सुरू होतो. अशा रीतीने जखम झाल्यापासून एक-तीन दिवसांत तिच्या एका कडेपासून दुसऱ्या कडेपर्यंत रक्तप्रवाह प्रस्थापित होतो. या प्रकारे लसीका वाहिन्यांचीही (रक्तद्रवाशी साम्य असणारा व ऊतकांकडून रक्तात मिसळणारा द्रव पदार्थ म्हणजे लसीका वाहून नेणाऱ्या वाहिन्यांचीही) वाढ होते परंतु रक्तवाहिन्यांप्रमाणे त्यांचे वाहिनीमीलन होत नाही.


वण तयार होणे : जसजशी तंतुजनक कोशिकांची वाढ होत जाते तसतसे कोलॅजन उत्पादन वाढते व त्याचा केशवाहिन्यांवर (सूक्ष्म रोहिण्या व सूक्ष्म नीला यांना जोडणाऱ्या सूक्ष्म वाहिन्यांवर) दाब पडून रक्तप्रवाहात अडथळा येतो. कालांतराने कोलॅजेनाच्या आकुंचनामुळे रक्तवाहिन्याविरहित कोलॅजेनयुक्त आणि कोशिकाविरहित संयोजी तंतूंचा वण तयार होतो.

प्राथमिक संधान : पूयीभवन (पुवाचा उद‌्भव) न होता व कणोतक (नविनच तयार झालेले व शेवटी ज्यापासून वण तयार होतो असे तंतुमय संयोजी ऊतक) तयार न होता इजेनंतर ताबडतोब होणाऱ्या पुःस्थितिस्थापनाला प्राथमिक संधान असे म्हणतात. पुनःस्थितीस्थापनाचा हा समजण्यास सर्वांत सोपा प्रकार असून शस्त्रक्रियेच्या वेळी चाकूच्या धारधार पात्याने केलेल्या निर्जंतुक छेदाची जखम अशा प्रकारे भरून येते. जखम जेव्हा मोठी नसते, कोशिकानाश क्षुल्लक असतो, सूक्ष्मजंतुजन्य शोथ नसतो व कमीतकमी ऊतक पुनर्संस्करणाची गरज असते तेव्हा पुनःस्थितिस्थापन प्राथमिक संधानाद्वारे होते.

छेदाच्या रेषेतील अधिस्तरीय व त्याखालील संयोजी ऊतक कोशिकांपैकी अत्यल्प कोशिकांचा नाश झालेला असतो. जखमेच्या दोन्ही बाजूंच्या केशवाहिन्या रक्तक्लथनामुळे बंद झालेल्या असतात. कापलेल्या दोन्ही कडा समोर येऊन छेद जेव्हा बंद होतो तेव्हा मधील जागा रक्ताने व्यापली जाते, या रक्ताचे क्लथन होते व जखमेचा पृष्ठभाग सीलबंद होतो. क्लथनामध्ये तयार होणाऱ्या फायब्रीन जालाने दोन्ही कडा जखडल्या जातात. या प्रसंगी शोथ प्रक्रीया आणि पुनःस्थितिस्थापन प्रक्रीया दोन्ही एकाच वेळी घडत असतात. २४ तासांच्या अखेरीस रक्तरस, तंतूंचे धागे आणि श्वेत कोशिका यांनी युक्त स्राव तयार होतो. जखमा भरून येताना तंतुजनक कोशिका व केशवाहिन्यांचे प्रगुणन होते. त्याच वेळी पृष्ठभागावरील अधिस्तरीय कोशिका वाढतात व त्वचेतील फट भरून निघते. या जागी जमलेल्या महाभक्षी कोशिका (अनावश्यक बाह्य पदार्थांचे भक्षण करणाऱ्या मोठ्या एककेंद्रकी कोशिका) प्रथिने, वसा वगैरे मिळून बनलेला स्त्रावातील उरलेला भाग नष्ट करतात. काही दिवसांतच छेदाच्या जागी सलगता पूर्णतः निर्माण होते व आणखी काही दिवसांनंतर छेदाची जागा ओळखता येत नाही. कोलॅजेनाच्या धाग्यामुळे बळकटी येते. सातव्या दिवसांपर्यंत निरोगी ऊतकाप्रमाणे ताकद प्रस्थापित होते. तंतुजनक कोशिकांचे तंतुकोशिकांत रूपांतर होते. कोलॅजेनाचे धागे आकुंचन पावतात व त्यामुळे अधिक प्रमाणात निर्माण झालेल्या केशवाहिन्या बंद होतात. अशा तऱ्हेने प्राथमिक संधानाद्वारे पुनःस्थितिस्थापन पूर्ण होते.

द्वितीयक संधान : पूयीभवन कमीअधिक प्रमाणात होऊन आणि कणोतकाच्या मदतीने जे पुनःस्थितिस्थापन होते, त्याला द्वितीयक संधान म्हणतात. प्राथमिक संधानापेक्षा हा प्रकार गुंतागुंतीचा असतो. कारण कोशिकानाश, पू, रक्तन्यूलत्व, विद्रधी (पू भरलेली खळगी) किंवा व्रण तयार होणे या सर्वांवर मात करावी लागते. ऊतकन्यूनता मोठी असते व जखमेच्या कडा जवळ आणणे शक्य नसते. त्यामुळे उघड्या जखमेच्या भरून येणाऱ्या पृष्ठभागावर कणोतक तयार व्हावेच लागते. म्हणून या पुनःस्थितिस्थापनाला ‘कणोतकाद्वारा संधान’ असेही म्हणतात.

पुनःस्थितिस्थापनास प्रत्यक्ष सुरुवात होण्यापूर्वी मृत कोशिका, शेष ऊत्तक भाग, पू वगैरे हलविले जातात. विघटन, अभिशोषण आणि महाभक्षी कोशिकांद्वारे भक्षण यांद्वारे हे नको असलेले पदार्थ नाहीसे केले जातात. द्वितीयक संधानातही प्राथमिक संधानाप्रमाणेच तंतुजनक कोशिका व वाहिन्या, अंतःस्तरीय कोशिकांचे प्रगुणन, नव्या केशवाहिन्या तयार होणे या गोष्टी घडतातच. पुनःस्थितिस्थापनाची सुरुवात तळ व बाजू यांपासून होते आणि ही क्रिया पृष्ठभागाकडे वाढत जाते. सूक्ष्म रक्तवाहिन्यांच्या नवनिर्मितीमुळे जखमेचा तळ मऊ, गुलाबी व छोट्या छोट्या कणांनी युक्त दिसतो, यालाच कणोतक म्हणतात. कणोतकयुक्त तळ जखम भरून येत असल्याचा द्योतक असतो, तसेच कणोतक आच्छादित पृष्ठभाग सूक्ष्मजंतूंच्या प्रवेशास विरोध करतो.

जखमेतील मोकळी जागा प्रारंभी क्लथित रक्तरस आणि फायब्रिनच्या तंतु-धाग्यांनी भरते. तंतुजनक कोशिका वाढतात व त्या कोलॅजेनाचे तंतू पसरविण्यास मदत करतात. मागोमाग केशवाहिन्या तयार होतात. अशा रीतीने कणोतक जसे वाढत जाते तसतशा तंतुजनक कोशिका कोलॅजेन अधिक प्रमाणात स्रवतात व खड्डा हळूहळू भरून येतो. गळवामध्ये हेच घडते. शोथाचे नियंंत्रण झाले की, पुनःस्थापनास सुरुवात होते. पू काढून टाकला म्हणजे पुनःस्थितीस्थापन झपाट्याने होते. पोकळी लहान असेल, तर  फक्त कणोतकाने भरून येऊ शकते. मोठी असेल, तर भोवती तंतुभित्ती तयार होते.

काही विशिष्ट प्रकार : यामध्ये (१) संघटनाद्वारा पुनःस्थितिस्थापन, (२) रक्तवाहिनीतील क्लथाचे संघटन आणि (३)शमनाद्वारे पुन:स्थितिस्थापन यांचा समावेश होतो.

संघटनाद्वारा पुनःस्थितिस्थापन : परिफुफ्फस, पर्युदर, परिहृद् यांसारख्या फुफ्फस, उदर व हृदय यांच्या आवरणाचा जेव्हा शोथ होतो तेव्हा त्यामधील अंतःस्तरीय कोशिकांचा  नाश होतो व त्यावर स्रावाचा थर जमतो. या स्रावाचा प्रमुख घटक फायब्रीन असतो. या थरामध्ये तंतुजनक कोशिका वाढून पृष्ठभागास आच्छादण्याचा प्रयत्न करतात परंतु पूर्वीप्रमाणे आच्छादन तयार होण्यापूर्वीच समोरासमोरचे स्रावाच्छादित पृष्ठभाग एकत्र येऊन एकमेकांना चिकटतात, जखडले जातात व दरम्यानची पोकळी नष्ट होते. हे जखडणे कायमचे असते व तंतु-धाग्यांच्या ज्या पट्ट्यामुळे हे जखडणे होते त्यांना स्थायी बंध म्हणतात. या प्रकारे या पूर्ण होणाऱ्या पुनःस्थापनास संघटनाद्वारा पुनःस्थितिस्थापन म्हणतात.

रक्तवाहिनीतील क्लथांचे संघटन : वर संगितलेल्या शोथजन्य स्त्रावाच्या संघटनासारखे वाहिनीक्लथाचेही (वाहिनीमध्ये रक्त साखळून बनवलेल्या त्याच्या गुठळीचेही) संघटन होते. रक्तवाहिनीच्या अंतःस्तरापासून तंतुजनक कोशिका व अंतःस्तरीय कलिका वाढतात. नव्या सूक्ष्म रक्तवाहिन्या तयार होऊन रक्तवाहिन्या मिश्रित संयोजी ऊतक क्लथाची जागा व्यापते. या ऊतकांच्या आकुंचनाबरोबर पोकळी निर्माण होऊन त्यामधून रक्तप्रवाह पुन्हा प्रस्थपित होतो.

शमनाद्वारे पुनःस्थितिस्थापन : शोथजन्य निःस्राव प्रथिनाचे अपघटन करण्याऱ्या एंझाइमांच्या (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करण्याऱ्या प्रथिनयुक्त संयुगांच्या) परिणामामुळे (शमनामुळे) पातळ केला जाऊन व हालवला जाऊन ऊतक पूर्ववत कार्यान्वित करण्याच्या क्रियेला शमनाद्वारे पुनःस्थितिस्थापन म्हणतात.⇨न्यूमोनिया या विकांरात फुप्फुसाच्या सबंध खंडात शोथजन्य निःस्राव गोळा होतो. हा संपुर्ण निःस्राव शमनाव्दारे हालवला जाऊन वायुकोश मोकळे केले जाऊन पुन्हा कार्यान्वित होतात.

पुनःस्थितीस्थापन आणि पुनर्जनन : विकृतीविज्ञानद्दष्ट्या पुनःस्थितिस्थापन आणि पुनर्जनन या संज्ञांमध्ये थोडाफार फऱक आहे. पुनर्जननात संपूर्ण ऊतकाची नवनिर्मीती होते. मूलोतकाचे प्रमाण अधिक असलेल्या यकृतासारख्या अवयवाच्या बाबतीत पुनर्जनन शक्य असते. मानवी शरीरातील पुनर्जनन दोन प्रकारचे असते : (१) शरीरक्रियाविज्ञानद्दष्ट्या होणारे उदा., रक्तातील तांबड्या कोशिकांचे सतत चालू असलेले  अस्थिमज्जेतील (लांब हाडांच्या मधल्या पोकळीत असणाऱ्या तंतुमय संयोजी ऊतकातील) उत्पादन किंवा स्त्रीच्या ऋतुचक्रातील ठराविक वेळी होणारे गर्भाशय अंतःस्तराचे पुनर्जनन. (२) विकृतीविज्ञानद्दष्ट्या होणारे : येथे आघात, जंतुसंक्रामण इत्यादींमुळे होणारा ऊतकनाश शक्यतो भरून काढण्याचा प्रयत्न असतो.

निरनिराळ्या ऊतकांची पुनर्जननक्षमता सारखीच नसते.उदा., पृष्ठभागावरील अधिस्तरीय कोशिकांचे संपूर्ण पुनर्जनन होते, तर केंद्रीय तंत्रिका तंत्रातील [→ तंत्रिका तंत्र) तंत्रिका ऊतक कोशिकांचे पुनर्जनन कधीही हेत नाही.

पुन:स्थितिस्थापनावर काही गोष्टींचा परिणाम होतो. वार्धक्यात पुनःस्थितिस्थापनाची क्रिया मंदावलेली असते. बालवयात काही अवयवांतील पुनःस्थितिस्थापन प्रौढापेक्षा अधिक जलद असते. ऊतक जेवढे अधिक वैशिष्ट्यपूर्ण तेवढी त्याची पुन:स्थितिस्थापनक्षमता कमीच असते. स्थानीय अरक्तता, बाह्य पदार्थ किंवा अस्थिभंगात भंगाच्या दोन टोकांमध्ये स्नायू अथवा त्वचा येणे अशा कारणांमुळे पुनःस्थितिस्थापनात व्यत्यय येतो. सार्वदेहिक कारणांत शारीरिक प्रथिनन्यूनता, क जीवनसत्त्वाचा अभाव ही विलंबास कारणीभूत असतात. सूक्ष्मजंतुसंक्रामण जखम भरून येण्यात बिघाड आणते.⇨कॉर्टिसोन या हॉर्मोनामुळे पुनःस्थितिस्थापनात बिघाड होतो. हा स्राव कोलॅजेन स्रावणाच्या क्रियेत व संयोजी ऊतकनिर्मितीत व्यत्यय आणीत असावा. डीऑक्सि- कॉर्टिकोस्टेरॉइड (डोका) आणि टेस्टोस्टेरोने ही  हॉर्मोने जखमा भरून येण्याची गती वाढवतात.

संदर्भः 1. Boyd, N. Textbook of Pathology, Philadelpgia, 1961.2. Dey, N. Dey, T.  Textbook  of Pathology, Calcutta,1974.

कुलकर्णी, श्यामकांत